चहातील ‘अर्थ’

गौरव मुठे 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा बाजार
 

भारताबरोबरच संपूर्ण जगात चहा जगात सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आहे. त्यावरून आपल्याला चहाची तल्लफ जगभर कशी पसरली आहे ते लक्षात येईल. शिवाय राजकारणापासून ते एखाद्या गंभीर विषयापासून आनंदाची बातमी आपण ’चाय पे चर्चा’ करत ’शेअर’ करतो. आपल्याकडे कोणी आलं, की आपण त्यांना चहा घेणार का असा आपुलकीने प्रश्न विचारून चहा ’ऑफर’ करतो. शिवाय आधीच्या काळात उच्च वर्गात ते ’स्टेट्‌स सिम्बॉल’ समजले जात होते. मात्र चहाला स्टेट्‌स मिळण्यासाठी मोठ्या संघर्षातून जावे लागले आहे. आता मात्र या अमृताच्या पेल्याचे एका स्टार्ट-अपमध्ये रूपांतर होत चालले आहे. चला तर मग या चहाचे अर्थकारण जाणून घेऊया. 

अज्ञात चहा 
जगात सर्वप्रथम चहाचा पेय म्हणून आस्वाद घेण्यात आला तो चीनमध्ये. क्वीन राजवटीत म्हणजे ख्रिस्तपूर्व २०० व्या शतकात चीनमध्ये चहा विलक्षण लोकप्रिय होता. चिनी लोकांनी कित्येकवर्ष चहा बनविण्याची पद्धत, कला जगापासून लपवून ठेवली होती. कोणीही व्यक्ती चिनी इतर लोकांसमोर चहा बनवत नसे. चीन ब्रिटिशांची वसाहत असून देखील ब्रिटिशांना याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अखेर युरोपियनांकडून ब्रिटिशांना चहाची ओळख झाल्यावर मात्र ब्रिटिशांना चहाचा व्यापार दिसू लागला.

चहाचे अर्थशास्त्र
ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून मग ब्रिटिशांनी चहाचा खात्रीशीर पुरवठा आणि मोठा नफा मिळावा यासाठी कठोर व्यापारनीतीचा अवलंब केला. चिनी लोकांनी कित्येक वर्ष चहा जगापासून लपवून ठेवला होता. त्यामुळे केवळ चीनमध्येच चहाचे उत्पादन होत होते. ब्रिटनचा चहापुरवठादार चीन या चहाची किंमत केवळ चांदीच्या स्वरूपात घेण्यावर आग्रही होता. मात्र इतक्‍या मोठ्या प्रमाणावर चांदी देणे ब्रिटनला शक्‍य नसल्याने. अखेर आयात चहाचे मूल्य चुकविण्यासाठी ब्रिटिशांनी चिनी लोकांना अफूची सवय लावून व्यापारतोल (Balance of Payment) सांभाळण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी चिनी लोकांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटून चांदीच्याऐवजी अफू देऊन चहाची आयात सुरू केली. मात्र चिनी सम्राटाने अफूपासून वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. परिणामी चीनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे मग ब्रिटिशांनी चहासाठी आपला मोर्चा भारताकडे वळविला. 

भारतात चहाचा प्रवेश... 
चहा हे पेय आहे हे खऱ्या अर्थाने भारतीयांच्या मनावर ठसविले गेले ते १८२० पासून. चीनमधून येणारा चहाचा पुरवठा खात्रीशीर न राहिल्याने ब्रिटिशांनी भारतात चहा लागवडीला प्रोत्साहन दिले. भारतात चहाचे झाड होते, त्याचा वापरही स्थानिक करत. पण ब्रिटिशांनी भारताला व्यापारी पद्धतीने चहाची लागवड करण्यास शिकविले. भारतात आरमारी अधिकारी म्हणून भारतात आलेला ए.सी. ब्रूस आणि लष्करी अधिकारी चार्ल्टन या दोघा ब्रिटिशांनी चहाबाबत भारतात मोठे संशोधन सुरू केले. परिणामी ब्रिटिशांनी भारतीयांना चहामळ्यांची लागवड करण्यासाठी १५ वर्षांपर्यंत बिनाभाड्याने जमिनी देण्यासह प्रचंड सवलती देऊ केल्या. 

