पाचव्या पिढीचे इंटरनेट

 वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
मंगळवार, 20 मार्च 2018

टेक्नोसॅव्ही

अमेरिकेत अलीकडेच ५ जी प्रकाशझोतात आले आहे. एक्‍सिओसने जानेवारी महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार अमेरिकन सरकार स्वतः:च ‘५ जी’ नेटवर्क उभे करण्याचा विचार करत आहे. या बातमीवर अनेक लोकांनी कडाडून टीका केली आहे. खुद्द फेडरल कम्युनिकेशन कमिशनचे अध्यक्ष अजित पै यांनीही सरकारने असे करू नये असे सुचवले आहे. ट्रंप सरकारच्या अधिकाऱ्यांनी ही बातमी खोडून काढली असून सरकार असा कुठलाही विचार करत नसल्याचे म्हटले आहे. परंतु या बातमीमुळे ‘५ जी’ म्हणजे नक्की काय आणि ते कधी उपलब्ध होईल यावर चर्चा मात्र सुरू झाली आहे.
‘५ जी’ म्हणजे नक्की काय ते समजण्यासाठी आपल्याला मोबाईल नेटवर्कची उत्क्रांती समजून घ्यावी लागेल. जेव्हा मोबाईल फोन बाजारात आले त्यावेळच्या नेटवर्कचा आता ‘१जी’ असे म्हटले जाते. यातील ‘जी’ म्हणजे जनरेशन. आपण याला मराठीत आवृत्ती असे म्हणूया. ही पहिली आवृत्ती ॲनालॉग होती आणि त्यावरून फक्त कॉल करता येत असत. अमेरिकेत या पहिल्या आवृत्तीवर चालणारी मोबाईल सेवा १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. १९९० च्या दशकात याची पुढची आवृत्ती - ‘२ जी’ - बाजारपेठेत आली. या आवृत्तीमध्ये नेटवर्कची व्हॉइस सेवा सुधारली व ॲनालॉगऐवजी डिजिटल सेवेची सुरवात झाली. २ जी मध्ये इंटरनेटची सुविधा जवळ जवळ नव्हती असे म्हटले तरी हरकत नाही. पण २ जीने एसएमएसची (शॉर्ट मेसेजींग सर्विस) भेट जगाला दिली. मॅशेबल वेबसाइटवरील एका वृत्तानुसार पहिला एसएमएस १९९२ मध्ये पाठवला गेला.  इंटरनेटचा उदयही त्याच वेळेला होत होता आणि ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवेचा उदय झालेला नव्हता. इंटरनेट मोबाईलवर खऱ्या अर्थाने आले ते ३जी मुळे. अमेरिकेत ३जी सेवेची सुरवात २००३ च्या आसपास झाली. त्यावेळेस आयफोनचा आणि आज बाजारात मिळणाऱ्या स्मार्टफोनचा उदय झालेला नव्हता. लोक अजूनही ‘पाल्म पायलट फोन’ वापरत होते. भारतात हे फोन आलेच नाहीत, कारण त्यावेळी भारतात अजूनही २जी सेवेचीच सुरवात होत होती. २९ जून २००७ ला आयफोनचे बाजारपेठेत आगमन झाले. आयफोनच्या आगमनानंतर लोक डेटा मोठ्या प्रमाणावर वापरायला लागले. आणि त्यामुळे अधिक जलद इंटरनेटची गरज लोकांना मोबाईल फोनवर भासू लागली. त्यातूनच आज लोकप्रिय असलेल्या ४ जी नेटवर्कचा जन्म झाला. अमेरिकेत ४ जी नेटवर्क २०१३ च्या आसपास बाजारपेठेत आले. भारतात ४ जीचा वापर २०१६च्या आसपास सुरू झाला. ४ जी किंवा मोबाईल नेटवर्कच्या या चौथ्या आवृत्तीतील मुख्य सुधारणा म्हणजे जलद इंटरनेट सुविधा. ही इंटरनेट सेवा आता इतकी जलद झाली की हाय डेफिनिशन व्हिडिओ आता मोबाईल इंटरनेटवरून स्ट्रीम करून सहज पाहता येऊ लागले. 

