शिल्पकला

शरद तरडे
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

चित्र-भान

अंतरंगात ठसा उमटवणारी आणि परंपरेचा यथोचित वापर करून बहरलेली शिल्पकला खरंतर चित्रकलेतील सर्वात आव्हानात्मक प्रकार.

शिल्प म्हणजे सर्व दिशेने वेगवेगळे अस्तित्व, रूप दाखविणारी कला. लयबद्धता , रेषा, आकार, उठाव या गोष्टींना त्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. छाया प्रकाशाच्या खेळानुरूप त्याचे देखणेपण अधिकच खुलून  दिसते. अंतरंगात ठसा उमटवणारी आणि परंपरेचा यथोचित वापर  करून बहरलेली शिल्पकला खरंतर चित्रकलेतील सर्वात आव्हानात्मक  प्रकार.

एक महत्त्वाचा मुद्दा. परंपरेनुसार जोपासलेल्या मूर्तीकलेमध्ये मुख्यत्वे करून पारंपरिक संदर्भ, कलापरंपरा वापरल्या जातात. देवदेवतांच्या मूर्ती, नंदी ,कासव, यक्ष यक्षिणीपर्यंतच्या मूर्ती या कलेमध्ये येतात, तर शिल्पकलेमध्ये कलाकाराच्या मनातील  कल्पनेनुसार, जाणिवेनुसार शिल्पे बनविली जातात, त्यामुळे शिल्पामध्ये हवे तसे स्वातंत्र्य कलाकार उपभोगू शकतो.

शिल्पाचे चैतन्य हा कलाकाराच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. त्याच्या भाववृत्तीचे स्पंदन  कलाकृतीतून जाणवले तरच ती कलाकृती श्रेष्ठत्वाला जाऊन पोचते. म्हणूनच मायकेल अँजेलो, हेन्री मूर, राम सुतार, नानासाहेब करमरकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची शिल्पे; त्यातील रेषा, सौष्ठव, गती यांची रचना; त्यांचा एकमेकांशी साधलेला संवाद हा त्यांच्या शिल्पाशी साधलेल्या सुसंवादाचे अप्रतिम प्रतीक म्हणून श्रेष्ठ पावतात.

भारतातील अनेक देवालयांमधील विषयानुरूप तयार झालेली शिल्पे आपल्याला वेगळ्या भावविश्वात घेऊन जातात. दक्षिणेकडील अनेक मंदिरांच्या रचना पाहिल्यानंतर त्या-त्या काळातील वास्तुरचनेमधील सुनियोजित सौंदर्यस्थळे म्हणून मान्य पावली आहेत.

कोणार्कचे सूर्यमंदिर, खजुराहोमधील काम शिल्पे, वेरूळमधील कैलास लेण्यांमधील धीरगंभीर शिल्पे, स्तूप यांच्या अप्रतिम रचनांपासून पट्टदकल या बदामीजवळच्या गावी वेगवेगळ्या वास्तुशैलीतील मंदिरांच्या पायरीपासून कळसापर्यंतच्या अनेक टप्प्यांतील रचना कलारसिकांचे मन मोहून घेतात.

आधुनिक शैलीतील वास्तूरचनेमध्ये शिल्पकलेला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. शहरांच्या रचनेमध्ये (Town Planning) मोठे चौक, स्टेडियम, बागा, रंगमंदिरे, जलतरण तलाव, विमानतळ, रेल्वे स्थानकांपर्यंतच्या सुशोभिकरणामध्ये शिल्पकलेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कलेची परंपरा, प्रसन्न वातावरण निर्माण करण्यापासून संवेदनशील समाज निर्माण करण्यापर्यंतची सर्व कार्ये ही शिल्पे पिढ्यानपिढ्या करीत आली आहेत. त्यामुळे शिल्पाच्या निवडीचे, उभारणीचे, त्या शिल्पामुळे समाजावर होणारे संस्कार,  परिणाम हे आव्हान कायमच कलाकारांसमोर, वास्तूरचनाकारांसमोर राहिले आहे.

बंगले, इमारती, घरातील व्हरांडे, कोनाडे यामध्ये लावण्यात येणारी छोटी-मोठी शिल्पे नुसती सुशोभीकरणासाठी नव्हे, तर त्या वास्तूचे व्यक्तिमत्त्वही दर्शविणारी असतात. अंतर्गत रंगसंगती, फर्निचर यांच्या आकाराशी निगडित शिल्पे वेगळे विश्व निर्माण करतात. धातू, लाकूड, संगमरवर,फायबर  यामध्ये बनवलेली शिल्पे आकर्षक दिसतात. हेन्री मूर या पाश्चात्त्य कलाकाराचे अमूर्त शैलीतील 'मदर अँड चाइल्ड' हे  शिल्प लयबद्धतेचे प्रतीक म्हणून गणले जाते. रुग्णालये, मातृमंदिर येथे अशा प्रकारची शिल्पे विषयानुरूप वाटतात. लोखंड, स्टील या धातूंचा वापर केलेली मूर्त, अमूर्त आकाराची मोठी शिल्पे सार्वजनिक ठिकाणी लावली जातात आणि ती लक्षवेधक ठरतात. 

