शरीरातला पाण्याचा दुष्काळ

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 1 एप्रिल 2019

उन्हाळा विशेष
 

उन्हाळा सुरू झाला, की दुष्काळाची हाकाटी सुरू होते. पाण्याचे महत्त्व, त्याचे नियोजन, वॉटर हार्वेस्टिंग वगैरे चर्चा सुरू होतात. वाढलेल्या तापमानाला बळी पडणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांच्या बातम्या येऊ लागतात. पाण्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. मानवी शरीर म्हणजे एकुणात ७५ टक्के पाणी आणि तत्सम द्रवपदार्थ असते. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीत, दोन पेशींमध्ये असलेल्या रिक्त भागात, रक्तवाहिन्यांमधून धावणाऱ्या रक्तामध्ये पाणीच असते. आपल्या शरीरातील सर्व संस्थांचे कार्य यथायोग्य होण्यासाठी दैनंदिन तत्त्वांवर ठराविक प्रमाणात द्रवपदार्थ घ्यावेच लागतात. शरीरांतर्गत क्रियांसाठी रोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिण्याची आपल्याला आवश्‍यकता असते. प्रत्येकाच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपानुसार आणि वयानुसार ही गरज वेगवेगळी असते. शारीरिक कष्ट करणाऱ्या, उन्हातान्हात फिरणाऱ्या व्यक्तींना, खेळाडू आणि व्यायामपटूंना जास्त पाण्याची गरज असते. आपल्या शरीरातील सामान्य कार्ये करण्यासाठी आणि कामात खर्च झालेले द्रवपदार्थ भरून काढण्यासाठी पाणी आवश्‍यक असते. 
काही कारणांमुळे आपल्या शरीरातून पाण्याचा निचरा जास्त झाल्यास किंवा गरजेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास शरीरात पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. यालाच ‘डिहायड्रेशन’ किंवा निर्जलीकरण म्हणतात. पाऊस कमी पडल्याने जशी देशात दुष्काळी परिस्थिती उद््‌भवते, तसाच हा शरीरात निर्माण होणारा दुष्काळच असतो.

डिहायड्रेशनची कारणे  
जुलाब : आपल्या खाण्यापिण्यातून शरीरात जुलाबाचे विषाणू किंवा जिवाणू गेल्यास आतड्याला सूज येते आणि त्यात शरीरातील पाणी जमा होते. परिणामतः शौचाला पातळ होते, म्हणजेच जुलाब होतात. जुलाबावाटे शरीरातील पाण्याचा शौचावाटे अतिरिक्त निचरा होतो. जुलाब जास्त प्रमाणात झाल्यास शरीरातील सर्व भागातील पाणी शोषले जाते आणि पाण्याचे प्रमाण खालावते. व्हायरल डायरिया, पटकी, गॅस्ट्रो अशा आजारात मोठ्या प्रमाणात जुलाब होऊन डिहायड्रेशन होते.
उलट्या : विविध विषाणू, जिवाणू किंवा आम्लता वाढल्याने, तसेच काही आजारात जठराला सूज येऊन उलट्या होतात. यातून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. उलट्या होत असल्याने पाणी पिणेही शक्‍य नसते आणि डिहायड्रेशन होते.
 ताप : शरीराचे तापमान खूप जास्त वाढल्यास आणि ते दिवसभर जास्त काळ टिकल्यास शरीरातील पाणी कमी होते. ताप जेवढा जास्त दिवस राहील, तेवढ्या प्रमाणात डिहायड्रेशन जास्त होते. 
घाम येणे : शरीराचे तापमान वाढल्यावर ते कमी करण्यासाठी आपल्या शरीरात एक ‘शीत प्रणाली’(कुलिंग सिस्टिम) असते. तिच्याद्वारे कोणत्याही कारणाने शरीराचे तापमान वाढल्यास घाम येऊन शरीराचे तापमान कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वातावरणातील तापमान जास्त वाढल्यावर, हवा दमट असल्यावर खूप घाम येत राहतो. अतिश्रमाचे काम केल्यास, खूप व्यायाम केल्यासदेखील भरपूर घाम येतो. ताप उतरतानाही घाम येऊन उतरतो. अशा कुठल्याही कारणाने सतत घाम येण्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते. 
मूत्रविसर्जन : कधीकधी काही आजारांमध्ये, तर काही औषधांनी मूत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळेही शरीरांतर्गत पाणी घटते.
मधुमेह : रक्तातील साखर सामान्य पातळीपेक्षा जास्त वाढल्यास मूत्रप्रवृत्ती वाढते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना उष्ण आणि दमट हवामानात डिहायड्रेशन होऊ शकते. 
भाजणे : एखाद्या व्यक्तीला जेव्हा भाजते, तेव्हा अग्नीच्या उष्णतेमुळे पाणी कमी होतेच, पण त्यात त्वचेखालील रक्तवाहिन्यांना इजा होऊन त्यातील द्रव पदार्थ मोठ्या स्वरूपात शरीरातील पेशींच्या बाहेर पडून डिहायड्रेशन उद्‌्‌भवते.
शस्त्रक्रिया : शस्त्रक्रियेच्या दरम्यान किंवा नंतर रक्तस्राव झाल्यास पाण्याची कमतरता निर्माण होते. 

