डाय ईट यूवरसेल्फ!

सोनिया उपासनी
सोमवार, 7 मार्च 2022

स्टाइल स्टेटमेंट

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या कॉफीपासून गाजराच्या सालांपर्यंत अनेक पदार्थांचा वापर करून जुन्या कपड्यांचा मेकओव्हर करता येतो. फिका, गडद आपल्याला हवा तसा डाय करून कापडाचा लूक बदलता येईल.

मागील लेखात आपण जुन्या कपड्यांचा मेकओव्हर करायला शिकलो. डाळिंबाचे साल व जांभळ्या कोबीपासून तयार होणारे घरगुती डाय कसे करायचे हे बघितले. आता बघूया आपल्याच स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या इतर जिनसांपासून डाग पडलेल्या व रंग उडालेल्या कपड्यांचा मेकओव्हर कसा करता येईल.

कॉफी
कॉफी हा पदार्थ प्रत्येकाच्याच घरात उपलब्ध असतो. बऱ्याच लोकांना फ्रेश कॉफी लागते, त्यामुळे कॉफी बीन्स आणून हवी तेव्हा बीन्सची पूड करून वापरली जाते. अनेकांकडे फिल्टर कॉफीही वापरली जाते. इन्स्टन्ट कॉफी मात्र घराघरात असते. हीच कॉफी कापड रंगवण्यासाठी वापरता येते. कापडाच्या वजनाइतकीच कॉफी घ्यावी. आधी कापड नीट बुडेल इतके पाणी घेऊन त्यात कॉफी घालून पाणी किमान अर्धा तास उकळू द्यावे. पाणी गार झाल्यावर कॉफी नीट गाळून घ्यावी व त्यात कापड बुडवावे. परत बारीक गॅसवर अर्धा तास गरम करावे. नंतर पाणी व कापड संपूर्ण गार झाल्यावर कापड हलकेच पिळून बाहेर काढावे व वाळवावे.

इतर सर्व कापडांपेक्षा सिल्कच्या कापडावर रंग जरा हलका चढतो. बाकी कापडांवर लाईट ब्राऊन शेड, बेज शेड छान येते. डार्क ब्राऊन शेड हवी असल्यास कॉफीचे प्रमाण जरा जास्त घ्यावे. 

फेड झालेल्या ब्लॅक जीन्स जर या पद्धतीने रंगवल्या तर नव्यासारख्या दिसायला लागतात. जीन्स नव्हे तर इतरही काळ्या व ब्राऊन शेडमधले कपडे फेड झाले असतील, तर या पद्धतीने त्यांचे नूतनीकरण करू शकतो.

हळद 
कित्येक वर्षांपासून हळद वापरून कापड रंगवले जात आहे. हळदीचा डाय कॉटन सिल्क आणि लोकरीवर खूप व्यवस्थित बसतो. हा नॅचरल कलर अनेक धुण्यांमध्ये जरी हळूहळू फेड होत गेला, तरी कापडाच्या क्वालिटीमध्ये फरक पडत नाही.

रंग किती गडद हवा त्याप्रमाणे हळद दोन चमच्यांपासून ते पाच चमच्यांपर्यंत एका मोठ्या भांड्यात घेऊन कापड बुडेल इतपत पाणी घालून उकळावे. अखंड कापड रंगवायचे असेल तर सगळे कापड त्यात बुडवावे. बांधणी डिझाईनमध्ये रंगवायचे असेल तर डिझाईनप्रमाणे दोऱ्याने कापड गुंडाळावे व पक्क्या गाठी माराव्यात. नंतर ते कापडाला उकळत्या हळदीच्या पाण्यात तासभर तसेच सोडावे. नंतर नीट स्वच्छ पाण्याने धुऊन काढावे. जर डार्क ऑरेंज अथवा तांबडा रंग हवा असेल तर डाय बाथमध्ये सोडताना त्यात आठ ते दहा चमचे लिंबाचा रस घालावा व बाकी प्रोसेस तशीच करावी.

