गरमागरम चहा आणि आरोग्य

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

आपणा भारतीयांचे चहाप्रेम जगद्‌विख्यात आहे. ’चहा पिण्याची कुठलीही वेळ नसते, पण वेळेवर चहा लागतोच’. घरात कोणी पाहुणा आला तर चहा घेणार का? म्हणून विचारणे किंवा न सांगता चहाचा कप आणणे, ही पाहुणचाराची शिस्तच मानली जाते. ऑफिसमध्ये काम करताना अधून मधून ’टी-ब्रेक’ घेणे हा तर बहुतेक ठिकाणी शिरस्ताच असतो. गावागावातली चहाची हॉटेल्स आणि शहरांच्या रस्तोरस्ती विखुरलेल्या चहाच्या टपऱ्या तुम्हाला कधीही रिकाम्या दिसणार नाहीत. अनेक मोठ्या शहरांत आणि विमानतळांवरसुद्धा अनेक प्रकारचा चहा देणारे ’स्पेशल चाय स्टॉल्स’ दिसू लागले आहेत. काही चहा कंपन्यांनी तर देशभर त्यांच्या चहाच्या हॉटेल्सच्या चेन्सही निर्माण केल्या आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी चहा पिणे हे एक त्याज्य व्यसन मानले जायचे, पण आज ती सर्व थरातल्या लोकांसाठी एक नित्याची गोष्ट होऊन बसली आहे. 

चहा आणि आरोग्य
भारतात शे- दोनशे वर्षांपासून प्रचलित असलेला सगळ्यांच्या आवडत्या चहाबाबत जगभरात अनेक संशोधने झाली आहेत. त्यातून चहाचे आरोग्यावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम अधोरेखित केले गेले आहेत.
चहामध्ये ’अँटिऑक्‍सिडंट’चे प्रमाण चांगले असते. चहातल्या ’फ्लॅव्हेनॉइड’ या घटकातून ’एपिगॅलोकॅटेचिन’ (इजीसीजी) हे अँटिऑक्‍सिडंट मिळते. ही अँटिऑक्‍सिडंट्‌स शरीरातील पेशींचे आरोग्य आणि एकूणच रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. काही प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, वाढत्या वयातील वृद्धत्वाकडे नेणाऱ्या समस्या, अल्झायमर्स अशा आजारांना प्रतिबंध करतात. चहात कॅफीन आणि थिआनिन ही द्रव्ये असतात त्यामुळे मेंदू उत्तेजित होतो आणि बौद्धिक सतर्कता वाढवतात. चहा प्यायल्यावर जे ताजेतवाने वाटते, ते त्यामुळेच.

चहाचे प्रकार
शास्त्रीयदृष्ट्या चहाचे पाच प्रकार पडतात. त्यांचे गुणाअवगुण पाहणे मनोरंजक ठरते.

ग्रीन टी : चहाची हिरवी पत्ती कपभर गरम पाण्यात टाकून थोडावेळ ढवळून बनवलेला चहा म्हणजे ग्रीन टी. यात दूध आणि साखर टाकले जात नाहीत. चहा उकळला न गेल्याने यात नैसर्गिक फ्लॅव्हेनॉइडस भरपूर असतात. त्यामधून मुबलक ॲण्टिऑक्‍सिण्डण्टस शरीराला मिळतात. याचे महत्त्वाचे फायदे म्हणजे-

 • मूत्राशय, स्तन, फुफ्फुसे, जठर, स्वादुपिंड, गुदाशय या महत्त्वाच्या अवयवांचा कर्करोग यामुळे टाळला जातो.
 • रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणारे अडथळे (ब्लॉक्‍स) दूर होतात.
 • चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहते. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
 • मेंदूच्या कार्यात निर्माण होणारे तणाव, बिघाड टळतात, याचा परिणाम म्हणून अल्झायमर्स, पार्किंन्स डिसीज, अर्धांगवायू असे आजार होण्याची शक्‍यता कमी होते.
 • एका संशोधनात ग्रीन टीच्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी होते असे आढळून आले आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते एक वरदान मानले जाते. ग्रीन टी इन्सुलिन स्रवणे नियंत्रित करतो, त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो.
 • ग्रीन टीमुळे अन्ननलिकेचा कर्करोग टळू शकतो. याचे नियमित सेवन केल्यास कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट होतात असे दिसून आले आहे.
 • ग्रीन टी प्यायल्याने दातातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू कमी होतात. त्यामुळे दात किडत नाहीत आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहते.
 • ग्रीन टीमध्ये विषाणू आणि जीवाणू विरोधी तत्त्वे असतात. त्यामुळे फ्लू सारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. वारंवार होणारा सर्दी-खोकल्याचा त्रास नियंत्रित होऊ शकतो.
 • ग्रीन टी च्या सेवनाने त्वचा निरोगी आणि टवटवीत बनते. तसेच उन्हाळ्यात सूर्यकिरणामुळे होणारा त्वचेचा त्रास कमी होतो.

