आय सूदिंग ‘पेस्टल्स’

सोनिया उपासनी
सोमवार, 16 मे 2022

स्टाइल स्टेटमेंट

सर्व ऋतूंमध्ये पेस्टल शेड वापरल्या जात असल्या तरी खास करून उन्हाळ्यात या शेड आय सूदिंग असतात. तापमानाचा पारा कितीही चढो, पेस्टल शेडमध्ये कम्फर्टेबल लूज हवेशीर कपडे परिधान केले, तर उन्हाळाही छान सुखकर जाऊ शकतो.

फॅशनच्या रंगीबेरंगी दुनियेत कपड्यांचे पॅटर्न जसे सारखे बदलत असतात, त्याचप्रमाणे त्या कपड्यांच्या रंगसंगतीतही बदल होत असतो. ऋतुमानानुसार वॉर्म कलर, कूल शेड अथवा पेस्टल कलरचा वापर करता येतो. थंडीमध्ये वॉर्म शेड, उन्हाळ्यामध्ये कूल लाइट शेड, पावसाळ्यात डार्क व अर्दी शेड वापरायच्या ही संकल्पना आपल्या डोक्यात अगदी फिट बसली आहे. 

सध्या उन्हाळ्यात पेस्टल शेड वापरण्याचा ट्रेंड आहे. पण तो नवा नाही. पेस्टल्स साधारण दोनशे वर्षांपासून अस्तित्वात आहेत व जगभरात त्यांचा वापर होतोय. कपड्यांच्या फॅशनबरोबरच घरातील फर्निचर, फर्निशिंग, घराचा रंग यामध्येही पेस्टल शेडचा वापर होतो. पेस्टल शेडचा ट्रेंड भारताआधी पाश्चात्त्य देशांमध्ये जास्त प्रचलित झाला, विशेषतः इटलीमध्ये. भारतामध्ये मात्र १९५०नंतर हळूहळू जसे या शेडचे ट्रेंड येऊ लागले, तसतसा त्याचा वापरही आपल्या देशात जास्त होऊ लागला. पण गंमत अशी झालीस की ‘फॅशन पर्सोना’व्यतिरिक्त सामान्य माणसाला या रंगांची जास्त माहिती नसल्यामुळे पेस्टल शेडला भारतात सुरुवातीला ‘इंग्लिश कलर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 

प्रत्येक दशकात पेस्टल शेड कमी-जास्त प्रमाणात नेहमीच फॅशनमध्ये राहिल्या. २००८च्या मोठ्या आर्थिक संकट आणि मंदीनंतर पेस्टल परत फॅशनमध्ये आले आणि आजतागायत टिकून आहेत. तेव्हापासून भारतातील फॅशन इंडस्ट्रीवर पेस्टल शेडचे राज्य कायम आहे. हे रंग कुठल्याही ऋतूमध्ये वापरता येतात व कुठल्याही समारंभाची शोभा वाढवतात. नवऱ्या मुलींचा कलसुद्धा गडद रंग सोडून पेस्टल शेडच्या साड्या व लेहंगा याकडे जास्त आहे. आजकाल लग्नसमारंभाच्या थीमसुद्धा पेस्टल शेडमध्ये एकदम रिच लुक देतात. 

