फेसबुकची दुसरी बाजू

वैभव पुराणिक
शुक्रवार, 11 मे 2018

टेक्नोसॅव्ही

फेसबुक सर्वांना त्यांच्या सोशल नेटवर्कमुळे माहीत आहे. परंतु सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञ मात्र फेसबुककडे एका वेगळ्याच नजरेने पाहतात. त्यांच्यासाठी फेसबुक ही एक गुगल आणि ॲपलप्रमाणे तंत्रज्ञान कंपनी आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत नसते, की इन्स्टाग्राम, व्हॉटस्‌ ॲप ही सोशल नेटवर्क आणि ऑक्‍युलस व्हर्चुअल रिॲलिटी हेडसेटही आता फेसबुकचाच हिस्सा आहेत. त्या व्यतिरिक्त फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातही बरेच काम केले असून स्वतः: संशोधन केलेले बरेच तंत्रज्ञान त्यांना इतर लोकांना वापरण्यासाठी मुक्त स्रोत (ओपन सोर्स) पद्धतीने खुले केले आहे. 

फेसबुकचे सोशल नेटवर्क आणि तंत्रज्ञान अनेक संगणक अभियंते वापरतात. या सर्वांना आपल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता फेसबुक दरवर्षी सिलिकॉन व्हॅलीत एक परिषद आयोजित करते. ‘एफ-८’ या नावाने प्रसिद्ध असलेली ही परिषद या वर्षी सॅन ओजेमध्ये १ व ३ मेला पार पडली. या परिषदेत फेसबुकने आपल्या सर्वच सेवातील अनेक नवीन सुविधा जाहीर केल्या. केंब्रिज ॲनालिटीका प्रकरण अलीकडेच उजेडात आले असल्याने परिषदेच्या सुरवातीलाच मार्क झकरबर्गने या विषयाला हात घातला व फेसबुक या संदर्भात काय करत आहे याची माहिती जमलेल्या लोकांना दिली. गेल्या काही काळात फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खोटी अकाउंट ओळखण्यासाठी सुरू केला आहे. अशा प्रकारे फेसबुकने हजारो अकाउंट बंद केली आहेत. एवढेच नव्हे तर अशी खोटी अकाउंट उघडणारे रशियातील एक नेटवर्कही फेसबुकने उघडकीस आणले आहे. फेसबुकवर कोण लोक जाहिराती विकत घेत आहेत आणि ते कशा प्रकारच्या जाहिराती विकत घेत आहेत याचाही ताळमेळ आता फेसबुकने ठेवायला सुरवात केला आहे. ज्या लोकांना फेसबुकवर राजकीय जाहिराती करायच्या आहेत अशा लोकांना आपले ओळखपत्र दाखवणे आवश्‍यक ठरले आहे. खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठीही फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे. तसेच फेसबुकवरील पोस्ट खऱ्या आहेत की खोट्या याची शहानिशा करण्यासाठी या वर्षाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ २० हजार लोकं फेसबुकवरील पोस्ट तपासून पाहण्याचे काम करतील असे मार्क झकरबर्गने या परिषदेत लोकांना सांगितले. त्याव्यतिरिक्त लोकांच्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी ‘क्‍लिअर हिस्टरी’ नावाची एक सुविधाही मार्क झकरबर्गने जाहीर केली. या सुविधेअंतर्गत तुम्हाला इतर कुठल्या वेबसाइटस्‌ अथवा ॲप तुमची माहिती वापरत आहेत ते पाहता येईल. तुम्ही फेसबुकवर ज्या ज्या गोष्टीवर क्‍लिक केले आहे, ज्या पोस्टना लाइक केले आहेत त्याची माहिती फेसबुक साठवून ठेवते. या सुविधेचा वापर करून ही माहिती तुम्हाला पुसूनही टाकता येईल. तुमच्या इंटरनेट ब्राउझरमध्येही अशा प्रकारची सुविधा असते. बहुतेक वेळा जेव्हा तुम्ही वेबसाइटना भेट देता तेव्हा कुकी नावाच्या ब्राउझरमधील फाइल तुम्ही कुठल्या वेबसाइटना भेट दिली ही माहिती साठवून ठेवतात. या कुकी डिलीट करून तुम्हाला ही माहिती पुसून टाकता येते. ही सुविधा काही महिन्यात उपलब्ध होईल असे फेसबुकने म्हटले आहे. 

