पटोला

सोनिया उपासनी
गुरुवार, 25 मार्च 2021

स्टाइल स्टेटमेंट

गुजरातचा उल्लेख कुठे आला तर सर्वप्रथम डोळ्यापुढे येते ते विविध रंगानी नटलेले आणि सजलेले एक खुशहाल, सर्व प्रकारची सुबत्ता असलेले राज्य. या गुजरातमधील कापडही प्रसिद्ध आहे. तेथील बांधणी कला जरी जगप्रसिद्ध असली, तरी गुजरात राज्यातील पाटण हे गाव प्रसिद्धीस आले ते तिथे विणल्या जाणाऱ्या पटोला साड्यांमुळे. बाराव्या शतकात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील साळवी जमातीतील जवळपास ७०० सिल्क वीव्हर्स गुजरात मधील पाटण गावात स्थलांतरित झाले, आणि तेथील राज्यकर्त्यांना शरण गेले. पाटणची पटोला साडी ही तेथील स्टेट्स सिम्बॉल आहे. तेथील प्रत्येक लग्न कार्यामध्ये पटोला साडीला स्त्रीधनाइतकेच महत्त्व दिले जाते. गुलाबाचे लाकूड भाल्याच्या आकारात तासून त्याची स्टिक तयार केली जाते. ही स्टिक पटोला साडी विणताना धागे ॲड्जस्ट करायला उपयोगी पडते. या स्टिकला ‘वी’ असे म्हणतात. 

पटोला साडी विणताना सर्वात क्लिष्ट भाग असतो तो धागे बांधायचा. पॅटर्न प्रमाणे सिल्कचा धागा कॉटन धाग्याने बांधून नंतर पॅटर्न तयार केला जातो. ही धागे बांधण्याची प्रोसेस अत्यंत अनुभवी विणकराकडून केली जाते, कारण हे काम अत्यंत नाजुक आणि वेळ घेणारे असते. यानंतर साडीच्या पॅटर्नप्रमाणे प्रत्येक बांधलेला धागा रंगवला जातो. एखाद्या धाग्याची जरी रंगवण्याची प्रक्रिया चुकली, तरी पूर्ण साडीचा पॅटर्न बिघडतो. एक पटोला साडी विणायला हातमागावर बसून दोन लोक कमीत कमी सहा महिने ते वर्षभर एका अप्रतिम कलाकृतीला जन्म देतात.

ताणा आणि बाणा दोन्ही डबल इकत पॅटर्नमध्ये डाय केले जातात. एक लहानशी चूक झाली तरी सर्व साडीचा पॅटर्न बिघडून केलेल्या मेहनतीवर पाणी फिरते. कारण पटोला साडी दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते, ज्याला आपण रिव्हर्सिबल पॅटर्न असे म्हणतो. साडी पूर्णपणे विणून झाल्यावर अगदी विणकरालासुद्धा एका नजरेत सांगता येत नाही की साडीचा समोरचा भाग कुठला आणि मागचा भाग कुठला.

पटोला साडीसाठी धागे रंगवायला काटेची, इंडिगो, हळद, लाख, मंजिष्ठा, रतनज्योत, काथ, केसू, डाळिंबाची साल, मेहेंदी, झेंडूची फूले, इ. गोष्टींचा अगदी नॅचरल डाय वापरतात. या नॅचरल डायला पक्के करायला तुरटी, कॉपर सल्फेट, फेरससल्फेट, टीन क्लोराइड पोटॅशियम डायक्रोनेटसारखे आणि इतर सौम्य केमिकल वापरले जातात, ज्यामुळे साडीतील सर्व रंग उठावदार, ब्राईट दिसतात.

साड्यांवर जैन मंडळी ॲबस्ट्रॅक्ट आणि जिऑमेट्रिकल पॅटर्न निवडतात. मुस्लिम बोहरा गाजीभाटचे पॅटर्न पसंत करतात आणि हिंदू स्त्रिया हत्तीचे पॅटर्न, फुले, पाने, राघु-मैना, पौराणिक काळातील स्त्रियांची चित्रे अशी डिझाइन्स पसंत करतात. 

पटोला साड्या गुजरातच्या दोन भागांमध्ये विणल्या जातात. एक राजकोट पटोला, दुसरी पाटण पटोला. राजकोट पटोला या सिंगल इकत वीव्ह उभ्या डाय केलेल्या असतात. पाटण पटोला डबल इकत वीव्ह आडव्या डाय केलेल्या असतात. पटोला हा पॅटर्न साड्यांमध्ये सर्वात महाग असला, तरी एकदम एक्सक्लुझिव्ह आहे. आता फक्त साड्याच नाही तर पटोलामध्ये दुपट्टे आणि ड्रेस मटेरियल पण उपलब्ध आहेत. घर सजावटीसाठी फर्निशिंग्‍ज, बेड कव्हर्स, कुशन कव्हर्स, पडदे इ. चटकदार रंगांमध्ये उपलब्ध आहेत. पर्स, हँडबॅग्स, सॅक, दुपट्टा, कुर्ती असे एक ना अनेक प्रकार राजकोट आणि पाटण पाटोलामध्ये बघायला मिळतात.

संबंधित बातम्या