विविधढंगी, विविधरंगी पैठणी

सोनिया उपासनी
सोमवार, 8 मार्च 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... याविषयी जाणून घेऊया!

पैठणीला अनेक शतकांची परंपरा लाभली आहे. शाही वस्त्र अथवा महावस्त्र म्हणून पैठणीला मान आहे. सर्व महिलावर्गाच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या या महावस्त्राच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया.

बांगडीमोर पैठणी ः बांगडीमोर मोटीफ हे सर्वात प्राचीन प्रकारात मोडते. याचे नक्षीकाम नाजूक असते. बांगडीच्या (वर्तुळ) आत सुंदर कमळ आणि वर्तुळाच्या भोवती चार बाजूंना सुंदर मोरांची नक्षी केलेली असते. पूर्वी ३६ प्रकारचे धागे वापरून हे काम केले जायचे. आता बदलत्या काळानुसार १० प्रकारचे धागे वापरून बांगडीमोर पैठणी विणली जाते.

एकधोती पैठणी ः या प्रकारच्या पैठणीत बाणा विणताना एकेरी शटल वापरतात. ताण्याचा धागा, बाण्याच्या धाग्यापेक्षा वेगळ्या रंगाचा असतो, ज्यामुळे वस्त्राला डबल टोन येतो. या पैठणीला नारळी बॉर्डर असते आणि बेसला सिंपल छोटी बुट्टी अथवा डॉलर बुट्टी असते. 

ब्रोकेड पैठणी ः काही पैठण्यांची बॉर्डर ब्रोकेडची असते, तर काही पैठण्यांचा बेस ब्रोकेडचा असतो. ब्रोकेडवर जेवढे जास्त नाजूक आणि नक्षीदार काम असते, तेवढी त्या पैठणीची किंमत जास्त असते. यामध्ये मुनिया ब्रोकेड आणि लोटस ब्रोकेड असे दोन प्रकार आहेत. मुनिया ब्रोकेडमध्ये पदरावर आणि बॉर्डरवर राघुमैना विणली जाते. लोटस ब्रोकेडमध्ये पदरावर आणि बॉर्डरवर कमळाची फुले, कळ्या पाने विणली जातात. लोटस मोटीफमध्ये सात ते आठ रंगांचा वापर होतो. 

बालगंधर्व पैठणी ः प्युअर सिल्कमधील हा मास्टरपीस जांभळ्या रंगाच्या छटांच्या बेसमध्ये येतो. लाल अथवा गुलाबी छटांची बॉर्डर असते. खांद्यावर मोराचे मोटीफ, बेसला कोयऱ्यांची बुट्टी आणि जॅकॉर्ड मिनाकारी पदर ही बालगंधर्व पैठणीची खासियत आहे. 

कडियल पैठणी ः ही पैठणी तयार करताना तीन शटल्सचा वापर केला जातो; पहिले शटल वरच्या बॉर्डरला, दुसरे शटर मधील बेसला आणि तिसरे शटल खालच्या बॉर्डरला. दोनपेक्षा जास्त रंगांच्या छटा उभारून याव्यात, या पद्धतीने ताणाबाणा विणला जातो. 

पेशवाई पैठणी ः ब्राह्मणी पेशवाई पैठणी, पेशवा आणि मुघल काळातील वीण. पेशवाई पैठण्या जास्तकरून नऊवारीमध्ये मिळतात आणि विवाहसोहळे अथवा काही खास प्रसंगांनाच नेसल्या जातात. या पैठण्या विणण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सिल्क वापरले जाते, त्याला दागिना सिल्क पण म्हणतात. कारण यावर नाजूक काम केलेले असते. चक्र बुट्टी आणि बॉर्डरवर भरजरी मोर, गोल्डन पदर ही या पैठणीची खासियत आहे. पैठण्या सर्वच रंगांमध्ये खुलून दिसतात, पण तीन खास रंग मनाला नेहमी भुरळ घालतात. 

चंद्रकळा ः काळ्या साडीला लाल बॉर्डर असते. बेसला चंद्रकोर अथवा पूर्ण चंद्र असतो.

राघू पैठणी ः हिरव्या रंगात राघू बॉर्डर आणि पदरावर राघू, मैनेची वीण असते.
शिरोदक पैठणी ः पूर्ण पांढऱ्या पैठणीला सोनेरी पदर आणि बॉर्डर असते; पदरावर मोर असतात.

संबंधित बातम्या