आव्हाने शोधताना!

उमेश झिरपे
सोमवार, 25 जानेवारी 2021

नोंद
 

एकोणीस डिसेंबर २०२० रोजी गिरिप्रेमीच्या सात प्रस्तरारोहकांनी नाणेघाट परिसरातील एका सुळक्यावर नवीन मार्गाने यशस्वी चढाई करत गिरिप्रेमीच्या मानपेचात आणखी एक तुरा रोवला. या सुळक्यावर अतिशय खडतर अशा उत्तर बाजूने चढाई करत नवीन चढाई मार्गाची आखणी केली व या मार्गाला नाव दिले ‘कळमजाई’. या नावाची प्रेरणा मिळाली सुळक्याजवळील गावातील देवीच्या मंदिरावरून. स्थानिक लोकांशी, भावनांशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे नामकरण केले, हे विशेष.    

खडतर आव्हाने सर्वांना पेलवता येतीलच असे नाही. आव्हानांचा सामना करताना ती कधी संपतील असेच विचार अनेकांच्या मनात येत असतात. याला काही अंशी अपवाद ठरतात ते गिर्यारोहक. जेवढे आव्हान खडतर तेवढाच जास्त उत्साह गिर्यारोहकांना असतो. नवनवीन आव्हाने अंगावर झेलत चढाई करण्यातच गिर्यारोहकांचे सुख सामावलेले असते, हे मी स्वानुभवांवरून सांगू शकतो. अशीच आव्हाने पेलण्याचे, भीतीवर, संकटावर धाडसाने व धैर्याने मात करण्याचे कसब आत्मसात केलेल्या गिरिप्रेमीच्या गिर्यारोहक व प्रस्तरारोहकांनी (रॉक क्लायंबर्स) आव्हाने तर यशस्वीपणे पेललीच, सोबतीला नवीन आव्हानांचा शोध घेऊन ती पूर्णदेखील केली. आव्हाने शोधण्याच्या या मालिकेत नुकतेच गुंफलेले पुष्प म्हणजे ‘निरा’ सुळक्यावर तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड अशा नवीन क्लायंबिग रूटचे ओपनिंग. 

सह्याद्रीच्या उत्तरेकडील भागामध्ये असलेल्या नाणेघाट परिसर हा सातवाहन काळापासून व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणार्थ या परिसरात जीवधन, चावंड, नीमगिरी इत्यादी किल्ल्यांची माळच उभी आहे. सोबतीला हडसरसारखे किल्लेदेखील डौलाने उभे आहेत. या परिसरात उंच दगडी सुळके, रॉक वॉल्स मोठ्या संख्येने असून रॉक क्लायंबिंगसाठी अतिशय अनुकूल आहेत. मात्र, त्यामानाने म्हणावे तसे रॉक क्लायंबिंग इकडे होत नाही. येथील आव्हाने वेगळी व नवीन आहेत, अन् नेमकी हीच आव्हाने गिरिप्रेमीचे गिर्यारोहक पेलत आहेत. गेल्या डिसेंबरच्या १९ तारखेला गिरिप्रेमीच्या सात रॉक क्लायंबर्सनी नाणेघाटातील फाणगूळ गव्हाण गावाजवळील एका नव्या सुळक्यावर अत्यंत कठीण व नवीन मार्गावर रॉक क्लायंबिंग करत चढाई केली अन या १३० फुटी चढाई मार्गाला नाव दिले ‘कळमजाई’. या नावाचे वैशिष्ट्य म्हणजे सुळक्याजवळील गावामध्ये स्थित ‘कळमजाई देवी’च्या नावावरून हे नामकरण केलेले आहे. या नवीन व अनवट सुळक्यावर २ डिसेंबर २०१८ रोजी खिंडीच्या बाजूने पहिल्यांदा चढाई करून सुळक्याचे ‘निरा’ असे नामकरण केल्याचे आढळते. याच सुळक्यावर गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी उत्तर बाजूने चढाई करत रॉक क्लायंबिंगचा नवीन मार्ग आखला. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेला पाषाण काही ठिकाणी अतिशय ठिसूळ असल्याने रॉक क्लायंबर्सला आपले प्रस्तरारोहण कौशल्य पणाला लावून चढाई करावी लागली. गिरिप्रेमीच्या संघातील कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, रोहन देसाई, मारीशा शाह, ऐश्वर्या घारे, अभिराम आपटे व अंकित सोहोनी यांनी सुळक्याच्या उत्तर दिशेच्या पायथ्यापर्यंत घनदाट जंगलातून वाट शोधत पाठीवर प्रस्तरारोहणाचे जड साहित्य घेऊन मार्गक्रमण केले. चढाई करत असताना फ्रेंडस, बॉल नट्स, पिटॉन्स, बोल्ट तसेच नॅचरल अॅन्कर्स यांचा वापर केला. चढाई करताना १३० फुटी मार्गावर दोन स्टेशन्स लावले. ठिसूळ कातळ व मधल्या टप्प्यात असणाऱ्या ओव्हरहँग (९०°पेक्षा अधिक कोनातील चढाई) आणि अंतिम टप्प्यात असणाऱ्या स्क्री (घसारा) यामुळे ही चढाई अधिक आव्हानात्मक झाली होती. या सर्व गिर्यारोहकांनी ही सर्व आव्हाने पेलत अवघड असे प्रस्तरारोहण करून शिखर गाठण्यात यश मिळविले व गिरिप्रेमीची नवनव्या सुळक्यांवर चढाई करण्याची चालत आलेली परंपरा अखंडपणे अशीच चालत राहील हे सिद्ध केले.

या आधी म्हटल्याप्रमाणे ‘कळमजाई’ हा चढाई मार्ग आखणे म्हणजे नवीन आव्हानांचा शोध घेऊन या आव्हानांवर मात करणे. या आधी २६ जानेवारी २०१८ला गिरिप्रेमीच्या रॉक क्लायंबिंग संघाने याच परिसरातील हडसर किल्ल्याच्या रॉक वॉलवर ३०० फुटांचा नवीन मार्ग आखला व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही चढाई केल्याने या मार्गाचे नामकरण केले ‘हडसर रिपब्लिक’. याच प्रमाणे जीवधन किल्ल्याजवळ दोन नव्या कड्यांवर चढाई केल्यावर त्याचे नामकरण केले ‘शिवगिरी’. शिवछत्रपतींचे जन्मस्थान शिवनेरी किल्लादेखील याच परिसरात आहे. तसेच जीवधनसारखे किल्ले शिवरायांचा  वैभवशाली इतिहास सांगतात. या सर्वांचे भान ठेवूनच सुळक्याचे नामकरण ‘शिवगिरी’ ठेवले आहे. येथील सुळक्यांना, किल्ल्यांना स्थानिक संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे, त्यामुळे अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या कातळकड्यांवर चढाई करताना, नवीन मार्ग आखताना इतिहासाचे भान ठेवून, स्थानिक भावनांचा आदर करूनच स्थानिक प्रतीकांचे नामकरण सुळक्यांना, नवीन मार्गांना करण्यात येते व कृतज्ञभाव व्यक्त केला जातो. 

सरत्या वर्षात ‘कळमजाई’ झाले, मात्र आव्हानांचा हा प्रवास इथेच थांबणार नाही. नाणेघाट परिसर असो वा सह्याद्रीचे असंख्य कातळकडे, गिरिप्रेमीचे शिलेदार नवीन आव्हानांचा शोध घेतील व आव्हानांवर मात करतील व आव्हानांची शोधमालिका अविरतपणे चालू ठेवतील.

संबंधित बातम्या