बी मॉन्सून रेडी!

सोनिया उपासनी
सोमवार, 19 जुलै 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

पावसाळ्यात पाऊस, ह्युमिडिटी, घाम यांसारख्या गोष्टींमुळे आपल्याला आपल्या वॉर्डरोबमधून काही गोष्टी वगळाव्या लागतात, तर काही गोष्टी सहज वापरता येतात...

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात...’ कडकडीत उन्हात तप्त होऊन भूमी जेव्हा पावसात चिंब न्हाते, तेव्हा तो ओल्या मातीचा सुगंध, सर्वत्र पसरलेली हिरवळ यामुळे कोणाचे मन जर प्रफुल्लित नाही झाले तरच नवल! पण मॉन्सूनच्या सुरुवातीलाच जर आपण कुठल्या गोष्टी टाळायच्या यावर लक्ष केंद्रित केले, तर आपल्या वॉर्डरोबमधल्या बरेच महागडे कपडे खराब होण्यापासून वाचू शकतात. लेदर, डेनिम, सिल्क, व्हेलवेट व भरजरी पोशाख हे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच व्यवस्थित व्हॅक्युम पॅक करून कोरड्या ठिकाणी स्टोअर करावेत. 

मॉन्सूनमध्ये लेदर वापरले तर ते वाळवायला कठीण असते. त्यामुळे त्यावर बुरशीचे थर साचून त्यावरची चमकही फिकी पडते व वस्तूही संपूर्णतः खराब होते. मॉन्सूनमध्ये व्हेलवेटच्या वस्त्रांचाही उपयोग कटाक्षाने टाळावा. हे फॅब्रिक लगेच मॉइस्चर शोषून घेते व त्यामुळे वजनाला जड होऊन बुरशीही लागते. बहुतांश फेस्टिव्ह वेअर व्हेलवेटमध्ये असते, त्यामुळे पर्यायी फॅब्रिकचा वापर करावा. मॉन्सूनमध्ये सर्वात जास्त रया जाते ती सिल्कच्या कपड्यांची. प्युअर सिल्कवर हवेतील मॉइस्चरचे बारीक ठिपक्यांसारखे पांढरे डाग पडतात. कितीही ड्रायक्लीन केले तरी ही हे डाग पूर्णतः जात नाहीत व रेशीमही जुने दिसायला लागते. डेनिमचेही सर्व प्रकारचे वस्त्र पावसाळ्यात घालणे टाळावे. एक तर जिन्सचे कापड सुकायला बराच वेळ लागतो आणि दुसरे म्हणजे, जिन्सचे कापड ओले झाले की अंगाला घट्ट चिकटून बसते, ज्यामुळे विविध स्किन इन्फेक्शन्स होण्याची शक्यता बळावते. याव्यतिरिक्त अंगात घट्ट बसणारे कपडे टाळावेत, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यात अडथळा निर्माण होतो.

 मग पावसाळ्यात कुठल्या प्रकारची वस्त्रे व ॲक्सेसरीज वापरता येतील? 

कुलोट्स, शॉर्ट्स, स्कर्ट, नी लेंथ शॉर्ट प्लाझो, अँकल लेंथ कॉटन ट्राऊझर्स, डीव्हाईडेड स्कर्ट, लूज पँटबरोबर क्रॉप टॉप्स, वेस्ट लेंथ टॉप्स अथवा टी शर्ट व्यवस्थित टीम अप करता येतात. मेन्टेनन्स फ्री व पटकन सुकणाऱ्या जॉर्जेट, सॅटिन, मल कॉटन, शिफॉन, क्रेप या प्रकारच्या फॅब्रिकचा जास्तीत जास्त वापर करावा. पावसाळ्यात ढग दाटून येतात व आसमंतात सर्वत्र निळ्या आणि राखाडी रंगांच्या शेड्स असतात. त्यामुळे पेहरावासाठी कलर कॉम्बिनेशन निवडताना वातावरणाची मोनोटॉनी ब्रेक करायला ब्राईट कलर निवडावेत. याने मूडही फ्रेश होतो व स्वतःचा लुकही खुलून दिसतो. 

पेहरावांप्रमाणे इतर पावसाळी ॲक्सेसरीजही विविध प्रकारांमध्ये बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कॅप अंब्रेला, रेनबो अंब्रेला, फ्लेअर्ड अंब्रेला, अंब्रेला रेनकोट, पॅराशूट जॅकेट्स सध्या फॅशनमध्ये आहेत. हल्ली पाण्याने शूज खराब होऊ नयेत म्हणून विविध रंगीबेरंगी बूट कव्हर्सही उपलब्ध आहेत. मॉन्सूनमध्ये सर्व मेटल ज्वेलरी नीट कापडी अथवा प्लॅस्टिक पाऊचमध्ये कोरड्या ठिकाणी स्टोअर करून ठेवावी. क्रिस्टल ज्वेलरीचा जास्तीत जास्त वापर करावा. क्रिस्टल ओले झाले तरी खराब होत नाहीत आणि दिसायलाही सुरेख दिसतात. चला तर मग आता होऊ यात मॉन्सून रेडी!

संबंधित बातम्या