ब्लॅक इज ब्यूटिफुल

सोनिया उपासनी
सोमवार, 11 जानेवारी 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

मकर संक्रांत अथवा पोंगल हा भारतीयांसाठी मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. विविध प्रांतांमध्ये हा सण विविध नावांनी साजरा केला जातो. सण म्हटले की त्याचा एक अविभाज्य भाग असतो तो म्हणजे, त्या सणासाठीचा खास पोशाख, त्यावर खुलून दिसतील असे दागदागिने आणि छान साजेशा ॲक्सेसरीज.

एरवी कुठलाही सण असला तरी डोळ्यासमोर येतात ते सगळे ब्राईट फेस्टिव्ह कलर्स. पण संक्रांत असा एकमेव सण आहे, जिथे सगळ्यात जास्त महत्त्व काळ्या रंगाला असते. काळा रंग उष्णता शोषून घेतो. संक्रांत हा सण वर्षाच्या अशा वेळी येतो, जेव्हा थंडी पूर्णपणे ओसरलेली नसते आणि उन्हाळ्याला सुरुवात झालेली नसते. त्यामुळे काळा रंग आणि इतर ब्राईट ह्यूज ही परफेक्ट चॉईस असते. नववधूचा पहिला संक्रांत सण असो वा बाळाची पहिली लूट, सर्व महिला वर्ग हळदीकुंकू करायला तत्पर असतो. 

काठापदराची गोल्डन जरीची साडी तरुण वर्गात काहीशी आऊटडेटेड झालेली दिसते. त्याऐवजी सुबक काठांची सिल्व्हर जर असलेली काळी चंद्रकला पैठणी, डॉलर बुट्टी पैठणी यांची सर्वत्र जोमात विक्री सुरू आहे. साड्यांमध्ये सिल्व्हर कलरने वर्चस्व गाजवले आहे, त्यामुळे दागिने कसे बरे मागे राहतील? सिल्व्हर ज्वेलरीमध्ये अगदी नथ, मंगळसूत्रापासून कोल्हापुरी साज, ठुशी, मोठे हार, झुबे आणि आपल्या गरजेप्रमाणे हवे असतील ते सर्व दागदागिने उपलब्ध आहेत. 

लहान मुलामुलींसाठी नवनवीन काळ्या फ्रॉक्स, धोती कुर्ता, मॅक्सी, सलवार-कुर्त्यांनी सगळी बाजारपेठ छान सजली आहे. मुलींसाठी काळ्या खणाच्या फ्रॉक्समध्ये नवनवीन डिझाइन्स उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात पैठणी आणि खणाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे गुजरात राजस्थानमध्ये ब्राईट कलर्समध्ये रंगबेरंगी घागरे, लाचा आणि बांधणी साड्यांना महत्त्व आहे. पंजाबमध्ये ब्राईट आणि बोल्ड लाल, गुलाबी आणि हिरव्या पोशाखाचे महत्त्व आहे. तामिळनाडूमध्ये पांढऱ्या, क्रीम रंगावर सोनेरी जरी बॉर्डरच्या कपड्यांचे महत्त्व आहे. आसाममध्ये या बिहूच्या पर्वात सिल्क, जॉर्जेट, कॉटन सिल्कमध्ये विशेषतः पिवळा, मरून, नारंगी, हिरवा आणि निळ्या रंगांच्या छटांमध्ये मेखला चादोर नावाचा पारंपरिक पोशाख घालतात. 

असा हा विविधतेमध्ये एकता असणारा सण थोडी पारंपरिक आणि थोडी आधुनिक जोड देऊन सर्व काळजी घेऊन साजरा करूया. संक्रांती स्पेशल काळे मास्क घालायला विसरू नका हं!!

संबंधित बातम्या