बदलती फॅशन...

सोनिया उपासनी
सोमवार, 24 जानेवारी 2022

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

कला फॅशन हा शब्दच मुळात सर्वसामान्यांमध्ये कुतूहल जागं करणारा आहे. अनेक दशकांपूर्वी जेव्हा ‘डिझाइनर आऊटफिट्स’ हा शब्द प्रचलितही झाला नव्हता, त्याकाळी लोकांसाठी फॅशन म्हणजे सिनेमात नटनट्या जे करतात त्याचे अनुकरण करणे असे. कपडे असो वा ज्वेलरी, हेअर स्टाइल असो वा बॅग्ज आणि पर्सेस, एखादा सिनेमा हिट झाला की त्यात परिधान केलेले कपडे आणि स्टाइल बरेच दिवस चलनात असे.

१९३०च्या दशकात बऱ्याच अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात होत्या. त्यामध्ये होत्या शोभना समर्थ, ललिता पवार, लीला चिटणीस, देविका राणी, शांता आपटे, सीतारा देवी. पण सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती देविका राणी या अभिनेत्रीला आणि त्याचबरोबर वाढले त्यांचे फॅन फॉलोइंग. त्यांनी प्रत्येक चित्रपटात नेसलेल्या साड्या, ब्लाउजची छोट्या बाह्यान व बंद गळ्यांची फॅशन, सगळे सगळे लोकप्रिय झाले.

१९४० व ५०चे दशक गाजवले ते अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, सुरैया, कामिनी कौशल, शकिला, शशिकला यांनी. ‘आवारा’ चित्रपटातील निरागस नर्गिस सगळ्यांच भावली व ट्राउझर टॉप्स आणि लहान केसांची ठेवण तरुण वर्गात लोकप्रिय झाली. आणखी एक चित्रपट फॅशन ट्रेंडसेटर ठरला, तो होता ‘पाकिजा’. पाकिजा ज्वेलरी, विशेषतः पायल आणि गळ्यातली, ही ऑल टाइम सुपर हिट ठरली. मिनाकुमारीचे सौंदर्य व त्यात भर घालणारे भरजरी शरारे आणि घागरे व त्यावर घातलेला कुर्तावजा टॉप, अनारकली कुर्ते ही फॅशन कधी कालबाह्य झालीच नाही. काळाप्रमाणे नावे फक्त बदलत गेली. मधुबालाचे लांब हातांचे ब्लाउज व सिम्पल प्रिंटेड साड्या ह्यांचीही मागणी वाढली. नंतर आल्या आशा पारेख, साधना, नूतन, वहिदा रहमान, हेलन.. आणि त्यांनी आपल्याबरोबर ट्रेंडमध्ये आणल्या विशिष्ट हेअर स्टाइल, सलवार कुर्ते आणि साड्यांचे प्रकार. ‘साधना कट’ तर आजही प्रसिद्ध आहे. ‘वक्त’ चित्रपटात शर्मिला टागोरने साईड फ्रिल असलेले फिटिंगचे कुर्ते घातले आणि ते त्याकाळचे ट्रेंडच झाले. लूज सलवार व बोट नेक कुर्ते यांनी सत्तरीच्या दशकापर्यंतचा काळ गाजवला. त्या दशकातील प्रिंटेड साडी व त्यावर मोठ्ठा अंबाडा असो, बेल बॉटम असो, अथवा चुडीदारवर घातलेला घट्ट स्लीव्हलेस कुर्ता किंवा मुमताजनी नेसलेली घट्ट फ्रिलची साडी, हे सगळेच प्रौढ, मध्यमवयीन स्त्रिया व तरुण मुली फॅशन म्हणून अनुकरण करू लागल्या. नंतर आला नव्वदचा दौर. माधुरी दीक्षित, जुही चावला, श्रीदेवी यांनी सगळी फॅशन स्टेटमेंट्स बदलली आणि ट्रेंडमध्ये आल्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या प्लेन झिरझिरित साड्या, पुन्हा एकदा फॅशनमध्ये आलेले अनारकली कुर्ते, घट्ट पँट व त्यावर लूज टॉप्स (ज्याला ‘लूजर’ म्हणून संबोधले जाते).

