राजेशाही बनारसी वस्त्र

सोनिया उपासनी
सोमवार, 19 एप्रिल 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

काशी, भारतातील अतिशय सुंदर आणि पवित्र क्षेत्रांपैकी एक. हे शहर वाराणसी अथवा बनारस या नावाने ओळखले जाते. अनेक गोष्टींसाठी नावाजलेले हे शहर तेथील वस्त्रनिर्मितीसाठीही प्रसिद्ध आहे.

मुगल कालीन चौदाव्या शतकात बनारसी वस्त्र प्रसिद्धीस आले, ते त्यावर असणाऱ्या अस्सल गोल्ड आणि सिल्व्हर जरीमुळे. रेशमी धाग्यात सोने अथवा चांदीच्या तारेने केली जाणारी वस्त्रनिर्मिती हळूहळू जगभरात प्रसिद्ध होऊ लागली. रेशमाचा उच्च दर्जा, नाजूक नक्षीकाम आणि सोन्या-चांदीच्या तारांनी विणलेली बॉर्डर, यामुळे बनारसी वस्त्र अधिकच राजेशाही आणि उठावदार झाले. 

सहावार बनारसी कापड विणायला १५ दिवस ते महिना लागतो. डिझाईन भरीव असेल आणि जरीकाम जास्त असेल तर सहा महिनेसुद्धा पुरे पडत नाहीत. 

या बनारसी कापडाचे लेहेंगे, घागरे, इंडोवेस्टर्न ड्रेसेस, साड्या, दुपट्टे, शेरवानी, कुर्ते, शॉल व स्टोल यांना सर्व समारंभांकरिता जास्त मागणीत असते. बनारसी वीव्ह अनेक प्रकारात विणली जाते...

कतान 
कतान सिल्क हे उच्च दर्जाच्या रेशमी धाग्यांनी विणले जाते. कापडाचा बेस प्लेन असतो आणि गोल्ड अथवा सिल्व्हरमध्ये हेवी बॉर्डर विणली जाते. त्यामुळे या वस्त्राला अतिशय रीच लुक आणि एक आगळीवेगळी चमक येते. वजनाला जड अशी ही सुरेख कलाकृती सर्व समारंभाची शोभा वाढवते.

शत्तीर
हा बनारसी वस्त्रातला प्रकार रेग्युलर युजसाठी विणला जातो. परिधान करण्यास सोपा आणि वजनास हलका असा हा प्रकार मॉडर्न डिझाईन्समध्ये विशेष करून तयार केला जातो.

ऑर्गन्झा (कोरा)
हा बनारसी प्रकार तलम रेशमी धाग्यांनी विणला जातो. कापडाला प्रॉमिनंट गोल्ड अथवा सिल्वर बॉर्डर असते. वजनाला हलका आणि कम्फर्टेबल असा हा प्रकार आहे.
 

जॉर्जेट
बनारसी प्युअर खड्डी जॉर्जेट साड्या आणि वस्त्र क्रेप यार्नने विणल्या जातात. वजनाला अतिशय हलक्या, दिसायला राजेशाही अशा या साड्या खड्डी काम करून तयार केल्या जातात, अथवा जरीचे रीच विणकाम केले जाते. 
 

जंगला 
हा बनारसी वस्त्रातला प्रकार सहजच ओळखता येण्यासारखा आहे. रंगबेरंगी रेशमी धाग्यांनी संपूर्ण बेसवर फुला-पानांनी व वेलबुट्टीन्नी वीव्हिंग केले जाते व मिनाकारीने सजवले जाते. 
 

शिकरगड 
या प्रकारामध्येही निसर्गाच्या मोटिफचा वापर केला जातो. विशेषतः प्राण्यांचे मोटिफ वापरतात. 

टंचोई 
हा प्रकार बनारसी ब्रोकेडमध्ये मोडतो. यात कुठलेही जरी काम नसते, पण जामावर पद्धतीने डिझाईन विणले जाते, जेणेकरून वस्त्रावरच्या डिझाईनला एम्बॉसिंग केल्याचा लुक येतो. कापड सॉफ्ट सिल्क आणि लाइट वेट असते.

कट वर्क 
कट वर्क फॅब्रिक हे बनारसी पॅटर्न मधील सर्वात जास्त वापरात येणारे, दिसायला सुरेख असे कापड आहे. कॉटन व सिल्क बेसवर काम केलेले असते. कापडाच्या बेसवर अथवा बॉर्डरवर झेंडू, जाई-चमेली व इतर फुले, पाने, वेल यांचे कट वर्क केले जाते. 

टिशू
बनारसी टिशू हा प्रकार गोल्डन जरीमध्ये येतो. रेशमी ताणा आणि जरीचा बाणा यांनी विणलेले हे वस्त्र अतिशय सुरेख दिसते. टियर ड्रॉप्स, लोटस मोटिफ, डायमंड पॅटर्न हे कापडाच्या बेसला आणि बॉर्डरला वापरले जातात.

बुट्टीदार 
या नावातच सर्व काही येते. कापडाच्या बेसला ऑल ओव्हर बुट्टी असते. यामध्ये अंगुर बुट्टी, झुमर बुट्टी, अशर्फी बुट्टी, लतीफा बुट्टी, कैरी आंचल हे प्रकार येतात. 

बनारसी जामदानी
अतिशय नाजूक आणि तलम फॅब्रिकवर फ्लोरल मोटिफ असतात. वस्त्र वजनाला हलके आणि दिसायला रीच असते. बनारसी सिल्क शालू  उत्कृष्ट दर्जाचे  रेशीम वापरून बेस 
तयार केला जातो. बेसवर वेलबुट्टी अथवा फ्लोरल मोटिफ काढले जाते. शालूला रुंद बॉर्डर असते, जी सिल्व्हर अथवा गोल्ड जरीने विणली जाते. सगळ्यात हटके  प्रकार असतो तो  बनारसी शालू.

संबंधित बातम्या