सॅमसंग गॅलॅक्‍सी एस 9

वैभव पुराणिक
बुधवार, 21 मार्च 2018

स्पेनमधील बार्सिलोना शहरात दरवर्षी भरणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस प्रदर्शनात सॅमसंगने आपले दोन नवीन फोन प्रदर्शित केले. गॅलॅक्‍सी ‘एस ९’ व ‘एस ९ प्लस’. हे दोन्ही स्मार्टफोन दिसायला त्यांच्या आधीच्या आवृत्ती सारखेच आहेत. किंबहुना ते एवढे सारखे आहेत की इंटरनेटवरील काही टीकाकारांना त्यांना ‘सेम संग’ असे नाव दिले आहे!

स्पेनमधील बार्सिलोना शहरात दरवर्षी भरणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस प्रदर्शनात सॅमसंगने आपले दोन नवीन फोन प्रदर्शित केले. गॅलॅक्‍सी ‘एस ९’ व ‘एस ९ प्लस’. हे दोन्ही स्मार्टफोन दिसायला त्यांच्या आधीच्या आवृत्ती सारखेच आहेत. किंबहुना ते एवढे सारखे आहेत की इंटरनेटवरील काही टीकाकारांना त्यांना ‘सेम संग’ असे नाव दिले आहे!

टीकाकारांनी ‘सेम संग’ म्हटले असले तरी खरंतर सॅमसंगने एस ९ मध्ये अनेक चांगले बदल केले आहेत. एक मुख्य बदल म्हणजे जो फिंगरप्रिंट सेन्सर मागच्या कॅमेराच्या बाजूला होता तो आता कॅमेराच्या खाली आणण्यात आला आहे. कॅमेराच्या बाजूला असलेल्या फिंगरप्रिंट सेन्सरवर बोट पोचायला अवघड होत असे व बोट चुकून कॅमेराच्या लेन्सला लागून लेन्सवर बोटांचे ठसे पडत असत. सेन्सर खाली आणण्यामुळे बोट सहज पोचते व कॅमेराच्या लेन्सवर चुकून बोट लागायची शक्‍यताही कमी होते. अजून एक चांगला बदल म्हणजे अखेरीस सॅमसंगने एस ९ मध्ये स्टीरीओ स्पीकर घातले आहेत. यापूर्वीच्या आवृत्तीत फक्त मोनो स्पीकर होता त्यामुळे आवाजाची प्रत नक्कीच वाढली आहे. एस ९ चा पडदा ५.८ इंची तर एस ९ प्लसचा पडदा ६.२ इंचीच राहिला आहे. त्यांचे रिझोल्यूशनही २९६० x १४४० चित्रबिंदू एवढेच राहिले असले तरीही दोन्ही पडद्यांचा ब्राइटनेस मात्र सॅमसंगने वाढवला आहे. एस ९ हा एस ८ पेक्षा थोडासा जड व जाड झाला आहे. एस ९ प्लसही एस ८ प्लसपेक्षा थोडा जाड व जड झाला आहे. बहुचर्चित हेडफोन जॅक मात्र या फोनमध्ये कायम ठेवण्यात आला आहे. ॲपलच्या पावलावर पाऊल टाकून सॅमसंगही हेडफोन जॅक काढून टाकते की काय अशी लोकांना भीती वाटत होती. एसडी कार्डचा स्लॉटही या फोनमध्ये सॅमसंगने कायम ठेवला आहे. ४०० गिगाबाइटपर्यंतचे एस डी. कार्ड या फोनमध्ये घालता येते. अँड्रॉइड ८.१ आवृत्ती तीन महिन्यापूर्वी प्रकाशित होऊनही सॅमसंगने एस ९ मध्ये अँड्रॉइड ८.० वापरली आहे. 

