उन्हाळा स्पेशल ट्रेंड

ज्योती बागल
सोमवार, 1 एप्रिल 2019

उन्हाळा विशेष
ऋतू बदलतात; तसे रोजच्या वापरातील कपड्यांचे ट्रेंड्‌सही बदलतात. किंबहुना त्यामुळेच तर प्रत्येक ऋतू माणसाला सुसह्य होतो... आणि उन्हाळ्यात आपण त्वचेची, खाण्यापिण्याची आवर्जून काळजी घेतो. पण याचबरोबर उन्हाळ्यात वापरायच्या कपड्याचादेखील विचार केला पाहिजे. कारण सर्वच प्रकारचे कपडे उन्हाळ्यात सूट होतील असे नाही आणि जाड व तंग कपडे घतल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. तसेच सुटसुटीत आणि फिकट रंगाचे कपडे घातल्याने सूर्याची किरणे कमी प्रमाणात शोषली जातात. त्यामुळे खास उन्हाळ्यात नेमके कोणते कपडे वापरले पाहिजेत? त्यासाठी कपड्यांचे काही कूल पर्याय इथे देत आहोत.

उन्हाळ्यात कॉटन, चिकन आणि रेयॉनचे कपडे वापरणे सोयीचे पडते. यामध्ये फिकट रंगाच्या अनेक शेड्‌स बाजारात उपलब्ध आहेत. मुलींसाठी कॅज्युअल कुर्ता, स्लीव्हलेस लाँग कुर्ता, कॉटन अम्ब्रेला टॉप, अम्ब्रेला शॉर्ट ॲण्ड लाँग कुर्ता, फ्लोअर लेन्थ अम्ब्रेला, कॉटन अनारकली कुर्ता, लखनवी चिकन प्युअर कॉटन कुर्ता, सेमी कॉटनमध्ये शॉर्ट आणि लाँग कुर्ते उपलब्ध आहेत. तसेच शिफॉनचे कपडेदेखील उन्हाळ्यात वापरायला चांगले असतात. यामध्ये फिके रंग जास्त उपलब्ध असतात. 

सध्या मुलींमध्ये लखनवी लाँग ॲण्ड शॉर्ट कुर्ता, प्युअर कॉटन कुर्ता, खुल्या गळ्यांचे कुर्ते, ऑफ शोल्डर लखनवी कुर्ता, क्रॉप टॉप, प्रिंटेड क्रॉप टॉप, लायक्रा क्रॉप टॉप यांची क्रेझ पाहायला मिळते. हे सर्व प्रकार कॉटन आणि रेयॉनमध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच ‘शीअर मेश टॉप’देखील बऱ्याच मुली वापरताना दिसतात. हा टॉप दिसायला अतिशय पारदर्शक असतो. या टॉपच्या आत मुद्दाम वेगळ्या रंगाची स्लिप वापरली जाते. तेव्हा त्याचे कॉम्बीनेशन जुळून येते. यांच्या किमती साधारण ५५० ते ९०० रुपयांदरम्यान आहेत. तर यामध्येच काही हेवी रेंजमध्येदेखील उपलब्ध आहेत.

धोती पॅंट आणि पलाजो 
 हे दोन्ही कॉटन आणि रेयॉन मटेरियलमध्ये मिळतात. धोती आणि पलाजो दोन्ही प्लेन आणि प्रिंटेड डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती २५० ते ४५० रुपयांदरम्यान आहेत. काही पलाजोच्या बॉटमला छिद्रांची डिझाईन असल्याने ते खास उन्हाळ्यात बरे पडते. 

स्कर्ट 
स्कर्टमध्ये शॉर्ट आणि लाँग स्कर्ट, ट्युलिप स्कर्ट बाजारात उपलब्ध आहेत. हे कॉटन आणि सिन्थेटिकमध्ये मिळतात. यावर फुलांच्या लहान मोठ्या डिझाईन्स असल्याने ते आणखी छान दिसतात. तसेच या स्कर्टवर प्लेन टीशर्ट किंवा टॉप घातल्याने कूल लुक येतो. या स्कर्टच्या साधारण किमती ३०० ते ६००/- रुपयांदरम्यान आहेत.

