वाळवणं - एक आनंदपर्व...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 11 एप्रिल 2022

उन्हाळा विशेष

आपण उन्हाळ्यात होणाऱ्या वाळवणांच्या साठवणुकीला ‘बेगमी’ म्हणतो. हा शब्द अरबी-फ़ारसीतून आला आहे. बेग़म-दुःखरहित अवस्था, ती बेगमी. उन्हाळ्यात पुढच्या वर्षाची अशी भरपूर साठवणीची तरतूद करून ठेवली, की मग येणारा काळ, विशेषतः पावसाळा कटकटीचा राहत नाही. घरात साठवून ठेवलेल्या पदार्थांचा वापर करून, आपलं भोजन रुचकर होतं आणि दिवस सुखकर. वाळवणं म्हणजे जणू आनंदाचं पर्वच...

चैत्री पाडवा नुकताच झाला. आपल्या मराठी परंपरेत या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवं वर्ष सुरू होतं. नवं वर्ष येणाऱ्या पुढच्या काळासाठी मनात आशा घेऊन येत असतं आणि नव्यानं करायचे संकल्पही. यंदाचा पाडवा तर दोन वर्षांच्या कोरोनाबंधनांतून आपल्याला मोकळं करणारा होता. वसंताच्या आगमनासोबत मुक्ततेची झुळूक घेऊन येणाराही... व्यवहारात इंग्रजी दिनदर्शिका वापरली गेली, तरी मराठी महिन्यांचं अस्तित्व आपल्या परंपरांमधून बोट घट्ट धरून ठेवणारं असतं. सगळीकडचीच खाद्यसंस्कृती ही ऋतुमानानुसार पानात पदार्थ वाढणारी; अवतीभवतीच्या हवामानाचा अंदाज घेत, खाणंपिणं राखणारी असते. आपलीही तशीच आहे. चैत्र बरोबर घेऊन येतो, उन्हाळ्याची सुरुवात आणि फुलांनी नटलेला आसमंत. होळीनंतरच्या दिवसांमध्ये थंडी सरलेली असते आणि उष्ण हवामानाची चाहूल लागते. महाराष्ट्रात किनारपट्टी आणि घाटावरच्या भागातला उन्हाळाही कमी-अधिक प्रमाणातला. त्याचा सामना तर करावाच लागतो. शिवाय उन्हाळा म्हटल्यावर आपल्या आहारविहारातही बदल होतात. याच काळात पुढच्या काळासाठी म्हणून खास तयारी केली जाते. उन्हाचा फायदा घेऊन, हरतऱ्हेची वाळवणं केली जातात. या वाळवणांशी अनेकांच्या मनात असंख्य आठवणी निगडित असतील. माझ्याही मनात त्या अर्थातच आहेत... यंदाच्या मोकळ्या वातावरणात तर या आठवणींनी धरलेला फेर विशेषच छान वाटतोय... चैत्र आणि चैत्रगौर, वसंत ऋतू ही सांगड जशी आहे, तशीच उन्हाळी वाळवणांचा शुभारंभही चैत्र महिन्यात होत असल्यानं ही जोडीही अविभक्त अशीच...

उन्हाळ्यातली बेगमीची वाळवणं करण्याची सुरुवात गुढी पाडव्याच्या दिवशी केली जाते. गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकीचा शुभ मुहूर्त. या दिवशी शकुन म्हणून निदान डाळींचे सांडगे तरी घातले जातात. वेगवेगळे पापड, कुरडया, शेवया, चिकोड्या, पापड्या अशी ही भली मोठी यादीच आहे. उन्हाचा फायदा घेऊन गव्हा-कडधान्यांची, डाळींची साठवणही केली जाते. मसाल्यांनाही उन्हं ‘दाखवली’ जातात. वर्षभराच्या हळद-मिरचीची साठवण याच काळात केली जाते. स्वयंपाकघराचा विज्ञानाशी किती जवळचा संबंध आहे, ते वाळवणांवरून लक्षात येतं. वाळवणाला तसा मोठा इतिहास आहे आणि पापड, सांडगे हे पदार्थ कैक शतकांपासून इथं केले जात आहेत. पापडाचा उल्लेख तर बौद्ध काळापासून आढळतो. तसंच कोहळ्याचे सांडगेही अनेक वर्षं केले जातात. वेगवेगळ्या अन्नपदार्थांची साठवणूक कशी करायची, याच्या वेगवेगळ्या पद्धती रूढ आहेत आणि त्यात उन्हात वा सावलीत ते वाळवणं हे अग्रक्रमावर आहे. पूर्वीच्या काळी भाज्या व फळं बारा महिने मिळत नसत. त्या साठवण्याची युक्ती मग केली जाई. आजही ठरावीक दिवसांतच भाज्या चांगल्या आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. हिवाळ्यापासूनच भाज्या सुकवून ठेवण्याचा खटाटोप केला जातो. तसंच
धान्य खराब होऊ नये, म्हणून ते कडक उन्हात वाळवण्याची प्रथाही पडली.