व्हॉटस्‌ ॲपमध्येही दोन नवीन सुविधा या परिषदेत फेसबुकने जाहीर केल्या. व्हॉटस्‌ ॲपचे व्हिडिओ कॉलिंग तर आजकाल सर्वत्र वापरले जातेच. परंतु आतापर्यंत हे कॉल एकाच व्यक्तीला करता येत असत. एकावेळी दोन लोकांना व्हिडिओ कॉल करायची सुविधा उपलब्ध नव्हती. एका वेळी चार लोकांना व्हिडिओ कॉल करायची सुविधा पुढील काही महिन्यात व्हॉटस्‌ ॲपवर उपलब्ध होणार आहे. म्हणजेच व्हॉटस्‌ ॲपचा वापर व्हिडिओ कॉन्फरन्सींगसाठीही एक प्रकारे करता येईल. व्हॉटसॲपप्रमाणे इन्स्टाग्राममध्येही व्हिडिओ चॅटींगची सुविधा घालायचे फेसबुकने ठरवले आहे. तसेच व्हॉटस्‌ ॲपने स्टीकर नावाच्या नवीन सुविधेचीही माहितीही लोकांना करून दिली. आता तुम्हाला लवकरच एकमेकांना स्टीकर पाठवता येतील. स्टीकर म्हणजे इमोजीचा मोठा अवतार. स्टीकर सुविधा इतर अनेक चॅटिंग व मेसेजिंग ॲपमध्ये उपलब्ध आहे. फेसबुकच्या स्वतः:च्याच फेसबुक मेसेंजरमध्येही स्टीकरचा वापर करता येतो. ‘लाइन’ या जपानमध्ये लोकप्रिय असलेल्या व ‘वी-चॅट‘ या चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या मेसेंजर ॲपमध्येही स्टीकर सुविधा उपलब्ध आहे. फेसबुक मेसेंजर ॲपमध्येही फेसबुक काही नवीन सुविधा घालणार आहे. त्यातील एक सुविधा म्हणजे भाषांतर. इंग्रजी व स्पॅनिश भाषांमध्ये लिहिलेले मेसेजेस आता भाषांतरित करून दुसऱ्या माणसाला दिसू शकतील. समजा तुम्ही फक्त स्पॅनिश समजणाऱ्या व्यक्तीशी मेसेंजरवरून संभाषण करत आहात. तुम्ही भाषांतर सुविधा सुरू केली, की त्या व्यक्तीने स्पॅनिशमध्ये लिहिलेले मेसेजेस तुम्हाला इंग्रजीत वाचता येतील. तसेच त्याने भाषांतराची सुविधा सुरू केली तर तुमचे इंग्रजीमधील मेसेजेस त्याला स्पॅनिशमध्ये वाचता येतील! मेसेंजर ॲपमधील कॅमेरा व गेम्स टॅब आता फेसबुक काढून टाकणार आहे. मेसेंजर ॲप मोठे झाले असून त्यात अनेक अनावश्‍यक सुविधा घातल्या गेल्या आहेत त्या काढून टाकल्या जाणार आहेत. 

