वन प्लस 6

वैभव पुराणिक
गुरुवार, 24 मे 2018

टेक्नोसॅव्ही
 

वनप्लस कंपनीने आपली दोन नवीन उत्पादने १६ मे ला लंडनमध्ये आणि १७ मे ला मुंबईत झालेल्या समारंभात जाहीर केली. लंडनमधील समारंभात कंपनीचे संस्थापक कार्ल पेई यांनी थेट स्टीव्ह जॉब्सच्या थाटात आपली उत्पादने जाहीर केली. मुंबईतील समारंभात अमिताभ

बच्चन व आदिती राव हैदरीही हजर होते. एकंदरीतच वनप्लस कंपनी मोठे समारंभ करून संपूर्ण जगाचे लक्ष दोन दिवस आपल्याकडून वळवून घेण्यात यशस्वी झाली असे म्हणावे लागेल.

वनप्लसने जवळजवळ बेझल (स्क्रीन आणि कडेमधील जागा) नसलेला फोन बाजारपेठेत आणण्यात यश मिळवले आहे. या फोनचा पडदा वरच्या बाजूला अगदी कडेपर्यंत जातो. मधोमध सेल्फी कॅमेरा व स्पीकरसाठी जागा ठेवलेली आहे. ही जागा आयफोन x नंतर ‘नॉच’ या नावाने ओळखली जाते. या नॉच विषयी ग्राहकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया पहायला मिळतात. काही लोकांना ही नॉच आवडते तर काही लोकांना ती नको असते. सुदैवाने वनप्लसने दोन्ही लोकांच्या आवडीची दखल घेतली आहे. तुम्हाला नॉच आवडत नसेल तर सॉफ्टवेअरच्या मदतीने पडद्याच्या वरचा भाग बंद करता येतो. त्यामुळे वरच्या बाजूला काळी पट्टी तयार होते व त्यामुळे बेझल असल्याचा भास होतो. या नॉचमुळेच हा फोन माझ्या मते दिसायला चांगला झाला आहे. फोनच्या खालच्या बाजूला मात्र थोडीशी कडा पडद्याशिवाय असलेली पहायला मिळते. आयफोन x मध्ये खालच्या बाजूलाही अजिबात जागा ठेवलेली नाही. वनप्लसमध्येही तसे असते तर मला आवडले असते, पण कदाचित त्यामुळे खर्च वाढत असावा. फोनचा आकार अजिबात न वाढवता, वन प्लसने ५टीपेक्षा अधिक पडदा देण्यात यश मिळवले आहे.  ५टी मध्ये सहा इंची पडदा होता तर ६ मध्ये ६.२८ इंची पडदा आहे. वनप्लसने पुढच्या बाजूचा फिंगरप्रिंट स्कॅनर ५टी मध्येच मागे नेला होता. तो याही आवृत्तीत मागेच आहे. याही आवृत्तीत मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत. परंतु ५टी प्रमाणे ते एकाबाजूला एक नसून, एकाखाली एक आहेत. कॅमेराच्या खाली फ्लॅश असून त्याखाली फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फिंगरप्रिंट स्कॅनरचा आकार टीप्रमाणे गोलाकार नसून ५ प्रमाणे लंबगोलाकार आहे. या स्कॅनरच्या खाली वनप्लसचा लोगो आहे. या फोनमध्ये ॲलर्ट स्लायडरची जागाही बदलली आहे. ॲलर्ट स्लायडर आता उजव्या बाजूला नेण्यात आला आहे. तसेच ॲलर्ट स्लायडरमधील डू नॉट डिस्टर्ब मोडही काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी इतर फोनप्रमाणे रिंग, व्हायब्रेट आणि सायलेंट असे मोड टाकण्यात आलेले आहे. अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे या फोनची मागची बाजू काचेची बनवलेली आहे. वनप्लसच्या मते धातू न वापरण्याचे एक कारण म्हणजे काचेतून रेडिओ तरंगाचे वहन धातूपेक्षा चांगले होते. त्यामुळे मोबाइलच्या सिग्नलला असणारा अजून एक अडथळा कमी होतो. तसेच काच धातूपेक्षा दिसायला चांगली असते. त्यापासून अधिक वेगवेगळे रंग व आकार बनवता येतात. वनप्लसने आपला फोन ३ वेगवेगळ्या आवृत्तीत जाहीर केला आहे - मिडनाईट ब्लॅक, मिरर ब्लॅक आणि सिल्क व्हाइट. त्यातील मिडनाईट ब्लॉकमधील मागील बाजूचे फिनिश मिरर ब्लॅकपेक्षा इतके वेगळे आहे की मिडनाईट ब्लॅकही काचेपासून बनला आहे हे पटतच नाही. वनप्लसने मागच्या बाजूसाठी कार्निंग कंपनीची गोरिला ग्लास ५ वापरली आहे. आणि त्यामुळे काच वापरूनही वनप्लस ६ आधीच्या फोन इतकाच सशक्त आहे. तो सहजासहजी पडल्यावर तुटत नाही असा कंपनीचा दावा आहे.

