चित्र विचार!

शरद तरडे
सोमवार, 13 डिसेंबर 2021

चित्र-भान

‘चित्र-भान’या सदरात आपण चित्र कशी पाहावीत, ती वारंवार पाहिल्यानेच चित्ररसिकाची दृष्टी तयार होते हे आत्तापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आले असेलच! आत्तापर्यंत मी माझे काही चित्रविषयक विचार मांडत होतो. या लेखामध्ये आपण काही प्रसिद्ध चित्रकारांची मते लक्षात घेणार आहोत. त्याची ही मते त्यांचे स्वतःचे चिंतन, अभ्यास, अनुभव यावर अवलंबून आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. 

“मी  दिवसेंदिवस माझ्या रेखाचित्रांवर काम करत असताना, पूर्वी जे अशक्य  वाटत होते, ते आता हळूहळू शक्य होत आहे. हळूहळू, मी निरीक्षण आणि इतर गोष्टी  शिकत आहे. मुख्य म्हणजे माणसांचे भाव अगणित आहेत  जितके चेहरे  नाहीत.’’ व्हॅन गॉग यांचे हे विचार जरी मागील शतकातील असले तरी अजूनही ते लागू आहेत. माणसांचे भावविश्व एवढे प्रचंड आणि वैविध्य पूर्ण आहेत की त्याचे मोजमाप  अशक्य आहे.

“रसिक अनेकांच्या कला पाहत असतो आणि त्यात रमतोही, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्या कलाकारांकडून प्रेरणा घेतो, अनेक प्रकारचे अनुभव, वेगळे भाव विश्व रंगवणारी चित्रं पाहून त्यांनाही काही वेगळं करायची प्रेरणा नक्कीच मिळते म्हणूनच "खरा कलाकार हा प्रेरणादायी नसून इतरांना प्रेरणा देणारा असतो,” असे साल्वाडोर दाली म्हणतात.

रविंद्रनाथ टागोरांच्या मते, “कला ही व्यक्तीद्वारे वैश्विक अभिव्यक्ती आहे” प्रत्येक कलाकाराला एक दृष्टी असते आणि त्याच्याकडे तीव्र संवेदनशीलता असते. कला ही एक माध्यम आहे ज्याद्वारे त्याचे भावनिक अनुभव आणि नैतिक निर्णय त्यांचे रस्ते  शोधतात, असे ते म्हणतात.

“मी माझी चित्रे शक्य झाली तर रोज बदलून नव्याने काढण्याचा प्रयत्न करेन, कारण रोज नवे विचार, नवी स्वप्ने उदयाला येतच असतात. त्यामुळे कालचे चित्र आजच्या मनाच्या बैठकीत नीट बसू शकत नाही. मला एकाच शैलीतील चित्रे काढणे मुळीच आवडत नाही. उलट माझे चित्र दुसऱ्या दिवशी मलाच ओळखू आले नाही तर मी स्वतःला भाग्यवान समजेन!” हे विचार आहेत आमचे गुरू चित्रकार अरुण पाथरे यांचे; ज्यांच्याकडे आम्ही ‘गुरुकुल’ पद्धतीने चित्रकला शिकण्याचा प्रयत्न केला. 

चित्रकार प्रभाकर बरवे म्हणतात, की कोणताही अनुभव हा अमूर्तच असतोच. जसं आपण संध्याकाळी एखाद्या ठिकाणी उभे आहोत आणि वारा वाहतो आहे; तर यातल्या सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगता येतील अशा नसतात (उदाहरणार्थ, वाऱ्याची झुळूक नेमकी कशी होती हे स्पष्ट शब्दांत सांगता येईल का?) बरवे यांच्या ‘मॉडर्न आर्ट’ला आक्षेप घेणाऱ्या एका चित्रकाराला त्यांनी, ‘तुम्हाला फिगरेटिव्ह चित्र म्हणजे मूर्त चित्र वाटतात का?’ असं विचारलं होतं.  दुसरीकडे नेहरू सेंटरमधल्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं, “मॉडर्न आर्ट कळत नाही असं लोक म्हणतात. आता संगणक किंवा अशा आधुनिक गोष्टी आहेत, त्यांचं आकलन केवळ बघून होत नाही; त्यावर बरंच वाचावं लागेल, अभ्यास करावा लागेल. मग आधुनिक चित्रकला तरी पटकन कशी समजेल?” 

