वसंतातील फुलांचा बहर 

ज्योती बागल
सोमवार, 1 एप्रिल 2019

उन्हाळा विशेष
 

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका जाणवायला लागतो. घराच्या बाहेर पडताच ‘सळो की पळो’ करून सोडणारी सूर्याची जीवघेणी किरणे नको नको वाटायला लागतात. सूर्यप्रकाशात सहज जरी समोर बघायचे म्हटले, तरी डोळ्यांना कमालीची हिम्मत दाखवावी लागते. अशावेळी आपल्या आजूबाजूला असणारी ही सप्तरंगी फुले डोळ्यांना, मनाला आणि शरीरालासुद्धा अल्हाददायक, शांत वाटेल असे वातावरण तयार करतात... आणि हा ऋतूदेखील इतर ऋतूंएवढाच खास असल्याची ग्वाही देताे. सध्या हे काम पार पडण्यात बोगनवेल, बहावा, पांढरा चाफा, पळस, पांगिरा ही फुलं अग्रक्रमावर आहेत म्हटले तरी वावगे ठरू नये. 

वसंत ऋतूची चाहूल लागताच ठराविक झाडांची पानगळ होते आणि पानोपानी फुलांचा बहर दिसू लागतो. झाडांची जुनी पाने गळून नवीन हिरवीगार पालवी फुटू लागते...आणि काही झाडांना फुलांचा बहर येऊ लागतो. ही नवीन आलेली हिरवी-तांबूस-सोनेरी पालवी आणि वसंतात फुललेल्या फुलांचे विविध रंग या काळात अतिशय गडद आणि मनाला तजेला देणारे असतात. म्हणजेच ग्रीष्माच्या दाहकतेला शीतल करण्याचे काम वसंत ऋतूच करू शकतो हे भासवून निसर्ग जणू आपल्यावर चहूबाजूंनी रंगांची उधळणच करू लागतो. 

वर्षभर आपल्याला बोगनवेल सर्वत्र दिसतेच. मात्र, या दिवसांत दिसणारी बोगनवेल बघणाऱ्याला अक्षरशः मोहिनी घालते. कारण या दिवसांत ती आणखी टवटवीत वाटते. खरे तर बोगनवेल ही मूळची भारतीय नाही. पण तिचे भारतातील अस्तित्व बघून ती इथली नाही यावर आपला विश्‍वासच बसणार नाही.  

बोगनवेलीच्या अनेक जाती आहेत, त्यानुसार तिचे रंग दिसतात. लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, राणी, पांढरा गुलबक्षी रंग, जांभळा अशा विविध रंगात बोगनवेल आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोट्या झुडुपापासून ते मोठ्या झाडावर सर्वदूर पसरलेल्या वेल स्वरूपात दिसते. अनेकदा बंगल्यांच्या, गार्डनच्या, हॉटेलच्या अवतीभोवती ही बोगनवेल लावली जाते. या बोगनवेलीच्या फुलांनी त्या जागेचे रूपच बदलून जाते. झुबक्‍यांमध्ये येणारी ही बोगनवेलीची फुले, यांना काही लोक ‘कागदी फूल’ म्हणूनदेखील ओळखतात. अनेक ठिकाणी दुभाजकांवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा बोगनवेल फुललेली दिसते. सुंदर आणि बघताक्षणी मन प्रसन्न करते, त्यामुळे निसर्गप्रेमींचा तरी प्रवास सुखकर होत असावा.  

चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. जसे, सोनचाफा, पिवळा चाफा, कवठी चाफा, नागचाफा, भुईचाफा आणि पांढरा चाफा. पण खास उन्हाळ्यात फुलतो, तो पांढरा चाफा. पांढरा चाफा हा पांढराशुभ्र असून त्याच्या आतला भाग पिवळा असतो. त्यामुळे ते फूल दिसायला आणखी छान दिसते. ग्रीष्मात या झाडाला पाने खूप कमी दिसतात; पण फुलांचा बहर खूप असतो. चाफा हा मूळचा अमेरिकेतील असला तरीही आपल्याकडे पण तो मोठ्याप्रमाणावर आढळतो. याचे शास्त्रीय नाव ‘प्लुमेरिया अल्ब’ आहे, तर इंग्रजी नाव ‘व्हाइट फ्रांगीपनी’असे आहे. सुंदर, सुबक असा हा चाफा आपल्याला अंतर्मुख करतो. या फुलांचा मंद सुगंध अगदीच सुखावून टाकतो. सडा पडलेली फुले बघताना, आकाशातील चांदण्या जमिनीवर पडल्या आहेत की काय असाच भास होतो. या चाफ्याबरोबरच आपल्या आठवणीतल्या चाफ्याला आठवताना ही कविता मन गुणगुणू लागते.

चाफ्याच्या झाडा...
का बरे अलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरल आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखाडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

पानोपानी फुललेला पिवळा धम्मक बहावा! झुबक्‍यांमध्ये असलेली बहाव्याची फुले वैशाखवणव्यात आणखी बहारदार दिसतात. उन्हाने बाकीच्यांची लाहीलाही होत असते, हा मात्र दिमाखात डोलत असतो. जणू त्यांचे रूप उन्हाचं लेणं लेवून निसर्गप्रेमींच्या मनाला भुरळ घालायला सज्जच झालेले असते. बहाव्याचा हा रुबाब बघून बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले नाही, तर नवलच! 

