मेश वायफाय

वैभव पुराणिक
शुक्रवार, 15 जून 2018

टेक्नोसॅव्ही
 

जसजशी भारतात सुबत्ता येत आहे, तसतशा लोकांच्या गरजा वाढू लागल्या आहेत. आणि त्यामुळेच लोकांच्या घरांचा आकारही वाढत आहे. आधीच मोठी घरे आणि त्यात घराच्या सर्व कोपऱ्यातील इंटरनेटला जोडलेली इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे यामुळे लोकांना वायफाय सिग्नलच्या कमतरतेला तोंड द्यावे लागत आहे. सर्वसाधारण राउटरचा सिग्नल पुरेसा न पडल्याने आता मेश वायफाय या तंत्रज्ञानाचा उदय झाला आहे. 

समजा तुमचे घर मोठे आहे आणि घराच्या सर्व कोपऱ्यात वाय फाय सिग्नल पोचत नाही. जरी तुमचे घर मोठे नसेल तरीही असे होऊ शकते. विशेषतः: तुमचा वाय फाय राउटर जर घराच्या एका कोपऱ्यात असेल तर १५०० स्क्वेअर फुटाच्या घरातील दुसऱ्या टोकाला सिग्नल नीट पोचेलच याची खात्री देता येत नाही. मध्ये किती अडथळे-किती भिंती आहेत, त्यावरही सिग्नलची क्षमता अवलंबून असते. भारतीय शहरांमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्ग १५०० स्क्वेअर फुटाच्या घरात रहात असला, तरी अमेरिकेत मात्र ही परिस्थिती बरीच वेगळी आहे. अमेरिकेत मध्यमवर्गीय लोकांकडे बंगलेवजा घरे असतात. ३००० हजार स्क्वेअर फुटाचे घर आणि ७००० स्क्वेअर फुटाचा लॉट. त्यात घराच्या पुढे आणि मागे अंगण. मग अशा वेळी अंगणाच्या टोकाला सिग्नल नीट पोचवायचा असेल तर वाय फाय एक्‍सटेंडर, रेंज बूस्टर अथवा ॲक्‍सेस पॉइंट वापरावा लागतो. वायफाय एक्‍सटेंडरमुळे तुमच्या वायफायची रेंज वाढते. पण एक्‍सटेंडर मध्ये एक मोठी समस्या असते. ती म्हणजे वायफाय एक्‍सटेंडर आपले स्वतंत्र वायफाय नेटवर्क तयार करतो. त्यामुळे तुम्ही त्या कोपऱ्यात गेल्यावर तुम्हाला त्या वेगळ्या वायफाय नेटवर्कला कनेक्‍ट करावे लागते. तुमचा फोन अथवा लॅपटॉप या एक्‍सटेडरला आपोआपच कनेक्‍ट होत नाही. आणि त्यामुळे असा एक्‍सटेंडर वापरणे सोईस्कर नाही. तसेच जेव्हा तुम्ही एक्‍सटेंडर वापरता तेव्हा अनेक एक्‍सटेंडर एकाच राउटरला कनेक्‍ट करतात आणि त्यामुळे जास्त उपकरणे अथवा लोक असतील तर त्या राउटरवर जादा भार पडतो. म्हणूनच या समस्या सोडवण्यासाठी मेश नेटवर्किंग अथवा मेश वायफायचा जन्म झाला. मेश वायफायमध्ये एक वायफाय राउटरऐवजी दोन किंवा अधिक राउटरचा वापर करण्यात येतो. बहुतेक मेश राउटर ३ च्या संख्येने मिळतात. हे राउटर एकमेकांना कनेक्‍ट करतात व वायफायची रेंज वाढवितात. अशा प्रकारे ३ राउटर वापरल्याने घराच्या कानाकोपऱ्यात नीट वायफाय सिग्नल मिळू शकतो. हे राउटर वायरलेस पद्धतीनेच एकमेकांना कनेक्‍ट करत असल्याने, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे वायरिंग करावे लागत नाही. तसेच हे तीनही राउटर एकाच वायफाय नेटवर्कचा भाग असल्याने तुमच्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना वेगळे कनेक्‍ट करण्याची गरज भासत नाही. ही उपकरणे आपोआपच जवळच्या राउटरला कनेक्‍ट होतात. अशा प्रकारची मेश नेटवर्क व्यावसायिक वापरात आतापर्यंत उपलब्ध होती. सर्वसाधारण: विमानतळ, परिषदा आणि कन्व्हेशन सेंटरमध्ये अशा प्रकारची नेटवर्क वापरली जातात. तिथे प्रचंड मोठ्या क्षेत्रात हजारो लोकांना वायफाय उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता असते. परंतु घरगुती वापरासाठी मात्र मेश नेटवर्क वापरायची संकल्पना बऱ्यापैकी नवीन आहे. एक्‍सटेंडर आणि मेश वायफाय मधील अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे एक्‍सटेंडर मुख्य राउटरशी कनेक्‍ट करण्यासाठी जे चॅनल वापरतो तेच चॅनल तुम्हाला वायफाय सेवा देण्यासाठीही वापरतो. त्यामुळे तुमची बॅंडविथ किंवा तुम्हाला मिळणारे इंटरनेट दुभागले जाते आणि तुम्हाला कमी दर्जाची सेवा मिळते. आजकाल बाजारात उपलब्ध असणाऱ्या मेश वायफाय राउटरमध्ये एकमेकांशी कनेक्‍ट करण्यासाठी खास वेगळे चॅनल राखून ठेवलेले असते आणि त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या इंटरनेटचा स्पीड कमी होत नाही. मेश वायफाय नेटवर्कनी लोकांची अजून एक समस्याही सोडवली आहे. जेव्हा राउटर तुम्ही तुमच्या घरी लावून घेता तेव्हा अनेक लोकांनी नक्की तो कसा लावायचा आणि त्यात काय सेटिंग करायच्या ते माहीत नसते. त्यासाठी त्यांना कुणा माहीतगार माणसाला बोलवावे लागते. परंतु आजकाल मिळणाऱ्या मेश वायफाय राउटरबरोबर स्मार्टफोन ॲप येतात आणि त्याच्या मदतीने सर्वसामान्य माणूसही राउटर आपल्या घरी लावू शकतो. अर्थात याचा मेश राउटर तंत्रज्ञानाशी तसा काही संबंध नाही. पण राउटर बनवणाऱ्या कंपन्यांनी मेश राउटर सर्वसामान्य लोकांना वापरता येईल असा सोपा बनवायचा चंग बांधल्याने ते तसे घडले आहे.