फेसबुकने या परिषदेत आपले नवीन उत्पादन - ‘ऑक्‍युलस गो’ जाहीर केले. ‘ऑक्‍युलस गो’ हा २०० डॉलर्सला मिळणारा व्हर्चुअल रिॲलिटी हेडसेट आहे. हा हेडसेट घालून तुम्हाला तुमचे संपूर्ण सभोवताल पडद्याने व्यापून टाकता येते. म्हणजेच एखादा गेम तुम्ही खेळत असाल तर संपूर्णपणे तुम्ही त्या गेममध्ये आहात असा आभास तुम्हाला होतो. त्या गेमशिवाय तुम्हाला काहीही दिसत नाही. अशा प्रकारच्या हेडसेटचा उपयोग प्रशिक्षण देण्यासाठी अथवा चक्क टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यासाठीही केला जाऊ शकतो. या हेडसेटचा वापर करून तुम्हाला नेटफ्लिक्‍सवरील कार्यक्रम पाहता येतात. तुम्ही एका दिवाणखान्यात बसला असून एका १८० इंची फ्लॅट स्क्रीन टीव्हीवर नेटफ्लिक्‍स पहात आहात असा आभास हा हेडसेट तुमच्यासमोर निर्माण करतो. व्हर्चुअल रिएलिटीच्या क्षेत्रात आतापर्यंत दोन प्रकारचे हेडसेट प्रचलित आहेत. सॅमसंगच्या गिअर व्हीआरप्रमाणे फोन वापरावा लागणारे अथवा एच टी सी कंपनीच्या व्हाइव्हप्रमाणे पीसी वापरायला लागणारे. ऑक्‍युलसचा रिफ्ट नावाचा व्हर्चुअल रिॲलिटी हेडसेटही अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध आहे, परंतु त्याला पीसीची आवश्‍यकता लागते. परंतु ऑक्‍युलस गोसाठी पीसीची आवश्‍यकता नाही व स्मार्टफोनचीही आवश्‍यकता नाही. व्हर्च्युअल रिएलिटीसाठी आवश्‍यक असणारी प्रोसेसिंग पॉवर या हेडसेटमध्येच आहे. या हेडसेटमध्ये ३२ गिगाबाइटचा ड्राईव्ह आहे. ६४ गिगाबाइटचा हेडसेट २४९ डॉलर्सना उपलब्ध आहे. फेसबुकने या हेडसेटमध्येही अनेक सोशल सुविधा घातल्या आहेत. यात असणाऱ्या ऑक्‍युलस रूम सुविधेत एकावेळी ४  लोकं एकत्र बसून गप्पा मारू शकतात ! म्हणजे तुमचे मित्र जगातील कुठल्याही शहरात असोत, तुम्ही या हेडसेटच्या मदतीने व्हर्चुअल रिएलिटीमध्ये भेटू शकता! एवढेच नव्हे तर या रूममध्ये तुम्ही एकत्र चित्रपट बघू शकता, एकत्र गाणी ऐकू शकता आणि एकत्र बोर्ड गेमही खेळू शकता! बोर्ड गेम आभासी जगात आणण्यासाठी फेसबुकने ‘हासब्रो’ या गेम बनवणाऱ्या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. त्यांचा बॉगल व मोनोपॉली (व्यापार) हे खेळ ऑक्‍युलस रूममध्ये उपलब्ध होणार आहेत. त्या व्यतिरिक्त फेसबुक पुढे भविष्यात स्टेडियममध्ये मॅच पाहायची सुविधाही या हेडसेटद्वारे उपलब्ध करणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मिळू शकेल. ऑक्‍युलस गो १ मेपासून इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