ब्रिटिशांसाठी स्टार्ट-अप
ब्रिटनमध्ये चहा ही उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी होती. त्यामुळे ब्रूसने त्यावेळी चहातील नफ्याचे गणित मांडायला सुरुवात केली. प्रत्येकी १६५ एकर जमिनीचा एक अशा हजार पट्ट्यांमधून वर्षाला २.३२ लाख पौंड नफा चहाच्या उद्योगातून होऊ शकतो असे ब्रूसने सांगितले. त्यानंतर लंडनमधील उच्चभ्रू  भांडवलदारांच्या या नवीन ’स्टार्ट-अप’साठी भारताकडे ओढा वाढला. तेथील भांडवलदारांना चहाच्या रूपाने एक वेगळा उद्योग मिळाला. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली. आसाममध्ये झाबुआ येथे १८३७ मध्ये प्रथमच इंग्लिश टी. गार्डन तयार करण्यात आले. १८४० मध्ये आसाम टी. कंपनीने व्यावसायिक तत्त्वावर चहाचे उत्पादन, ब्रॅंडिंग विक्री करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चहाचे ब्रॅंडिंग ब्रिटनच्या राणीकडून करण्यात आले. ब्रिटनची राणी चहा घेत असतानाचे चित्र सर्व ठिकाणी पसरविण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून १८५० च्या दशकामध्ये भारतामध्ये चहाविक्रीचे प्रमाण झपाट्याने वाढले. 

भारत आणि चहा
भारतातील चहा व्यवसायाला १७२ वर्षांची परंपरा आहे. या १७२ वर्षांच्या परंपरेत भारतीय चहा उद्योगाने अनेक चढ-उतार बघितले आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेत चहा व्यवसायाचे मोठे योगदान राहिले आहे. भारतातून सर्वांत प्रथम अमेरिकेत चहाची विक्रीसाठी निर्यात करण्यात आली. त्यानंतर ५० आणि ६०च्या दशकात इतर देशांमध्ये निर्यात सुरू करण्यात आली. भारत सर्वाधिक चहाचे उत्पादन, खप आणि निर्यात अशा तिन्ही पातळ्यांवर आघाडीवर आहे. जगातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी ३१ टक्के चहाचे दर्जेदार उत्पादन भारतात घेतले जाते. 
जगात सर्वाधिक चहाचे सेवन करणारा भारत एक प्रमुख देश आहे. देशातल्या चहाच्या एकूण उत्पादनापैकी तीन-चतुर्थांश चहाचे उत्पादन देशातच उपभोगले जाते. २०१७-१८ मध्ये भारतातून ५ हजार ८४० कोटी रुपये मूल्याच्या चहाची निर्यात करण्यात आली. इराण, रशिया, संयुक्त अरब अमिरात, यूएसए आणि यूके हे भारतातून मोठ्या प्रमाणावर चहाची आयात करतात. खरं तर जगातील एकही देश असा नाही, की जिथे भारताचा चहा घेतला जात नाही. सध्या केनिया (शेजारील आफ्रिकन देशांसह), चीन आणि श्रीलंका यानंतर चहा निर्यातीच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. २०१६ च्या आकडेवारीनुसार, भारत १२६.७ कोटी किलोग्रॅम चहाच्या उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर होता. 

शेअर बाजारात चहाच्या कंपन्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे 
भारतीय शेअर चहाच्या कंपन्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. शेअर बाजारात चहा संबंधित प्रक्रियाउद्योग आणि चहाची निर्यात करणाऱ्या १६ नोंदणीकृत कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांची ११ हजार ६५९ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता असून या सर्व कंपन्यांचा वार्षिक निव्वळ नफा ८५० कोटी आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार कंपन्यांचे सुमारे ३५ हजार कोटींचे बाजारभांडवल आहे.