डिहायड्रेशनची लक्षणे
 कुठल्याही कारणाने शरीरातील पाणी कमी होताना शरीराला आवश्‍यक असलेले क्षार, म्हणजे सोडिअम, पोटॅशियम, क्‍लोराईड्‌सदेखील कमी होतात. क्षार आणि पाण्याची किमान आवश्‍यक पातळी २ ते ३ टक्‍क्‍यांनी कमी झाल्यास काही विवक्षित लक्षणे दिसू लागतात.     

 • तोंडाला आणि जिभेला कोरड पडणे. 
 • गळून गेल्यासारखे वाटणे.  स्नायूंमध्ये कमजोरी वाटणे, पायात शक्ती नसल्यासारखे वाटणे, उभेसुद्धा राहता न येणे, हातांनी थोड्या जड वस्तू उचलायला त्रास होणे.
 • लघवीचा रंग पिवळा होणे.  उन्हाळी लागणे म्हणजेच लघवी करताना जळजळ, आगआग होणे.
 • डोके दुखणे. गरगरणे, चक्कर आल्यासारखे वाटणे.

 जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण १० ते १५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी होते, त्यावेळेस वरील लक्षणांसोबत इतरही लक्षणे आढळून येतात.

 • डोळे खोल जाणे, निस्तेज होणे. 
 • पायांना विशेषतः पोटरीमध्ये वेठ येणे (क्रॅम्प्स)  त्वचा शुष्क पडणे आणि उकलणे  लघवी लाल होणे  मूत्राचे प्रमाण खूप कमी होणे किंवा लघवी बंद होणे 
 • घाम येण्याचे बंद होणे  रक्तदाब उतरणे  हृदयाचे ठोके वेगाने पडणे, छातीत धडधडणे  शरीराचे तापमान वाढून खूप ताप भरणे  असंबद्ध बोलणे  बेशुद्ध पडणे

 
 लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन झाल्यास काही विशेष लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे त्वरित ध्यानात घेणे अत्यंत गरजेचे असते. यामध्ये :

 • टाळू खोल जाणे किंवा टाळूला खड्डा पडल्यासारखे दिसणे.  
 • तोंड आणि जीभ खूप कोरडी पडणे.
 • जीभ पांढरट दिसणे. 
 •  डोळे खोल जाणे.  
 • गाल सुकल्यासारखे दिसणे.  
 • खूप रडणे, चिडचिड किंवा सतत किरकिर करणे.  
 • लघवीचे प्रमाण अचानकपणे खूप कमी होणे.  
 • रडताना डोळ्यातून पाणी न येणे.

