सिक्कीमचे लेपचा वस्त्र

सोनिया उपासनी
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी
कला आणि संस्कृती

सिक्कीम प्रसिद्ध आहे तेथील पारंपरिक वीव्ह ‘लेपचा’साठी. ताण्याबाण्यात एक तंतू लोकरीचा व एक सुती तंतू वापरून लुम्सवर सुंदर कॉट्सवूल लेपचा फॅब्रिक विणले जाते. या कॉट्सवूलपासून सुंदर तलम ब्लॅंकेट्स, शाल, दुलई तयार होतात. लेपचा जॅकेट्स तर सर्व थंड प्रदेशांमध्ये प्रसिद्ध आहेतच. 

सर्व भारतीय राज्यांपैकी कमी क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेले, पूर्वोत्तर हिमालयाच्या सान्निध्यात असलेले अत्यंत सुंदर राज्य म्हणजे ‘सिक्कीम’. भारतातील सर्वात उंच व जगातील तिसरे उंच शिखर कांचनजुंगा, तीन बाजूंनी भूतान, नेपाळ व तिबेट या देशांनी वेढलेला, प्राकृतिक सौंदर्याची खाण असलेला हा रमणीय भूप्रदेश आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे इथे अगणित जंगली फुले व दुर्मीळ वनस्पतींचा खजिना आहे. गौतम बुद्ध यांच्या शिकवणीची विशेष छाप असलेला, सुंदर नागमोडी वळणांचा असा हा सुंदर प्रदेश सिक्कीम. 

तीन वेगवेगळ्या देशांच्या सीमारेषा असल्यामुळे सिक्कीमच्या स्थानिकांच्या जीवनशैली व पेहराव यामध्ये नेपाळ, भूतान व तिबेटच्या परंपरेची झलक बघावयास मिळते. सिक्कीम प्रसिद्ध आहे तेथील पारंपरिक वीव्ह ‘लेपचा’साठी. लेपचाचा इतिहास बघितला तर पुरातन काळी ‘सिस्नू’ (इंडियन स्टिंग नेटल) या झाडाच्या तंतूंपासून हँडलूमवर लेपचा वस्त्राची निर्मिती व्हायची. लेपचा वीव्हला सिक्कीमच्या भाषेत ‘थारा’ म्हणून संबोधले जाते. लेपचा ज्या हातमागावर विणले जाते, ते हातमाग इतरत्र वापरल्या जाणाऱ्या हातमागांपेक्षा रुंदीला लहान असल्या कारणाने या फॅब्रिकची रुंदी इतर वस्त्रांचा तुलनेत थोडी कमी असते.

पुरातन काळी लेपचा निर्मितीसाठी प्राकृतिक नैसर्गिक व्हेजिटेबल डायचा वापर व्हायचा. यामध्ये विशिष्ट फुले, पाने, भाज्या, वनस्पती, फळे, कंदमुळे यांचा रंग तयार करण्यासाठी वापर व्हायचा. परिणामी वस्त्रांमधील रंग दीर्घकाळ टिकायचे नाहीत व रंगांमध्ये लिमिटेशन होते. मिक्स मॅच करून नवीन रंग तयार करता यायचे नाहीत. कालांतराने जेव्हा सिंथेटिक पक्के फॅब्रिक डाय बाजारात आले तेव्हा, या नैसर्गिक रंगांची जागा आपोआपच या मॅन मेड कलर्सनी घेतली व रंगांच्या पॅलेटमध्येही विविधता आली. मेंढी पालन हा सिक्किममधील लोकांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय असल्याने लोकरीचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणावर होते. ताण्याबाण्यात एक तंतू लोकरीचा व एक सुती तंतू वापरून लुम्सवर सुंदर कॉट्सवूल लेपचा फॅब्रिक विणले जाते. या कॉट्सवूलपासून सुंदर तलम ब्लॅंकेट्स, शाल, दुलई तयार होतात. लेपचा जॅकेट्स तर सर्व थंड प्रदेशांमध्ये प्रसिद्ध आहेतच. काही उच्च प्रकारच्या कारागिरीतील डिझाईनमध्ये लोकरी तंतूचा वापर करून बेसला तलम सुती तंतू वापरून कापड उठावदार केले जाते. लेपचा अथवा थारा फॅब्रिकच्या विणकामाच्यावेळी डिझाईनप्रमाणे मुख्यत्वे काळा, पांढरा, लाल, पिवळा व हिरव्या रंगाचा वापर होतो, जे सिक्कीमचे पारंपरिक रंग आहेत.

फार पूर्वी स्थलांतरण करून आलेल्या भूतानमधील काही जमाती व काही नेपाळी ट्राईब्सच्या वेशभूषेची व आभूषणांची छाप स्थानिक लोकांमध्ये दिसून येते. ही आभूषणे बोल्ड गोल्डन आणि सिल्व्हर कलरमध्ये असतात. सिक्कीमची सर्व ज्वेलरी, बांबूपासून तयार केलेल्या मनमोहक वस्तू, चादरी, बॅग्ज, शाल, साड्या, पेंटिंग्ज, इतर कलाकुसर व त्यांचा पारंपरिक पेहराव ‘खो’ अथवा ‘बाखू’ लेपचा अत्यंत सुंदर ब्राईट कलरमध्ये भारतात सर्व ठिकाणी हँडलूम व हॅंडिक्राफ्ट प्रदर्शनांमध्ये उपलब्ध असतात.

संबंधित बातम्या