या फोनमध्ये वनप्लस कंपनीने सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेला सर्वांत जलद प्रोसेसर - स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर वापरला आहे. त्याबरोबर आड्रीनो ६३० ग्राफिक्‍स प्रोसेसरही घालण्यात आलेला आहे. हा फोन जलद करण्यासाठी कंपनीने विशेष प्रयत्न केले आहेत. या संपूर्ण फोनचे मुख्य ब्रीदवाक्‍य ‘नीड फॉर स्पीड’ असे ठेवण्यात आलेले आहे. कंपनीने आपल्या लंडनमधील समारंभात दाखविल्याप्रमाणे इतर प्रसिद्ध फोनच्या मानाने या फोनमधील ॲप अधिक जलद सुरू होतात. मोबाईल गेमिंगसाठी विशेष सुविधा या फोनमध्ये घालण्यात आल्या आहेत. गेमिंग मोड सुरू केल्यावर हा फोन तुम्ही खेळत असलेल्या गेमला विशेष प्राधान्य देईल. इतर ॲपसाठी उपलब्ध असलेला प्रोसेसर व रॅम कमी करून ती तुम्ही खेळत असणाऱ्या गेमला दिली जाईल.  ५ टी प्रमाणेच या फोनच्याही ६ गिगाबाईट व ८ गिगाबाईट रॅमच्या आवृत्त्या उपलब्ध होणार आहेत. तसेच  ६४ आणि १२८ गिगाबाईट स्टोरेजमध्ये आता २५६ गिगाबाईट स्टोरेजची भर पडली आहे. या फोनमध्ये ३३०० mAH बॅटरी असून फास्ट चार्जिंग सुविधाही कायम ठेवण्यात आली आहे. अनेकांना वायरलेस चार्जिंग उपलब्ध होणार असे वाटले होते, परंतु कंपनीने वायरलेस चार्जिंग या आवृत्तीत उपलब्ध करून दिलेले नाही. ५टी प्रमाणे फेस अनलॉक सुविधाही या फोनमध्ये कायम ठेवण्यात आली आहे. तसेच कंपनीने हा फोन वॉटर रेझिस्टंट असल्याचे म्हटले आहे. थोडेफार पाणी पडले तर हा फोन खराब होणार नाही असे कंपनीने म्हटले आहे. परंतु सर्वसाधारणतः: एखादी कंपनी आपला फोन वॉटरप्रूफ आहे असे म्हणते तेव्हा त्याची आयपी रेटिंगही देते. IP६५, IP६६ व IP६७ पैकी नक्की कुठल्या प्रकारचे वॉटरप्रूफिंग केलेले आहे ते सांगते. परंतु वनप्लसने मात्र कुठल्याच प्रकारचे आयपी रेटिंग सांगितलेले नाही. त्याऐवजी फोन थोडाफार भिजला तर तो खराब होणार नाही असे म्हटले आहे. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये ३.५ मिमीचा हेडफोन जॅक कायम ठेवण्यात आला आहे. ॲपल व गुगल या दोन्ही कंपन्यांनी आपापल्या फोनमधून हेडफोन जॅक काढून टाकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हेडफोन जॅक कायम ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. सिग्नल चांगला मिळण्यासाठी या फोनमध्ये ४ x ४  MIMO घालण्यात आले आहे. याचा अर्थ एकावेळी हा फोन चार वेगवेगळ्या सिग्नल स्ट्रीम पकडू शकेल. त्यामुळे फोनवरील डेटा व व्हॉइस कॉलची प्रत वाढू शकेल. अर्थात हा मोड नीट काम करण्यासाठी तुमच्या सेल्युलर सेवा देणाऱ्या कंपनीच्या टॉवरमध्ये तशी क्षमता असणे आवश्‍यक आहे. या मोडमुळे या फोन मध्ये १ गिगाबिट प्रति सेकंद डेटा ट्रान्समिट करण्याची क्षमता आली आहे. 