५ जी मोबाईल नेटवर्कमध्ये जास्त बॅंडविड्‌थ, कमी लेटन्सी उपलब्ध होईल आणि त्यामुळेच तुमचे मोबाईल इंटरनेट अतिशय जलद असल्याचा अनुभव येईल. इथे ‘बॅंडविड्‌थ’ आणि ‘लेटन्सी’ यांचा अर्थ समजून घेणे आवश्‍यक आहे. ‘बॅंडविड्‌थ’ म्हणजे इंटरनेटवरील डेटा वाहून नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कनेक्‍शनची क्षमता. याची तुलना एखाद्या पाण्याच्या पाइपलाइनशी करता येईल. समजा तुमच्या इमारतीत सर्वत्र अर्ध्या इंचाचे पाइप टाकलेले आहेत. त्यामुळे तुमच्या नळाला एका ठराविक फोर्सने पाणी येते. पण हेच पाइप जर बदलून एक इंचाचे केले तर तुमची बादली अधिक जलद भरू शकेल. बॅंडविड्‌थ म्हणजे या पाइपची पाणी वाहून नेण्याची क्षमता. इंटरनेट कनेक्‍शनची डेटा वाहून नेण्याची क्षमता सर्वसाधारणतः मेगाबिटस्‌ पर सेकंद मध्ये मोजली जाते. २५ मेगाबिटस्‌ पर सेकंद म्हणजे एका सेकंदात २५ मेगाबिटस्‌ डेटा वाहून नेला जाण्याची क्षमता. अमेरिकन सरकार २५ मेगाबिट्‌स पर सेकंद बॅंडविड्‌थला ब्रॉडबॅंडचा दर्जा देते. म्हणजेच तुमची बॅंडविड्‌थ त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुमच्याकडे ब्रॉडबॅंड इंटरनेट नाही असे मानले जाते. अमेरिकेतील सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात - विशेषतः: मोठ्या शहरांमध्ये १०० मेगाबिटस्‌ पर सेकंद एवढी बॅंडविड्‌थ, केबलने येणाऱ्या इंटरनेटवर सहज उपलब्ध असते. माझ्या घरी १०० मेगाबिटस्‌ पर सेकंद बॅंडविड्‌थ उपलब्ध असून ती ४०० मेगाबिट्‌स पर सेकंद इतकी (जास्त पैसे देऊन) वाढवता येते. आता सेलफोनवर मिळणारी बॅंडविड्‌थही बऱ्यापैकी वाढली आहे. १० मेगाबिटस्‌ पर सेकंद एव्हढी बॅंडविड्‌थ तर अमेरिकेतील मोठ्या शहरात मोबाईलवर मिळतेच, काही सेवा त्यापेक्षाही जलद देऊ शकतात. जितकी जास्त मोबाईल डेटा बॅंडविड्‌थ उपलब्ध तेवढ्या अधिक सेलफोनना अथवा उपकरणांना एका सेल टॉवरशी जोडता येईल. जास्त बॅंडविड्‌थ जलद इंटरनेटसाठी आवश्‍यक असली तरीही जलद इंटरनेटसाठी कमी लेटन्सीचीही आवश्‍यकता असते. लेटन्सी म्हणजे डेटाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी लागणारा कालावधी. तो जितक्‍या कमी वेळात वाहून नेला जाईल तितके तुमचे इंटरनेट जलद काम करेल. 

बॅंडविड्‌थ वाढवण्यासाठी व लेटन्सी कमी करण्यासाठी ५ जी मध्ये अनेक वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला आहे. त्यातील एक तंत्र म्हणजे मिलिमीटर वेव्ह. सेलफोनचा सिग्नल रेडिओ लहरींद्वारे वाहून नेला जातो. या लहरींच्या तरंग लांबीवरुन त्यांची उपयुक्तता ठरते. सध्या ४ जी तंत्रात सर्वसाधारण ६ इंच ते दीड फूड तरंग लांबीच्या रेडिओ लहरी वापरल्या जातात. आणि जेवढी तरंग लांबी जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी कमी. ४० सेंटीमीटर तरंगलांबी असलेल्या तरंगाची (वेव्हची) फ्रिक्वेन्सी ७५० मेगाहर्टझ एवढी असते तर १४ सेंटीमीटर तरंगलांबी असलेल्या तरंगाची फ्रिक्वेन्सी २१५० मेगाहर्टझ एवढी असते. जसजशी तरंगलांबी कमी होत जाते तशी फ्रिक्वेन्सी वाढते व तरंगांची डेटा वाहून नेण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे ’५ जी’ मध्ये खूप जास्त फ्रिक्वेन्सीच्या रेडिओ लहरी वापरण्यात येणार आहेत. परंतु हे वाटते तेवढे सोपे नाही. जितकी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढेच कमी अंतर हे तरंग कापू शकतात! ५ जी मध्ये वापरल्या जाण्याऱ्या मिलिमीटर वेव्ह मधून १००० मेगाबिटस्‌ पर सेकंद डेटा वाहून नेता आला तरी अशा प्रकारच्या वेव्ह फक्त १००० फूट अंतरावरच काम करू शकतात! म्हणजेच मिलिमीटर वेव्ह तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपनीला दर १००० फुटावर आपले सेल टॉवर ठेवावे लागतील! त्यावर एक उपाय म्हणजे अशा प्रकारचे मिनी टॉवर प्रत्येक इमारतीत अथवा प्रत्येक घरात लावता येऊ शकतील. म्हणजेच तुम्ही सेलफोन सर्विस घेतलीत की तुमच्या घरी एक उपकरण पोस्टाने येईल. हे उपकरण एका छोट्या टॉवरचे काम करेल व तुम्हाला घरी इतर कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटची गरज राहणार नाही. हे उपकरण तुम्हाला  १००० मेगाबिट्‌स पर सेकंदाचे इंटरनेट उपलब्ध करून देईल!  अशी उपकरणे सर्वांच्या घरी व ऑफिसमध्ये उपलब्ध झाली तर लवकरच टॉवरचे जाळे तयार होऊन मिलिमीटर वेव्हने कमी अंतर कापण्याच्या त्रृटीवर मात करता येईल. मिलिमीटर वेव्ह तंत्रज्ञानात ३० गिगाहर्टझ (३००० मेगाहर्टझ) ते ३०० गिगाहर्टझ फ्रिक्वेन्सीचा वापर करण्यात येतो. परंतु सर्वच अमेरिकन कंपन्या या बॅंडचा वापर करतील असे नाही. टी. मोबाईल नावाच्या एका कंपनीने आपण ६०० मेगाहर्टझ बॅंडचा वापर करून ‘५जी’ नेटवर्क बनवण्यात असल्याचे म्हटले आहे. परंतु ते नक्की कसे याचा तपशील उपलब्ध नाही. 

