ऊन-पावसाच्या खेळात...

सोनिया उपासनी
रविवार, 7 जून 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरू झाला असला, तरी आता बऱ्यापैकी बाहेर येण्याजाण्याबद्दलचे, कामाला सुरुवात करण्याबद्दलचे बरेच नियम शिथिल केले आहेत. हळूहळू सगळी कामे सुरळीत व्हायला सुरुवातही होईल. म्हणजेच आता आपल्यालाही हळूहळू घराबाहेर पडून कामे करण्यास मुभा मिळणार आहे. अशातच आलाय जून महिना. हा महिना म्हणजे ऊन पावसाचा खेळ सतत सुरू असतो. हवेतील आर्द्रता वाढते व त्यामुळे घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते.
आता घराबाहेर पडायला सुरुवात करायची म्हणजे कुणाच्या रखडलेल्या मीटिंग्स पूर्ण होणार, कुणी सहजच राहिलेली कामे पूर्ण करायला निघणार... आशा एक ना अनेक कारणांसाठी बाहेर निघताना आता डोक्यात एकाच विचार, की या अशा वातावरणात काय पेहराव परिधान करायचा?
त्यामुळे कपड्यांचे प्रकार निवडताना काही गोष्टींची काळजी घेतली तर हा काळही सुखकर होतो. 

 • कपड्याचा प्रकार कुठलाही असो, ते जरा सैलसर असावेत.
 • कपडे घाम शोषून घेणारे आणि जर पावसात ओले झालेच तर पटकन वाळतील असे असावेत.
 • कपड्यांचा पॅटर्न असा असावा, की शरीरात हवा खेळती राहिली पाहिजे. 
 • ऑरगॅनिक लीनेन, कॉटन, रेयॉन, मल कॉटन या प्रकारच्या फॅब्रिकचा वापर करावा. शक्य असेल तर स्लीव्हलेस वापरावे. 
 • नी लेंथ शॉर्ट ड्रेसेस, कुर्ते, अँकल लेंथ वन पीस ड्रेसेस, पेन्सिल स्कर्ट वर हवेशीर शॉर्ट टॉप्स, शॉर्ट्स आणि टी-शर्ट, असे सुटसुटीत पेहरावांचे चयन करावे.
 • घट्ट चुडीदार अथवा लेगिंगऐवजी सैलसर प्लाझो, सिगरेट पँट व त्यावर मिक्स अँड मॅच होणारा छानसा कुर्ता वापरावा.
 • साड्या परिधान करताना मल कॉटन, टिशू, लीनेन, ऑर्गन्झा या प्रकारातील निवडाव्यात.
 • पुरुषांनी बाहेर जाताना कॉटन ट्राउझर्स, कॉटन टी-शर्ट अथवा ऑरगॅनिक लीनेन शर्ट वापरणे हितावह, कारण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना घाम जास्त प्रमाणात येतो, ज्यामुळे अनेक स्किन इन्फेकशन्स होऊ शकतात. सहज म्हणून बाहेर पडायचे असेल, तर नी लेंथ बरमुडा आणि टी-शर्ट हा पेहराव उत्तम. 
 • हा महिना असा असतो, की गडद रंग वापरले तर उष्णता शोषली जाते आणि हलके रंग वापरले तर पावसात भिजल्यावर कपड्यांवर डाग पडतात. त्यामुळे रंगांची निवड करताना मीडियम टोन कलर्स निवडावेत, जसे गुलाबी, नारंगी, गडद आकाशी, पिवळा, पिस्ता ग्रीन, टोमॅटो रेड ग्रे, लव्हेंडर अशा शेड्स निवडाव्यात. हे रंग मेंटेनन्सला सोपे असतात आणि सर्व प्रकारच्या स्किन टोन्सवर खुलून दिसतात.
 • दागिने वापरत असाल तर कमीतकमी दागिन्यांचा वापर करावा. शक्य असल्यास हेवी ॲक्सेसरीजचा वापर टाळावा, कारण मिनिमल ॲक्सेसरीजच्या वापरामुळे, आर्द्रतेमुळे होणारे स्किन इन्फेकशन्स टाळता येऊ शकतात.
 • हॅट्स आणि कॅप्सचा वापर करावा, ज्या ऊन आणि बारीक पावसापासून संरक्षण करतील. 
 • हेवी हँडबॅग्स आणि पर्सेस घेण्याचे टाळावे, ज्या खांद्याला वजनामुळे आणि घर्षणामुळे इजा करू शकतात. त्याऐवजी सुटसुटीत स्लिंग बॅग्स वापराव्यात. 
 • फुटवेअरसुद्धा सुटसुटीत हवे. पायात घट्ट बसून घामाने होणारे कॉर्न आणि इतर कुठलेही फूट इन्फेक्शन होईल असे नसावेत. 

    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अबाल-वृद्ध कोणीही घरातून बाहेर पडण्याआधी आपण व्यवस्थि मास्क, ग्लोव्ह्ज, स्कार्फचा वापर केलाय ना हे नीट तपासून घ्यावे. स्वतः सुरक्षित राहावे आणि इतरांना सुरक्षित ठेवावे. शेवटी, जान है तो जहान है, नाही का!

संबंधित बातम्या