जुन्या कपड्यांचा करा मेकओव्हर

सोनिया उपासनी
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

आवडत्या पण ‘निगलेक्टेड’ कपड्यांना नैसर्गिकरीत्या, कुठलेही हार्श केमिकल्स न वापरता एक नवी झळाळी देता येते. पांढऱ्या व फिक्या रंगाच्या कपड्यांचे मेकओव्हर करायला सोपे असते. ज्या रंगाचे डाग कापडावर असतील, अथवा ठेवणीतील पिंगट झालेले कपडे त्याच रंगाच्या शेडमध्ये घरच्या घरी डाय करता येतात. 

बरेचदा असे होते की कपडे विकत घेताना आपण चांगले टिकाऊ, मजबूत कापडाचे म्हणून विकत होतो आणि त्याप्रमाणे त्याला किंमतही चांगलीच मोजतो. कालांतराने तेच कपडे परत परत घालायचा कंटाळा येतो. ते धड घालवतही नाहीत व महागडे म्हणून टाकवतही नाहीत. अशावेळेस घरच्या घरी सहज उपलब्ध घरगुती जिनसांपासून फार कमी वेळात आपण छानपैकी अशा ‘निगलेक्टेड’ कपड्यांचा मेकओव्हर करू शकतो. 

मेकओव्हर करण्याच्या रांगेत प्रथम क्रमांकावर असतात ते पांढरे कपडे. कारण पांढरे कपडे कितीही चांगल्या गुणवत्तेचे असले तरी कुठल्याही प्रकारचा एक डाग पडला की कपडे खराबच होतात. ब्लिच अथवा स्टेन रिमूव्हरने डाग निघाले तर नशीब म्हणायचे, नाही तर संपलेच. पांढऱ्या रंगामागोमाग दुसरा क्रमांक येतो तो सर्व गडद रंगाच्या कपड्यांचा. गडद रंगांच्या कपड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अगदी चुकून कडक उन्हात वाळत घातले तरी रंग उडालाच म्हणून समजा. त्यात जर चुकून सुलटे वाळायला ठेवले, तर सुलट बाजू रंग उडालेली आणि उलट बाजू नवी दिसते. एकंदर काय, तर परत प्रॉब्लेमच! गडद रंगांवर डाग पडले आणि चुकून स्टेन रिमूव्हरऐवजी ब्लिच वापरले गेले तर मग काय सगळाच आनंद. एखाद्या आवडीच्या ड्रेस, साडी, शर्ट वा टी-शर्टच्या बाबतीत असे झाले, तर मन हळहळत राहते.

पांढऱ्या आणि गडद रंगांनंतर तिसऱ्या क्रमांकावर असतात ते बिचारे सर्व मिडलटोन कलर. ह्या रंगसंगतीत मोडल्या जाणाऱ्या कपड्यांची अवस्था अशी असते, की कितीही महागडे आणि टिकाऊ घेतले तरी काही वेळा धुतल्यावर जुनेच दिसायला लागतात.

तर या सगळ्या आवडत्या पण निगलेक्टेड कपड्यांना नैसर्गिकरीत्या, कुठलेही हार्श केमिकल्स न वापरता एक नवी झळाळी देता येते. पांढऱ्या व फिक्या रंगाच्या कपड्यांचे मेकओव्हर करायला सोपे असते. ज्या रंगाचे डाग कापडावर असतील, अथवा ठेवणीतील पिंगट झालेले कपडे त्याच रंगाच्या शेडमध्ये घरच्या घरी डाय करता येतात. 

डाळिंबाची साल ः डाळिंबाच्या सालात टॅनिन नावाचा घटक असतो, जो दुसऱ्या कापडावर रंग पक्का करतो. कॉटन, लिनन, ऑरगॅनिक क्लोदिंग, लोकर व सिल्कवर डाळिंबाच्या सालाचा रंग उत्तमरीत्या उतरतो. पांढऱ्या कापडाला पिवळा रंग देतो, तर फिक्या कापडाला फॉन कलर देतो. डाळिंब कच्चे असेल तर कापडाला फिका पिवळा रंग येतो. डाळिंब पिकलेले असेल तर सोनेरी पिवळा रंग येतो. 

डाळिंबाच्या साली वाळवून रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवाव्यात. कापडाचे बल्क जेवढे असेल साधारण त्या प्रमाणात वाळलेली साल घ्यावी. दुसऱ्या दिवशी ही भिजलेली साल त्या पाण्यासकट साधारण तासभर उकळवावी. उकळून झाल्यावर ते पाणी पूर्णपणे गार होऊ द्यावे व नंतर ते नीट डबलमेशने गाळून घ्यावे. नंतर डाय करायचे कापड साध्या पाण्याने ओले करून मग या डाळिंबाच्या सालाच्या पाण्यात साधारण तास - दीडतास भिजवून ठेवावे. कापडाला युनिफॉर्म कलर (एकसारखा कलर) हवा असेल तर गाळलेले पाणी वापरावे व अनइव्हन कलर हवा असेल तर साल न गाळता तसेच त्या पाण्यात कापड बुडवावे. ह्यामध्ये कापडाला लाईट, डार्क अनइव्हन शेड मिळते. कापड पाण्यातून बाहेर काढून हलकेच पिळावे व झटकून सावलीत वाळत घालावे. या प्रक्रियेमध्ये तुम्ही टी-शर्ट, शर्ट, कुर्ता, टॉप, दुपट्टा, साडी सर्व प्रकारच्या कापडांचा मेकओव्हर करू शकता. 

जांभळा कोबी  ः सिल्कच्या कापडावर घरच्या घरी डाय करायचा असेल, तर बाजारात उपलब्ध असलेला जांभळा कोबी अत्यंत उपयुक्त आहे. ही भाजी कापडाला सुरेख जांभळ्या रंगाची शेड आणते. कापड रंगवण्यासाठी कोबीची कमीतकमी पाचपट पाने लागतात. एक पसरट भांडे घेऊन त्यात कोबीची पाने आणि कापड बुडेल एवढे पाणी घालावे. नंतर भांड्यात तळाला कोबीच्या पानांचा एक लेअर पसरावा. त्यावर फॅब्रिकची पाठची बाजू पसरावी. टी-कार्ट, शर्ट अथवा टॉप असेल तर त्याच्या मध्यभागी परत एक पानांचा लेअर पसरावा. फॅब्रिकच्या टॉप लेअरवर पुन्हा पाने पसरवीत. नंतर हे भांडे झाकून रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी हे भांडे गॅसवर ठेवून डाय-बाथला म्हणजेच पाण्याला उकळी येईपर्यंतच तसेच ठेवावे. नंतर साधारण दोन तासांनी कापड बाहेर काढावे व व्यवस्थित सुकवावे. सुंदर जांभळी शेड कापडावर आलेली दिसते. जर तुम्हाला निळसर जांभळ्या रंगाची शेड अपेक्षित असेल, तर हे पानांचे पाणी फेकून न देता त्यात साधारण तीन चमचे मीठ घालावे. वाळलेले कापड परत त्या पाण्यात घालून उकळी येईपर्यंतच गॅस सुरू ठेवावा. सेम प्रोसिजर रिपीट करावी. सुकल्यावर कापड सुंदर निळसर जांभळ्या रंगाचे दिसते.

संबंधित बातम्या