चित्रप्रक्रिया

शरद तरडे
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021


चित्र-भान

चित्रामध्ये बरेच काही असते आणि ते बरेच म्हणजे रंग, भावना आणि संवेदना! हे बघून प्रत्येकाला ते चित्र वेगळेच दिसते. चित्र बघताना प्रत्येकाचे त्याचे वेगळे व्याकरण तयार होते आणि या व्याकरणाची मजा अशी आहे की हे व्याकरण दर वेळेला बदलतही जाते कारण तुमच्या आयुष्यातील मूड, वातावरण अशा अनेक गोष्टी जशा  बदलतात,  त्याच रीतीने तुमचे चित्राकडे बघणेही बदलते.

आत्तापर्यंतच्या अनेक चित्र प्रदर्शनात रसिकांच्या मनात महत्त्वाचा प्रश्न होता, “चित्रात बघावे काय? आणि चित्रकाराच्या मनात चित्र काढताना काय असते?” खरेतर  मनात अनेक विचार, आठवणी असूनसुद्धा  चित्रकार रंग, आकार, अवकाश यांचा मनमोकळा वापर आपल्या सर्जनशीलतेने चित्रात करत असतो. त्या क्षणी त्याचे मन अगदी निर्विकारपणे चित्रातील खेळाची मजा घेत असते. ज्या क्षणी चित्र संपते त्यावेळी चित्रकर्ताही स्वतःला बाजूला ठेवतो. 

आता ते चित्र स्वतंत्र असते त्यामुळे रसिकांनी त्याच्या आवडीने त्याचा आस्वाद घ्यावा. आपल्या मनाला जसे भावेल  त्या प्रमाणे त्याच्याकडे बघावे. शक्यतो विचार न ठेवता चित्र फक्त अनुभवावे. त्यातील रचना, रंगसंगती, त्यांचे एकमेकांशी नाते समजावून घ्यावे. ते चित्र वेगवेगळ्या वेळेस आपल्या मूड प्रमाणे पहावे ते नक्कीच तुम्हाला प्रत्येक क्षणी वेगळे जाणवेल.

आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे- “कलेमध्ये सरावाला किती महत्त्व आहे?” खरे म्हटले तर आपल्या आवडत्या कलेमध्ये आपण कायमच राहायला पाहिजे. आपल्या मनामध्ये त्याबद्दल अनेक अंगांनी सारखे विचार यायला हवेत, आणि त्या विचारांपासून नवीन काही सुचते आहे काय याचाही शोध घ्यायला हवा.

अनेक दिवस खूप सराव केल्यानंतर तो सरावही एकसारखा व्हायला लागल्यावर खूप कंटाळा येतो. त्यावेळी दोन- चार दिवस या सर्वांपासून दूर होणे आणि वेगळीच काम करणे ही गोष्ट चित्रकारासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते कारण तो सराव आणि अस्वस्थता अंतर्मनातून बाहेर गेलेली नसते तर तेथेच तिची मुळे बहरत असतात आणि एका क्षणी तुम्हाला जाणवते की आता पुन्हा आपल्याला कला परत बोलावते आहे आणि तो क्षण  आपण कधीही दुर्लक्षित करू नये.

त्या क्षणाला हाताला लागेल तो रंग आणि इतर सामग्री घेऊन ते चित्र येऊ द्यावे आणि त्याला आपण फक्त साक्षीदार असावे. हे चित्र संपल्यावर तुम्हाला लक्षात येईल की आत्तापर्यंतचा केलेल्या सर्वांपेक्षा हे खूप वेगळे आणि आपल्याला चकित करणारे चित्र तयार झाले आहे, जे पुन्हा आपल्याला कधीही करता येणार नाही! 

हा क्षण जर वारंवार येऊ लागला तर तुमच्यातील ‘कलाकार’ जिवंत झाला असे म्हणावे लागेल, नाहीतर तेच तेच काम करणाऱ्या कारागिरासारखे तेच तेच काम होत राहील! त्या  सुखद क्षणाची वाट पुन्हा पहावी लागते हे मात्र नक्की!

चित्र पहावे की वाचून बघावे?

चित्र पाहताना प्रत्येकाची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते आणि ते चित्र पाहून घेतलेला अनुभवही वेगळा असतो, त्यामुळे चित्र पहावे कसे? याचे उत्तर म्हणजे वारंवार चित्र पाहून त्याच्यातील भावना, संवेदना या आपल्या जीवनाची अनुभवाशी काही संवाद साधतात का, हे बघणे खूप महत्त्वाचे ठरते. 