कुणाला होऊ शकते  
मानवी आरोग्याला विघातक डिहायड्रेशन कोणालाही होऊ शकते. मात्र, काही व्यक्तींना ते होण्याची जास्त शक्‍यता असते. 

 • भूप्रदेश : दुष्काळी भागात राहणाऱ्या व्यक्तींना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठाच पुरेसा नसतो. त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन सहजरीत्या होते. समुद्रसपाटीपासून खूप उंचावरील दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनासुद्धा पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे हा त्रास होऊ शकतो.  
 • खेळाडू : शारीरिक फिटनेसची परीक्षा घेणारे काही विशिष्ट खेळ म्हणजे एन्ड्युरन्स इव्हेंट्‌स, मॅरेथॉन, ट्रायथलॉन, सायकलिंग, फुटबॉल या खेळामध्ये वेगवान शारीरिक हालचाली कमालीच्या उच्च पातळीवर होतात. त्यामुळे डिहायड्रेशन होते.
 • दीर्घकालीन आजार : मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, सिस्टिक फायब्रोसिस, अतिमद्यपान, ॲड्रीनल ग्रंथीचे आजार असणाऱ्यांना डिहायड्रेशन होते.
 • लहान बालके : नवजात अर्भकांना आणि लहान मुलांना एखादा दिवस जरी उलट्या-जुलाब झाले, तरी त्यांना डिहायड्रेशन होते. अनेकदा अशा छोट्या बालकांत फक्त एका मोठ्या जुलाबाने त्यांच्या इवल्याशा शरीरातले पाण्याचे प्रमाण एवढे घटते, की बिचारी एकदम मलूल होऊन जातात.
 • काही ज्येष्ठ नागरिक, कामावर असलेले स्त्री-पुरुष, लघवीला लागल्यास मध्येच उठावे लागते या संकोचाने पाणी अगदी कमी पितात. अनेकदा लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये असणारे लोकही हा विचार करतात. अशांना डिहायड्रेशन झाले नाही, तर नवलच.

शरीरावरील गंभीर दुष्परिणाम 
 रक्तदाब : शरीरातले पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण वाजवीपेक्षा कमी झाले, की द्रवरूप रक्ताचे घनफळ किंवा आकारमान कमी होते. त्यामुळे रक्तदाब उतरतो. परिणामतः रक्तातून शरीराला मिळणाऱ्या प्राणवायूचे प्रमाण घटते. यातून गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते.
 झटके येणे : मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्याला लागणारे पाणी, क्षार आणि प्राणवायूचे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा घटल्यास रुग्णाला अपस्मारासारखे झटके येतात.
 मूत्रपिंडे : पाणी कमी पडल्यामुळे मूत्रपिंडात खडे होणे, मूत्रमार्गामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होणे(युरिनरी ट्रॅक्‍ट इन्फेक्‍शन), किडनी फेल्युअर म्हणजेच मूत्रपिंडाचे कार्य मंदावणे असे आजार उद्‌्‌भवू शकतात. 
 उष्माघात : उन्हाळ्यामध्ये उन्हात काम करणाऱ्या किंवा फिरणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील पाणी भराभर कमी होऊन त्यांना उष्माघात(हीट स्ट्रोक) होऊ शकतो. यात रक्तदाब कमी होणे, भोवळ येऊन पडणे, झटके येणे, श्वास गुदमरणे, हृदयाचे स्पंदन बिघडणे असे त्रास होऊन रुग्ण बेशुद्ध होतो. तो कोमामध्ये जाऊन दगावण्याची शक्‍यता असते.

