चंदेरी आणि माहेश्वरी

सोनिया उपासनी
सोमवार, 21 मार्च 2022

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

वेस्टर्न, इंडोवेस्टर्न, ड्रेस, ट्युनिक, टॉप, कुर्ती यांच्या उत्पादनासाठी जगभरात डिझायनर चंदेरी कापड वापरणे पसंत करतात. तर, माहेश्वरी फॅब्रिकला भारतातील सर्वात तलम व ‘रीच’ फॅब्रिक म्हणून ओळखले जाते. माहेश्वरी फॅब्रिकच्या साड्या व कापड सिल्क, कॉटन व कॉटनसिल्कमध्ये उपलब्ध आहेत.

भारताच्या मध्यभागी असलेले मध्यप्रदेश राज्य हे प्रसिद्ध आहे तेथील सृष्टीसौंदर्य, टेक्सटाईल इंडस्ट्री, हँडलूम व प्रिंट इंडस्ट्रीसाठी. आज जाणून घेऊया मध्यप्रदेशच्या हँडलूम आणि हॅंडीक्राफ्टबद्दल. हॅंडलूममध्ये चंदेरी व माहेश्वर ही ठिकाणे विशेष प्रकाशझोतात आली.

चंदेरी 
पुरातन काळापासून चंदेरी हे गाव चंदेरी कापड विणण्यासाठी ओळखले जायचे. ताणा व बाणा (वार्प आणि वेफ्ट) ही पद्धत वापरून कापड विणले जायचे. चंदेरी कापडाचा उल्लेख आपल्या पुराणांमध्येही आहे व असे म्हटले जाते की चंदेरीची उत्पत्ती ही कृष्णकालीन आहे. या उल्लेखानुसार श्रीकृष्णाचा आतेभाऊ शिशुपाल याने चंदेरी वस्त्राचा शोध लावला. या वस्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे अतिशय तलम, वजनाला हलके व जरीकाम केलेले कापड, सिल्क व सुती धाग्याने विणले जाते. पुरातन काळापासून हॅँडस्पन धागा वापरण्याची पद्धत प्रचलनात झाली. आजही हॅँडस्पन यार्न आणि हँडवूव्हन चंदेरी वस्त्राला जास्त मागणी आहे. 

चंदेरी दुपट्टे, साड्या व फॅब्रिकवर पाने, फुले, झाडे, मोर, कमळ, पृथ्वीवरील सृष्टीसौंदर्य, आकाश, गोल्ड बुट्टी (अशरफी) या प्रकारचे मोटिफ वापरले जातात. दिसायला सोबर, नेसायला हलक्या-फुलक्या कॉटन व सिल्कच्या धाग्याच्या वापरामुळे वस्त्रांवर थोडी चमक असते व वस्त्र थोडे पारदर्शकही असते. 

चंदेरी वस्त्र तीन प्रकारांमध्ये विणले जाते. प्युअर सिल्क चंदेरी, कॉटन चंदेरी व कॉटन सिल्क चंदेरी.  साधारण १९३०नंतर ट्रॅडिशनल चंदेरीचा लूक बदलून थोडा मॉडर्नाइझ झाला. सुरुवातीला जी चंदेरी फक्त पेस्टल कलर आणि गोल्ड जरीमध्ये  विणली जायची, ती आता ब्राईट कलर व गोल्ड, सिल्व्हर व कॉपर जरीवरसुद्धा विणली जाते. यामध्ये प्रामुख्याने लाल, काळा, गडद गुलाबी, मोरपंखी, निळा व पांढरा हे रंग वापरल्याने फॅब्रिकला एक व्हायब्रन्ट लूक येतो. सुरुवातीला फक्त साड्या, घागरे, गरारे यासाठी चंदेरी वस्त्र निर्मिती होत असे. आता मात्र बदलत्या काळानुसार वेस्टर्न, इंडोवेस्टर्न, ड्रेस, ट्युनिक, टॉप, कुर्ती यांच्या उत्पादनासाठी जगभरात डिझायनर चंदेरी कापड वापरणे पसंत करतात. चंदेरीला ‘चॉईस ऑफ द रॉयल्स’ असेही संबोधले जाते.

माहेश्वरी
माहेश्वरी साड्या व फॅब्रिक याचा उल्लेख पाचव्या शतकापासून आढळतो. माहेश्वरी फॅब्रिक खऱ्या अर्थाने नावारूपास आले ते पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे. १८व्या शतकात होळकर घराण्याने माहेश्वरवर राज्य केले व तेथील हातमागाची खासियत आधी राजघराण्यांमध्ये व नंतर सामान्य माणसांमध्ये ट्रेंड सेटर झाली. माहेश्वरी फॅब्रिकला भारतातील सर्वात तलम व ‘रीच’ फॅब्रिक म्हणून ओळखले जाते. चंदेरी प्रमाणेच या साड्या व कापड सिल्क, कॉटन व कॉटनसिल्कमध्ये उपलब्ध आहेत. 

बुट्टे, बॉर्डर व पदरावर जरीकामासाठी जरीच्या धाग्याचा वापर केला जातो. माहेश्वरी साड्यांमध्ये गुलदस्ता, आमबुटी (कोयऱ्या), घुंगरू, चटई किनार, बेलफुल, जाईफुल, हंस, मयूर, चांदतारा हे मोटिफ बघायला मिळतात. माहेश्वरी साड्या व फॅब्रिक दिसायला सिम्पल-एलिगंट असतात. चेक्स, स्ट्राईप, बुटीदार व प्लेन या प्रकारामध्ये उपलब्ध असतात. 

फरक कसा ओळखाल?
चंदेरी आणि माहेश्वरी असे वेगळे ओळखताना साड्या आणि फॅब्रिकबद्दल माहीत नसलेल्यांचा चंदेरी कुठली व माहेश्वरी कुठली असा गोंधळ होऊ शकतो, कारण दोन्ही पहिल्यांदा बघताना कमी-जास्त प्रमाणात सारख्याच दिसतात. खालील काही गोष्टी लक्षात ठेवल्या, तर चंदेरी व माहेश्वरी साड्या ओळखायला सोप्या जातात.  

  • चंदेरी साड्यांच्या डिझाईनमध्ये आडवा धागा (वेफ्ट) वापरतात व माहेश्वरीच्या डिझाईनला उभ्या (वार्प) धाग्याने सुरुवात करतात.
  • माहेश्वरी साड्यांमध्ये साधारण चार हजार स्ट्रिंग उभ्या धाग्याचे वापरले जातात. चंदेरी साड्यांमध्ये साधारण ५,६०० स्ट्रिंग वापरले जातात, ज्यामुळे चंदेरी साडी अधिक नाजूक व पारदर्शी होते. 
  • माहेश्वरी साड्यांवर जिऑमेट्रिकल बुटी व रेषांचा जास्त समावेश असतो आणि मोटिफ कमी प्रमाणात वापरले जातात. तर, चंदेरी साड्यांवर मोटिफला जास्त भर दिला जातो.
  • चंदेरी साड्यांवर व फॅब्रिकवर वापरले जाणारे मोटिक हे फ्लोरल व बोल्ड असतात.
  • माहेश्वरी साड्यांना मोठी बॉर्डर व माहेश्वर फोर्टच्या भिंतीवर जे डिझाईन आहे, ते वापरले जाते. चंदेरी साड्यांची बॉर्डर थोडी बारीक असते व बॉर्डरसाठी विविध प्रकारच्या डिझाईनचा वापर केला जातो.

संबंधित बातम्या