रंग उत्सव!

शरद तरडे
सोमवार, 3 मे 2021

चित्र-भान

रंग म्हणजे चित्रकाराच्या स्वप्नांची मांडणी असे म्हटले तरी चालेल कारण चित्रकार नुसतीच रंगांची मांडणी करत नाही, तर रसिकांच्या मनात चित्र भावना फुलाव्यात म्हणून त्या रंगांच्या गंधाचा वापरसुद्धा करत असतो असे म्हणता येईल.

पूर्ण चित्रामध्ये अगदी फिकट रंगाचा एखादा आकारसुद्धा पहाणाऱ्याचे लक्ष वेधून घेऊ शकतो. चित्रातल्या रंगांचे आपापसातले संवाद एकदा आपल्या लक्षात येऊ लागले की मग ते चित्रच आपल्याशी मूकपणे संवाद साधू शकते.

संध्याकाळच्या आकाशाचा हलका रंग, त्यावर विखुरलेले पांढरट ढग, वाऱ्यामुळे त्यांची होणारी हळुवार हालचाल, घरांकडे निघालेले रंगीबेरंगी पक्षी...  हे सर्व पाहिले की ते रंगही हळुवारपणे आपल्या मनाला त्यांच्या दुनियेत घेऊन जातात, काही वेळा आठवणींमध्ये रमायला लावतात आणि मग आपण स्वतःला विसरून जातो.

दगडाचे पिवळे, तपकिरी, काळसर रंग, झाडांच्या पानांचे विविध रंग जसे हिरवे-पिवळे किंवा तांबडे. डोंगरांचे हिरवे, जांभळे रंग. बर्फाच्छादित पांढरी शिखरे. गवताचे सोनेरी रंग. फुलपाखरांचे रंगीबेरंगी पंख. आकाशातील निळ्या रंगाच्या अनेक छटा, झाडांचे अनेक रंगातील बुंधे, पाण्यातील प्रतिबिंब या सर्व वस्तू चित्रात आपल्या हव्या तशा पद्धतीने  रंगविण्याचे कसब चित्रकाराच्या हाती असते. खरंतर चित्रकार हा त्याच्या मनातील निसर्ग आपल्याला दाखवत असतो. जो आपण नेहमी पाहतो त्यापेक्षा तो निसर्ग नक्कीच वेगळा असतो.

निसर्गाची विविध रूपे आपल्याला अनेक शतके भूल घालीत आहेत. त्यातून निसर्गचित्र हा प्रकार आला आणि तो सर्वांना भावला. अगदी लहान मूल देखील डोंगर, सूर्य अगदी सहजरीत्या काढत असते.

निसर्ग दृश्यातील ते रंग, आकार, दृश्य आपल्या मनाप्रमाणे निवडून ते चित्ररूपी माध्यमातून आपल्या समोर नव्या पद्धतीने, रचनेने मांडण्याचे काम चित्रकार करीत असतो असे म्हणता येईल.

आपण या रंगांकडे पाहू लागलो की ते आपल्याशी बोलतात, हळूवार संगीत ऐकवतात! 

चित्रकाराला जर या रंगांची सांगड अप्रतिमपणे घालता आली असेल तर ते चित्र पाहणाऱ्याला संगीतातील एखादा रागही आठवेल हे नक्की.

मध्यंतरी माझ्या एका प्रदर्शनातील चित्रावर एका संगीत प्रेमी रसिकाने फार सुंदर अभिप्राय दिला होता. एक चित्र बघून ते म्हणाले, ‘‘हे चित्र मी खूप वेळ बघत आहे. मला तरी यात संगीताचे स्वर आळवलेले  दिसतात!’’  नंतर समजले की त्यांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती. म्हणजेच आपली आवड, आपले विचार यावरही चित्र कसे दिसेल ते अवलंबून असते असे म्हणता येईल.  

