विविधरंगी मास्क 

सोनिया उपासनी
शुक्रवार, 29 मे 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

कडाउनमुळे सध्या सगळेच व्यवहार ठप्प झालेत. गेले दोन महिने सगळे घरीच. अगदी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडणे आणि रखरखीत उन्हातसुद्धा बाहेर निघताना सर्वांग झाकून निघणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. अशातच मास्क, ग्लोव्हज आणि संपूर्ण चेहरा व डोक्याला कव्हर करणे बंधनकारक झाले आहे.

लॉकडाउनच्या या चौथ्या टप्प्यात रहदारी व कामकाजांना थोडीफार सूट मिळाल्याने घरातून बाहेर निघायचे मार्ग थोडेफार मोकळे झाले आहेत. अशात उन्हाळा अजून पूर्णपणे संपलेला नाही व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यातील सुती कपडे वापरावे की पावसासाठी सिन्थेटिक हेच उमजेनासे झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघताना योग्य पेहरावांचे चयन केल्यास या बदलत्या ऋतुमानामुळे होणारा त्रास व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे या दोन्ही गोष्टी शक्य होण्यास मदत होईल. पेहराव हलक्या रंगाचा व सैल असला, तर शरीरात रक्ताभिसरण योग्यरीत्या होईल. कारण रोज मास्क वापरण्याची सवय नसल्यामुळे श्‍वास कोंडल्यासारखा वाटू शकतो. अशात जर कपडे घट्ट असतील तर त्रास अजून बळावेल.

पुढचे अनेक महिने सर्वांना योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडणे हितकारक असणार आहे. बाहेर पडताना सर्वांत अत्यावश्यक गोष्ट ही मास्क असेल. सर्जिकल मास्क हे मेडिकल प्रोफेशनल्स आणि हेल्थ वर्कर्ससाठी आहेत. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी कापडी, सुती मास्क वापरले तरी त्यामुळे योग्य प्रोटेक्शन मिळणार आहेच. 

तर आपण आज बघूया, की सर्वांनाच कम्पलसरी केलेल्या या मास्क आणि ग्लोव्हजला आपण घरच्या घरी कशी एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. अर्धवट जुन्या झालेल्या कपड्यांचे काय करायचे हा प्रश्‍न सर्वांनाच भेडसावत असतो. विशेष करून लहान मुलांचे कपडे आणि पुरुषांचे जुने कपडे. लहान मुलांच्या अथवा घरातील पुरुषांच्या जुन्या पण जरा पातळ कापडाच्या जीन्स व होजिअरीचे टी-शर्ट वापरून आपण घरच्या घरी दैनंदिन वापराकरिता मास्क आणि ग्लोव्हज तयार करू शकतो. फॅशन इंडस्ट्रीमध्ये जीन्स आणि होजिअरी कधीही आऊटडेटेड होत नाही. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या घरगुती मास्कचा वापर केला, तर या सक्तीच्या काळातही आपल्या पेहरावाला साजेल असे विविधरंगी मास्क आणि ग्लोव्हज तयार करून यातूनही एक नवे स्टाइल स्टेटमेंट तयार करू शकतो. 

आता अटी-शर्तींसह समारंभांनासुद्धा परवानगी मिळू लागली आहे. कालांतराने समारंभ पूर्वीसारखे साजरे होऊ लागतीलही, पण मास्क घालणे पुढील बराच काळ बंधनकारक राहील. पोशाख कितीही भरजरी असला तरी त्यावर मास्क घालावा लागेल. त्यामुळे कोसा कलर व गोल्डन कलरचे मास्क आतून सूती अस्तर लावून नीट शिवले व त्यावर हलकेसे नक्षीकाम केले, तर कुठल्याही समारंभात व्हायरसपासून संरक्षणपण होईल आणि नवीन फॅशनही. ज्या स्त्रियांना लिपस्टिक फ्लाँट करायची आहे, पण त्याबरोबरच संरक्षणही हवे आहे, त्यांनी मास्क तयार करताना आयताकृती कापडाला ओठांच्या जागी कट देऊन तिथे प्लास्टिक शीट लावून मास्क तयार करावा. सध्या या प्रकारचे फॅशनेबल मास्कही चलनात आहेत. 

घरगुती मास्क तयार करण्यासाठी कुर्ता शिवून उरलेले कापड, अथवा टी-शर्टला आयताकृती ६×४ इंच कापून, गरज भासल्यास आतून अस्तर लावून व्यवस्थित टीप मारावी व दोन्ही टोकांना इलॅस्टिक लावून परत नीट शिवून घ्यावे. असे विविधरंगी आणि विविध आकाराचे मास्क घरच्या घरी तयार करता येतील. 

कपड्यांमधून घरसजावट
स्त्रियांच्या अर्धवट जुन्या झालेल्या कपड्यांमध्ये जुन्या जॉर्जेटच्या साड्यांपासून बेड कव्हर्स आणि पडदे शिवून रूमचा लुक बदलता येईल. पावसाळा तोंडावर असल्यामुळे जॉर्जेट वाळायला सोपे आणि नो मेंटेनन्स! जुन्या ओढण्यांचे लांब लांब पट्टे कापून नंतर एकत्र विणून त्याचे पायपुसणे तयार करता येऊ शकते. या मल्टिकलर पायपुसण्यामुळे रूमचा लुकही खुलून दिसेल. अशा या लॉकडाउनच्या काळामध्ये घरच्या घरीच थोडी कलाकुसर करून आणि जुन्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपल्या घरासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी हटके करून आपल्या वेळेचा ही सदुपयोग करू शकतो.

संबंधित बातम्या