समर ॲक्सेसरी...

सोनिया उपासनी
सोमवार, 18 एप्रिल 2022

 स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

उन्हाळा म्हटले की नुसता घाम आणि चिकचिक. त्या भानगडीत फॅशन-बिशन करायचे जिवावर येते. पण आधीच नीट तयारी केली, तर उन्हाळ्यातही योग्य कपडे आणि ॲक्सेसरीज वापरून तुम्ही स्टायलिश दिसू शकता. 

मार्च संपता संपता तापमानाचा पारा हळूहळू वाढायला सुरुवात होते. एप्रिल महिन्यात तर वातावरण अधिकच शुष्क होते. त्यामुळे उन्हाचे चटके अधिक प्रमाणात जाणवू लागतात आणि अंगाची तलखी सुरू होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीच या उन्हाच्या तडाख्यातून सुटत नाही. उष्म्याचे प्रमाण वाढले की कुठलेही जाडसर कपडे, घट्ट कपडे घालायला नको वाटतात. कोणी भडक रंग परिधान केलेले नुसते बघितले तरी डोळ्यांना त्रास होतो. उठसूट बाहेर जाण्यावर बंधने येतात. पण जरा हुशारीने वागलो व काही नियमांचे पालन करून घराबाहेर पडलो तर उन्हाळाही सुखकर होऊ शकतो. 

घराबाहेर पडताना ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याची यादी तयार करून वस्तू आधीच खरेदी करून ठेवल्या, तर ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येते. उन्हापासून चेहऱ्याच्या संरक्षणासाठी स्त्रियांनी पातळ सुती लांब स्कार्फ व पुरुषांनी स्मार्फ (मास्कवजा आटोपशीर स्कार्फ) वापरावे. पुरुषांचे स्मार्फ जागोजागी विकत मिळतात आणि ते वापरून झाले की ठेवायलाही आटोपशीर असतात. छोटीशी घडी करून पँटच्या खिशातही ठेवता येतात. स्त्रिया घरी उपलब्ध असलेल्या जुन्या सुती ओढण्या व दुपट्टे तसेच्या तसे वापरू शकतात, अथवा ९० सेमी × ९० सेमी आकारामध्ये कापून त्याला टीप मारून आटोपशीर स्कार्फ म्हणून वापरू शकतात. ओढण्या व दुपट्टे कलरफुल असतील तर त्या तशाच लांबलचक ठेवून त्याला ‘बंडाना’ पद्धतीनेही डोक्यावर बांधू शकता. हे उन्हापासून बचाव तर करतेच शिवाय दिसायलाही स्टायलिश दिसते. बंडाना हा प्रकार युनिसेक्स असल्याने पुरुषही बांधू शकतात. 

स्कार्फ ‘बांधायची’ भानगड नको असेल तर हल्ली बाजारपेठेत क्विक, इझी-टू-यूज हेड स्कार्फ उपलब्ध आहेत. यामध्ये फक्त डोळ्याचा भाग व नाकपुड्या उघड्या राहतील एवढा भाग ओपन असतो. बाकी चेहरा, कपाळ, केस या सर्वांचा उन्हाच्या तीव्रतेपासून व्यवस्थित बचाव होतो. वापरायला सोपे व स्टाइल स्टेटमेंटमध्ये भर घालणारे असे हे युझर फ्रेंडली स्कार्फ सर्वत्र खरेदीसाठी उपलब्ध असतात.

स्कार्फ वापरणे अगदीच अवघड वाटत असेल तर कापडी व वाळ्याची हॅट व कॅपही एक छान स्टाइल स्टेटमेंट ठरू शकते. या हॅट व कॅप सर्व प्रकारच्या फॅब्रिकमध्ये व बांबूपासूनही तयार केल्या जातात. वाळ्याचे तंतू धाग्यांमध्ये विणून त्याला कापडी पायपीन लावून छान कॅप तयार केल्या जातात. केन व बांबूपासून सुंदर हॅट तयार करतात. कापडांमध्ये जीन्स व कॅनव्हासपासून सुंदर विविध रंगी हॅट तयार होतात, ज्या मिक्स अँड मॅच करून आपण वेगवेगळ्या वेशभूषेवर घालू शकतो. 