एव्हाना आपल्या लाडक्या टीव्हीनेसुद्धा प्रगती केली व दूरदर्शनव्यतिरिक्त इतर चॅनल व त्यावर विविध मालिका सुरू झाल्या. तेव्हा फॅशनने एक नव्या अंगाने भरारी घेतली. जसजशा मालिका व त्यातील प्रत्येक पात्र प्रसिद्ध होऊ लागले, तसतसा त्यांचा पेहरावही प्रसिद्ध होऊ लागला. यात दाखतात तोच आजकालचा ट्रेंड असे ठाम मत होऊ लागले. सोन्याच्या नाजूक मंगळसूत्राची जागा ठसठशीत आठ-दहा पदरी मोठे पेंडेंट असलेल्या मंगळसूत्रांनी घेतली. सुक्या कुंकवाची जागा मोठ्या रंगीबेरंगी टिकल्यांनी घेतली, कपाळभर कोरीव ओले कुंकू लावण्यास पसंती मिळू लागली आणि त्या सगळ्यात सर्वात जास्त प्रचलनात आला तो ‘भांगभर सिंदूर’ व काठ अथवा लेस लावलेल्या प्लेन साड्या. जसेजसे आधुनिकीकरण होत गेले तसतसे साड्या, दागिने, ड्रेसेस यामध्येसुद्धा बदल होत गेले.

प्लेन साड्यांची जागा लहरिया क्रेप व भरजरी वर्क केलेल्या साड्यांनी घेतली. सिम्पल सलवार कुर्त्यावर हेवी वर्क दुपट्टे दिसू लागले व त्याचबरोबर चलनात आल्या चामड्याच्या कोल्हापुरी चप्पल व मोठे झुमके. तुलसीसारखे लांब केस व गुजराती पद्धतीची साडी सर्व सुनांची पसंती बनली, तर पार्वतीची लांब वेणी व साधे राहणीमान मध्यमवयीन स्त्रियांच्या मनात घर करून गेले. तर ताराचा शॉर्ट बॉबकट व वेस्टर्न पद्धतीचे कपडे तरुण वर्गाच्या पसंतीस उतरले. 

नंतर सुरू झाल्या मराठी मालिकांच्या लडी व आपल्या मराठमोळ्या गृहिणींनी बदलत्या फॅशनप्रमाणे परत काठापदराच्या साड्या व बॉर्डरचे सलवार कुर्ते पेहरावत आणले. जसजशी फॅशन इंडस्ट्री प्रगत होत गेली, तसतसे साड्यांच्या प्रकारात व साडी नेसण्याच्या पद्धतीत बदल होत गेले. स्ट्रेट कट कुर्त्यामध्ये आधुनिकीकरण झाले, अनारकली कुर्त्यांना एक वेगळी कलाटणी मिळाली व नेटचे कुर्ते, टॉप ट्रेंडमध्ये आले. घागरा चोली व शॉर्ट स्कर्टवर क्रॉप टॉपचा हा प्रवास मध्यमवर्गीय, मध्यमवयीन गृहिणींनी बघितला.

आजच्या युगात कुठल्यास पेहरावाला वयाचे बंधन नाही. बांधा, उंची, रंग यावर पेहराव ठरतो. सध्या जंपसूट, डंगरी, रफल्ड साडी, मॅक्सी ड्रेस, ऑफ शोल्डर टॉप्स, लेस आणि नेटचे टॉप्स, शिमरचे वन पिस, नी लेंथ ड्रेसेस ट्रेंडमध्ये आहेत. फ्लोरल आणि नाजूक प्रिंट यांना विशेष पसंती आहे.

जी फॅशन काल परवापर्यंत फक्त सिनेमा व मालिकांपर्यंत मर्यादित होती, ती आता स्मार्टफोनद्वारे घराघरात पोचली आहे. पूर्वी लोक अनुकरण करत. आता बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे लोक स्वतःचे फॅशन स्टेटमेंट स्वतः बनवू लागले आहेत, मग वर्ग कुठलाही असो प्रौढ, मध्यमवयीन अथवा तरुणाई. सगळ्यात वेगळे व हटके दिसण्याच्या चढाओढीत फॅशन रोज एक नव्या रूपाने समोर येते.

संबंधित बातम्या