एस ९ मधील सर्वांत मोठा बदल म्हणजे कॅमेरा. कॅमेरात मात्र अनेक नवीन सुविधा टाकण्यात आल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात एस ९ प्लसमध्ये जास्त सुविधा घालण्यात आल्या आहेत. एस ९ प्लस मध्ये आता मागच्या बाजूला एकाऐवजी दोन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे एस ९ प्लस आता आयफोन व गॅलॅक्‍सी नोट मालिकेच्या बरोबरीत आला आहे. तसेच एस ९ व एस ९ प्लस या दोन्ही फोन मध्ये सॅमसंगने पहिल्यांदाच ड्युएल अपर्चरचा वापर केला आहे. किंबहुना आजपर्यंत कुठल्याही स्मार्टफोन कंपनीने आपल्या फोनच्या कॅमेरात ड्युएल अपर्चर टाकलेले नाही. अपर्चर म्हणजे कॅमेरातील प्रकाश आत घेणारे भोक किंवा झडप. कॅमेराच्या लेन्सच्या आतील ही झडप एका क्षणासाठी उघडते, प्रकाश आत घेते आणि लगेचच बंद करते. अपर्चर जेवढे मोठे तेवढा जास्त प्रकाश कॅमेराच्या सेन्सरवर पडतो व त्यामुळे फोटो जास्त उजळतात. अपर्चरचा आकार एफ क्रमांकात सांगितला जातो. उदाहरणार्थ f/२, f/१.५, f/२.४. यातील आकडा जेवढा मोठा तेवढे अपर्चर लहान. म्हणजेच f/१.५ अपर्चर हे f/२ अपर्चरपेक्षा मोठे असून त्यातून जास्त प्रकाश सेन्सरवर पडतो. सर्वसाधारण एस एल आर कॅमेरात अपर्चर बदलायची सुविधा असते. त्यामुळे संध्याकाळी अथवा रात्री जेव्हा कमी प्रकाश असेल तेव्हा अपर्चरचा आकार जास्त (f/१.५) करून जास्त प्रकाशाला आत घेता येते. दिवसा हेच अपर्चर कमी (f/२.४)  करून कमी प्रकाश कॅमेरात घेता येतो. परंतु ही सुविधा आतापर्यंत स्मार्टफोनच्या कॅमेरात उपलब्ध नव्हती. सॅमसंगने प्रथमच दोन वेगवेगळी अपर्चर एस ९ च्या कॅमेरात घालण्यात यश मिळवले आहे. या फोनच्या मागील कॅमेराचे अपर्चर f/१.५ व f/२.४ या दोन आकारात बदलता येते. बाहेरील प्रकाश ओळखून कॅमेरा आपोआपच अपर्चर कमी जास्त करतो. परंतु ज्या लोकांना फोटोग्राफीमधलं कळते अशा लोकांसाठी सॅमसंगने मॅन्युअल मोडही घातला आहे. त्यांना f/१.५ व f/२.४ मधून अपर्चरचा आकार निवडता येतो. एस ९ प्लस मध्ये मागे असलेल्या दोन कॅमेरापैकी फक्त एकाच कॅमेराचे अपर्चर बदलता येते. दुसऱ्याचे (टेलिफोटो लेन्स) चे अपर्चर f/२.४ आहे, ते बदलता येत नाही. या एका मोठ्या बदलामुळे सॅमसंगचा कॅमेरा आज उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनपैकी सर्वांत उत्तम दर्जाचा बनला आहे.  कॅमेऱ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी DxOMark  स्कोअरचा वापर करण्यात येतो. सॅमसंग गॅलॅक्‍सी एस ९ प्लसने या मूल्यमापनामध्ये सर्वांत जास्त म्हणजे ९९ गुण मिळवले आहेत. ९८ गुण मिळवून गुगलचा पिक्‍सेल  दुसऱ्या क्रमांकावर आहे तर ॲपलचा आयफोन x,  ९७ गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

कॅमेरामध्ये सॅमसंगने अजून एक छान सुविधा घातली आहे - स्लो मोशन व्हिडीओची. एस ९ मध्ये आता ७२० पी रिझोल्यूशनचा व्हिडिओ ९६० फ्रेम प्रति सेकंद वेगाने चित्रित करता येऊ शकतो. सर्वसामान्य व्हिडिओ २४ ते ३० फ्रेम प्रति सेकंद वेगाने चित्रित केलेला असतो. म्हणजेच कॅमेरा एका सेकंदात २४ वेळा फोटो काढतो व हे फोटो वेगाने दाखवले असता आपल्याला चलतचित्राचा म्हणजेच व्हिडीओचा भास होतो. एका सेकंदात तुम्ही जेवढ्या जास्त फ्रेम (चित्र) घेऊ शकाल तेवढा चांगला स्लो मोशन व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतो. एस ९, ९६० फ्रेम प्रति सेकंदाच्या वेगाने फक्त ०.२ सेकंदच चित्रण करू शकतो. या फोनमध्ये स्लो मोशन चित्रण सुरु करण्यासाठी तुम्हाला सर्वसाधारण व्हिडिओ चित्रण सुरु करावे लागते. त्यात एक बॉक्‍स येतो. या बॉक्‍स मध्ये हालचाल दिसली की हा फोन  फ्रेमच्या वेगाने पुढील ०.२ सेकंद चित्रण करतो. परंतु ०.५ सेकंदातही अनेक सुंदर गोष्टींचे चित्रण करता येऊ शकते. एखादा कुत्रा उडी मारत आहे, किंवा सिगारेटच्या लायटरची ज्योत सुरु होत आहे अशा प्रकारचे व्हिडिओ इंटरनेटवर एस ९ मधून चित्रित केलेले पहायला मिळतात.  सॅमसंगच्या या सुविधेचे अनेक लोकांनी कौतुक  केले आहे. 

