होम मेड आइस्क्रीम

नंदिनी गोडबोले, नागपूर
सोमवार, 11 एप्रिल 2022

उन्हाळा विशेष
 

ब्लॅक करंट आइस्क्रीम
साहित्य : बेससाठी - एक कप म्हशीचे कच्चे दूध, पाव कप पिठीसाखर, पाव कप मिल्क पावडर, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. आइस्क्रीमसाठी - सव्वा कप व्हीप क्रीम, पाव कप कंडेन्स्ड मिल्क, १० ते १५ काळ्या मनुका, ब्लॅक करंट क्रश (ऑप्शनल).
कृती : कच्चा दुधामध्ये बेसमधील सर्व साहित्य घालावे. ते गॅसवर थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे आणि थंड करायला ठेवावे. दुसऱ्या भांड्यामध्ये व्हीप क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क घालून चार ते पाच मिनिटे इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घ्यावे. फोम येईपर्यंत बीट करावे. काळ्या मनुका थोड्या कोमट पाण्यात भिजत घालाव्यात व त्या मिक्सरमध्ये भरड क्रश करून घ्याव्यात. व्हीप क्रीमच्या मिश्रणात बेसचे मिश्रण घालून पुन्हा बीट करावे आणि त्यात भरड पेस्ट केलेल्या मनुका घालाव्यात. नंतर एका घट्ट झाकण असलेल्या डब्यात घालून फ्रिझरमध्ये दहा ते बारा तास आइस्क्रीम सेट करायला ठेवावे. ब्लॅक करंट क्रश हवा असेल तर एक तृतीयांश कप घालावा.

पान आइस्क्रीम
साहित्य : वर सांगितल्याप्रमाणे बेस, ४ रेडीमेड मिठा पान, थोडीशी टुटीफ्रुटी, पान सिरप (उपलब्ध असेल तर).
कृती : पानामधला मसाला काढून घ्यावा आणि विड्याची पानांची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. फेटलेल्या व्हीप क्रीमच्या मिश्रणात कंडेन्स्ड मिल्क, शिजवलेले बेस मिश्रण, मिठा पानमधील मसाला, थोडीशी टुटीफ्रुटी आणि विड्याच्या पानांची पेस्ट घालावी. यात फूड कलर वापरत नाहीये. सर्व मिश्रण बीटरच्या साह्याने बीट करावे आणि घट्ट झाकण असलेल्या डब्यात दहा ते बारा तास फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवावे.

बटरस्कॉच आइस्क्रीम
साहित्य : बेस वर सांगितल्याप्रमाणे, अर्धा कप साखर, बटरस्कॉच इसेन्स, ४-५ काजू, २-३ थेंब पिवळा फूड कलर, १ छोटा चमचा बटर.
कृती : बेस वर सांगितल्याप्रमाणे शिजवून घ्यावा. दुसऱ्या पॅनमध्ये अर्धा कप साखर घेऊन ती गरम झाली की त्याचे कॅरॅमल करावे. म्हणजेच ब्राऊन कलरमध्ये वितळली की त्यात एक चमचा बटर घालावे. चार-पाच काजू भरड करून घालावेत. एका ॲल्युमिनियमच्या ट्रेला ग्रिसिंग करून त्यात मिश्रण पटकन ओतावे. अर्धा तास थंड करायला ठेवावे. हे झालं कॅरॅमल. व्हीप क्रीमच्या फेटलेल्या मिश्रणात कंडेन्स्ड मिल्क, बटरस्कॉच इसेन्स, पिवळा फूड कलर, बेसचे शिजलेले मिश्रण आणि कॅरॅमल केलेली भरड क्रश हे सर्व मिश्रण घालून घट्ट झाकण असलेल्या डब्यात दहा ते बारा तास सेट करायला ठेवावे.

चॉकलेट आइस्क्रीम
साहित्य : बेस, ३ टेबलस्पून कोको पावडर, २ टेबलस्पून चोको चिप्स, ५० ग्रॅम डार्क कंपाउंड चॉकलेट.
कृती : बेसच्या मिश्रणात तीन टेबलस्पून कोको पावडर घालून ती शिजवून घ्यावी. ५० ग्रॅम डार्क कंपाउंड चॉकलेट मायक्रोवेव्हमध्ये वितळवून घ्यावे. व्हीप क्रीमच्या मिश्रणात कंडेन्स्ड मिल्क, बेस आणि कोको पावडरचे मिश्रण, थोडे चोको चिप्स आणि वितळलेले कंपाउंड चॉकलेट घालावे आणि इलेक्ट्रिक बीटरच्या साह्याने बीट करावे. घट्ट झाकण असलेल्या डब्यात दहा ते बारा तास फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवावे. सेट करताना वरून थोडे चोको चिप्स डेकोरेशन करिता घालावेत.

अंजीर आइस्क्रीम
साहित्य : बेस, ८-१० भिजवलेले अंजीर, व्हीप क्रीम, कंडेन्स्ड मिल्क.
कृती : भिजवलेले अंजीर मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घ्यावेत. फेटलेल्या व्हीप क्रीमच्या मिश्रणात कंडेन्स्ड मिल्क, शिजवलेला बेस आणि अंजिराची पेस्ट घालावी. इलेक्ट्रिक बीटरच्या साह्याने बीट करावे. घट्ट झाकण असलेल्या डब्यात दहा ते बारा तास फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवावे.

व्हॅनिला आइस्क्रीम
साहित्य : बेस, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, व्हीप क्रीम.
कृती : व्हीप क्रीम, बेस, कंडेन्स मिल्क आणि एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स हे सर्व एकत्र करावे. ते बीटरने चार ते पाच मिनिटे बीट करावे. नंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात दहा ते बारा तास फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवावे.

अमेरिकन  नट्स आइस्क्रीम
साहित्य : बेस, १ टेबलस्पून बदाम, १ टेबलस्पून काजू, १ टेबलस्पून भाजलेले पिस्ते, १ टेबलस्पून जेली.
कृती : ड्रायफ्रूट भाजून घ्यावेत. व्हीप क्रीमच्या मिश्रणात बेस, भाजलेले ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे, कंडेन्स्ड 
मिल्क आणि थोडेसे जेलीचे तुकडे घालावेत. बीटरच्या साह्याने चार ते पाच मिनिटे बीट करावे. घट्ट झाकणाच्या डब्यात दहा ते बारा तास फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवावे.

राजभोग आइस्क्रीम
साहित्य : बेस, ५० ग्रॅम थोडासा भाजलेला खवा, व्हीप क्रीम, कंडेन्स मिल्क.
 कृती : फेटलेल्या व्हीप क्रीमच्या मिश्रणात कंडेन्स मिल्क, शिजवलेले बेस मिश्रण आणि थोडासा परतून घेतलेला खवा घालावा. इलेक्ट्रिक बीटरच्या साह्याने बीट करून घ्यावे. घट्ट झाकणाच्या डब्यात मिश्रण घालावे. मधे मधे खव्याचे थोडेसे तुकडे घातले तरी चालेल. दहा ते बारा तास फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवावे.

टिप ः दिलेल्या प्रमाणामध्ये सहाजणांसाठी आइस्क्रीम होईल.

संबंधित बातम्या