कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स शो

वैभव पुराणिक    
शुक्रवार, 16 मार्च 2018

टक्नोसॅव्ही    

दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात लास व्हेगासमध्ये कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स शो भरतो. २०१७ मध्ये या शोला तब्बल १.८ लाख लोकांनी भेट दिली होती. या वर्षी तो आकडा दोन लाखाच्याहीपेक्षा मोठा असेल. इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या जगतातील हे बहुधा सर्वांत मोठे प्रदर्शन असावे. अनेक प्रसिद्ध कंपन्या या प्रदर्शनात आपली नवीन उत्पादने लोकांपुढे आणतात. आजकाल तर कार कंपन्याही आपली नवीन मॉडेल व कन्सेप्ट कार या प्रदर्शनात लोकांपुढे ठेवतात. या प्रदर्शनातील काही मला आवडलेल्या गोष्टी पुढे देत आहे. 

टीव्ही
सॅमसंगने या वर्षीच्या शोमध्ये आपला १४६ इंची ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा टीव्ही लोकांपुढे प्रथमच आणला. हा प्रचंड टीव्ही एक भिंत संपूर्णपणे व्यापून टाकतो म्हणून त्याचे नाव ‘द वॉल’ असे ठेवण्यात आले आहे. हा टीव्ही मायक्रो एलईडी तंत्रज्ञानावर चालतो. मायक्रो एलईडी हे तंत्रज्ञान ओएलइडी तंत्रज्ञानापेक्षा नवीन व अनेक बाबतीत जास्त चांगले आहे. ओएलइडी टिव्हींना ’बर्न इन‘ होऊ शकते, म्हणजेच एखादे चित्र या टीव्हीवर जास्त काळ दाखवले गेले तर ते चित्र गेल्यानंतरही पुसटसे दिसत राहते. तसेच ओएलइडी तंत्रज्ञान वापरून बनवलेले टीव्ही दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. मायक्रो एलइडी तंत्रज्ञान या त्रृटींवर मात करते.  तसेच मायक्रो एलईडी टीव्ही बनवायची पद्धत तुलनेने सोपी असल्याने मायक्रो एलईडी पासून तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे टीव्ही बनवू शकता. सॅमसंगने हा टीव्ही २०१८ मध्ये बाजारात उपलब्ध होईल असे म्हटले आहे. या प्रदर्शनात एलजी कंपनीनेही आपला एक अभिनव टीव्ही लोकांना दाखवायला ठेवला होता. हा टीव्ही एका लहान आयताकृती बॉक्‍समध्ये असतो. एक बटन दाबताच तो बॉक्‍समधून रोल होऊन बाहेर येतो! आपल्यापैकी अनेकांनी ऑफिसमध्ये अथवा विद्यापीठात असलेला प्रेझेंटेशनसाठीचा पांढरा पडदा पाहिलेला असेलच. हा टीव्ही तसाच आहे पण तो वरून खाली येण्याऐवजी खालून वर जातो. 4के. रिझोल्यूशन असलेला हा टीव्ही ६५ इंची आहे. हा टीव्ही अजूनही बाजारात आणायचा मात्र एलजीचा बेत आहे की नाही हे जाहीर झालेले नाही. त्यामुळे सध्यातरी ही केवळ संकल्पना असून ती प्रत्यक्ष लोकांच्या घरात येईल की नाही हे सांगता येत नाही. या टिव्हीव्यतिरीक्त एलजीने  ८८ इंची 8के टीव्हीही दाखवायला ठेवला होता. 8के म्हणजे हाय डेफिनीशनच्या ८ पट जास्त रिझोल्यूशन असलेला पडदा. अमेरिकेत आताशा 4के रिझोल्यूशन लोकप्रिय होत आहे. नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन ज्या नवीन टीव्ही मालिका बनवतात त्या 4के रिझोल्यूशनमध्ये पहायला मिळतात. 4के टीव्हीही आताशा अमेरिकेत सर्वत्र दिसू लागले आहेत. पण 8के मात्र अजून कुठेही दिसत नाही. त्यामुळे हा टीव्ही बाजारात उपलब्ध झाला तरी कुणी घेईल की नाही याबद्दल मला शंका आहे.