काळा चहा : चहाची पानांवर प्रक्रिया करून वाळवून केलेल्या पत्तीचा पाण्यात उकळून केलेला चहा म्हणजे ब्लॅक टी किंवा काळा अथवा ’कोरा’ चहा. यातही दूध आणि साखर न टाकल्यास तो उपयुक्त ठरतो. काळ्या चहात कॅफीनचे प्रमाण भरपूर असते. त्याचा फायदा धूम्रपानामुळे होणारी फुफ्फुसाची झीज कमी होते. त्याचप्रमाणे काळा चहा पिणाऱ्यांना अर्धांगवायू होण्याचा धोका कमी असतो.

पांढरा चहा (व्हाईट टी) : चहाची पाने वाफाळून वाळवली जातात. चीनमध्ये या प्रकारचा चहा लोकप्रिय आहे. यावर अन्य कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. या चहामध्ये सर्वांत जास्त ॲण्टिऑक्‍सिडण्टस असतात. त्यामुळे कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी हा सर्वोत्तम मनाला गेला आहे.

प्यूएर टी : चीनच्या युनान प्रांतात तयार होणाऱ्या या चहाला ’प्युएर’ हे त्या प्रांतातील एका गावाचे नाव दिले आहे. चहाच्या खूप जुन्या पानांचे अर्धवट फर्मेंटेशन एका विशेष प्रक्रियेने केलेला हा चहा असतो. याची पत्ती न करता वड्या केल्या जातात. या चहाने लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि वजनही नियंत्रणात राहते. 

हर्बल टीचे वास्तव

 • बाजारात वेगवेगळ्या वनस्पतींची पाने, फुले, मुळे, बिया वापरलेले चहा ’वनस्पतिजन्य चहा किंवा हर्बल टी’ म्हणून मिळतात. त्यांच्या गुणांबद्दल वारेमाप जाहिरातीदेखील केल्या जातात. पण त्यांच्यात ग्रीन किंवा व्हाईट टीपेक्षा कमी प्रमाणात उपयुक्तद्रव्ये असतात. अर्थात हे त्या चहात कोणती वनस्पती वापरली आहे, यावर अवलंबून असते. साधारणपणे बाजारात प्रसिद्ध असलेल्या हर्बल चहात आले, गवती चहा, जीनसेंग, जास्वंद, गुलाब, जाई, रुईबॉस, कॅमोमाईल, एकिनेसीआ असे प्रकार जगभरात प्रसिद्ध पावले आहेत. यामध्ये आले, इलायची, गवतीचहा हे परंपरागत पदार्थ नेहमीच्या चहात मिसळून प्यायले जातात.
 • आले, गवती चहा नेहमीच्या चहात मिसळून वापरल्याने सर्दी-खोकला कमी होतो.
 • इलायचीयुक्त चहा स्वाद वाढवतो आणि अन्नपचन सुधारतो.

पण बाजारात मिळणाऱ्या काही हर्बल चहात चहाचा वापर न होता त्या गोष्टींचा काढा चहा म्हणून वापरला जातो. ’हर्बल टी’च्या नावाखाली गुलाब किंवा जास्वंदीच्या फुलांचा खूप महाग चहा बाजारात मिळतो, मात्र अशा चहात गुलाबाच्या किंवा जास्वंदाच्या पाकळ्या नक्की असतात, पण त्यात चहाची पानेच नसतात. त्यामुळे हर्बल पेये स्वाद किंवा वासाला चांगली असली तरी त्यातून ’अँटिऑक्‍सिडंट’ मिळतीलच असे नाही.

 • कॅमोमाईल चहामधील उपयुक्त ॲण्टिऑक्‍सिडंटमुळे मधुमेह, दृष्टिदोष, मज्जातंतूंमुळे येणारी हातापायांची बधीरता कमी होते असे मानले जाते.
 • जास्वंद- एका प्राथमिक शास्त्रीय संशोधनात रोज ३ कप जास्वंदाचा चहा घेतल्याने उच्च रक्तदाब काही प्रमाणात कमी होतो, असे आढळून आले.
 • एकीनेसीआचा हर्बल चहा प्यायल्याने सर्दी वारंवार होण्याचे प्रकार कमी होतात.
 • रुईबॉस हा दक्षिण आफ्रिकेत मिळणारा हर्बल चहा प्यायल्याने कर्करोग टळू शकतात, असे एका संशोधनात लक्षात आले आहे.

