खासगीपणाची किंमत...

योगेश बोराटे
सोमवार, 25 जानेवारी 2021

चर्चा

“अरे, 'नेटफ्लिक्स'नं सोशल मीडियाविषयीची एक डॉक्युमेंट्री काढलीय. बघा. काय बरं तिचं नाव... हं.... ते हे.... आपलं.... थांबा, एक मिनीट, गुगल करतो.... हं, ‘सोशल डिलेमा’. भारी झालीय...” आपल्या नेहमीच्या गप्पांच्या कट्ट्यावरचा आणि आता तसा नेहमीच्या प्रकारातला हा एक संवाद. तुम्ही वास्तव जगामधून एकदम डिजिटल दुनियेमध्ये ‘स्वीच’ होता आणि पुन्हा वास्तवाच्या दुनियेत येत वास्तवातले व्यवहार सुरू ठेवता. 

गप्पांचा फड रंगायला सुरुवात झालेली असते. हातातला मोबाईल आपलं वास्तव आणि डिजिटल दुनियेतलं अंतर टिचकीसरशी दूर करत राहातो. दरम्यानच्याच काळात टेबलवरचा बारकोड मोबाईलवर स्कॅन होऊन ऑर्डर प्लेस झालेली दिसते. आपल्या प्रायव्हसीवर कसं आक्रमण वगैरे झालंय, याच्या चर्चा रंगात येता - येताच तुमच्या टेबलवर ऑर्डर आलेली असते. तुमचा सर्वांचा एक सेल्फी झालेला असतो. टेबलवर नुकत्याच आलेल्या डिशचा फोटोही मिळालेला आहे. कट्ट्यावरचा तुमच्यापैकीच कोणी तरी एकजण थोडं कॅज्युअली “अरे छोडो यार ये बकवास...,” म्हणत फेसबुकला लॉगिन झालेला अाहे. आजच्या कट्ट्यावर जे- जे कोण आहे, त्या सगळ्यांना टॅग करून झालेलं असतं. “आजकी ट्रिट .... के नाम,” वगैरे वगैरे म्हणत तो तुमचा सर्वांचा सेल्फी, ती टेबलवरची डिश, तुम्हा सगळ्यांसाठीचे प्रोफाइल टॅग्ज् असं सगळं काही त्या पोस्टचा मजकूर म्हणून फेसबुकवर पोस्ट झालेलं दिसतं. 

प्रायव्हसीवरच्या आक्रमणाच्या तुमच्या त्या गप्पा अर्धवटच राहतात. सेल्फीमध्ये कोण कसं दिसतंय, कोण टॅग करण्यासाठी सापडत नाहीये, तिकडं पलीकडं लगेच लाईक करायला कोण बसलंय वगैरे वगैरेच्या गप्पा सुरू झालेल्या असतात. तुमची प्रायव्हसी मागे पडलेली असते. तुम्ही ती कधीच मागे सारलेली असते, केवळ गप्पांच्याच संदर्भानं नाही, तर कृतीच्या संदर्भानंही! कारण दरम्यानच्याच काळात तुमचं ठिकाण, तुमच्या मित्रमंडळींची माहिती, तुमच्या कट्ट्यावरच्या टेबलवरचा पदार्थ, तुमचे चेहरे वगैरे वगैरे जगजाहीर झालेलं असतं. ती फेसबुकवरची पोस्ट फक्त पोस्ट नसते, तर तो अशा नानाविध माहितीचा खजिना असतो. आपण स्वतःच तो तयार करत चाललो आहोत. इतरांसाठी वाटतही चाललो आहोत. आपल्या आजूबाजूला सगळीकडेच हे असंच काहीसं सुरू आहे ना? ही एक छोटीशी झलक आहे, आपल्या आजूबाजूच्या डिजिटल समाजरचनेची आणि त्यापाठोपाठ पुढं येणाऱ्या ‘प्रायव्हसी’, अर्थात तुम्हा-आम्हाला प्रत्येकालाच जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या खासगीपणाविषयीच्या चर्चांची. निमित्त आहे अर्थातच ‘व्हॉट्सअॅप’ने नुकत्याच पुढे आणलेल्या त्यांच्या नव्या खासगीपणाविषयक धोरणाचं. वास्तविक आता या धोरणाविषयी झालेल्या चर्चांच्या परिणामामुळे ‘व्हॉट्सअॅप’नं या धोरणाची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. मात्र, त्यामुळं हा विषय संपला असं नाही. या निमित्तानं हा संपूर्ण घटनाक्रम ज्या एका आधुनिक व्यवस्थेशी निगडित आहे, ती तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, त्या आधारे केवळ वास्तवातच नाही, तर आभासी वास्तवातही पुढं येणारी डिजिटल समाजरचना, त्यामुळं उदयाला आलेली डिजिटल संस्कृती आणि या नव्या समाजरचनेमधील व्यवहार अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  