 मनात रुजलेल्या अशा अनेक कल्पना चित्र, काव्य, कलेतील अनेक प्रकार बघून रसिक व्यक्त होतात आणि मग ते त्या कलेशी अखंडपणे जोडले जातात.

हे जे रंग तुमच्याशी संवाद साधत असतात, कधी ते गुणगुणतात, कधी कधी ते तुमची सुख दुःख ऐकतात असे वाटते; हे सर्व संवेदनशीलतेने समजण्यासाठी डोळे, कान, नाक आणि आपले स्वच्छ मन नेहमीच तयार असायला पाहिजे हे मात्र नक्की. रंगांशी निगडित असलेल्या आठवणी, अनुभव आपल्याला साद घालत असतात, त्याचा आपण कुठल्या संस्कृतीत वाढलो, आपल्यावर कसे संस्कार झाले यांचा खूप जवळचा संबंध असतो.

चित्र हे जरी प्रेक्षकाच्या दृष्टीने संवेदना उलगडण्याचे द्वार असले तरी चित्रकार ज्यावेळी विविध रंगांचा विचार चित्रांमध्ये प्रयोग करताना करत असतो, त्यावेळी मात्र तो रंगांचे वरवरचे भाव लक्षात न घेता त्यांच्या अंतरंगाकडे बघण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण हे रंग जर अंतर्मनातून उमटले तरच त्याला ते जवळचे वाटतात. कधीकधी तो अनेक रंगांचे मिश्रण करून वेगवेगळे ‘मनभावन रंग’ तयार करून वापरत असतो. त्या चित्रात कुठल्या रंगाचे शेजारी कुठल्या रंगाचे अस्तित्व, किती जाणवून  द्यायचे आहे पण त्याला ठरवायचे असते.

चित्रातील वेगवेगळे आकार, रेषा, अवकाश आणि रंग यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याचा योग्य मिलाफ करून चित्रात आनंदी वातावरण तयार करणे हे केवळ एका सर्जनशील कलाकाराला जमू शकते.

रंग जसे दिसतात त्याच प्रकारच्या भावना चित्रात बहुधा कधीच नसतात. त्यांचा एकत्रित अनुभव हा खूप वेगळा असतो. तो अनुभव जर तुम्हाला चित्रापासून दूर नेणारा ठरला तर तो चित्रकार आणि रसिक यांनाही चित्रापासून मुक्त करून वेगळ्या विश्वात घेऊन जातो असे वाटते.

प्रत्येक रंगाचा रसिकांवर होणारा परिणाम आणि चित्रकार चित्र काढतो तेव्हा त्याच्या मनातील भावना वेगवेगळ्या असतात हे आपण याआधी बघितले आहे. पण प्रत्येक रंग हा वेगवेगळ्या प्रकाराने रस उत्पत्ती करत असतो हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे.

निळसर रंगाच्या छटा रसिकांना शांत वाटतात तर त्या शेजारी गर्द जांभळा, काळा रंग आला तर त्या गूढ वाटतात. त्यामुळे मनामध्ये भयाची भावना निर्माण होते. तर नारिंगी, लाल रंग बघितल्यावर उत्साह वाटतो; यालाच वीर रस म्हणतात. पिवळ्या रंगाच्या छटा मनात उत्साह उत्पन्न करतात. कधी कधी हे सर्व रंग चित्रात आले तरी ते कुठल्याही भावना जागृत नाहीत अशा वेळी ती चित्ररचना बिघडली आहे असे समजावे. सर्जनशील चित्रकार दर वेळेला रंगांचे एकमेकांशी असलेले नाते नव्याने जाणण्याचा प्रयत्न करीत असतो. तो रंगसंगतीतील नव्या रचना, त्या मागचे मर्म नव्याने शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यावेळी कलाकृतीही नव्या पद्धतीने गवसते आणि रसिकांना ही त्याची साथ लाभली तर दोघांचाही आनंद द्विगुणित होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या