प्रेग्नन्सी लुक..

सोनिया उपासनी
सोमवार, 28 डिसेंबर 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

ओन्ली चेंज इज परमनंट, ही म्हण फॅशनच्या दुनियेला परफेक्टली लागू होते. हल्ली नव्याने प्रकाशझोतात आलेला ट्रेंड आहे तो मॅटर्निटी फॅशनचा. ही फॅशन प्रचालनात आणली ती आपल्या देशातील व पाश्चात्त्य सेलिब्रेटीजनी. बदललेल्या हवामानामुळेही मॅटर्निटी फॅशन लोकप्रिय होत आहे. गर्भावस्थेत शरीरात होणाऱ्या बदलांमुळे कंफरटेबल पेहरावाकडे लक्ष देणे जास्त गरजेचे झाले आहे. गर्भावस्थेत पूर्ण नऊ महिने कामावर जायचे म्हणजे पेहरावांची निवडसुद्धा स्मार्टली करायला हवी, जेणेकरून दिवासातील आठ ते दहा तास काम करणे सुखकर व सोयीचे होईल.

प्रेग्नन्सीमध्ये विशेषतः रक्तदाब, रक्तातली साखर यांच्यातले बदल आणि दर महिन्यात वजनामध्ये होणारा बदल, या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेऊन आपल्या वार्डरोबमध्ये बदल करावा. 

हल्ली मार्केटमध्ये जागोजागी मॅटर्निटी वेअरची मोठमोठी दुकाने उघडली आहेत. मॅटर्निटी इनरवेअरपासून  फीडिंग गाऊन्सपर्यंतचे सगळे पर्याय इथे उपलब्ध असतात. 

प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यांत फारसे शारीरिक बदल होत नाहीत, त्यामुळे रेग्युलर वापरातील कपडे घातले तरी त्रासदायक होत नाही. तरीही जीन्सला पर्याय म्हणून लूज ट्राउझर्स आणि त्यावर लूज टॉप्स घालावेत. स्कर्ट असेल तर तो जास्त घट्ट नसावा. लेगिंग खूप फिट बसणारे नसावे. सैलसर लेगिंग आणि त्यावर थोडा लूज फिटिंगचा टॉप अगदी आरामदायक फील देतात.  

सेकंड ट्रायमेस्टरमध्ये पोटाचा घेर वाढू लागतो, वजनही वाढते, सगळी मापे बदलायला सुरुवात होते. अशा वेळी जिन्स, लेगिंग किंवा घालायला त्रासदायक होतील असे बॉटम वेअर्स कटाक्षाने टाळावेत. कारण खाली वाकण्यास त्रास होऊ लागतो आणि वाढत्या पोटामुळे एकदम पाय दिसेनासे होऊ लागतात. स्किन सेन्सेटिव्ह झालेली असते आणि अंगावर सूज येण्याचे प्रमाणही वाढलेले असते. अशावेळी घट्ट कपडे वापरले तर त्वचेवर रॅशेस येण्याचे प्रमाणदेखील वाढते. परिणामी सर्वांगावर खाज येणे, पुरळ येणे या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, कंफर्ट असेल असेच परफेक्ट मापाचे सॉफ्ट कॉटनी फील असलेले इनरवेअर निवडावे व बाह्य वापराचे कपडे सैलसर ठेवावेत. सैलसर कपडे परिधान केल्याने रक्ताभिसरण तर चांगले होतेच, पण मनसुद्धा प्रसन्न राहायला मदत होते. 

तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्येसुद्धा प्लाझो, जिन्स, जेगीन्स, जंपसुट्स या सगळ्यांना तात्पुरते बाय बाय म्हणून स्मार्ट क्लोदिंग चूज करावे. सुटसुटीत कॉटन, लिनन, रेयॉन, डेनीम या कापडांमध्ये उपलब्ध असलेले नी लेंथ फ्रॉक्स, अँकल लेंथ फ्लेअर्ड मॅक्सी ड्रेस, ए लाईन डेनीम ड्रेसेस, हाय वेस्ट स्कर्टवर लूज फ्लेअर्ड अथवा रफल्ड टॉप्स, रफल्ड मॅक्सी या प्रकारचे कपडे घालावेत. या प्रकारच्या पेहरावांमुळे हवा खेळती राहते. दैनंदिन उठबस करताना त्रास कमी होतो व सर्व कपडे सैलसर असल्यामुळे शरीरावर अतिरिक्त दाब निर्माण होत नाही. 

वरील सर्व मुद्दे लक्षात घेतले तर प्रेग्नन्सीचा काळ सुखकर जाईल आणि शिवाय संपूर्ण प्रेग्नन्सी काळात एक कूल आणि स्टायलिश लुकसुद्धा कॅरी करता येईल.

संबंधित बातम्या