ओरिसाची वीण

सोनिया उपासनी
सोमवार, 25 जानेवारी 2021

स्टाइल स्टेटमेंट

सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

भारतीय हातमागावर विणलेले कापड उत्तम दर्जा, तलम पोत, विणीतील विविधता आणि परंपरा यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. जसजसा काळ बदलत गेला तसतशी कापडाची आणि त्यातील वैविध्याची मागणी वाढली. त्यातच पॉवरलूमचा जन्म झाला. जे वस्त्र हँडलूमवर तयार करण्यास महिनोन महिने लागायचे ते पॉवरलूमवर झटपट तयार होऊ लागले. नवा मॉडर्न डिझाइन्स, पॅटर्न, कलर कॉम्बिनेशन यामुळे हातमागाची मागणी कमी झाली असली, तरी हातमागावर विणलेल्या वस्त्राचा रिचनेस, फाईन क्वालिटी आणि वेगळेपणा याची सर कशालाच नाही.

भारतात प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी एक खास वीव्ह (Weave) आहे, ज्यामुळे तो प्रदेश नावारूपास आला. आज आपण ओरिसा राज्याच्या अनेक गावांतून नावारूपास आलेल्या वीव्हबद्दल जाणून घेऊ. सुवर्णपुर तालुक्यातील भुलिया जमातीच्या विणकरांची बोंमकाई वीण प्रसिद्ध आहे. बोंमकाई साड्या सोनेपूर साड्या, सोनेपुरी पाट्स म्हणूनही ओळखल्या जातात. दुसरी वीव्ह आहे ती ओरिसाच्या संबलपूर तालुक्यातील. बालनगीर, बार्गद, बौध गावातील कारागिरांनी विणलेल्या इकतच्या साड्या आणि फॅब्रिक प्रसिद्ध आहे. त्या संबलपुरी साड्या म्हणूनही ओळखल्या जातात. डोलाबेदी हीदेखील प्रसिद्ध वीव्ह आहे. ओरिसातील गोपालपूर आणि संबलपूर तालुक्यातील विणकर या साड्या विणण्यात निपुण आहेत.

हातमागावर धागे लावण्याआधी पूर्वतयारी करावी लागते. जो पॅटर्न कापडावर हवा आहे, त्या पॅटर्ननुसार कॉटन अथवा सिल्कच्या धाग्यांचे बंडल तयार करून घट्ट बांधले जातात. पॅटर्न विविधरंगी हवा असेल, तर डाय झालेला भाग परत पॅटर्नप्रमाणे बांधून त्यावर दुसऱ्या रंगाने डाय केले जाते. पॅटर्न सिंगल इकत करायचा की डबल इकत त्याप्रमाणे ताणा-बाणा हातमागावर चढवला जातो. सिंगल इकतमध्ये रंगवलेल्या ताण्याबरोबर प्लेन पांढरा धागा विणून डिझाईन तयार होते. डबल इकतमध्ये ताणा व बाणा (warp & weft) दोन्ही डाय केलेले असतात. 

ओरिसाच्या इतर पॅटर्नमध्ये पासापल्ली, बारपली व बाप्टा यांचा समावेश आहे. या सर्व पॅटर्नची नावे ते ज्या गावांमध्ये विणले जातात, त्यावरून पडलेली आहेत. या सर्व साड्या व फॅब्रिकवर ओरिसाची ट्रॅडिशनल डिझाइन्स बघायला मिळतात. त्यात शंख, चक्र, सागरीप्राणी, मासोळ्या, वाघ, झाडेझुडपे व जंगल, आदिवासींची चित्रे, फुले पाने, टेकड्या या गोष्टींचा उपयोग होतो. त्यामुळेच या साड्या आणि फॅब्रिकचे वेगळेपण खुलून दिसते.

डोलाबेदी साड्यांवर जगन्नाथ पुरीच्या प्रसिद्ध डोला पौर्णिमा उत्सवाच्या रथाचे आणि त्या संदर्भात असलेल्या कथांचे विणकाम असते. या वैशिष्ट्यपूर्ण साड्या जगभरात प्रसिद्ध आहेत. संबलपुरी वीव्हच्या फक्त साड्याच नव्हे, तर बेडशीट्स, पडदे, बटवे, पर्स, मोजड्या, दुपट्टे, कुर्ते, जॅकेट्स, धोती, अशा एक ना अनेक वस्तू देश विदेशात भरपूर मागणीसह फॅशन ट्रेंडमध्ये आहेत.

संबंधित बातम्या