पण या पेस्टल शेड नेमक्या आहेत तरी कुठल्या? पेस्टल शेड डोळ्याला कायम आल्हाददायक वाटणारे, फिकट रंग असतात. नाजूक दिसणारे हे रंग सर्व प्रसंगांमध्ये वापरायला उत्तम असतात. गुलाबी रंगातील लाइट शेड, जांभळ्या रंगातील लाइट शेड, बेबी ब्लू, मिंट ग्रीन, पिच, लव्हेंडर, सदाफुलीच्या फुलातील रंगांच्या सर्व शेड, क्रीम, सूदिंग यलो, लाईटेस्ट ऑरेंज, ब्लुईश ग्रीन, पेस्टल रेड, हे सगळे डोळ्याला त्रास न होणारे रंग पेस्टल शेडमध्ये मोडतात. कुठलीही पेस्टल शेड तयार करताना १५ ते २० टक्के प्रायमरी अथवा सेकंडरी कलर ८० ते ८५ टक्के पांढऱ्या रंगात, हवी ती पेस्टल शेड मिळेपर्यंत ब्लेंड करतात. कुठलाही रंग त्याचे पिगमेंट न बिघडवता ८० टक्क्यांपर्यंत पांढऱ्या रंगात मिसळले जातात, त्या सर्वच रंगांना आपण पेस्टल कलर म्हणू शकतो.

सर्व ऋतूंमध्ये हे रंग वापरले जात असले, तरी खास करून उन्हाळ्यात या शेड आय सूदिंग असतात. तापमानाचा पारा कितीही चढो, बाहेर जाऊन काम करणाऱ्या लोकांना, विद्यार्थी वर्गाला घरातून बाहेर पडावेच लागते. अशा वेळी जर पेस्टल शेडमध्ये कम्फर्टेबल लूज हवेशीर कपडे परिधान केले, तर उन्हाळाही छान सुखकर जाऊ शकतो. 

फॅशन जगतात पेस्टलचा एकच नियम आहे, कुठल्याही दोन सारख्या टोनच्या शेड शक्यतो एकत्र मिसळायच्या नाहीत. एक तर एकाच रंगाची मोनोटॉनी ठेवायची अथवा पेस्टलबरोबर पांढऱ्या रंगाचे मिक्स ॲण्ड मॅच करायचे. बॉटम वेअर पेस्टल शेडमध्ये आणि टॉप वेअर व्हाईटमध्ये ठेवले व त्यावर बॉटम वेअरवर मॅच होईल असा स्कार्फ, स्टोल, टाय वापरला तर छान समर कूल लूक देता येतो. पेस्टल ट्राउझर, पँट, स्कर्ट, प्लाझो, शॉर्ट्स, नॅरो बॉटम पँट या गोष्टी बॉटम वेअरमध्ये येतात. टॉप वेअरला ब्लेझर, व्हाईट शर्ट, टॉप, ब्लाऊज, क्रॉप टॉप, श्रग, कफतान हे व्हाईट अथवा पेल शेडमध्ये उठून दिसतात. डेनिम ब्लूवर सर्व प्रकारचे पेस्टल शेडमधील टॉप वेअर उठून दिसतात. ब्रायडल वेअरमध्येसुद्धा सर्व प्रकारचे पेस्टल शेडमधले लेहंगे, साड्या, इंडोवेस्टर्न ड्रेस, हे गोल्डन अथवा सिल्व्हर थ्रेड नि हेवी जरदोसी वर्क करून फन्क्शनल वेअर केले जाते. त्यामुळे सर्व कॉर्पोरेट लोक, ऑफिस गोअर्स, विद्यार्थी वर्ग आणि अर्थातच वधूंच्या पसंतीस पडणारे हे पेस्टल सर्व वयोगटांमध्ये हिट आहेत.

 कपड्यांच्या फॅशनबरोबरच घरालासुद्धा पेस्टल शेडनी आतून व बाहेरून रंगवता येते. गृहसजावटीसाठी, कुठल्याही समारंभात डेकोरेशनसाठी अत्यंत सौम्य रंग वापरले तर त्या जागेला एक छान सॉफ्ट आणि रिच लुक येतो. 

चला तर मग, वाट कसली बघताय? आपल्या वॉर्डरोबमध्ये, होम डेकोरेशनसाठी, होम फर्निशिंगसाठी, कुठल्याही पेस्टल शेड निवडा आणि बाराही महिने या सूदिंग रंगांचा मनमुराद आनंद लुटा!

संबंधित बातम्या