वनप्लस कंपनीचे फोन त्यांच्या कॅमेरासाठी प्रसिद्ध आहेत. कॅमेरातही कंपनीने अनेक बदल केलेले आहेत. मागच्या बाजूला १६ मेगापिक्‍सेल व २० मेगापिक्‍सेलचे दोन कॅमेरे असले तरी त्यातील मुख्य कॅमेराचा सेन्सर १९ टक्के मोठा करण्यात आला आहे. त्यामुळे जास्त प्रकाश कॅमेराच्या सेन्सरवर पडू शकतो. त्यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो येण्यास मदत होते. आतापर्यंत वनप्लसच्या कॅमेरात ऑप्टिकल स्टॅबिलायझेशन सुविधा नव्हती. वनप्लस ६ मध्ये कंपनीने पहिल्यांदाच मागील १६ मेगापिक्‍सेलच्या कॅमेरात ऑप्टिकल स्टॅबिलायझेशन घातले आहे. त्यामुळे फोटो काढताना तुमचा हात जरासा हलला अथवा थरथरला तरी कॅमेराची लेन्स स्थिर राहील व त्यामुळे चांगला फोटो येऊ शकेल. तसेच कंपनीने या कॅमेरात स्लो मोशन व्हिडिओ चित्रण करायची सुविधाही घातली आहे. वनप्लस ६ चा कॅमेरा आता ४६० फ्रेम प्रति सेकंद वेगाने ७२० पी रिझोल्यूशनचा व्हिडिओ चित्रित करू शकतो. तो १ मिनीटापर्यंतचे चित्रण स्लोमोशनमध्ये चित्रित करू शकतो. ४ के व्हिडिओ ६० फ्रेम प्रतिसेकंद वेगाने तर १०८० पी व्हीडीओ २४० फ्रेम प्रतिसेकंद वेगाने चित्रित केला जाऊ शकतो. जितका प्रतिसेकंद फ्रेम आकडा जास्त तितका चांगला स्लोमोशन व्हिडिओ दिसू शकतो. तसेच वनप्लसने आपल्या सहाव्या आवृत्तीत व्हीडीओ एडिटरही टाकला आहे. त्यामुळे आता तुम्हाला व्हीडीओत वेगवेगळे इफेक्‍ट टाकण्यासाठी तो लॅपटॉपवर डाऊनलोड करण्याची गरज उरलेली नाही. व्हीडीओत बदल करून लगेचच तुम्ही युट्यूबवर अपलोड करू शकता. वनप्लसच्या कॅमेरातील माझी आवडती सुविधा म्हणजे पोट्रेट मोड. पोट्रेट मोडमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचा फोटो काढायचा आहे त्यावर फोकस करून बाकीची पार्श्वभूमी धूसर करता येते. त्यामुळे ती व्यक्ती फोटोमध्ये उठून दिसते.५ टी पर्यंत पोट्रेट मोड फक्त मागील कॅमेरातूनच वापरता येत असे. परंतु ६ मध्ये हा मोड सेल्फी कॅमेरातही घालण्यात आला आहे. तसेच पोट्रेट मोड अधिक जलदही करण्यात आला आहे. ५ व ५ टी मध्ये पोट्रेट मोडमध्ये फोटो घेतल्यावर तो दिसायला काही सेकंद वेळ लागत असे, आता सहामध्ये तो लगेचच दिसतो. त्याशिवाय पोट्रेट मोडमध्ये आता वेगवेगळे इफेक्‍टही घालण्यात आलेले आहेत. 

जगभरात हा फोन २२ मेपासून उपलब्ध झाला आहे. भारतामध्ये ॲमेझॉन वेबसाइटव्यतिरीक्त क्रोमामध्येही हा फोन उपलब्ध आहे. भारतामध्ये या फोनची ६४ गिगाबाईट आवृत्ती ३४,९९९ रुपयांना तर १२८ गिगाबाईट आवृत्ती ३९,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. या फोनची एक विशेष आवृत्ती - ॲव्हेंजर्स लिमिटेड एडिशन ४४,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. अव्हेंजर्स लिमिटेड एडीशन व सिल्क व्हाइट या आवृत्त्या जून ५ ला उपलब्ध होणार आहेत. 

वनप्लस कंपनीने मे १६ व १७ च्या समारंभात वनप्लस ६ फोन जाहीर केलाच पण त्याव्यतिरिक्त आपले नवीन उत्पादन-वायरलेस इअरबडस्‌ - जाहीर केले. या हेडफोनला वनप्लसने ‘बुलेटस्‌ वायरलेस‘ असे नाव दिले आहे. हे इअरबडस्‌ ॲल्युमिनिअम शेलमध्ये असून ते एकमेकांना वायरने जोडलेले आहेत. त्यामध्ये वनप्लसने मॅग्नेटिक कंट्रोल घातलेले आहेत. याची वायर तुम्ही गळ्याभोवती ठेवायची. कानातून काढल्यावर ते शरीराच्या पुढच्या बाजूला चुंबकामुळे एकमेकांना चिकटविता येतात. त्यामुळे ते खाली पडत नाहीत. तसेच कानातून काढून ते एकमेकांना चिकटवले की त्यात सुरू असलेला ऑडिओ आपोआपच बंद होतो. ते एकमेकांपासून वेगळे करून तुम्ही कानात घातल्यावर ऑडिओ पुन्हा सुरू होतो. तसेच वनप्लसने आपल्या फोनप्रमाणे या हेडफोनमध्येही डॅश चार्जिंग सुविधा घातली आहे. केवळ १० मिनिटे चार्ज केल्यावर हे इअरबडस्‌ तब्बल ५ तास वापरता येतात. तसेच या इअरबडसमध्ये मायक्रोफोन आहे हे सांगायला नकोच. त्यामुळे याचा वापर फोनवर बोलण्यासाठीही करता येईल. हे इअरबडस्‌ वनप्लसच्या ५ व ५टी या फोनबरोबरही वापरता येतील. हे इअरबडस्‌ भारतात ३,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहेत. अमेरिकेत ते ६९ डॉलर्सला उपलब्ध होतील.

संबंधित बातम्या