मुळातच डिजिटल समाजाची निर्मिती ही तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रित प्रक्रियांमधून होत चालली आहे. पर्यायानं या समाजाचा भाग होण्याची इच्छा असणाऱ्यांना तंत्रज्ञान टाळून या समाजामध्ये प्रवेश करणं सध्या तरी शक्य नाही. स्मार्टफोन्स आणि तुम्ही- आम्ही सध्या वापरत असणारी वेगवेगळी अॅप्लिकेशन्स हा अशाच तंत्रज्ञानाचा एक भाग. आपण स्मार्टफोनला स्पर्श करून, अॅप्लिकेशन वापरायला सुरुवात करून या डिजिटल समाजाचा भाग होऊ लागलोय. व्हॉट्सअॅप म्हणा किंवा आणखी कुठलं वेगळं अॅप्लिकेशन, हे सगळं त्याचाच एक भाग. आपल्या संवादाची गरज भागवण्यासाठी म्हणा, आपल्या वास्तवातील व्यवहारांना पर्याय म्हणून म्हणा किंवा निव्वळ करमणूक म्हणून म्हणा, आपण या त्या-त्या वेळी त्या डिजिटल समाजाचा भाग बनत राहतो. अशी अॅप्लिकेशन्स आपल्याला आपली काही माहिती विचारतात, आपण ती स्वतःहून देतो. मर्यादित स्वरूपात त्या अॅप्लिकेशन्सना आपल्या खासगी आयुष्यातील माहिती गोळा करण्याची मुभाही देतो. अनेकदा ही बाब तंत्रज्ञानाविषयीच्या अज्ञानामधून घडते तर अनेकदा अत्याधुनिक तंत्रज्ञान अधिक प्रगत होत असताना मानवी समज आणि ज्ञानावर मात करत वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करत राहते. तुम्ही तुमचं लोकेशन टॅग केलेलं नसतानाही, बऱ्याचदा गुगल तुम्हाला तुम्ही भेट दिलेल्या जागेविषयी तुमची मतं विचारतं, ती अशीच. खरी गोची होती ती या टप्प्यावरच. आपण आपल्याला हवंय, तेवढंच इतरांना सांगतोय-दाखवतोय ही जाणीव प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. त्याचवेळी आपल्या परोक्ष तसं झालं, तर ते आपल्या खासगीपणावरचं आक्रमण ठरतं आणि तिथूनच पुढे आधुनिक तंत्रज्ञान की खासगीपणा? नवी पद्धत की सरधोपटपणा? असे नानाविध प्रश्न पुढे यायला सुरुवात होते. 

आपण असे प्रश्न तयार करताना डिजिटल समाज, डिजिटल समाजामधील व्यवहारांची क्लिष्टता आणि त्यांचा वेग, तुमचं- आमचं आभासी वास्तव आणि त्याच्या वेगळेपणाविषयीची मूळ जाणीव असे गंभीर मुद्दे विसरतो. त्यामुळेच की काय मग एकीकडे ‘व्हॉट्सअॅप’ अनइन्स्टॉल करण्याचा सपाटा लावला जातो, तर दुसरीकडे लगेचच पर्यायी अॅप्लिकेशन्सची जंत्री वाढते, त्यांचं बाजारातलं मूल्यही वाढू लागतं! मूळ प्रश्न हा अॅप्लिकेशनमधील बदलत्या तांत्रिकतेचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या खासगीपणाविषयीच्या गंभीर प्रश्नाचा होता, हा भाग त्यात कधीच मागे पडलेला असतो.  आपण पारंपरिक समाजाच्या चौकटीमध्ये वावरत असताना सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्या- आमच्याविषयीची माहिती ही कागदी तुकड्यांमध्ये गोळा होत असे. एखादी अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी एखादं तुकड्या-तुकड्यांमधलं कोडं सोडवण्यासारखी किचकट प्रक्रिया करावी लागत होती. आता ते कोडं अवघ्या काही सेकंदांमध्ये जोडण्याची सुविधा तुमच्या- आमच्याविषयीच्या डिजिटल माहितीनं आयतीच उपलब्ध करून दिलीय. डिजिटल स्वरूपात आपण जी माहिती एकदा देतो आहोत, ती माहिती अनेकांना त्यांना हव्या त्या पद्धतीनं आणि हव्या त्या उद्देशानं वापरण्याची मिळणारी आयती मुभा, हे या डिजिटल संस्कृतीचं एक वैशिष्ट्य. 

त्यावर नियंत्रण ठेवायचंय म्हणून खरं संबंधित अॅप्लिकेशन्स किंवा वेबसाइट्सच्या प्रायव्हसी पॉलिसी, अर्थात वापरकर्त्यांच्या खासगीपणाविषयीच्या धोरणांची पुरेपूर माहिती असणं वापरकर्त्यांसाठी गरजेचं बनून जातं. त्यासाठी आपण डिजिटल व्यासपीठांना (व्यासपीठांवर नव्हे!) एखादी गोष्ट सांगायची की नाही, कळू द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्याविषयीची मूलभूत जाणीव वापरकर्त्यांनाही असणं ही या नव्या समाजातील व्यवहार अधिक मोकळेपणाने आणि पारदर्शकपणे चालण्यासाठीची एक गरज ठरते आहे.. त्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयीचं किती, काय, कोणाला, कोणत्या व्यासपीठावर आणि कसं सांगायचं वा नाही, याचा निर्णय जाणतेपणी घेण्याची प्रगल्भता विकसित होणं गरजेचं आहे. अन्यथा ‘फुकट ते पौष्टिक’ ही वास्तवातील सामाजिक मानसिकता डिजिटल समाजाच्या उंबरठ्यावरच तुमच्या खासगीपणाची किंमत चुकवून मोकळी होईल. व्हॉट्सॲपच्या निमित्तानं सुरू झालेली खासगीपणाची ही चर्चा तुम्हा- आम्हाला अशी किंमत न चुकवण्याविषयीचीच प्रेरणा तर देत नाही ना? 

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

संबंधित बातम्या