प्रत्येकाला प्रत्येक रंगाची एक वेगळी आठवण असते. त्यामुळे चित्र दुसऱ्याला समजावून द्यायला  गेले तर खूप पंचाईत होते. चित्रकलेची काही तत्त्वे तुम्हाला समजावून सांगता येतील, परंतु त्याशिवाय चित्रामध्ये बरेच काही असते आणि ते बरेच म्हणजे रंग, भावना आणि संवेदना! या बघून प्रत्येकाला ते चित्र वेगळेच दिसते. चित्र बघताना प्रत्येकाचे त्याचे वेगळे व्याकरण तयार होते आणि या व्याकरणाची मजा अशी आहे की हे व्याकरण दर वेळेला बदलतही जाते कारण तुमच्या आयुष्यातील मूड, वातावरण अशा अनेक गोष्टी जशा  बदलतात,  त्याच रीतीने तुमचे चित्राकडे बघणेही बदलते.  खूप चित्र पाहणे, पाहण्याचा  रियाज करणे आणि, रियाज करताना ते वाचणे,  हेच खरे चित्राचे व्याकरण आहे असे मला वाटते! हा रियाज करताना कुठल्याही चित्राची बघून नक्कल करू नये कारण ते चित्र दुसऱ्यांचे असते. 

यावर एक गोष्ट आठवली, मध्यंतरी माझ्या एका मित्राने ही महत्त्वाची गोष्ट सांगितली... माझा तो मित्र त्याच्या एका मित्राच्या घरी गेला असता त्याच्या मुलाने काढलेली चित्रं दाखविली. ती सर्व कॉपी केलेली होती आणि त्या चित्रांखाली त्याने आपली सही केली होती, त्यावर त्या चित्रकार मित्राने त्या मुलाला विचारले, ‘तू ही चित्रं पाहून काढलीस का?’ तो हो म्हटल्यावर माझ्या मित्राने एका कागदावर ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार’ ही कविता पूर्ण लिहिली आणि त्याखाली स्वतःची सही केली. हे पाहून तो मुलगा त्याला म्हणाला, ‘ही कविता मला माहीत आहे, पण ती तुमची नाही, पण तुम्ही तर तुमची सही केलीत?’

यावर माझा मित्र त्याला म्हणाला, ‘अरे, ही चित्रंही तुझी नाहीत, तू पण पाहून काढलीस ना, तरी तू सही केलीस की?’

यावर मात्र तो मुलगा ओशाळला आणि मुख्य म्हणजे नंतर त्याने कधीही ती चूक केली नाही .

नवचित्रकार, छंद जपणारे चित्रकार यांनीही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.  

कलाकारांनी कलेवर अतोनात प्रेम करावे, तिच्यासाठी रोज काहीतरी नावीन्यपूर्ण, सर्जनशील अर्पण करता यावे यासाठी प्रत्येक क्षण सार्थकी लागला असे वाटले तरच कदाचित कधीतरी वेगळे चित्र निर्माण होऊ शकेल असे वाटते आणि त्यासाठी नवनवीन माध्यमे आणि  प्रयोग करण्याचे धाडस नेहमी अंगी बाळगावे. 

एखादे चित्र माझ्या मनासारखे होत आहे; आवडत आहे, असे वाटता क्षणी माझ्याकडे नव्याने काही करण्याची क्षमता, विचार, वाटा बंदच  पडतील. त्या क्षणी जर सावध होऊन, त्रयस्थ  होऊन, साक्षी नजरेने बघायला शिकलो तरच त्यामध्ये माझा जीव अडकणार नाही, पण जर असे केले नाही तर माझ्यातला चित्रकार संपणार आणि नुसती कारागिरी होणार हे मात्र नक्की! चित्र काढण्याचा प्रक्रियेपासून जेव्हा मला वेगळे काढता येईल आणि काय घडते आहे याकडे मी पाहायला शिकेन,  त्याच  वेळी मी फक्त क्रिया करणारा राहीन, हे आता लक्षात येते. खिडकीतून आकाशाकडे, लयबद्ध हालणाऱ्या झाडांकडे, कोसळणाऱ्या पावसाकडे बघत त्यामागे लपलेली चित्रे, आकृत्या शोधत राहणे यासारखे दुसरे सुख नाही!

हा हालता, सळसळता निसर्ग केवढी ऊर्जा देतो, सुख देतो, नवीन विचार देतो हे समजले तर कुठल्याही वस्तूला जिवंत बघण्याची सवयच  लागते. त्यातला उत्साह अंगात संचारतो आणि मन त्यात रमून  जाते!

जीवनातील ही स्थित्यंतरे एकदा लक्षात आली की मग मनात त्याचाच जागर चालू होतो. प्रत्येक क्षण वेगवेगळ्या रूपाने आपल्या समोर उभा राहून काहीतरी देऊन जातो याचे भान राहते. ते स्वीकारण्याचे भान राखावे लागते.

माझ्या मते यापुढे ‘स्थित्यंतर’ हाच सर्व  कलांचा आत्मा असणार आहे असे वाटते!

(ता. १८ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘चित्रभान’ सदरातील चित्र चित्रकार   प्रभाकर बरवे यांचे नसून चित्रकार प्रभाकर कोलते यांचे आहे.)

(या लेखाबरोबरच ‘चित्रभान’ हे सदर समाप्त होत आहे.)

संबंधित बातम्या