सॅमसंगने फोन अनलॉक करण्यासाठी अजून एक उपयुक्त नवीन सुविधा एस ९ मध्ये घातली आहे. त्याला त्यांनी इंटेलिजंट स्कॅन असे नाव दिले आहे. इंटेलिजंट स्कॅन सर्वप्रथम फोन तुमच्या चेहऱ्याचा वापर करून अनलॉक करायचा प्रयत्न करते. ते जमले नाही, तर मग तुमच्या डोळ्यांची बुब्बुळे तो तपासून पाहते. आणि त्यामुळेही फोन अनलॉक झाला नाही तर चेहरा व डोळ्यांच्या बुब्बुळाचा एकत्र वापर करून फोन अनलॉक करायचा प्रयत्न केला जातो. आणि हे सर्व अतिशय जलद होत असल्याने फोन एवढे काम करत आहे हे तुम्हाला कळतही नाही. सॅमसंगने ही सुविधा ॲपलच्या फेस रेकग्निशन सुविधेला उत्तर म्हणून घातली आहे असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. ॲपलने आयफोन X मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर काढून टाकला आहे. त्याऐवजी तुमच्या चेहऱ्याचा वापर करून फोन अनलॉक करता येतो. सॅमसंगला अजून ॲपलएवढे चांगले चेहरा ओळखणारे सॉफ्टवेअर बनवता न आल्याने त्यांना इंटेलिजंट स्कॅन सुविधेवरच समाधान मानावे लागत आहे. सॅमसंगने आपली सुविधा संपूर्णपणे सुरक्षित नसल्याचे मान्य केले आहे आणि मोबाईल पेमेंट करण्यासाठी इंटेलिजंट स्कॅन वापरता येणार नाही असेही म्हटले आहे. त्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनरचाच वापर करावा लागेल. ॲपलच्या अजून एका सुविधेला उत्तर देण्याचा प्रयत्न सॅमसंगने एस ९ मध्ये केला आहे. ॲपलच्या आयफोन X मध्ये ‘ॲनिमोजी’ नावाची एक सुविधा आहे. या सुविधेअंतर्गत तुमच्या चेहऱ्यासारखा दिसणारा इमोजी फोन बनवतो. मग तुम्ही एखादा मेसेज रेकॉर्ड केलात की हे रेकॉर्डिंग करत असताना तुमच्या चेहऱ्याच्या हालचाली कॅमेरा टिपतो व त्याप्रमाणे त्या इमोजीकडून हालचाली करवून घेतो. हे चालते बोलते इमोजी मग तुम्ही कुणालाही पाठवू शकता. एस ९ मध्ये हीच सुविधा सॅमसंगने घातली असून त्याला ‘एआर इमोजी’ -  ‘ऑगमेंटेड रिएलिटी इमोजी’ असे नाव दिले आहे. 

छोट्या छोट्या अशा अनेक नवीन सुविधाही सॅमसंगने एस ९ मध्ये घातल्या आहेत. त्यांची पूर्ण यादी करणे तर शक्‍य नाही, पण मला विशेष आवडलेली एक सुविधा म्हणजे बिक्‍सबी व्हीजन.

या सुविधेचा वापर करून तुम्ही तुमच्या एस ९ चा कॅमेरा एखाद्या दुसऱ्या भाषेतील बोर्डावर नेलात की बिक्‍सबी व्हीजन तुम्हाला बोर्डावरील वाक्‍य भाषांतरित करून दाखवते! यात बहुतेक भारतीय भाषांचा समावेश नसावा, पण जगातील महत्त्वाच्या भाषा - इंग्रजी, फ्रेंच, मॅडरीन, स्पॅनिश वगैरेचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर सॅमसंगने या फोनमध्ये ब्लड प्रेशर मोजू शकणारा सेन्सरही लावला आहे.  सॅन फ्रान्सिस्कोमधील युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मदतीने सॅमसंगने नुकतेच माय बीपी लॅब नावाचे ॲप जाहिर केले आहे. हे ॲप फक्त सॅमसंगच्या नवीन फोनवरच चालू शकेल.

सॅमसंगने आयफोन X  ला टक्कर देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. उत्तम कॅमेरा, संपूर्ण पुढची बाजू व्यापून टाकणारा उच्च दर्जाचा पडदा आणि उच्च दर्जाचे स्पीकर बसविल्याने एस ९ नक्कीच खरेदी करावा असा फोन झाला आहे.  गॅझेट ३६० नुसार भारतामध्ये हा फोन ५७,९०० रुपयांना तर त्याची प्लस आवृत्ती ६४,९०० रुपयांना उपलब्ध होईल. आयफोन x भारतामध्ये ८३,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. आयफोनपेक्षा तब्बल २० हजार रुपयांनी स्वस्त असलेला हा फोन नक्कीच भारतामध्ये यशस्वी ठरेल यात काही शंका नाही.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या