पापड-शेवयांसारखी वाळवणं करण्यातलं कौशल्य आणि नजाकतही वेगळीच असते. विज्ञान आणि कलेचा संगमच जणू त्यात होतो. आजकाल या साऱ्या गोष्टी बाजारात मिळतात, सहज उपलब्ध असतात. तरीही घरी वाळवणं करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तसेच बाजारासाठी ज्या घरांमधून हे पदार्थ तयार केले जातात, तिथली लगबगही निराळीच असते. अनेक गृहिणींना अर्थार्जनाचं एक साधनही या वाळवणांनी मिळवून दिलं आहे. हा एक जुना गृहोद्योग आहे. माणसाला खाण्याची हौस असते आणि त्यातलं वैविध्य हा त्याचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. वाळवणांमधून ही त्याची हौस बऱ्यापैकी भागवली जाते. एक गरज म्हणून वाळवणांचा जन्म झाला असला, तरी चवीढवींचा साज चढवलेली वाळवणं हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य असा भाग झाली आहेत... आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तऱ्हतऱ्हेची वाळवणं होत असतात. यात मग भाज्या, मासे, पापड-सांडगे, मसाले अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. 

मला आठवतं, लहानपणी पाडवा आला, की क्वचितच परीक्षा उरकलेल्या असायच्या. पण बहुधा त्या अजून संपलेल्या नसायच्याच. घरोघरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाची लगबग आणि चैत्रांगणाची सजावट असायची. आंबेडाळ, पन्हं, हरभऱ्याची उसळ अशा पदार्थांची रेलचेल असायची. परीक्षा संपल्यावर उत्सुकता असायची ती घरची आणि आसपासची वाळवणं कधी सुरू होणार याची. वाळवणं हा तसा सामूहिकरीत्या किंवा एकत्रितपणे करायचा प्रकारही आहे. पूर्वी तरी नक्कीच होता. माझं बालपण मुंबईत गेलं. इथलं ऊन काही तेवढं कडक नसतं. त्यात एप्रिल-मे या काळात ढगाळ वातावरण असे. आजही तसंच असतं. त्यामुळे देशावर जसं मोठ्या प्रमाणात धान्य वगैरे ऊन दाखवून ठेवतात, तसं मुंबईत शक्य होत नाही. उन्हाची तीव्रता जास्त नसल्याने असे प्रयोग कधी फसतात आणि धान्यात किडेही पडू शकतात. पण इतर प्रकारची वाळवणं इथे होत आणि त्या कामात सहभागी होण्याची संधी आम्हा मुलामुलींनाही मिळत असे. खास करून, पापड करण्यासाठी शेजारपाजारच्या बाया एकत्र येत. क्रमानं एकमेकींकडे जमून पापड लाटत. पापडाच्या लाट्या खाण्याची मजा असे. पण जास्त मिळत नसत. शेवटचे पापड लाटण्याची संधीही लहान मुलामुलींना दिली जाई. हो, काही हौशी मुलगेही पापड लाटायचा उत्साह दाखवत... पापडाचं पीठ भिजवण्याची लगबगही बघण्यासारखी असे. ‘भिजवताना पापडखार कमी टाका गं...तब्येतीला चांगला नसतो तो...,’ हे वाक्य दरवर्षी ठरलेलंच असायचं. मग कधी फक्त कोहळ्याच्या पाण्यातच पापडाचं पीठ भिजवण्याचा प्रयोग व्हायचा. आमच्या शेजारी राहणाऱ्या काकू आणि आई बरेचदा एकत्र खरेदी करायच्या आणि पापड एकत्रितपणे लाटून मग समान वाटप करून घ्यायच्या. पण पापड करण्याचं एकूणच प्रमाण मग हळूहळू कमी होत गेलं. कारण स्त्रिया नोकरी करू लागल्या. पापडही बाजारात मिळू लागले आणि मुख्य म्हणजे, बाहेरचे पापड आणण्याचं वळणही पडलं. हे पापडही चांगले असतात नि ते सोयीचं पडतं, हेही लोकांना पटलं. बहुतेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात हेच घडलं...

