‘डीआयवाय’ गोधडी

सोनिया उपासनी
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

‘डीआयवाय’ पद्धतीने म्हणजेच ‘डू इट युअरसेल्फ’ पद्धतीने जुन्या वापरात नसलेल्या सुती कपड्यांपासून घरच्या घरी गोधडीसारख्या सुंदर कलाकृती शिवता येतात. 

डिसेंबर सुरू होतो आहे आणि आता थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. पूर्वीच्या काळी घरातल्या जाणत्या स्त्रिया जसा वेळ मिळेल तशा जुन्या कॉटनच्या साड्या, नऊवारी धुऊन कडकडीत वाळवून त्यापासून सुंदर, सुबक आणि उबदार अशी गोधडी हाताने विणायच्या. मऊसूत, चापलेली घडी शिवाय त्याला मायेची ऊब! जसा काळ बदलत गेला, तसा या मायेच्या उबेचा ‘फॉर्म’ही बदलला. महिला साडीऐवजी सुटसुटीत गाऊन व सलवार कुर्ते परिधान करायला लागल्या, तसे गोधडीचे स्वरूपही बदलले. गोधडीऐवजी वेलवेट व फरच्या ब्लॅंकेटनी बाजारपेठा भरल्या. 

हल्ली लोकांना परत सुती कापडाचे महत्त्व पटू लागले आहे. सिंथेटिक ब्लँकेट्सऐवजी लोक सुती विणलेल्या गोधड्यांना प्राधान्य देऊ लागले आहेत. डबल बेड साईज चौकोनी व सिंगल बेड साईज आयताकृती गोधड्या विविध रंगांमध्ये आता उपलब्ध आहेत. पण विकत आणलेल्या गोधड्या वापरायच्या नसतील, तर ‘डीआयवाय’ पद्धतीने म्हणजेच ‘डू इट युरसेल्फ’ पद्धतीने जुन्या वापरात नसलेल्या सुती कपड्यांपासून घरच्या घरी ही सुंदर कलाकृती शिवता येते. घरी शिलाई मशीन असेल तर मशीनवर मोठ्या टिपा मारून अथवा जुन्या विटलेल्या चादरी, साड्या, दुपट्टे, कॉटनचे कुर्ते, शर्ट यांचा वापर करून स्वतःसाठी छानशी गोधडी शिवता येते.

दोन ते तीन साड्या एकमेकांना ‘कॉर्नर टू कॉर्नर’ जोडून साधारण सात फूट लांबीची गोधडी हात टिपा अथवा मशीनवर टीप मारून तयार करता येते. कुर्ता अथवा शर्टपासून गोधडी तयार करायची झाली, तर आधी एकसारख्या लांबी व रुंदीचे चौकोन अथवा आयताकृती तुकडे कापावेत. चौकोनी तुकडे कापायचे असतील तर साधारण ६ × ६ इंचाचा तुकडा कापावा. आयताकृती तुकडा कापायचा असेल तर ५ × ८ इंचाचा घ्यावा. हे सगळे तुकडे एकमेकांना नीट शिवून त्याचा मोठा चौकोनी अथवा आयताकृती आकार करावा. 

यात जुन्या चादरींचाही समावेश करायचा असेल, तर सिंगल अथवा डबल बेडच्या चादरींच्या मापाच्या तुकड्यांनी जोडलेले गोधडीचे बाह्य आवरण तयार करावे. किती जाड गोधडी हवी, त्याप्रमाणे आत चादरी लावाव्यात. थोड्या जास्त जीर्ण झालेल्या चादरी बाह्य व आतल्या आवरणाच्या मधे लावाव्यात. म्हणजे वापरून वापरून कंटाळा आलेल्या चादरींचाही योग्य उपयोग होतो. चौकोन व आयत आकाराप्रमाणेच कापडाच्या लांब लांब पट्ट्या कापून उभ्या अथवा आडव्या पट्ट्यांची गोधडी/बेड कव्हरही तयार करता येते. बेडकव्हरप्रमाणेच कुशन कव्हर व पिलो कव्हरसुद्धा या पॅच वर्कनी तयार करता येते.

 घरच्या घरी जुन्या टाकाऊ कपड्यांपासून सुंदरसे मनमोहक डिझाईन तयार होते. प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीप्रमाणे या साऱ्या कलाकृतीला डिझाइनर लूकसुद्धा देता येतो. सिक्वीन, शिंपले, शटलची फुले, मणी, मोती, लेस, पायपीन या सर्व प्रकारांनी छान सजवता येते. चला तर मग, या हिवाळ्यात हाही उपक्रम करून बघू या...!

संबंधित बातम्या