चटकदार लोणची...

सुप्रिया खासनीस
सोमवार, 11 एप्रिल 2022

उन्हाळा विशेष

भोकराचे लोणचे
साहित्य : अडीचशे ग्रॅम भोकरे, ३-४ चमचे तिखट, चवीनुसार मीठ, १ चमचा भरडसर मेथी पूड, ४ चमचे मोहरी डाळ पूड, ३ चमचे हळद, फोडणीसाठी तेल, १ मध्यम आकाराची कैरी (ऐच्छिक).
कृती : थोडे मीठ घातलेल्या पाण्यात भोकरे धुऊन, पुसून, कोरडी करावीत. नंतर भोकरे फोडून त्यांच्या बिया काढून टाकाव्यात. वरील सर्व मसाला कालवून भोकरात भरावा. या लोणच्यात एका कैरीच्या बारीक फोडी घातल्यास खार लवकर सुटतो व चवही छान वेगळी येते.

लिंबाचे ठेचा लोणचे
साहित्य : एक डझन लिंबे, १५ ते २० ओल्या मिरच्या, १ वाटी साखर किंवा गूळ, पाऊण वाटी मीठ, १ चमचा हिंग, दीड चमचा हळद, २ चमचे मेथ्या, फोडणीचे साहित्य.
कृती : लिंबाच्या अगदी बारीक फोडी कराव्यात. मिरच्यांचे तुकडे करावेत. मिरच्यांत मीठ घालून दगडी खलात ठेचाव्यात. नंतर त्यात लिंबाच्या फोडी घालून थोडे ठेचावे. मग त्यात अर्धा चमचा हिंग व तळलेल्या मेथ्यांची पूड घालावी. साखरेसह सर्व एकत्र कालवावे. उरलेल्या हिंगाची पूड आणि हळद घालून नेहमीप्रमाणे फोडणी करून लोणच्यावर घालावी.

आंबोशीचे लोणचे
साहित्य : एक वाटी कैरीच्या सुकविलेल्या फोडी, १ वाटी गूळ, पाव वाटी मोहरी, १ चमचा मेथी, तेल, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद.
कृती : कैऱ्या सोलून त्याच्या फोडी उन्हात वाळवाव्यात, म्हणजे आंबोशी तयार होते. एक वाटी आंबोशी घेऊन त्यावर उकळते पाणी घालावे म्हणजे फोडी म‌ऊ होतील. गुळात थोडे पाणी घालून कच्चा पाक करून घ्यावा. मोहरी चांगली वाटावी. तेलात हळद, हिंग, मोहरी घालून फोडणी करावी. गुळाच्या पाकात वाटलेली मोहरी, मेथी पूड, चवीनुसार मीठ घालून चांगले कालवावे. नंतर त्यात आंबोशीच्या फोडी घालून लोणचे बरणीत भरावे.

लिंबाचे लोणचे (तिखट)
साहित्य : एक डझन लिंबे, २ चमचे हळद, २ चमचे मेथ्या, २ ते ४ चमचे तिखट, १ चमचा हिंग, पुरेसे मीठ. 
कृती : थोड्या तेलावर मेथ्या लालसर तळाव्यात. नंतर बारीक वाटून घ्याव्यात. तेलात मोहरी घालून फोडणी करावी. एका परातीत हळद, हिंग, तिखट एकत्र करून त्यावर ही फोडणी ओतावी. फोडणी गार होऊ द्यावी. लिंबाच्या फोडी करून त्यांना गरजेनुसार मीठ लावून ठेवावे. नंतर मेथी पूड व कालवलेले हिंग, हळद इत्यादीचे मिश्रण व लिंबाच्या फोडी एकत्र करून बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे केव्हाही करता येते.

ओल्या हळदीचे लोणचे
साहित्य : एक वाटी ओल्या हळदीचे केलेले गोल तुकडे, ४-५ ओल्या मिरच्या, मीठ, लिंबू, १ वाटी आल्याचे गोल तुकडे, पाव वाटी कुटलेली मोहरी - १ चमचा मेथी - १ चमचा हिंग  हे ३ जिन्नस एकत्र करून केलेला मसाला.
कृती : ओल्या हळदीचे व आल्याचे गोल तुकडे प्रत्येकी एक वाटी करावेत. ते एकत्र करून त्याला वरील एकत्र केलेला मसाला चोळावा. नंतर अंदाजे लिंबाचा रस व चवीनुसार मीठ त्या तुकड्यांवर घालावे. नंतर ओल्या मिरच्यांचे तुकडे त्यात घालून त्यावर गार फोडणी घालावी. लोणचे कालवून एकसारखे करावे व बरणीत भरावे. हे लोणचे बरेच दिवस टिकते.