उन्हाळी फॅशनमध्ये भर घालणारी दुसरी ॲक्सेसरी म्हणजे स्मार्ट गॉगल. गॉगलमध्येही बरीच व्हरायटी येते. स्त्रियांसाठी वेगळे, मुलांसाठी वेगळे, पुरुषांची स्टाइल वेगळी आणि सर्वांना वापरता येतील असे युनिसेक्स गॉगलही खरेदी करू शकता. ब्लॅक फ्रेममध्ये वेगवेगळे काळे, निळे, पिवळे, लाल, ग्रे, टिंट असलेले गॉगल ही तरुण वर्गाची आवड आहे. ज्यांना रात्रीही गाडी चालवायला लागते अशांनी डे -नाईट गॉगलचा वापर करावा. हल्ली रेट्रोस्टाइलच्या गॉगलना जास्त मागणी आहे. यामध्ये रंगीबेरंगी फ्रेम, निरनिराळे आकार व टिंट आहेत. गोलाकार, त्रिकोणी व मोठ्या आयताकृती फ्रेम परत ट्रेंडमध्ये आल्या आहेत. अशा प्रकारच्या फ्रेम सिनेसृष्टीत अनेक नट-नट्यांनी गाजवल्या. हा काळ १९७०च्या दशकातला. रेखा, परवीन बाबी, ज़ीनत अमान, डिंपल कपाडिया यांना चित्रपटात बघून लोक त्याप्रमाणे अशा मोठ्या आकाराच्या गॉगलची खरेदी करू लागले. हीच स्टाइल आता पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे.

     घरातून बाहेर निघताना उन्हात सर्वात जास्त वाट लागते ती हातांची व पावलांची. पूर्वी हातमोजे व पायमोजे फक्त पांढरे किंवा स्कीन कलरमध्ये मिळायचे. आता विविध लाईट कलर्समध्येही मिळतात. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. बाह्यांच्या लांबीप्रमाणेही हातमोजे उपलब्ध आहेत. स्लीव्हलेस ड्रेस असेल तर  २८ ते ३० इंची, हाफ बाह्या असतील तर २२ ते २४ इंची, थ्री फोर्थ बाह्या असतील तर १५ ते १८ इंची व फुल बाह्यांसाठी फक्त हाताचे पंजे कव्हर करणारे १० इंची हातमोजे खरेदी करू शकता.  

उन्हाळी ॲक्सेसरीजमध्ये अजून एक वस्तू स्टाइलमध्ये भर घालते, ती म्हणजे फोल्डिंग कॉटन अम्ब्रेला. ही कॉटनची छत्री उन्हापासून तर बचाव करतेच, शिवाय सगळीकडे कॅरी करायलाही सोपी असते. छोट्या पर्समध्ये, हँडबॅगमध्ये कुठेही सहजपणे मावणाऱ्या या छत्र्या सुंदर, आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. मुलांसाठी कार्टून व ॲनिमल प्रिंट, कॉर्पोरेट्ससाठी प्लेन सटल कलर, मध्यमवयीन लोक प्रिंट्स अथवा पोलका डॉटचे डिझाईन असलेल्या छत्र्या वापरू शकतात. 

समर लुकसाठी स्लिंग बॅगही कापडी वापरल्या तर स्वतःला कूल लुक देता येतो. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे कॉटन स्लिंग बॅग विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत. छोट्या स्लिंगपासून मोठ्या शबनम बॅगपर्यंत तुमच्या गरजेनुसार तुम्ही खरेदी करू शकता.

संबंधित बातम्या