मॉकटेल डिलाईट

नंदिनी गोडबोले, नागपूर
सोमवार, 11 एप्रिल 2022

उन्हाळा विशेष
 

ऑरेंज मार्गारिटा
साहित्य : अर्धा कप ऑरेंज ज्यूस, पाव कप लेमन ज्यूस, पाव कप आईस क्यूब, चाट मसाला.
कृती: सर्वप्रथम वाइन ग्लासच्या काठाला थोडासा लिंबाचा रस लावावा. मग तो ग्लास पिठीसाखर किंवा मिठामध्ये उलटा ठेवावा, जेणेकरून ग्लासच्या कडेला पिठीसाखर/मीठ चिकटेल. मॉकटेल सर्व्ह करण्याची ही पद्धत आहे. मग त्या ग्लासमध्ये अर्धा कप ऑरेंज ज्यूस, पाव कप लेमन ज्यूस, पाव कप पाणी, बर्फाचे आठ ते दहा तुकडे घालून ढवळावे आणि थंडगार ऑरेंज मार्गारिटा सर्व्ह करावे.

मॅंगो म्यूल
साहित्य : एक किसलेली काकडी, अर्धा टेबलस्पून लेमन ज्यूस, पाव कप मॅंगो ज्यूस, १ टेबलस्पून मध, पाणी, बर्फाचे तुकडे.
कृती : एक काकडी सालासकट किसावी. त्यात अर्धा टेबलस्पून लेमन ज्यूस घालून काकडी थोडीशी क्रश करावी. त्यामध्ये पाव कप मॅंगो ज्यूस, एक टीस्पून मध, अर्धा कप पाणी आणि बर्फाचे आठ ते दहा तुकडे घालावेत. मग ते गाळून ग्लासमध्ये ओतून घ्यावे. पुदिन्याच्या पानाने सजवून सर्व्ह करावे.

कालाखट्टा मोईतो
साहित्य : दहा पुदिन्याची पाने, बर्फाचे आठ-दहा तुकडे, ३ टेबलस्पून कालाखट्टा सरबत, १ कप सोडा वॉटर.
कृती : पुदिन्याची पाने थोडीशी क्रश करून घ्यावीत. ग्लासमध्ये सहा ते सात बर्फाचे तुकडे, तीन टेबलस्पून कालाखट्टा सरबत घालावे आणि सर्व ढवळून घ्यावे. मग त्यात एक कप सोडा वॉटर घालावे आणि वरून पुदिन्याच्या पानांनी सजावट करावी.

पुदिना तुलसी मोईतो
साहित्य : आठ-दहा पुदिन्याची पाने, ६-७ तुळशीची पाने, २ टेबलस्पून लिंबाचा रस, बर्फाचे ८-१० तुकडे आणि सोडा वॉटर.
कृती : तुळशीची व पुदिन्याची पाने खलबत्त्यामध्ये क्रश करून पेस्ट करावी. एका ग्लासमध्ये ती पेस्ट, आठ-दहा बर्फाचे तुकडे, लेमन ज्यूस, सैंधव मीठ आणि सगळ्यात शेवटी सोडा वॉटर घालावे. पुदिन्याच्या आणि तुळशीच्या पानांनी सजावट करून सर्व्ह करावे.

वर्जिन पिना कोलाडा
साहित्य : पाइनॲपल ज्यूस, लेमन ज्यूस, बर्फाचे तुकडे आणि २०० मिली कोकोनट मिल्क.
कृती : मिक्सरमध्ये बर्फाचे तुकडे, पाइनॲपल ज्यूस, लेमन ज्यूस आणि कोकोनट मिल्क व्यवस्थित फिरवून घ्यावे. हे मिश्रण एका ग्लासमध्ये ओतून वरून चेरीने गार्निश करावे.

ब्लू क्युरासो लेमनेड
साहित्य : एक टेबलस्पून ब्लू क्युरासो सिरप, सोडा 
वॉटर, बर्फाचे ८-१० तुकडे, २ लिंबू, ४ टेबलस्पून साखरेचा पाक.
कृती : एका उभ्या ग्लासमध्ये दोन चिरलेली लिंबे घ्यावीत. त्यावर चार ते पाच टेबलस्पून साखरेचा पाक घालावा व थोडेसे क्रश करावे. त्यातच सोडा वॉटर आणि नंतर शेवटी एक टेबलस्पून ब्लू क्युरासो सिरप घालून थंडगार सर्व्ह करावे. अगदी हलक्या निळ्या रंगाचे हे मॉकटेल दिसायला अतिशय सुंदर दिसते व चवीलासुद्धा छान लागते. प्यायल्यावर एकदम फ्रेश वाटते.

खट्टा मिठा आम पन्हा
साहित्य : पाव कप आम पन्ना सरबत, १ हिरवी मिरची, बर्फाचे ८-१० तुकडे.
कृती : एका उभ्या ग्लासमध्ये आम पन्ना सरबत, एक चीर पाडलेली हिरवी मिरची, आठ ते दहा बर्फाचे तुकडे घ्यावेत. वरून थोडेसे सैंधव मीठ घालून थंडगार सर्व्ह करावे.

रोझ पान डिलाईट
साहित्य : पाव कप रोझ पान सरबत, पाणी, लेमन ज्यूस, बर्फाचे ८-१० तुकडे.
कृती : एका उभ्या ग्लासमध्ये वरील सर्व साहित्य घालावे. 
थंडगार रोझ पान डिलाईट गुलाबाच्या ड्राय पाकळ्या घालून 
सर्व्ह करावे.

टिप ः दिलेल्या प्रमाणामध्ये एक ग्लास मॉकटेल होते. किती ग्लास मॉकटेल करायचे आहे, त्यानुसार प्रमाण वाढवावे.

संबंधित बातम्या