बंगाली हँडलूम

सोनिया उपासनी
सोमवार, 28 जून 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

पश्‍चिम बंगाल हे राज्य तेथील हँडलूम व हँडिक्राफ्टमुळे जगभरात प्रसिद्ध झाले. येथील शांतीपुरी सिल्क व कॉटन वस्त्र सर्व बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. येथील तांत साड्या, जामदानी, बालूचर येथील बलुचरी, बेगमपुरी, धनियाखली तांत साडी, शांतीपूरच्या हातमागावर विणलेल्या फुलीया कॉटन साड्या, कांथा वर्क केलेल्या सिल्क व कॉटन साड्या, बिरभुमच्या खेश साड्याही तितक्याच प्रसिद्ध आहेत. 

जामदानी साड्या : कुठल्याही बंगाली स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये जामदानी साडी असतेच. अतिशय ग्रेसफुल व एलिगन्ट असल्याने हा प्रकार कुठल्याही प्रसंगी शोभून दिसतो. ही साडी ढाकाई जामदानी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. मसलीन, मल धाग्यांनी अतिशय नाजूक काम करून पाने, फुले व बागेचे मोटिफ वापरून सुंदर जामदानी कलाकृती विणली जाते. 

बलुचरी : सर्वात सुंदर आणि अनोख्या पद्धतीने विणलेला हा साडीचा प्रकार पूर्वी मुरशीदबाद येथील बलुचर या गावात विणला जायचा. पण पुरानंतर येथील सर्व विणकरांना विष्णुपूर येथे स्थलांतरीत केले व त्यानंतर या साड्या व वस्त्र ‘विष्णुपुरी’ म्हणूनसुद्धा ओळखल्या जाऊ लागल्या. या साड्यांच्या काठावर व पदरावर रामायण, महाभारत व इतर अनेक पौराणिक कथांचे चित्र विणले जाते. बलुचरीमध्ये मुख्यत्वे दोन प्रकार असतात, १) मिनाकारी बलुचरी - यात ताणा आणि बाण्याव्यतिरिक्त रंगीबेरंगी रेशमी धागे मोटिफ आणि डिझाइनला उठावदार करण्यासाठी वापरले जातात. २) स्वरणाचारी बलुचरी - या प्रकारात ताण्या-बाण्या व्यतिरिक्त फक्त जरीचा धागा वापरून काम केले जाते. यामुळे या साडीला एक रिच आणि राजेशाही लुक येतो.

तांत साडी : प्युअर कॉटन बेसवर सुंदर बॉर्डर, जिऑमेट्रिकल डिझाइन, फ्लोरल मोटिफ, कलका पॅटर्न वापरून सुंदर कलाकृती विणली जाते. या साड्या व ड्रेस मटेरिअल्स मेंटेनन्स फ्री असल्याने प्रत्येकाच्या पसंतीस उतरते. 

बेगमपुरी साड्या : या सुती साड्या विणायला १०-१२ तासांपासून चार-पाच दिवस लागतात. ब्राईट कलर व कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये असलेल्या या साड्या नेसायला अतिशय कंफर्टेबल आणि दिसायला एलिगंट. उभ्या व आडव्या स्ट्रीप्स व त्रिकोण वीव्ह यावरून हे पॅटर्न पटकन ओळखता येते. 

धनियाखली तांत साड्या : हे पॅटर्न इतर साड्यांपेक्षा वेगळे, जरा जाडसर व हेवी असते. पेस्टल शेडमध्ये या साड्या विणल्या जातात. फिश मोटिफ, सरकल मोटिफ असल्यामुळे हुआ साड्या वेगळ्या ओळखू येतात.

हँडलूम फुलिया कॉटन :  या शांतीपुरी साड्या म्हणूनही ओळखल्या जातात. ब्राउन्सच्या शेडमध्ये या साड्यांचे विणकाम होते. कॉटन व सिल्क अशा दोन्ही प्रकारात या साड्यांची निर्मिती होते.

कांथा वर्क साड्या : प्युअर सिल्क, टसर सिल्कवर हँड एम्ब्रॉयडरीने रनिंग कांथा स्टीच टाकून या साड्या व मटेरियल तयार केले जाते. ट्रॅडिशनल टेम्पल डिझाइन्स फ्लोरल डिझाइन्स, गावाकडील सिनरी, अशा प्रकारचे पॅटर्न कांथा स्टीचने केले जातात. साड्या, ड्रेस मटेरीयल, धोती कुर्ता दुपट्टे यावर आवर्जून ही एम्ब्रॉयडरी केली जाते.

बीरभूम खेश साड्या : बीरभूम येथे जुन्या साड्यांपासून खेश साड्या तयार केल्या जातात. विणकर जुन्या कॉटनच्या साड्या बल्कमध्ये विकत घेतात. एका साडीतून ८० ते ९० स्ट्रीप कापतात व या स्ट्रीप्सपासून नवीन वस्त्राची निर्मिती होते. यात साड्या, बॅग्ससाठी कापड, जाडसर कुर्त्याचे कापड, फरनिशिंगसाठी कापड या सर्वांची निर्मिती होते.

संबंधित बातम्या