क्रोशियाची जादू

सोनिया उपासनी
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

क्रोशिया हा शब्द आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. क्रोशिया सुईवर विणलेला प्रत्येक पीस हा मास्टरपीसच असतो. क्रोशियावर बारीक कॉटन थ्रेडने, रेशमाच्या धाग्यांनी, लोकरीने असे विविध प्रकारांनी विणता येते. या विणकामाच्या अनेक कलाकृती प्रसिद्ध आहेत. 

रेशमाच्या धाग्यांनी क्रोशियावर विणलेल्या साड्या व त्यावर घालायला तेवढेच बारीक काम करून विणलेले ब्लाऊज याची तोड कशालाच नाही. विविध डिझाइनर साड्यांवर क्रोशियाच्या मिक्स अँड मॅच ब्लाऊजचा कॉम्बो म्हणजे सोने पे सुहागा. नॅशनल व इंटरनॅशनल फॅशन वीकमध्ये या क्रोशिया डिझाइनर साड्यांनी व क्रोशियाच्या इतर ॲक्सेसरीजनी आपला वट कायम ठेवला आहे. 

अबाल वृद्धांमध्ये क्रोशियावर विणलेले विविध प्रकार लोकप्रिय आहेत, मग ते कपड्यांचे प्रकार असोत अथवा गृहासजावटीसाठी कुठली वस्तू असोत, क्रोशियाची नाजूक वीण सर्व गोष्टींना उठावदार करते. जीन्सवर अथवा स्कर्टवर घालायचे क्रोशियावर विणलेले शॉर्ट आणि लाँग टॉप्स, विविध रंगी आणि प्रकारात विणलेले स्कर्ट्स, जॅकेट्स, श्रग्स, बॅग्ज व हँडबॅग्ज, स्कार्फ्स, कॅप्स, मोबाइल पाउचेस, वन पीस व कुर्ती हे तरुण पिढीमध्ये आवडीने फॅशन स्टेटमेंट म्हणून घातले जाते.

याशिवाय क्रोशियावर विणलेले लहान मुलांचे स्वेटर्स, हातमोजे, पायमोजे, टोप्या, फ्रॉक्सही उठावदार दिसतात. 

जगभरात याच क्रोशियावर विणलेले पाँचो, शॉल्स, मफलर्स, विविध प्रकारच्या फॅशनेबल कानटोप्या प्रसिद्ध आहेत व सगळीकडे त्यांना मागणी आहे. 

कापड्यांमध्येच नव्हे तर गृहासजवटीमध्येही क्रोशियाने एक विशेष स्थान निर्माण केले आहे. रूमच्या थीमप्रमाणे बेड कव्हर्स, कुशन कव्हर्स, पडदे उपलब्ध आहेत. डायनिंग रूमच्या सजावटीसाठी टेबल क्लॉथ, टेबल मॅट, टीकोझी, कोस्टर्सही उपलब्ध आहेत. हॉलच्या सजावटीसाठी वॉल हँगिंग्स, मॅगेझीन होल्डर्स, विविध आकाराच्या स्टोरेज बास्केट्स आहेत. किचनच्या उपयोगासाठी विविध आकारांच्या आणि प्रकारांच्या टोपल्या, लाँड्री बॅग्जही उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या खेळण्यासाठी बहुरंगी बाहुल्यांनी दुकाने सजली आहेत.  

अठराशेच्या काळात फ्रान्समधून आलेल्या या क्रोशियाच्या जादूई सुईने जगभरातच होम डेकॉर आणि फॅशन वर्ल्डमध्ये स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

संबंधित बातम्या