केरळी हँडलूम

सोनिया उपासनी
सोमवार, 17 मे 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

देवतांची भूमी म्हणून ओळखले जाणारे आणि पर्यटनासाठी लोकप्रिय असलेले केरळ तिथल्या हँडलूमसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. कापसापासून तयार केलेल्या पांढऱ्या अथवा ऑफ व्हाईट धाग्याला कुठलाही रंग न चढवता, सोनेरी जरी बॉर्डर अथवा रंगवलेल्या रेशमाची बॉर्डर टाकून तसेच्या तसे विणणे, हे इथल्या हातमागावर विणलेल्या कापडाचे वैशिष्ट्य! 

इथल्या या नॅचरल व्हाईट आणि गोल्डन हँडलूम कापडाला ‘कासवू’ म्हणतात. कासवूचा इतिहास बौद्धकालापर्यंत मागे जातो, असे म्हटले जाते. केरळचे हे प्रसिद्ध हँडलूम उत्पादन तेथील चार मुख्य ठिकाणी होते. त्रिवेंद्रम जिल्ह्यातील बालरामपुरम तालुक्यात, एर्नाकुलममधील चेन्नमंगलम तालुक्यात, थ्रीसुरमधील कुठमपल्ली तालुक्यांव्यतिरिक्त पलक्कड, कुंनूर, आणि कासरगोड जिल्हे कासवूच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. 

दक्षिणमध्य केरळमध्ये तलम मऊसूत कापडाचे उत्पादन होते, तर उत्तर केरळ सिल्क व होम फर्निशिंगसाठी लागणाऱ्या जाडसर कापडाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. केरळच्या सुप्रसिद्ध कॉटन कासवू साड्यांचे उत्पादन तेथील कासरगोड जिल्ह्यात होते.

केरळमध्ये सर्व सणासुदीला व लग्न समारंभात तेथील पारंपरिक पोशाखच परिधान करतात. पांढऱ्या रंगाला तिथे अतिशय पवित्र मानतात, म्हणूनच सर्व धर्मीय समारंभात ट्रॅडिशनल गोल्डन व लाल रेशमी बॉर्डर असलेला कासवूच आवर्जून परिधान करतात. 

इथला पारंपरिक पोशाख म्हणजे मुंडू व नेरीयथाम (वेष्टि) होय. मुंडू म्हणजे चार-पाच वार आयताकृती कासवू, जे स्त्रिया व पुरुष दोघेही कमरेखाली परिधान करतात. नेरीयथाम (वेष्टि) हे खांद्यावरून घ्यायचे उपरणे अथवा दुपट्ट्यासारखे वस्त्र होय. पुरुष मुंडूवर शर्ट अथवा कुर्ता घालून त्यावर वेष्टि परिधान करतात. स्त्रिया कासवू मुंडूवर कमरेपर्यंत उंचीचे ब्लाऊज घालून त्यावर साडीच्या पदराप्रमाणे नेरीयथाम ड्रेप करतात. अगदी लहान मुलेसुद्धा कासवूचे परकर पोलके, धोती कुर्ता अथवा मुंडू वेष्टि आवडीने परिधान करतात. 

बदलत्या काळानुसार केरळी पारंपरिक पोशाख आता फक्त कार्यप्रसंगी वापरला जातो. रोजच्या वापरण्यासाठी कासवूचे सलवार कुर्ते, शॉर्ट ड्रेसेस, लाँग कुर्ती अथवा वन पीस ड्रेस, साडी या प्रकारची विविधता कपड्यांमध्ये बघायला मिळते.

आंतरराष्ट्रीय फॅशन विक्समध्येसुद्धा या अतिशय तलम आणि सुरेख कासवूचे विविध अँग्लो इंडियन  फ्युजन्स बघायला मिळतात. 

कासवूचे उत्पादन फक्त वस्त्र निर्मितीपर्यंतच मर्यादित नाही, तर होम फर्निशिंगमध्येसुद्धा लागणारी कासवूची जाडसर पोत सर्वत्र निर्यात होते. यामध्ये बेडशीट्स, बेड कव्हर्स, पडदे, सोफा कव्हर्स यांचा मुख्यत्वे समावेश असतो. हँडलूम बरोबरच हँडिक्राफ्टच्या उत्पादनांमध्ये ही केरळ अग्रेसर आहेच. नारळाच्या फांद्या (झावळ्या), करवंट्या यांपासून सुरेख कलाकृती, कथकली मुखवटे, बांबू व पामच्या झावळ्यांपासून केलेले वेगवेगळे बॉक्स व टोपल्या, समुद्री शिंपल्यांचा खजाना या सगळ्यांनीसुद्धा मनाला भुरळ घातली नाही तर नवलच!

संबंधित बातम्या