’टी बोर्ड ऑफ इंडिया’ची स्थापना 
भारतात सर्वप्रथम १९०३ मध्ये ’टी. बोर्ड ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अधिनियम १९५३ अंतर्गत नवीन ’टी. बोर्ड’ची स्थापना स्वातंत्र्यानंतर १ एप्रिल, १९५४ मध्ये करण्यात आली. ’टी. बोर्ड ऑफ इंडिया’ मुख्यालय कोलकता येथे असून भारतात १७ कार्यालये आहेत. विकासात्मक आणि नियामक कार्यांव्यतिरिक्त, ’टी. बोर्ड ऑफ इंडिया’ थेट प्रचार कार्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन आणि सहभागाचे आयोजन करते. शिवाय खरेदीदार-विक्रेता भेट घडवून आणणे आणि परदेशात व्यापारी शिष्टमंडळ दौरा आयोजित करण्याचे काम करते. चहा बाजार सर्वेक्षण, मार्केट ॲनॅलिसिस, निर्यातदार / आयातदारांना संबंधित माहिती प्रसारित करणे यासारख्या विविध बाजार विकासाची कार्ये करते. 

भारतात व्यापाराच्या पद्धती
भारतात दोन पद्धतीने चहाची विक्री केली जाते. एक म्हणजे बोली लावून (ऑक्‍शन) आणि थेट व्यापाऱ्याला विक्री केली जाते. कलकत्ता, गुवाहाटी, सिलिगुडी, कोची, कोन्नूर आणि कोइम्बतुर येथील चहाच्या मुख्य बाजारपेठांमध्ये बोली लावून चहाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. 

चहाला सोन्याचा भाव
भारतीय बाजारपेठेत सुटा चहा १४० रुपये प्रतिकिलोपासून उपलब्ध आहे. वेगवेगळ्या चहाच्या प्रतीनुसार किमती बदलत जातात. नुकताच गुवाहाटी चहा लिलाव केंद्रावर हाताने तयार केलेल्या आसाममधील चहाला प्रति किलो ३९ हजार ००१ रुपयांची किंमत मिळाली. लिलाव पद्धतीत चहाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. 

चहाची उलाढाल
भारतातील चहाखालील क्षेत्र वाढत असून जगातील सर्वाधिक म्हणजे १३ हजार चहाचे मळे भारतात आहे. शिवाय त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या २० लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. भारताच्या निर्यातीत चहाचा मोठा वाटा असून चहा व्यवसायाची उलाढाल ११ हजार कोटींची आहे. यातून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. भारतात सध्या १६९२ चहाचे नोंदणीकृत उत्पादक (प्रकिया उद्योग), २२०० नोंदणीकृत चहा निर्यातदार, ५५४८ नोंदणीकृत चहाचे खरेदीदार आहेत. आसाममध्ये सर्वाधिक चहाचे उत्पादन घेतले जाते. 

चहा एक स्टार्ट-अप
शहरी भागात चहाचा व्यवसाय आता एक ’स्टार्ट-अप’ म्हणून उदयास येऊ लागला आहे. चहाच्या अशा नवीन स्टार्ट-अपची महिन्याकाठी उलाढाल देखील लाखोंवर पोचली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद यांसारख्या ठिकाणी अशी ’स्टार्ट-अप’ मुख्यतः दिसून येत असून यशस्वीरीत्या काही शाखांमध्ये अशा ’स्टार्ट-अप’चा विस्तार पोचला आहे. 
चहा एक स्टार्ट-अप म्हणून यशस्वी होण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. जसे की, 
१) उच्चशिक्षित किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण झालेले तरुण आता या व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शक्कल लढवून ग्राहकांना आकर्षित करणे. 
२) चहा करण्याच्या वेगळ्या-वेगळ्या पद्धतीमुळे चहाची ’स्टार्ट-अप’ आकर्षणाची केंद्रे बनली आहेत. चहाच्या चवीतले वेगळेपण आणि केव्हाही गेलो तरी त्याच चवीचा चहा मिळणार याची खात्री
३) पारंपरिक दृष्टिकोन सोडून नीट-नेटकेपणा आणि स्वच्छता नजरेत भरते. 
४) दर्जा टिकवून ठेवता यावा यासाठी चहाशिवाय अन्य कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले जात नाहीत.
चहा आज आपल्या देशातील परिस्थिती पाहता उपाशी-अर्धपोटी काम करणाऱ्या कोट्यवधी श्रमजीवींच्या पोटाला आधार अधिक बनलेला आहे. त्यामुळेच आपला देश देखील एक चहावाला चालवतो हे अभिमानाने सांगितले जाते. 
 

संबंधित बातम्या