‘मस्ट हॅव’ वूलन्स

सोनिया उपासनी
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

जरा जागरूकतेने थोडा शोध घेतला, तर या वाढलेल्या कडाक्याच्या थंडीतही प्रत्येक पार्टीला आणि आऊटिंगला अगदी टापटीप फॅशनेबल दिसता येते. 

पारा जसजसा उतरू लागतो व थंडीचा कडाका वाढतो, तसतसे हेवी पुलओवर, स्वेटर, शॉल, मफलर, वूलन टोप्या असे एक ना अनेक उबदार कपडे बाहेर पडतात. हातमोजे व पायमोजे यांचे तर कितीही जोड असले तरी अपुरेच पडतात. त्यात ख्रिसमस आणि न्यू इयरचे आऊटिंग व पार्टी यासाठी आधीच प्लॅनिंग झालेले असते. आपण निवडलेले आऊटफिट आणि त्यावर मोठा स्वेटर यांचा मेळ काही  बसत नाही. पण आपण जर जागरूकतेने थोडा शोध घेतला, तर या वाढलेल्या कडाक्याच्या थंडीतही प्रत्येक पार्टीला आणि आऊटिंगला अगदी टापटीप फॅशनेबल दिसता येते. 

थंडीमधल्या खास ऑकेजन्ससाठी आपल्या वॉर्डरोबचा एक कप्पा ‘मस्ट हॅव वूलन्स’साठी कायम राखीव ठेवावा. या मस्ट हॅव्ह वूलन्सच्या लिस्टमध्ये काही गोष्टी ऑफ सीझन खरेदी करून ठेवल्या, तर प्रॉडक्टही दर्जेदार आणि स्वस्त मिळतो. डार्क कलर्ड कॉड्रॉय जीन्स ही फॅशन स्टेटमेंट तर आहेच, पण थंडीपासूनही छान बचाव करते. कॉट्सवूलच्या अँकललेंथ प्लीटेड ट्राऊझर्स, ए-लाईन कॉट्सवूल स्कर्ट्‌स, वूलन शॉर्ट स्कर्ट्‌स वीथ वॉर्मर स्टॉकिंग्स, हेवी ऑरगनिक क्लॉथचा फ्लेअर्ड स्कर्ट व वूलन लेगिंग्स हे कायम स्टॉकमध्ये असावे. 

रंग निवडताना त्यावर कुठल्याही रंगाचा स्वेटर, पुलओवर, जॅकेट, टॉप उठून दिसतील असे रंग निवडावेत. डार्क कलर्समध्ये ब्लॅक, नेव्ही ब्ल्यू, इंडिगो; मिडियम कलर्समध्ये लाईट व डार्क ब्राऊन; बेज कलर व लाईट कलर्समध्ये व्हाईट, लाईट ब्लू, लेमन इत्यादी निवडावेत.

फिटिंगच्या बॉटम वेअरवर ओव्हर साईज्ड लूज स्वेटर ऑफ-सेंटर टक-इन केला, तर कमालीचा कूल लुक देतो. त्याचप्रमाणे वूलन रिप्ड क्रॉप टॉप्स, ऑफ शोल्डर वूलन टॉप्स, पॉँचो, फॉर्मल शर्टवर टिमअप केलेला वूलन वेस्ट कोट, टरटल नेक टॉप्ससुद्धा वेगवेगळ्या बॉटम वेअरवर घातल्यावर अप्रतिम आणि आगळावेगळा लुक देतो. वूलन साड्यांवर पाष्मिना शाल प्रत्येक साडीची रंगत वाढवते. वूलन कुर्तीसुद्धा वेगवेगळ्या रंगसंगतींमध्ये प्रत्येक शॉपिंग स्टॉपला उपलब्ध आहेत. सर्व आऊटफिट्सला मॅच होणाऱ्या वूलन कॅप्स, ग्लोव्ह्ज, सॉक्स, मफलर, स्कार्फ हे तर सर्वत्र उपलब्ध आहेत.

विंटर स्टाइल करताना काही छोट्या बाबींकडे लक्ष द्यावे. दोन गडद रंग अथवा दोन फिके रंग क्लॅश होणार नाहीत याची काळजी घ्यावी. रंगसंगतीचा ताळमेळ नीट जुळला की प्रत्येक पोशाख खुलून दिसतो.

मग विचार कसला करताय? आपल्या वॉर्डरोबमध्ये या सगळ्यांची भर घाला आणि या गुलाबी थंडीत रोज मिक्स अँड मॅच वूलन फॅशनचा मनसोक्त आनंद लुटा!

संबंधित बातम्या