आंध्राचे कॉटन आणि सिल्क

सोनिया उपासनी
सोमवार, 31 मे 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विविध प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती होते. प्रत्येक प्रकार हा स्वतःची अशी विशिष्ट प्रकारची छाप उमटविणारा, तलम व नाजूक कलाकुसर केलेला असतो. या प्रदेशातील पोचमपल्ली, वेंकटगीरी, गडवाल, नारायणपेठ, धर्मावरम, उपाडा, मंगलगिरी, एलुरू, चिराला, नालगोंडा हे जिल्हे प्रमुख वस्त्र उत्पादक आहेत. 

गडवाल
गडवाल येथे होणाऱ्या वस्त्र निर्मितीचे वैशिष्ट्य हे की अस्सल गडवाल वस्त्रांचा बेस हा कॉटनचा असतो. साड्यांमध्ये काठ व पदर रेशमी धाग्याबरोबर जरीचे काम करून विणले जातात व नंतर मधल्या बेसला शिताफीने जोडले जातात. बॉर्डर व पदरावर आंध्रच्या टेम्पल डिझाईनची छाप दिसते.

कलमकारी 
कलमकारी ही रेशमी अथवा सुती वस्त्रावर पेंट अथवा प्रिंट केली जाते. हॅंड पेंटिंग करताना विशिष्ट प्रकारचे पेन वापरले जाते म्हणून, कलम - पेन, कारी- नक्षी काम, हे नाव पडले. पाने, फुले, पक्षी, प्राण्यांचे मोटिफ, देवी-देवतांचे मुखवटे कापडावर रंगवले जातात अथवा ब्लॉक प्रिंट केले जातात. साड्या, ड्रेस मटेरियल, वॉल हँगिंग, बेड कव्हर्स, पडदे, जॅकेट्स, हँडबॅग्स यांचे आंध्रातील पोलावरम व पेडना या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते.

धर्मावरम 
धर्मावरम हे सिल्कच्या साड्यांबरोबरच चामड्यापासून तयार केलेल्या कठपुतळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. धर्मावरम साडी वेगळी ओळखता येते. साड्यांवर सिम्पल प्लेन बेस व चौडी प्लेन बॉर्डर, ब्रॉकेड पॅटर्न असते.

पोचमपल्ली इकत 
नागमोडी वीण, जिऑमेट्रिक आणि ॲबस्ट्रॅक्ट पॅटर्न असलेल्या ‘इकत’ वस्त्रांची मागणी फक्त भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वात जास्त निर्यात होणाऱ्या वस्त्रांमध्ये ‘आंध्र इकत’ अग्रेसर आहे. इकत ही वीव्ह भारतातील अनेक राज्यांमध्ये विणली जात असली, तरी त्याचे उगम हे आंध्रप्रदेश होय.

चिराला
 चिराला येथे वस्त्र निर्मितीसाठी लागणारे सर्व प्रकारचे धागे तयार होतात. चिराला हे भारतातील एकमेव ठिकाण आहे, जिथे ऑईल बेस फॅब्रिक तयार होते. कापसापासून सूत तयार करताना तेलाचा वापर करून सुताला घट्ट व चमकदार केले जाते. त्यानंतर हातमागावर घेऊन कापड विणले जाते. कापड विणून झाल्यावर त्यावर मेण व पांढरी माती घासली जाते. कापड तुकतुकीत झाले की मग पाहिजे त्या रंगांमध्ये रंगविले जाते व नंतर त्यावर पेंटिंग अथवा प्रिंटिंग केले जाते. या ऑईल फॅब्रिकपासून साड्या, ड्रेस, दुपट्टे, कुर्त्याचे कापड, बेडकव्हर्स, पडदे, सोफ्याचे कापड यांची निर्मिती होते.

एलुरू 
एलुरू हे गाव प्रसिद्ध आहे ते तेथील वूलन कार्पेटसाठी. मुघलकालीन स्टाइलचे वूलन व सिल्कचे रग, कार्पेट्स व हँडिक्राफ्ट्स एलुरू येथे मोठ्या प्रमाणावर तयार होऊन जगभरात निर्यात होतात. कार्पेटवर मुघलकालीन झरोके, उद्याने यांची छाप बघायला मिळते.

वेंकटगीरी 
वेंकटगीरी कापडामध्ये अथवा साड्यांमध्ये बॉर्डरला जरीचाच धागा वापरला जातो. वेंकटगीरी कापड हे कॉटन, सिल्क अथवा कॉटनसिल्क या तिन्ही प्रकारात विणले जाते. बेसला जरीच्या धाग्यांची छोटी बुट्टी व बॉर्डर आणि पदरावर डॉट्स, पक्षी अथवा जिऑमेट्रिकल डिझाइनचे मोटिफ असतात. 

उपाडा 
उपाडा गाव तेथील कॉटन बेस साड्यांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. या गावात आता ऑरगॅनिक सिल्क कापडाचेही उत्पादन होते. मोठी कॉन्ट्रास्ट बॉर्डर व सिम्पल प्लेन बेसमुळे उपाडा साड्यांना एक वेगळाच उठाव 
येतो.

मंगलगिरी
मंगलगिरी गाव तेथील सुंदर देवळे व ऐतिहासिक ठिकाणांबरोबरच उच्च प्रतीच्या कॉटन साड्या, ड्रेस मटेरियलसाठी प्रसिद्ध आहे. प्लेन तलम बेस अथवा सेल्फ प्रिंट बेसवर सिल्क मिश्रित कॉटनची बॉर्डर, कापडाला सुरेख टोन व टेक्श्चर देते.

संबंधित बातम्या