ब्लीच 
बाथरूम धुवायला असो, किंवा पांढऱ्या कपड्यांचा पिंगटपणा घालवण्यासाठी असो, प्रत्येक घरामध्ये ब्लीच असतेच. डार्क कपड्यांना ‘टाय ॲण्ड डाय’ पद्धतीने झटपट रंगवण्यासाठी व त्याला डिझाईनर लूक देण्यासाठी ब्लीचचाही वापर केला जातो. पावडर ब्लीचचा हायड्रोजन पॅरॉक्साईड व ॲक्टिवेटर घालून तयार केलेला घोळ, अथवा रेडिमेड ब्लिचिंग स्प्रेने तुम्ही ही प्रक्रिया पार पाडू शकता. 

यामध्ये बांधणी पद्धतीने डिझाईन तयार करायचे असेल, तर कापडाला दोऱ्याने हव्या त्या पद्धतीने बांधून त्यावर ब्लीच सोल्यूशन स्प्रे करावे. प्राणी-पक्ष्यांचे अथवा कुठलेही चित्र रंगवायचे असल्यास आधी कार्ड बोर्डवर त्याचे स्टेन्सिल तयार करावे. मग कापडावर स्टेन्सिल ठेवून त्याच्या आत ब्लीच स्प्रे करावे. डार्क कापडावर हा प्रयोग अधिक उठून दिसतो.

स्वयंपाकघरामध्ये वापरात येणारा सर्व भाजीपाला, मसाले यांपासून कापडांवर छान रंग देता येतो. 

 •     गाजर व कांद्याची साले वापरून छान ऑरेंज शेड तयार करता येते.  
 •     ओक बार्क, कॉफी, चहा, अक्रोडाचे साल यांपासून ब्राऊन शेड्स देता येतात. 
 •     गुलाब, सर्व प्रकारच्या रेड व पिंक बेरी, ॲवोकॅडोचे बी व साल यांपासून लाईट ते डार्क पिंक शेड देता येते. 
 •     निळ्या शेडसाठी मलबेरी, ब्लू बेरी, काळी द्राक्षे अथवा बाजारात सहज उपलब्ध असलेला इंडिगो कलरही वापरता येतो. 
 •     लाल रंगासाठी डाळिंब, बीट, लाल रंगाची जास्वंदीची फुले, लाल कंद यांचाही वापर होतो.
 •     काळसर अथवा ग्रे रंगासाठी चारकोल पावडर, ब्लॅक बेरी, अक्रोडाचे मधले आवरण, शाई याचा वापर करता येतो. 
 •     हिरव्या रंगासाठी पालक, पुदिना, गवत (हरळ) लिलीचे पान वापरता येते. 
 •     पिवळ्या रंगासाठी तेजपान, झेंडूच्या पाकळ्या, सूर्यफुलाच्या पाकळ्या, हळद, सेलेरीची पाने वापरली जातात.

काही टिप्स 

 •     डायसाठी वापरण्यात येणारे जिन्नस जर आधी नीट वाळवून घेतले व मग कापड रंगवण्यासाठी वापरले, तर कापडावर रंग अधिक खुलून येतो.
 •     कपडे रंगवण्यासाठी कोणताही जिन्नस घेतला तरी साधारण प्रक्रिया सारखीच असते. गरम पाण्यात आधी जिन्नस उकळून घ्यायचे आणि नंतर कापड त्यात बुडवून परत उकळी येऊ द्यायची. 
 •     बाजारात कलर फिक्सर मिळतात. दीर्घ काळ जर हे रंग टिकवून ठेवायचे असतील, तर कापड वाळले की परत या फिक्सरच्या पाण्यात बुडवून ठेवावे आणि अर्ध्या तासाने हलकेच पिळून वाळवावे.

संबंधित बातम्या