उन्हाळ्यासाठी चिकन कपडा हा उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो. चिकन कपडा हा ऑलटाइम चालणारा असला, तरी उन्हाळ्यात मात्र याची मागणी जास्त असते. सध्या चिकन कपड्यांमध्ये ड्रेस मटेरिअल, शॉर्ट टॉप, लाँग टॉप, पलाजो इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. हा कपडा मऊ सुताचा तर असतोच, शिवाय यामध्ये डिझाईन बनवताना छोटेछोटे छिद्र ठेवून डिझाईन बनवली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात नक्कीच याचा फायदा होतो. विशेष म्हणजे या प्रकारातील कपडे सर्व रेंजमध्ये उपलब्ध असल्याने सर्वसामान्य लोकही सहज घेऊ शकतात. 

जम्पसूट 
टॉप आणि पॅंट एकत्रित असा हा जम्पसूट असतो. 
उन्हाळ्यात कॉटनचे जम्पसूट सर्वांत जास्त वापरले जातात. यामध्ये ब्लॅक अँड व्हाइट, चैन प्रिंट, प्रिंटेड स्मॉल कॉटन, प्लेटेड कॉटन, हाय नेक जम्पसूट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. याचे कलर कॉम्बीनेशन सोबर असल्याने हे दिसायलाही अतिशय कूल असतात.   

फ्लोरल प्रिंट 
फ्लोरल प्रिंटमध्ये मुलींसाठी शॉर्ट, लाँग कुर्ते, वनपीस, क्रॉप टॉप, शॉर्ट आणि लाँग स्कर्टस उपलब्ध आहेत. पण मुलांसाठीदेखील फ्लोरल प्रिंटमध्ये कॅज्युअल शर्टस उपलब्ध आहेत. आणि सध्या ही फॅशन असल्यामुळे ते ऑडही वाटत नाही. यामध्ये पर्पल, लव्हेंडर, फेंट ब्लू, लेमन कलर, व्हाइट हे कलर जास्त वापरतात. क्रॉप टॉपच्या साधारण किमती २५० ते ७०० रुपयांदरम्यान आहेत. तर मुलींसाठीचे लाँग कुर्ते ५५० रुपयांपासून मिळतात. मुलांचे फ्लोरल प्रिंटचे शर्ट ७५० रुपयांपासून मिळतात. कपडा आणि क्वालिटीनुसार किमतीत बदल होतो.  

तरुणांसाठी कॉटनमध्ये उभ्या-आडव्या, लहान-मोठ्या स्ट्राइपचे शर्टस उपलब्ध आहेत. तसेच कॉटनचेच प्लेन शर्टस आणि कुर्तेदेखील उपलब्ध आहेत. तसेच सध्या बाजारात लेग फ्रेंडली डेड डेनिम आणि रिप्ड लाइट डेनिम जीन्स उपलब्ध आहेत. या जीन्स लूज फिटिंगच्या असतात. यावर शर्ट, टीशर्ट हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता. याव्यतिरिक्त लिनन फॅब्रिकच्या ट्राउजरही वापरू शकता. यावरदेखील फॉर्मल शर्ट किंवा टीशर्ट छान दिसतात. शिवाय या सुटसुटीत आणि कंफर्टेबल असतात. यातलाच आणखी एक प्रकार म्हणजे साइड स्ट्राईप ट्राउजर. आताच्या समर सीझनमध्ये याची देखील चलती आहे. लहान मुला-मुलींसाठी कॉटनच्या फ्रॉक, शर्ट-पॅंट, खास उन्हाळ्यासाठी बंडी बाजारात उपलब्ध आहे. बंडीमध्ये मुलींसाठी बेबी पिंक, अबोली असे रंग दिसतात तर मुलांसाठी फिकट पिवळा, फिकट निळा असे रंग आहेत. यांच्या साधारण किमती १८० ते ३५० रुपयांदरम्यान आहेत.

बाजारात आलेले हे कपड्यांचे नवीन ट्रेंड्‌स उपलब्ध असलेली पुण्यातील ठिकाणे म्हणजे तुळशी बाग, लक्ष्मी रोड, एफ सी रोड, पुणे कॅम्प, खडकी बाजार इत्यादी. या व्यतिरिक्त तुम्हाला ऑनलाइनही अनेक पर्याय मिळतील.

लेखात दिलेल्या किमतीत बदल होऊ शकतो. 

संबंधित बातम्या