चहाचे दुष्परिणाम
आपल्या देशातील चहा म्हणजे वरील प्रकारच्या चहांपेक्षा वेगळा असतो. चहाच्या रोपांची पाने प्रक्रिया करून वाळवली जातात खरे, पण आपल्या चहात काही दोष असतात.

 • आपल्याकडे चहाची पत्ती भरपूर उकळून चहा बनवला जातो, त्यामुळे त्यातील फ्लॅव्हेनॉइडस आणि ॲण्टिऑक्‍सिडण्टस पूर्ण नष्ट होऊन जातात.
 • चहा जास्त उकळल्याने त्यातील कॅफीनचा अंश वाढतो. अतिरिक्त कॅफीनमुळे निद्रानाश, नैराश्‍य, मानसिक अस्वास्थ्य, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, वारंवार लघवीला जावे लागणे, डोकेदुखी, पोटात आम्लता वाढणे असे त्रास सतत संभवतात. 
 • काळ्या चहात साधारणतः ४७ ते ६० मिलिग्रॅम प्रतिकप, तर हिरव्या चहात (ग्रीन टी) २५ मिलिग्रॅम प्रतिकप कॅफीन असते. प्रौढ व्यक्तींना चहातून जास्तीत जास्त ३०० ते ४०० मिलिग्रॅम कॅफीन. पोटात गेल्यावर झोपेवर विपरीत परिणाम होतो. मात्र कॅफीनला संवेदनशील असलेल्या व्यक्तींनी १०० ते १२० मिलिग्रॅम एवढे कॅफीन असा निद्रानाश घडवून आणू शकतो. 
 • किशोरावस्थेतील मुला-मुलींसाठी कॅफीनची मर्यादा एका दिवसात १०० मिलिग्रॅम, तर गर्भावस्थेतील स्त्रियांसाठी ती प्रतिदिवशी २०० मिलिग्रॅम आहे. त्यामुळे आपला प्रचलित चहा आरोग्यासाठी अपायकारक ठरतो. 
 • आपल्या चहातला सर्वांत धोकादायक घटक म्हणजे साखर. त्यामुळे सतत चहा  पिणाऱ्यांच्या पोटात कॅलरीजदेखील जास्त जातात. या अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे चहा कमी साखरेचा किंवा बिन साखरेचा घ्यावा. 
 • आपल्या चहातील दूध हा घटकदेखील चहाची आरोग्याबाबत असलेली उपयुक्तता कमी करतो. दुधात ’केसिन’ नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन चहातील अँटिऑक्‍सिडंस्टचा प्रभाव कमी करते. त्यामुळे ’ब्लॅक टी’ जास्त चांगला ठरतो. 
 • ’आइस टी’ म्हणजे शीत चहासुद्धा उत्तम पेय असते; पण त्यातही भरपूर साखर असल्यामुळे कमी साखर घालून तो प्यायल्यास बरे.

काही महत्त्वाच्या सूचना 

 • दिवसभरात जास्तीत जास्त ३ ते ४ कप चहा घ्यावा त्यापेक्षा अधिक प्रमाणात आणि वारंवार ही पेये पिणे मात्र टाळावे. 
 • झोपण्यापूर्वी ४ ते ६ तास चहा पिणे टाळावे. चहा किंवा कॉफी पिऊन लगेच झोपणे चुकीचे असते. काही जणांना रात्री उशिरापर्यंत  किंवा अतिताणाचे काम करण्यासाठी वारंवार चहा घ्यावासा वाटतो. चहामधून कॅफीन पोटात गेले, की उत्साह येतो हे जरी  खरे असले तरी या व्यक्तींनी दर दोन तासांनी काही खाल्ले तर शरीराचा उत्साह टिकून राहतो. दिवसाला ५ ते १० कप अती उकळलेला चहा पिणाऱ्यांची पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध असे विकार होतात.
 • टपरीवरचा चहा ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. ॲल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांशी होणारा दीर्घकाळ संपर्क ’अल्झायमर्स’ होण्यास कारणीभूत ठरतो.

चहा हे शेवटी जीवनात गम्मत म्हणून घ्यायचे एक उत्तेजक पेय आहे. ते काही आजारांवरचे औषध नाही. शेवटी ग्रीन असो किंवा व्हाईट अथवा ब्लॅक नाहीतर हर्बल, चहा हा शेवटी चहाच असतो. त्याचे अतिसेवन आणि व्यसन लागणे कधीही चांगले नाही.
 

संबंधित बातम्या