मोबाईल - विवो इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर
आजकाल सर्वच प्रिमियम फोनची पुढची बाजू पडद्याने भरलेली असते. त्यासाठी अनेक स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी आपले पुढचे बटण व फिंगरप्रिंट सेन्सर काढून तो मागच्या बाजूला घालायला सुरवात केली आहे. ॲपलने तर आपल्या आयफोन १० मधून फिंगरप्रिंट सेन्सरच काढून टाकला आहे. परंतु ग्राहकांना मात्र फिंगरप्रिंट सेन्सर हवा आहे व तो पुढच्या बाजूलाच हवा आहे. पुढची बाजू पूर्णपणे पडद्याने व्यापल्यावर त्यात फिंगरप्रिंट सेन्सर बसवणार कसा? हा प्रश्न सिनॅप्टिक्‍स कंपनीने ‘विवो’ या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीबरोबर सोडवला आहे. त्यांनी काचेच्या स्क्रीनमध्ये बसवता येणारा फिंगरप्रिंट सेन्सर बनवला आहे. त्यामुळे आता मागील फिंगरप्रिंट सेन्सर पुन्हा एकदा पुढे येईल अशी आशा जागृत झाली आहे. ज्या लोकांनी हा फिंगरप्रिंट सेन्सर प्रत्यक्ष वापरून बघितला त्यांनी तो हळू चालत असल्याचे म्हटले आहे. परंतु कुठलेही तंत्रज्ञान नवीन असले की त्यात अशा प्रकारच्या त्रृटी अपेक्षितच असतात. पुढील एखाद्या वर्षात तो जलद चालवणे शक्‍य होईल अशी आशा आहे.  २०१९ मध्ये येणाऱ्या प्रिमियम फोनमध्ये हा सेन्सर आपल्याला हाताळायला मिळेल अशी मला आशा आहे. 

सोनीचा आयबो नावाचा रोबो-कुत्रा 
या प्रदर्शनात सोनीच्या आयबो नावाच्या रोबो-कुत्र्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. हा रोबो सोनीने या आधीही लोकांना दाखवला आहे. या रोबो कुत्र्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर बसवलेले आहेत. या कुत्र्याच्या डोक्‍यावर, हनुवटीवर आणि पाठीवर स्पर्श ओळखणारे सेन्सर लावलेले आहेत. त्यामुळे त्याला तुम्ही हात लावल्यावर तो त्याला प्रतिसाद देऊ शकतो. त्याच्या नाकामध्ये कॅमेरा बसवलेला आहे. या कॅमेराचा वापर करून आयबो तुम्हाला ओळखू शकतो. याचे डोळे ओएलइडी पॅनेलने बनवलेले असून त्यात तुम्हाला वेगवेगळे भाव दिसू शकतात. त्याच्या मागे लावलेल्या कॅमेराचा वापर करून हा कुत्रा चार्जिंग स्टेशनचा स्वतः शोध घेऊ शकतो! मानवाच्या विविध कृतींना हा कुत्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिसाद देतो. हा लेख वाचेपर्यंत या कुत्र्यावजा रोबोची विक्री जपानमध्ये सुरू झालेली असेल. जपानमध्ये याची किंमत १,९८,००० येन (सुमारे १,१४,००० रुपये) एवढी ठेवण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त २९८० येन (१,९१८ रुपये) इतकी दरमहा ‘फी’ हा कुत्रा पाळण्यासाठी द्यावी लागेल! 

