ओझोनचे भोक बुजणार कधी?

इरावती बारसोडे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

विज्ञान-तंत्रज्ञान 

शाळेत असताना शिकवले जाते, ‘पृथ्वीच्या वरच्या वातावरणामध्ये ओझोन वायूचा थर आहे. हा थर सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करतो.’ ओझोनच्या थराबाबत आपले सामान्यज्ञान एवढ्यापुरतेच मर्यादित असते. पण आत्ता मधेच ओझोनचा उल्लेख करण्याचे कारण काय? तर, गेल्याच आठवड्यामध्ये जागतिक ओझोन दिन साजरा झाला. ओझोनच्या थराला प्रदूषणामुळे भोक पडले, ते भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि हा दिन साजरा होऊ लागला.
तीन-चार दशकांपूर्वी मानवी कृतींमुळे उत्सर्जित झालेल्या क्लोरीन आणि ब्रोमाईन असलेल्या रसायनांमुळे ओझोनचा थर काही ठिकाणी विरळ झाला आणि ओझोनच्या थराला भोक पडले ही संज्ञा प्रचलित झाली. थराला शब्दशः भोक पडले नाही. तसे झाले असते, तर परिस्थिती फारच बिकट झाली असती. अजूनही ओझोनच्या थराला भोक आहेच, पण ते भरून येत आहे. 

ओझोन म्हणजे नक्की काय?
ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. गॉर्डन डॉबसन यांनी १९५७ मध्ये ओझोन थराचा शोध लावला होता. ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून तयार झालेला वायू आहे. याला शास्त्रीय भाषेमध्ये O3 म्हणतात. हा वायू पृथ्वीच्या वर साधारण २०-३० किलोमीटर अंतरावर वातावरणाच्या दुसऱ्या थरामध्ये म्हणजे स्ट्रॅटोस्फीअरमध्ये असतो. हा थर आपले अतिनील किरणांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून रक्षण करतो.

स्ट्रॅस्टोस्फीअर खालील वातावरणामध्ये म्हणजे टोपोस्फीअरमध्ये असणारा ओझोन प्रदूषक मानला जातो. हा पृथ्वीवरून मानवी उपकरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या वेगवेगळ्या वायूंची रासायनिक प्रक्रिया होऊन तयार होतो. भूपृष्ठावर असणारा ओझोन वनस्पती आणि प्राणी, त्यात माणूसही आला; अशा सर्व सजीवांनासाठी घातक असतो. 

ओझोनला धोका कशाचा? 
क्लोरीन, फ्लोरिन आणि कार्बनच्या अणूंपासून तयार झालेल्या क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनांमुळे ओझोनला धोका पोचतो. हे वायू जेव्हा वातावरणामध्ये मिसळतात आणि सूर्यप्रकाशामध्ये येतात, तेव्हा अतिनील किरणांमुळे त्यांचे पुन्हा विभाजन होते. क्लुरोफ्लुरोकार्बन्सपासून वेगळ्या झालेल्या क्लोरीनची ओझोनबरोबर रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून ओझोनचा रेणू नष्ट होतो आणि ओझोनचा थर विरळ होत जातो. सामान्यपणे ओझोनला घातक असलेले घटक ओझोन डीप्लीटिंग सबस्टन्सेस (ओडीएस) म्हणून ओळखले जातात. 

ओझोन थराच्या भोकाचा इतिहास
कॅलिफोर्निया विद्यापीठातील मारिओ मोलिना आणि शेरवूड रोलंड या शास्त्रज्ञांना १९७४ मध्ये पहिल्यांदा सीएफसींमुळे ओझोनच्या थराला धोका असल्याचे लक्षात आले. त्यावेळी सीएफसी रेफ्रिजरंट (थंड करणारा) म्हणून फ्रीजमध्ये तसेच इतर अनेक गोष्टींमध्ये वापरले जायचे. क्लोरीनचा एक अणू ओझोनचे एक लाखाहून अधिक रेणू नष्ट करत होता. परिणामी, ओझोन खूप वेगाने नाहीसा होऊ लागला. हे असेच सुरू राहिले, तर २०५० पर्यंत संपूर्ण ओझोन थरच नाहीसा होईल, असे भाकीत त्यावेळी संशोधकांनी केले होते. सुदैवाने या समस्येची जगाने दखल घेतली आणि ‘माँटरिअल प्रोटोकॉल’ अस्तित्वात आला.

माँटरिअल प्रोटोकॉल
ओझोनच्या थराचे भोक नाहीसे करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) ‘माँटरिअल प्रोटोकॉल ऑन सबस्टन्सेस दॅद डीप्लीट द ओझोन लेयर’ अस्तित्वात आणला. २६ ऑगस्ट १९८७ रोजी यावर निर्णय झाला आणि १६ सप्टेंबर १९८९ पासून तो अमलात आणण्यात आला. म्हणून दर वर्षी १६ सप्टेंबरला ‘जागतिक ओझोन दिन’ साजरा केला जातो. माँटरिअल प्रोटोकॉल हा असा एकमेव करार आहे, ज्याला सर्व म्हणजेच १९७ यूएन सदस्य देशांनी मंजुरी दिली. या करारामुळे आत्तापर्यंत ९८ टक्के ओडीएस कमी करण्यात यश मिळाले आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी पर्यावरणीय करार मानला जातो.  

ओझोन थराची सद्यःस्थिती
यावर्षीच्या ओझोन दिनानिमित्त एक आनंदाची बाब म्हणजे, यावर्षी गेल्या तीन दशकांची तुलना केल्यास ओझोनच्या थराचे भोक सर्वांत लहान आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ओझोनचा थर धृवीय प्रदेशांमध्ये, विशेषतः अंटार्क्टिटावर सर्वांत विरळ आहे. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान अंटार्क्टिकावरील ओझोनचा थर सर्वांत कमी असतो. अंटार्क्टिकावरील वैशिष्ट्यपूर्ण हवामानामुळे दरवर्षी भोक नाहीसे होते आणि पुन्हा तयार होते. यंदा भोक सप्टेंबरच्या सुरुवातीला सुमारे एक कोटी चौरस किलोमीटर एवढे मोजले गेले आहे. यावर्षी भोकाचा आकारही काहीसा वेगळा आहे. भोक नेहमीप्रमाणे दक्षिण ध्रुवावर असण्याऐवजी दक्षिण अमेरिकेकडे कललेले आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे. उत्तर गोलार्धातील थर २०३० पर्यंत आणि अंटार्क्टिकावरील थर २०६० पर्यंत पूर्ण भरून येण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या ओझोन दिनाची थीम ‘३२ इयर्स अँड हीलिंग’ अशी होती. ओझोन संरक्षणासाठी ३० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जागतिक पातळीवरील सहकार्याने ओझोन थर पूर्णपणे भरून येईल, अशी आशा आहे.     

संबंधित बातम्या