उन्हाळ्यात करण्याच्या पदार्थांपैकी सांडगे, साबुदाण्याच्या पापड्या किंवा चिकोड्या, गव्हाच्या कुरडया या गोष्टी मात्र आमच्या घरांमधून होत राहिल्या. गव्हाच्या कुरडया नाही केल्या, तरी चीक मात्र नेहमी व्हायचा. आजही मी गव्हाचा चीक नेहमी करते. शिवाय बटाटा उकडून किसून करायचा बटाट्याचा कीसही घरात व्हायचा. मोठमोठे बटाटे निवडून आणायचे, ते भल्या पहाटे उकडायचे आणि सकाळी उन्हं वर यायच्या आत शक्यतो कीस घालायचा. मग कुणी तरी सांगितलं, की बटाटे रात्रीच उकडून ठेवायचे. उकळत्या पाण्यात दहा मिनिटं ठेवायचे आणि पातेल्याला झाकण लावायचं. सकाळी उठल्यावर छान शिजलेले असतात. हा प्रयोग फारच सोपा आणि सोयीचा. 

घरी आजीच्या तोंडून पूर्वीच्या काळातल्या वाळवणांबद्दल ऐकायला मिळायचं. तिचं वास्तव्य जास्त करून खानदेशात झालेलं. तिथल्या उन्हात पालेभाज्या आणि गवार वगैरे भाज्या कशा वाळवल्या जात, ते ती सांगायची. आपणही वाळवू या, असा आग्रह धरल्यावर ती सांगायची, की मुंबईच्या उन्हात त्या नीट वाळणार नाहीत नि नंतर टिकणारही नाहीत... मग जरा खट्टू व्हायचो आम्ही मुलं. आपण मुंबईत कशाला राहतोय, असं वाटायचं... तरी पुणं आणि नाशिक-खानदेश भागात काहीवेळा नातेवाइकांकडे उन्हाळ्यात जाण्याची संधी मिळाली अन् तिथली वाळवणं पाहण्याचीही. तिथं मग हातावर केल्या जाणाऱ्या शेवया बघायला मिळाल्या. शेवयाचा स्टँडही एका घरी पाहिला. त्याच्याशी जोडलेल्या खुर्चीत बसून शेवया करून, मग त्या गोल टोपलीवर वा चाळणीवर वाळत घातल्या जात होत्या. शेवया करणं हे एक कौशल्यच आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या गावी आजीचा कुरडईचाही या स्टँडसारखा सोऱ्या होता आणि उभं राहून कुरडया केल्या जायच्या. त्याला हत्तीचा आकार होता. हत्तीचं तोंड आणि शेपटापर्यंताच भाग आणि मधल्या शरीराच्या जागी सोऱ्याची यंत्रणा बसवलेली होती. वरून खटका दाबायचा आणि कुरडई पाडायची. ती खाली ताट धरून त्यात झेलायची, अशी पद्धत.

वाळवणाचा विषय निघाला, की अशा बऱ्याच गोष्टी आठवणीतून वर येतात. पूर्वी प्लॅस्टिकचा वापर तेवढा नव्हता. तेव्हा सुती कापडच वाळवणांसाठी वापरलं जायचं. अंगण असेल, तर तिथं, नाहीतर गच्ची वा धाब्यावर खाली सतरंजी अंथरून त्यावर चादर वा धोतर टाकून वाळवणं केली जात. काहीच नाही, तर घरावरच्या पत्र्यांवर वाळवणं केली जायची. तीव्र उन्हाच्या प्रदेशात जमिनीच्या उष्णतेमुळे वेड्यावाकडे होतात म्हणून मग पापड किंवा साबुदाण्याच्या पापड्या शक्यतो खाटेवर वाळवल्या जात. आम्हा मुलांना वाळवणांच्या राखणीसाठी बसवलं जाई. मग सुकत आलेले सांडगे तोंडात टाकायचे, तर कधी अर्धा ओला पापड, असं आम्ही करायचो. तसंच कापडावर साबुदाण्याच्या पापड्या टाकल्या असतील, तर संध्याकाळच्या वेळी कापडाला मागच्या बाजूने पाण्याचा हात लावून, पापड्या वेगळ्या करून सुपात ठेवण्याचं कामही आम्ही मुलीच करत असू, तेव्हाही थोड्या पापड्या गट्टम करायला मिळायच्या... उन्हाळ्याची सुटी आणि वाळवणं यांची जोडी हातात हात घालूनच येत असल्याने आजही त्या लडीवाळ आठवणी आनंद देऊन जातात. 

आपण या साठवणुकीला ‘बेगमी’ म्हणतो. हा शब्द अरबी-फ़ारसीतून आला आहे. बेग़म-दुःखरहित अवस्था, ती बेगमी. उन्हाळ्यात पुढच्या वर्षाची अशी भरपूर साठवणीची तरतूद करून ठेवली, की मग येणारा काळ, विशेषतः पावसाळा कटकटीचा राहत नाही. घरात साठवून ठेवलेल्या पदार्थांचा वापर करून, आपलं भोजन रुचकर होतं आणि दिवस सुखकर. वाळवणं म्हणजे जणू आनंदाचं पर्वच...

संबंधित बातम्या