मनमोहक फुलकारी

सोनिया उपासनी
सोमवार, 5 एप्रिल 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

पंजाब आणि हरयाणा ही राज्ये ‘फुलकारी’ या सुंदर व मनमोहक कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहेत. ‘फुलकारी’ एम्ब्रॉयडरीला फक्त भारतातच नव्हे तर जगभर मागणी आहे. 

भारतीय फॅशन डिझाइनरची आवडती आणि फॅशन जगतात आपला पाया अजूनही घट्ट रोवून धरणारी फुलकारी कला ही पंजाबची देन आहे. हाझरा, पेशावर, झेलम, मुलतान, अमृतसर, जालंदर, अंबाला, लुधियाना, कपूरथला, चाकवाल या शहरांमध्ये फुलकारीने कलाकुसर केलेले कापड मोठ्या प्रमाणात जगभरात निर्यात व्हायचे. फाळणी झाल्यावर यातली काही शहरे पाकिस्तानचा भाग बनली. 

फुलकारी हा शब्द ‘फुल’ (फुले, पाने, बाग) आणि ‘कारी’ (कलाकुसर) म्हणजेच फुलांची कलाकुसर होय. असे ही म्हटले जाते की भारतात ही कला त्याकाळी इराण देशातून आली, जिथे हिला ‘गुलकारी’ असेही म्हणतात, गुल-फुले, कारी-कलाकुसर. प्राचीन भारतात पारंपरिक कारागिरांनी या कलेला जोपासले आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना या कलेत निपुण केले. त्यांनी घेतलेल्या या मेहनतीमुळे ही सुंदर आणि सुबक कला आज आपल्यापर्यंत पोचते आहे. पंजाब, हरयाणा राज्यात आजही मुलीचा जन्म होताच घरातील स्त्रिया फुलकारीने कापड भरायला घेतात. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीनुसार ११ नग कापडापासून ते १०१ नग कापडांपर्यंत ही कलाकुसर केली जाते व मुलीबरोबर सासरी पाठवली जाते. 

जुन्या काळी फुलकारी हे बायकांचे वेळ घालवण्याचे साधन होते. घरातील वयोवृद्ध महिला आपल्या हाताखाली आपल्या लहानांना तयार करत. घरच्या स्त्रिया चरख्यावर सूत कातून ते रंगवायला देत व विणकराकडून हवे तसे तलम कापड विणून घेऊन त्यावर फुलकारी भरल्या जात.फुलकारीचे बारीक काम करण्यासाठी तलम व टिकाऊ कापडाची निवड केली जाते. त्यानंतर जे डिझाईन भरायचे आहे ते कापडावर व्यवस्थितरीत्या छापले जाते. कापड मोठे असेल, म्हणजे साडी अथवा घागरा तयार करायचा असेल, तर त्यावर फक्त नाजूक फुलांचे काम न करता संपूर्ण बागेचे चित्र छापण्यात येते. ज्यामुळे कापडाला भरीव आणि एकदम रिच लुक येतो. एम्ब्रॉयडरी करण्यासाठी तलम रेशमी धाग्याचा वापर होतो.  फुलकारीमध्ये साड्या, लेहेंग्याचे कापड, दुपट्टे, शॉल, कुर्ती, पटियाला सूट, जॅकेट्स, हँडबॅग, जुती व होम फर्निशिंगच्या वस्तू येतात. ज्या लोकांना पारंपरिक पद्धतींनी आपले घर सजवायचे आहे त्या लोकांसाठी फुलकारीने कलाकुसर केलेले दिवाण सेट, कुशन कव्हर, बेडशीट, वॉल हँगिंग फ्रेम हे उत्तम चॉइस आहेत. 

सर्व प्रकारच्या फॅशन विकमध्येसुद्धा फुलकारीचे अजून वर्चस्व आहे. ही क्रेझ कधी ओसरली नाही आणि ओसरणारही नाही. फॅशनमध्ये कायम ‘इन थिंग’ राहणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे ही सुंदर मनमोहक फुलकारी!

संबंधित बातम्या