निदान
दवाखान्यात येणाऱ्या रुग्णाची चिकित्सा करताना त्याचा पूर्वेतिहास, त्याच्या लक्षणांची छाननी करतानाच निदान होऊ शकते. त्याचा कमी झालेला रक्तदाब, नाडीची वेगवान गती, ताप, त्याची कोरडी पडलेली जीभ, सुकलेले ओठ आणि त्वचा, बाळाची टाळू, सैलावलेले स्नायू यातून डॉक्‍टरांना प्राथमिक अंदाज येतो. 
रुग्णाच्या रक्ताच्या ‘सीरम इलेक्‍ट्रोलाईट’ सारख्या तपासण्यांमधून रक्तामध्ये क्षाराचे कमी झालेले प्रमाण ध्यानात येते. मूत्रतपासणीत मूत्राचा रंग, त्याची आम्लता, कीटोन्ससारखे काही घटक, जंतूंचा प्रादुर्भाव यातून पाण्याची कमतरता आणि तदनुषंगिक दोष लक्षात येतात.

उपचार
एखाद्या प्रदेशात दुष्काळ पडला, तर बाहेरून पाण्याचे टॅंकर मागवून भागवावे लागते. त्याप्रमाणे शरीरातील पाणी कमी पडल्यावर शिरेतून ‘सलाइन’द्वारे द्रव पदार्थ द्यावे लागतात. हे देताना रुग्णाचा रक्तदाब, त्याच्या लघवीचे प्रमाण आणि रक्तातील क्षार यावर विशेष लक्ष पुरवावे लागते. 
त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेल्या ‘ओरल रिहायड्रेशन’ची पावडर पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून दिल्यास उपयुक्त ठरते. यामध्ये सोडिअम, पोटॅशियम अशा विविध क्षारांचा समावेश असतो. आजकाल असे तयार द्राव बंद टेट्रापॅकमध्येही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर अवश्‍य करावा. हे शक्‍य नसल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर, एक चिमूट मीठ, एक चिमूट खायचा सोडा आणि चवीला थोडे लिंबू पिळल्यास ते पर्यायी ठरू शकते. याशिवाय तोंडाने पाणी, सरबत, पन्हे, कोकम सरबत, ताज्या फळांचे रस, शहाळे, ताक, लस्सी असे नेहमीचे परिचित द्राव घ्यावे. हे द्रवपदार्थ मुबलक स्वरूपात घेणे गरजेचे असते. म्हणजे पाणी आणि ओरल रिहायड्रेशन किंवा त्याचे पर्याय दिवसभरात २ ते ३ लिटर एवढे जाणे अपेक्षित आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेप्रमाणे कित्येक प्रकारच्या जुलाबावर, विशेषतः लहान बालकांमधील जुलाबात फक्त ‘ओरल रिहायड्रेशन’ योग्यरीत्या केल्यास अन्य औषधांची गरजही भासत नाही. 
पाण्याच्या उपलब्धतेसमवेत रुग्णाला असणारे शारीरिक त्रास म्हणजे ताप, उलट्या, जुलाबाचा जंतुसंसर्ग, मूत्रमार्गातील इन्फेक्‍शन, काही इतर आजार यांचा इलाज करणे अत्यावश्‍यक असते.

प्रतिबंधक उपाय 
 कोणत्याही आजाराचा प्रतिबंध करणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. डिहायड्रेशनचा त्रास त्याला अपवाद नाही. त्यासाठी दिवसातून २ लिटर पाणी पिण्याची सवय लावावी. म्हणजे दर तासाला एक ग्लास पाणी प्यावे. शिवाय ताजी फळे, कच्च्या भाज्या यामध्येही पाणी भरपूर असते. कलिंगड, द्राक्षे, आवळा, काकडी, डाळिंब, कांदा, टोमॅटो, मुळा यामध्ये मुबलक पाणी असते. त्यांचा आहारात नियमितपणे समावेश असावा. 
 उन्हाळ्यात उन्हात फिरणे, व्यायाम करणे किंवा शक्‍य असल्यास काम करण्याचे टाळावे. उन्हाळ्यात सुट्या असल्याने मुले उन्हात खेळतात. ते शक्‍यतो टाळावे. या दिवसात सुटीतील प्रवासाचे बेत आखले जातात, अशा प्रवासात पिण्याच्या पाण्याचा साठा भरपूर ठेवावा. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा टोपी वापरावी. वृद्ध व्यक्ती आणि बालके यांना डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या