फेसबुकच्या सर्व घोषणांमध्ये जर कुठल्या घोषणेने लोकांचे लक्ष वेधून घेतले असेल तर ते म्हणजे डेटींग सुविधेने. लवकरच फेसबुक आपल्या सोशल नेटवर्कमध्ये डेटींगची सुविधा घालणार असल्याची घोषणा मार्क झकरबर्गने या परिषदेत केली. फेसबुकवर असलेली तुमच्या माहितीचा वापर करून फेसबुक आता तुमच्यासाठी जोडीदारही शोधू शकेल! फेसबुकवरील तुमचे मित्र अथवा मैत्रिणींना तुमचा जोडीदार म्हणून सुचवले जाणार नाही. ज्या व्यक्तींना जोडीदार शोधायचा आहे त्यांना आता एक वेगळी डेटींग प्रोफाइल बनवता येईल. सुचवलेली व्यक्तीची प्रोफाइल तुम्हाला आवडली तर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर खासगी मेसेजसद्वारे संवाद साधू शकाल. तसेच फेसबुक इव्हेंटसमधील माहितीचा वापर करून ही व्यक्ती तुम्ही जात असलेल्या एखाद्या पार्टीला जाणार असेल तर त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायचीही संधी मिळेल. ही सुविधा नक्की कधी उपलब्ध होणार हे मात्र मार्क झकरबर्गने जाहीर केले नाही. 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी फेसबुकने अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाविषयी घोषणा केल्या. फेसबुकने facebook.ai ही एक वेबसाइटही दुसऱ्या दिवशी जाहीर केली. या वेबसाइटवर फेसबुकच्या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयीच्या प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग व डीप लर्निंग या क्षेत्रातील अनेक नवीन सॉफ्टवेअर आवृत्त्यांची घोषणा फेसबुकने कली. पायटॉर्च सॉफ्टवेअरची १.० आवृत्ती फेसबुकने जाहीर केली. ऑगमेंटेड रिॲलिटी - एआर क्षेत्रात उपयोगी ठरू शकेल अशा काही तंत्रज्ञानाची झलकही फेसबुकने परिषदेच्या दुसऱ्या दिवशी लोकांना दाखवली. ऑगमेंटेड रिॲलिटी म्हणजे सत्य आणि आभासी जगाचे मिश्रण. उदाहरणार्थ तुम्ही ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेट घातला असेल तर तुम्हाला तुमचे स्वयंपाकघर त्यातून दिसेल पण तुम्ही काही बटणे दाबून तुमच्या ओट्यावर एक आभासी मिक्‍सर आणू शकाल. किंवा तुमच्या कपाटाचा रंग बदलून तो कसा दिसतो हे पाहू शकाल! ऑगमेंटेड रिॲलिटी हे क्षेत्र सध्या झपाट्याने वर येत आहे. अनेक कंपन्या त्याचा वापर कसा करता येईल याची चाचपणी करत आहेत. मायक्रोसॉफ्टने ‘होलोलेन्स’ नावाचा ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेटही बाजारात आणला आहे. परंतु स्मार्टफोन ॲपमध्येही ऑगमेंटेड रिएलिटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ऑगमेंटेड रिएलिटीचे अजून एक सोपे उदाहरण म्हणजे तुम्ही फेसबुक कॅमेरा वापरून सेल्फी काढणे व फिल्टर वापरून स्वतःला सशाचे कान लावणे. अनेक ॲप तुम्हाला अशा प्रकारच्या सेल्फी काढून देतात. या परिषदेत फेसबुकने आपले ऑगमेंटेड रिॲलिटी फिल्टर मेसेंजर फॉर बिझनेस (कंपन्यांनी वापरायचा मेसेंजर) मध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता विविध कंपन्याची उत्पादने तुम्ही फेसबुक मेसेंजर वापरून ‘घालून’ पाहू शकाल. एखादी लिपस्टीक तुम्हाला कशी दिसते, एखादा ड्रेस अथवा बूट तुम्हाला कसे दिसतात हे तुम्ही ऑगमेंटेड रिएलिटीचा वापर करून पाहू शकाल. यामुळे ऑनलाइन खरेदीला अधिकच चालना मिळेल. 

एकंदरीत केंब्रिज ॲनालिटीकाच्या नकारात्मक प्रसिद्धीनंतर ‘एफ-८’ परिषदेमुळे फेसबुकविषयीची प्रसार माध्यमातील चर्चा पुन्हा एकदा सकारात्मक झाली आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

संबंधित बातम्या