वास्तू रचनाकार आणि शिल्पकार यांच्या सुनियोजित निर्माण प्रक्रियेतूनच वास्तूशी निगडित शिल्पकृती तयार करण्यात  येतात. वास्तूचा विषय, व्यक्तिमत्त्व, आकारमान करण्यात याचा विचार करून शिल्पाचा विषय ठरविला जातो, आकार ठरविला जातो. शिल्पाची संकल्पना पटल्यावर शिल्पाची छोटी प्रतिकृती तयार करून तो वास्तूच्या प्रतिकृतीवर ठेवून बघितली जाते. या पद्धतीमुळे शिल्पाची उंची, रुंदी, रंगाचा अंदाज करता येतो आणि कामामध्ये अचूकता येण्यास या मदत करतात. वेगवेगळ्या प्रकारचे दगड, धातू, फायबर ग्लास, काच, सिरॅमिक, सिमेंट आदींचा वापर करून शिल्पे बनवली जातात.  नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या  स्थानिक दगडांतून पारंपरिक पद्धतीने मूर्ती घडविल्या जातात आणि त्या त्या स्थानिक हवामानात शतकानुशतके चांगल्या राहतात.  अलीकडच्या काळात धातूचा वापर शिल्पकृतीसाठी मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. धातूच्या शिल्पास त्याच्या वजनामुळे काही मर्यादा येतात शिवाय खूप मोठ्या आकाराची शिल्पे बनविण्यास खूप वेळ आणि खर्चही लागू शकतो. तेच काम नैसर्गिक दगड, फायबर, प्लास्टिक, सिमेंटमध्ये बनविल्यास खर्च आणि वेळेची बचत होऊ शकते. चंडीगड येथील ‘रॉक गार्डन’पासून ते मोठ्या आकाराची देवळे, स्तूप याची साक्ष देतात. 

मुंबईतील मुलुंड येथील एका मोठ्या वास्तू प्रकल्पातील शिल्पाची उभारणी करताना ‘पंचतत्त्वे’ या संकल्पनेचा वापर करायचे ठरले. अग्नी, वायू, आकाश, पाणी आणि पृथ्वी यांचे एकमेकांशी असलेले नाते या शिल्पाद्वारे दर्शविण्यात आले आहे.

या शिल्पकृतीमध्ये माणसांच्या एका समूहाने गतिशील वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी यांना सामावून घेतले आहे आणि चहूबाजूस असलेल्या जलतत्त्वाने त्या शिल्पास तोलून धरले आहे. पाण्यामध्ये पडणाऱ्या शिल्पाच्या प्रतिबिंबामुळे त्याचे जडत्व आणि काठिण्य कमी झाल्यासारखे जाणवते. इतकेच नव्हे, तर पाण्यावर उठणाऱ्या तरंगामुळे दृष्टिमनात त्याची घनताही कमी झाल्यासारखी जाणवते. 

‘कॉमनवेल्थ गेम ०८’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवानिमित्त पुणे शहराच्या सुशोभिकरणासाठी उभारण्यात आलेल्या 'ऱ्हिदम अँड बॅलन्स' या संकल्पनेचे  शिल्पही मी साकारले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून औंधकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ब्रेमेन चौकाच्या अलीकडे हे शिल्प उभारण्यात आले आहे. खेळाडूंमध्ये ‘लय आणि तोल’ या बाबींना खूप महत्त्व आहे किंबहुना लय आणि तोल नसेल तर त्या खेळाडूच्या क्रियाशक्तीला अर्थ राहत नाही. त्यामुळे या शिल्पात स्त्री आणि पुरुष यांचे द्योतक असलेल्या दोन लवचिक, लयबद्ध आणि वळणदार अमूर्त आकारांनी पृथ्वीरूपी चेंडू तोलून धरला आहे.

‘कल्पवृक्ष’ या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्याला महत्त्व देणारे शिल्प पुण्याजवळच्या वाकड परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आले आहे. पंधरा फूट उंचीचे हे शिल्प निळसर रंगात रंगविलेले आहे. याच्या पानांमध्ये जे डिझाईन कोरण्यात आले आहे तेदेखील नैसर्गिक पानाचा आधार घेऊन केले आहे. या कल्पवृक्षाभोवती फेर धरून आपला आनंद व्यक्त करणारे, त्याला जपणारे, त्यावर प्रेम करणारे लोक दाखविले आहेत. तसेच वृक्षावर पाने, फुले, पक्षी यांच्या रचना असून त्याद्वारे निसर्गातील विविध घटक आणि माणसामध्ये एक प्रेम बंध निर्माण होण्यास मदत होईल, अशी या कल्पवृक्षाची संकल्पना आहे . अशा शिल्पकृतींमुळे केवळ वास्तूच नव्हे, तर एक वेगळे 'वास्तू-शिल्प' निर्मितीचे भाग्य कलाकार, वास्तूरचनाकाराला मिळते आणि रसिकांच्या हृदयात ती कायमची वास्तव्य करतात.

संबंधित बातम्या