कैरीचे लोणचे (तिखट)
साहित्य : एक किलो कैऱ्या, पाव किलो मीठ, २ ते ३ चमचे मेथ्या, ४ चमचे हळद, १० ग्रॅम हिंग, ८ ते ९ चमचे तिखट, १०० ग्रॅम मोहरीची डाळ, तेल.
कृती : कैरीच्या बेताच्या आकाराच्या फोडी कराव्यात. त्याला मीठ व हळद लावून ठेवावे. मीठ भाजून घ्यावे. थोड्या तेलात हिंग व मेथ्या तळून घ्यावे. त्याच तेलात हळद परतून घ्यावी. भांडे खाली उतरवून त्यात तिखट घालून जरा हलवावे. हिंग व मेथ्या बारीक करून घ्यावे. नंतर तेलाची फोडणी करावी. परातीत मोहरीची डाळ, मीठ, हळद, तिखट, हिंग, मेथीची पूड व कैरीच्या फोडी एकत्र कालवाव्यात. नंतर त्यावर गार झालेली फोडणी ओतून लोणचे कालवावे व बरणीत भरावे. लोणच्याच्या फोडींच्या वर तेल राहील इतके तेल असावे. कमी वाटल्यास पुन्हा थोड्या तेलाची फोडणी करून गार झाल्यावर त्यावर घालावी.

आवळ्याचे लोणचे 
साहित्य : अर्धा किलो आवळे, अर्धी वाटी लोणच्याची लाल मोहरी, पाव वाटी लाल तिखट, २ चमचे मेथ्यांची पूड, हिंग, पाव किलो गूळ अथवा साखर, फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम आवळे स्टीलच्या किसणीवर किसून घ्यावेत. मोहरी बारीक वाटून थोड्या पाण्यात चांगली फेटून घ्यावी. मेथ्या बदामी रंगावर तळून त्याची पूड करावी. गूळ किंवा साखर, तिखट, मेथी पूड, वाटलेली मोहरी आणि चवीनुसार मीठ घालून चांगले कालवावे. नंतर अर्धी वाटी तेलाची हिंग, हळद घालून फोडणी करावी व कालवलेल्या मिश्रणावर घालावी. बरणीत भरून वर थोडे मीठ घालून  ठेवावे.

पेरूचे लोणचे
साहित्य : दोन पेरू, एका लिंबाएवढा गूळ, अंदाजे तिखट व मीठ, ४-५ मेथी दाणे, २ चमचे दाण्याचे कूट.
कृती : प्रथम पेरूच्या बेताच्या आकाराच्या फोडी करून पाण्यात घालाव्यात. नंतर तेलाची हिंग, हळद, मेथ्या घालून फोडणी करावी. त्यात थोडे पाणी घालून फोडी शिजवाव्या. फोडी शिजल्या की त्यात तिखट, मीठ, गूळ, दाण्याचे कूट घालून भांडे खाली उतरवावे. हे लोणचे खूप छान लागते, दोन ते तीन दिवस टिकते.

उकड आंबा
साहित्य : लहान लहान पिकलेले पण जास्त न झालेले १ डझन रायवळ आंबे, १ वाटी मोहरीची डाळ, पाव किलो गूळ, ४ चमचे तिखट, २ चमचे मेथ्यांची पूड, २ चमचे हिंग, गरजेनुसार मीठ.
कृती : पाणी न घालता आंब्याला वाफ देऊन घ्यावी. नंतर मोहरी थोडे पाणी घालून वाटावी. वाटलेल्या मोहरीत गुळाचा पाक करून घालावा. मेथीची पूड, हिंग व चवीनुसार मीठ, घालून एकत्र कालवावे. नंतर वाफवलेल्या आंब्याच्या डेखापाशी थोडी साल मोकळी करून घ्यावी व ते आंबे वरील मिश्रणात घालावेत. आंबे चांगले बुडतील इतपत मिश्रण असावे. आंबे एका बरणीत भरून त्याला दादरा बांधावा व बरणी ठेवून द्यावी. वाढायच्यावेळी जरुरीपुरते आंबे काढून घेऊन ते कुस्करून त्यावर फोडणी घालावी व वाढावे. हे लोणचे पुष्कळ दिवस टिकते.