अनेकांना असे वाटते की त्यांच्या मोबाईलवर मिळणारा डेटा स्पीड पुरेसा असून अजून जास्त जलद इंटरनेटने त्यांच्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही. परंतु हे चुकीचे आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या संकल्पनेमुळे आता जवळजवळ प्रत्येक इलेक्‍ट्रॉनिक उपकरण सेल्युलर तंत्रज्ञानाने इंटरनेटला जोडले जात आहे. तुमचा फ्रिज, वॉशिंग मशिन, तुमच्या घराचे कुलूप (होय - इलेक्‍ट्रॉनिक कुलूप), विजेचे दिवे इत्यादी गोष्टी तर आताही वायफाय वापरू लागल्या आहेत. पण पुढे मागे त्यांना वायफायचीही आवश्‍यकता राहणार नाही. त्याशिवाय स्वयंचलित कारना तर वायफाय वापरायचा पर्यायच उपलब्ध नाही. त्या रस्त्यावरुन चालत असताना त्यांना त्यांच्या सर्व्हरशी संवाद साधण्यासाठी ‘५ जी’ कनेक्‍शन आवश्‍यकच असेल. आणि रस्त्यावरील प्रत्येक गाडी इंटरनेट वापरायला लागली तर ‘४ जी’ कनेक्‍शनला त्याचा भार पेलणे शक्‍यच होणार नाही. त्यामुळेच ‘४ जी’पेक्षा कित्येक जास्त पटीने बॅंडविड्‌थ असलेल्या सेल सेवेची आवश्‍यकता आता भासू लागली आहे. 

‘५ जी’ मोबाईल नेटवर्कचा वापर सुरू होण्यासाठी नुसत्या सेल टॉवरचे तंत्रज्ञान बदलणे गरजेचे नाही तर सेलफोनचे तंत्रज्ञानही बदलणे आवश्‍यक आहे. ‘५ जी’ स्पीडवर काम करू शकणारे मोबाईल फोनच अजूनही बाजारात उपलब्ध नाहीत. क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर १ गिगाबाइटस्‌ पर सेकंद इतकी बॅंडविड्‌थ वापरू शकेल. तो बाजारात येऊ घातला आहे. परंतु अशा प्रकारचे प्रोसेसर असलेले फोन बाजारात येण्यास मात्र २०१९ उजाडावे लागेल. अमेरिकेतील जवऴजवळ सर्वच सेलफोन सेवा देणाऱ्या कंपन्या ‘५ जी’ नेटवर्कवर काम करीत आहेत. त्यातील ’ए टी. अँड टी.’ कंपनीने आपण २०१८ मध्येच सेवेची सुरवात करणार असले असे म्हटले असले तरी २०१९ शिवाय ते प्रत्यक्षात येईल असे वाटत नाही. एकंदरीतच सर्व प्रकारचे तंत्रज्ञान तयार होऊन ते प्रत्यक्ष अमेरिकन ग्राहकाच्या हातात येईपर्यंत २०२० वर्ष उजाडेल असा तज्ञांचा कयास आहे. 

संबंधित बातम्या