“एका रंगातून दुसऱ्या रंगात जाताना कलाकार वेळेचा आणि अवकाशाचा विचार करत असतो, तो खरेतर मिनिटभराचा असू शकतो, पण ज्या वेळेस चित्र पूर्ण होते त्या वेळी रसिक मात्र त्या रंगात  तासनतास अडकू शकतो. ही मनःस्थिती ज्या वेळी दोघांना कळते त्या वेळी ते चित्र जमले असे समजावे. मनातील भावनांना अनेक प्रकारचे रंग छटा हव्या असतात पण आपल्याकडे  तसे रंग नसतात तरीही आपण चित्र काढतोच, कधी ते फसते तर कधी ते संपल्यानंतर कळते की सगळे किती छान जमले आहे .

आपण पेंटिंग करून पाहतो, त्या प्रक्रियेचा आनंद घेतो. जेव्हा ते रसिकांच्या नजरेला पडते त्यावेळी  ते  त्यांच्या मनात बहरू लागते, वाढू लागते. त्यामुळे ते पेंटिंग स्वतःची एक जागा निर्माण करते. प्रत्येक क्षणी ते वेगळे भासते . सकाळी, दुपारी, संध्याकाळी ते  मूडप्रमाणे वेगळे भासू शकते. ज्या वेळी एखादे पेंटिंग बघणाऱ्याला आपलेसे करते त्या वेळी ते  पेंटिंग चांगले झाले, असे समजावे, हे मत आहे कर्नाटकातील ज्येष्ठ चित्रकार, लेखक चंद्रकांत कुसनूर यांचे. 

चित्रकार, कवी भ. मा. परसावळे यांच्या मते, “अर्थाशिवाय चित्र पाहणे हे रसिकांना मान्य नाही. अर्थ निरपेक्ष निर्मिती म्हणजे -अमूर्त चित्रं -ती विशुद्ध कला आहे. त्याला जोपर्यंत सौंदर्यमूल्य प्राप्त होत नाही तोपर्यंत ती एक उत्कृष्ट होत नाही.  त्यात आशय शोधू नये. तो चित्रकाराचा स्वतःचा शोध आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. चित्राचे तंत्र शिकता येते पण चित्र काढणे शिकवता येत नाही.

लयीचा खेळ चित्रात असेल तर ते जिवंत चित्र दिसते. रंगांचा उत्सव चित्रात असायलाच हवा. आशय आणि विषय बाजूला ठेवून चित्र पाहायला शिकायला पाहिजे. चित्रातील लय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती  चित्राचे हळुवार विभाजन करते तर कधी ते चित्र त्यामुळे एकसंध भासते. रचना आणि लय हे चित्रातील फार  महत्त्वाचे  घटक आहेत. लय ही  काव्य, संगीत, शिल्प, चित्र, नृत्य यातील  प्राणभूत घटक आहे.”

आपल्याकडे चित्रविषयक लिहिले जात नाही. चित्राचीसुद्धा एक भाषा असते, हे आपण विसरलो आहोत. चित्रकाराने चित्राच्या भाषेतून विचार करायला पाहिजे, तसा प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी मी वीस-बावीस वर्षे प्रयत्न केले. चित्र रंगविणे हीच आपली भाषा झाली पाहिजे. चित्रकारांनी सतत चित्र काढली पाहिजेत, स्वतःचा शोध घेतला पाहिजे. चित्र काढून ते कागदावर, कॅनव्हासवर संपू शकते पण ते मनातून कधीच संपत नाही. त्यामुळे चित्रकार  पुन्हापुन्हा नव्याने चित्र काढायचा प्रयत्न करतो आणि अमूर्त चित्रांमध्ये ही संधी जास्त आहे, कारण ती एका विचाराला बांधून ठेवत नाहीत. अमूर्त चित्राला विचार नाही तर तुम्हीच एक विचार आहात!  तुम्हाला दर वेळेला नव्याने चित्र काढायची त्यात संधी असते हे खूप महत्त्वाचे. तुमचा स्वतंत्र कलेतील  रस्ता तुम्ही तयार करू शकता.
-चित्रकार प्रभाकर कोलते

संबंधित बातम्या