या फुलाला इंग्रजीमध्ये ‘लॅबनर्म’ आणि ‘गोल्डन शॉवर’ असे म्हणतात. तर काही भागात हा ‘अमलताश’ या नावानेदेखील ओळखला जातो. वर्षातील साधारण आठएक महिने दुर्लक्षित असलेला बहावा उन्हाळ्यात मात्र फुलांचा राजाच वाटू लागतो. 

लाल-तांबूस-पिवळा अशा रंगांच्या छटा असणाऱ्या गुलमोहराला ऐन उन्हाळ्यात बहर येतो. पण विशेष करून एप्रिल आणि मे महिन्यात हा पूर्ण बहरलेला असतो. हा देशी वृक्ष नसला तरी आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि थंड शीतल छायेने त्याने सर्वांच्याच मनात आणि दारात आपले अस्तित्व जपले आहे. हे झाड आकाराने मोठे असल्याने फुलांनी बहरलेले झाड दुरून आणखी सुंदर दिसते व लगेच ओळखायलादेखील येते. या फुलांच्या पाकळीच्या देठाचा रस गोड असतो. फुलांच्या काही पाकळ्यांना पांढरट छटा असतात. आम्ही लहान असताना अशा फुलांना राजा आणि लाल-तांबूस छटा असणाऱ्या फुलांना राणी म्हणायचो.  

वसंत ऋतू हा पांगिऱ्याचादेखील फुलण्याचा ऋतू असतो. पांगिऱ्याची फुले आतून लाल भडक आणि बाहेरून फिकट गुलाबी दिसतात. वसंत ऋतूचे आगमन होताच या झाडांची जुनी पालवी गळून जाते व त्याची जागा फुले घेतात. इतर फुलांप्रमाणे ही फुले फांदीच्या शेंड्याकडून उगवत नाहीत, तर खालून शेंड्याकडे उगवत जातात. या फुलांमध्ये मध असतो, म्हणून भुंगे या झाडाकडे आकर्षित होताना दिसतात. शिवाय भारद्वाज, मैना असे बरेच पक्षीदेखील परागकण खाण्यासाठी या झाडावर येताना दिसतात.

पळसाची फुले दिसायला अत्यंत आकर्षक असतात. त्यांचा आकार पोपटाच्या चोची सारखा असतो. हा वृक्ष मानवी वस्तीत कमी आणि जंगलात जास्त दिसतो. वसंतात इतर वृक्षांप्रमाणे याचीही पाने गळून गेलेली असतात व पानांची जागा लालभडक फुलांनी घेतलेली असते. या फुलांचा रंग इतका गडद लाल असतो, की हा वृक्ष उन्हात अक्षरशः पेटल्यासारखा भासू लागतो. त्यामुळे त्याला इंग्रजीत ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ असेही म्हणतात. हे फूल आकर्षक जरी दिसत असले, तरी त्याला गंध मात्र नसतो. 

निळ्या रंगाचा जॅकरांडा आणि जांभळ्या रंगाची ताम्हण इतर हिरव्या झाडांमध्ये आणि रंगीबेरंगी फुलांमध्ये उठून दिसतात. दोन्ही रंग सौम्य असल्याने बघणाऱ्याच्या डोळ्यांना सुखावतात. संधीप्रकाशात या फुलांचा रंग आणखी आकर्षक दिसतो. जॅकरांडाची फुले दीड-दोन इंच लांब असून नरसाळ्यासारखा त्यांचा आकार असतो. जॅकरांडा हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील वृक्ष आहे. आपल्याकडे याला ‘नीलमोहर’ असे म्हणतात; पण हल्ली ‘जॅकरांडा’ हाच शब्द बऱ्यापैकी सर्वत्र वापरला जातो. याची जमिनीवर पसरलेली फुले अगदी गालिचासारखी दिसतात. 

या व्यतिरिक्त खास उन्हाळ्यात फुलणारे अनेक वृक्ष आहेत. जसे, मोगरा, जाई, जुई, निशिगंध, रेन ट्री, काटेसावर, शिरीष, कांचन, कण्हेर, कोरांटी, गुलबक्षी, जंगली जास्वंद, फणशी, शिवण, पाडळ, कौशी, आपटा, गेळा, मेडशिंगी, बारतोंडी, नेवर, कळम, अर्जून, आईन, अशोक, रानपांगारा, धामण, मोठा करमळ, रतनगुंज, पाचुंदा, करंज, कांचन, काळा कुडा, पांढरा कुडा, बेल इत्यादी. यातील बऱ्यापैकी वृक्षांची फुलेही पांढरट रंगाची दिसतात. या शिवाय उन्हाळ्यामध्ये पेल्टोफोरम, सिल्व्हर ओक, कॉपर पॉड ही काही मूळची विदेशी असणारी झाडेदेखील बहरलेली दिसतात. यातील काही फुलझाडे मानवी वस्तीत दिसतात तर काही फक्त जंगलात दिसतात.
 

संबंधित बातम्या