भागलपुरी सिल्क

सोनिया उपासनी
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

बिहारच्या पूर्व भागात गंगेकाठी वसलेले ‘भागलपूर’ शहर ‘सिल्क सिटी’ म्हणून प्रख्यात आहे. देशविदेशात निर्यात होणाऱ्या टसर सिल्कचे भागलपूर येथे सर्वाधिक उत्पादन होते. 

भागलपूरमध्ये सुमारे २०० वर्षांपासून विणकरांच्या जमाती वास्तव्यास आहेत. सुमारे २५ हजार हातमाग आणि अंदाजे ४० हजार विणकरांची कुटुंबे ही कला आजही जोपासून पुढच्या पिढ्यांना आपल्या निपुण हातांखाली तयार करीत आहेत. विणकरांव्यतिरिक्त बहुतांश लोकांचे रोजगाराचे साधन म्हणजे रेशमी धागा तयार करणे होय. भारताबरोबरच युरोप, अमेरिका, जपान येथे या टसर सिल्कला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

येथील सिल्कला ‘वाइल्ड सिल्क’ असेही संबोधले जाते, कारण झारखंडच्या जंगलांमध्ये मुख्यत्वे साल व अर्जुन या झाडांवरची पाने खाऊन रेशीम तयार करणारे किडे आपले कोश तयार करतात. म्हणून नॅचरल टसर सिल्क व रॉ सिल्कचा रंग थोडा पिंगट व लाईट ब्राऊनच्या शेड्समध्ये असतो. भागलपूर सिल्क अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. 

टसर सिल्क - रेशीम तयार करणारा किडा त्याचा कोश सोडून गेल्यावर रिकामे कोश सोडा घातलेल्या पाण्यात दोन ते अडीच तास मऊ होईपर्यंत उकळले जातात. त्यानंतर त्यातले तंतू एका रिळावर अलगद काढले जातात व त्यापासून नंतर रेशमी धागा तयार केला जातो.

घिचा सिल्क - कोशांपासून तंतू काढण्याच्या प्रक्रियेत व्यक्ती जमिनीवर मांडी घालून बसते व कोशाचा तंतू दोन्ही मांड्यांभोवती ताण देऊन गुंडाळला जातो व नंतर या बारीक तंतूंना बांबूच्या मोठ्या रिळावर अलगद गुंडाळले जाते. 

खेवा सिल्क - दोन हातांच्या भोवती रेशमी कोशाची नाजूक तार गुंडाळून त्यातून रेशमी तंतू रिळावर घेतला जातो. भागलपूर येथील मटका व मलबेरी सिल्कही सुप्रसिद्ध आहेत. भागलपुरी वस्त्राचे वैशिष्ट्य, त्याच्या आपल्या मनाला भुरळ घालणाऱ्या ब्राईट रंगांमध्ये आहे. तपकिरी, पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा, नारंगी अशा गडद रंगांमध्ये सिल्क डाय केले जाते. भागलपुरी कापडांवरचे मोटिफ मुघल काळाचे दर्शन घडवले. मोठे झरोके, अंबाऱ्या, बागायती, घोडे, हत्ती, हरिण व इतर प्राण्यांचे व पक्ष्यांचे मोटिफ विशेषतः वापरले जातात. सिल्कबरोबरच कॉटन सिल्क व कॉटनही तितकेच प्रसिद्ध आहेत. भागलपुरी वस्त्रांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. साड्या, कुर्तीचे कापड, ड्रेस मटेरियल, दुपट्टे, शाली, शर्ट, लाँग ड्रेसेस, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, होम फर्निशिंग मटेरियल इत्यादी. भागलपुरी सिल्क जितके प्रसिद्ध आहे, तितकीच भागलपुरी चादरही. सुती व रेशमी तंतूंना पीळ देऊन विणलेल्या या चादरी अतिशय मऊसूत व तलम असतात. पांघरूण म्हणून वापरायला कुठल्याही ऋतूमध्ये परफेक्ट. लांबी व रुंदीमध्ये खूप मोठ्या असतात व अनेकदा धुतल्यानंतरही चादरींवरची चमक कायम असते. प्लेन व उभ्या-आडव्या पट्ट्यांच्या चादरी हे तेथील वैशिष्ट्य आहे. 

वस्त्रनिर्मिती बरोबरच तेथील हँडिक्राफ्टसाठीही भागलपूर व बिहारमधील बरीच गावे प्रसिद्ध आहेत. मार्बलपासून केलेल्या शोभेच्या वस्तू जगभरात निर्यात होतात. मणियार बँगल्स तर महिला वर्गात विशेष प्रसिद्ध आहेत. सिक्की गवतापासून तयार केलेले ज्वेलरी बॉक्स, छोट्या व मोठ्या टोपल्या, शिंके, वॉल हँगिंग हे तेथील हँडिक्राफ्टची अप्रतिम देण आहे.

 

संबंधित बातम्या