कटकी कैरी
साहित्य : कैऱ्या, साखर, गरजेनुसार तिखट, मीठ, जिरे पूड.
कृती : घट्ट व मोठ्या कैऱ्या आणून त्याची साले काढून बारीक फोडी कराव्यात. नंतर फोडींना थोडावेळ मीठ लावून ठेवावे व नंतर पाणी काढून टाकावे. जितक्या कैऱ्या असतील तितकी साखर घ्यावी. परातीत हे मिश्रण कालवून फोडी ७-८ दिवस दिवसा उन्हात ठेवाव्यात. रात्री बाहेर ठेऊ नये. नंतर त्यात आवश्यक तेवढे तिखट, मीठ, जिरे पूड घालावी. पुन्हा एक दिवस उन्हात ठेवून मग लोणचे बरणीत भरावे. वर्षभर टिकते.

खारकांचे लोणचे
साहित्य : दोन वाट्या खारकांचे बारीक केलेले तुकडे, खारकांचे तुकडे बुडतील इतपत लिंबाचा रस, १ वाटी मनुका, अर्धी वाटी आल्याचा कीस, १ चमचा पादेलोण (काळे मीठ), चवीनुसार नेहमीचे मीठ, अर्धा ते १ वाटी साखर.
कृती : मनुका निवडून स्वच्छ धुवाव्यात. एक बरणी घेऊन त्यात लिंबाच्या रसात खारकांचे तुकडे, मनुका व इतर सर्व साहित्य घालून एकसारखे हलवून, खाली वर करून ठेवावे. मुरल्यावर मगच वापरावे.

कांद्याचे लोणचे
साहित्य : कांदे, २ चमचे मोहरी डाळ, पाव चमचा मेथ्या, १ चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी लिंबाचा रस, हिंग, अर्धी वाटी तेल, फोडणीचे साहित्य.
कृती : एक वाटीभर उभा चिरलेला कांदा घ्यावा. 
मेथ्या बदामी रंगावर तळून मेथ्या व मोहरी वाटून घ्यावी. फोडणी करावी व ती गार करून घ्यावी. सर्व मिश्रण एकत्र कालवावे. त्यात कांद्याच्या फोडी व लिंबाचा रस घालून एकसारखे कालवून लोणचे बरणीत भरावे.

हिरव्या मिरच्यांचे लोणचे

साहित्य: दोनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम मोहरीची डाळ, १ चमचा हळद, १ चमचा मेथ्या, १ चमचा हिंग, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी तेलाची फोडणी, २ लिंबे. 
कृती : मोहरीची डाळ चांगली कुटून घ्यावी. थोड्या तेलावर मेथ्या परतून घ्याव्यात. त्याची बारीक पूड करावी. नंतर मीठ, हळद, हिंग, मेथी पूड, मोहरी पूड व मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यासह सर्व एकत्र करावे. त्यावर गार फोडणी घालावी. मग लिंबाचा रस घालून चांगले कालवावे व बरणीत भरून ठेवावे. ४-५ दिवसांनी खायला काढावे. मधून मधून हलवावे. साधारण वर्षभर टिकू शकते.

रसलिंबू

साहित्य : एक वाटी लिंबाचा रस, पाव किलो गूळ, ४-५ चमचे मोहरीची पूड, तेल, ४ चमचे लाल तिखट, २ चमचे मेथीची पूड, चवीनुसार मीठ, २ चमचे हळद, दालचिनीचे २ ते ४ बारीक तुकडे, १५ ते २० मिरे.
कृती : गुळाचा पक्का पाक करून घ्यावा. तो गार झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळावा. मोहरी व मेथ्या भाजून घेऊन त्याची पूड करावी. मिरीची पूड करावी. लाल तिखट, हळद, थोडे तेल टाकून भाजून घ्यावे. नंतर मोहरी, मेथी, मिरपूड, तिखट, हळद, दालचिनी पूड व मीठ असे सर्व जिन्नस एकत्र करून मिसळावे व हा मसाला गुळाच्या पाकात घालावा. मिश्रण सारखे करून घ्यावे व बरणीत भरून ठेवावे. मुरण्यास साधारण चार ते पाच दिवस लागतात. रसलिंबू चविष्ट लागते.

संबंधित बातम्या