टोयोटा ई-पॅलेट
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक कार कंपन्यांनी आपल्या नवनवीन कन्सेप्ट कार लोकांना दाखवायला ठेवल्या होत्या. या बहुतेक कार बॅटरीवर चालणाऱ्या स्वयंचलित कार होत्या. पण टोयोटा कंपनीच्या एका विचित्र दिसणाऱ्या वाहनाने मात्र लोकांचे लक्ष वेधून घेतले. हे वाहन ही कार नसून एखाद्या मिनी बस एवढे मोठे वाहन आहे. त्याचा लोकांना वाहून नेण्याव्यतिरीक्त इतरही अनेक गोष्टीसाठी वापर केला जाऊ शकतो. टोयोटाने या वाहनाचे नाव ‘इ-पॅलेट’ असे ठेवले आहे. लोकांची वाहतूक करण्याव्यतिरिक्त मालाची वाहतूक करणे आणि मोबाईल दुकान म्हणून वापर करणे असेही या वाहनाचे उपयोग होऊ शकतात. याच्या सर्व बाजूंनी पडदे (स्क्रीन) असून त्यामुळे या कारचा चेहरामोहरा कधीही बदलता येऊ शकतो. या वाहनाचा पिझ्झा डिलिव्हरीसाठी, कुरिअर डिलिव्हरीसाठीही उपयोग होऊ शकतो. स्वयंचलित कारचा वापर मालवाहतुकीसाठी करण्याची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. लोकांना या तंत्रज्ञानाविषयी विश्वास वाटत नसल्याने मालवाहतुकीसाठी ही गाडी आधी वापरून अशा प्रकारचा विश्वास निर्माण करता येऊ शकेल. कारच्या सॉफ्टवेअरमधील त्रृटी अशा प्रकारचा वापर करून शोधता येतील व त्या सुधारता येतील. माझ्या मते स्वयंचलित गाड्या प्रत्यक्षात आणण्याचा हा एक नक्कीच चांगला मार्ग आहे. परंतु या वाहनाचे उत्पादन टोयोटा नक्की कधी करणार आहे याविषयी मात्र कुठेही माहिती उपलब्ध नाही. टोयोटाने ॲमेझॉन, डीडी चुशिंग (चीनमधील उबर), मझदा, पिझ्झा हट आणि उबर या कंपन्यांशी मिळून अशा प्रकारच्या वाहनावर काम करत असल्याचे म्हटले आहे. २०२० मधील ऑलिंपिक स्पर्धा टोकियोत होणार आहेत. या ऑलिंपिकच्या दरम्यान हे वाहन प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचा टोयोटाचा मानस आहे. 
कारमध्ये ह्युंडाई व मर्सिडीज या कंपन्यांनी आपल्या आर्टिफिशियल इंटेलजिन्सवर आधारित इंफोटेनमेंट सिस्टिम लोकांना दाखवायला ठेवल्या होत्या. ॲमेझॉनच्या अलेक्‍साप्रमाणे व ॲपलच्या सिरीप्रमाणे या कारना आवाजी आज्ञा देता येतात. आवाजी आज्ञा देऊन कार तुम्हाला आजचे हवामान सांगू शकते, दरवाजे लॉक अथवा अनलॉक करू शकते, वातानुकूलन यंत्रणा कमी अथवा जास्त करू शकते. एडमंडस्‌ डॉट कॉम या प्रसिद्ध कार वेबसाइटनुसार पुढील काही वर्षातच या सुविधा अनेक अमेरिकेतील गाड्यांमध्ये पहायला मिळतील. 

लॉरीआल कंपनीचा अल्ट्राव्हॉयलेट किरणांसाठीचा सेन्सर
लॉरीआल कंपनीने हाताच्या बोटावरील नखांवर लावायचा अल्ट्राव्हायोलेट किरणांचे मोजमाप करणारा छोटा सेन्सर या प्रदर्शनात दाखवायला ठेवला होता. नखांवर लावायच्या बटनाच्या आकाराच्या या इवल्याशा सेन्सरमध्ये चक्क एक एनएफसी अँटेना, तापमानाचा सेन्सर आणि अल्ट्राव्हॉयलेट रे सेन्सर आहे. या सेन्सरला बॅटरीची आवश्‍यकता लागत नाही. या सेन्सरमध्ये काही महिन्यांची अल्ट्राव्हॉयलेट किरणांचे मोजमापे साठवता येतात. तुम्ही हा सेन्सर फोनजवळ नेला की फोनमधील लॉरीआलचे ॲप यातील मोजमापे फोनमध्ये घालून घेऊ शकते. ज्या लोकांना फार उन्हात काम करावे लागते त्यांना - विशेषतः गोऱ्या लोकांना त्यातील अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. ती कमी करण्यासाठी या सेन्सरचा वापर करता येईल. हा सेन्सर या वर्षीच्या जुलै महिन्याच्या आसपास बाजारात येणार आहे. ’द व्हर्ज’ मधील वृत्तानुसार याची किंमत ५० डॉलर्सपेक्षाही कमी असण्याची शक्‍यता आहे.

संबंधित बातम्या