मेश राउटर साधारणतः: गेल्या दोन वर्षात बाजारात आले असले तरी अमेरिकेत त्याचा अजून तेवढा प्रसार झालेला नाही. भारतातही तीच परिस्थिती असावी. भारतातही आता सर्व मुख्य मेश वायफाय राउटर उपलब्ध आहेत. प्रसार न होण्याचे मुख्य कारण म्हणजे किंमत. सर्वसाधारण वायफाय राउटर भारतात ३ ते ५ हजार रुपयांना उपलब्ध आहे. उत्तम प्रकारचा राउटरसाठी ५ ते ७ हजार रुपये मोजावे लागतात. परंतु मेश राउटरसाठी कमीत कमी २२ हजार रुपये मोजावे लागतात. भविष्यात जेव्हा या किंमती खाली येतील तेव्हा त्यांचा प्रसार वाढू शकेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मेश वायफाय राउटरपैकी गुगल वायफाय, नेटगिअर कंपनीचा ऑरबी, इरो कंपनीचा मेश वाय फाय हे लोकप्रिय आहेत. पुढे त्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

गुगल वायफाय
गुगल राउटर दिसायला एखाद्या तबकडीसारखा दिसतो. पांढऱ्या रंगाच्या या तबकडीवर गुगलच्या G लोगोशिवाय आपल्याला काहीही लिहिलेले दिसत नाही. हा मेश राउटर तीनच्या संचात विकत मिळतो. यातील कुठलाही राउटर मुख्य राउटरची भूमिका निभावू शकतो. तीनही राउटरना नेटवर्क पोर्ट आहेत. त्यामुळे एखाद्या उपकरणाला वायफाय चालत नसेल आणि त्यांना इथरनेट वायरची आवश्‍यकता लागत असेल तर तुम्ही या संचातील कुठलाही राउटर या उपकरणाजवळ ठेवून तो वायरने जोडू शकता. प्रत्येक राउटरला इथरनेट पोर्ट व एक युएसबी-सी पोर्ट उपलब्ध असते. या राउटरचा सेटअपही फारच सोपा आहे. तीनपैकी कुठलाही एक राउटर तुम्ही तुमच्या केबल इंटरनेट मोडमला वायरने जोडायचा. त्याला पॉवर सप्लाय लावून त्यावर असलेला क्‍यू आर कोड गुगल वायफायच्या स्मार्टफोन ॲपमध्ये स्कॅन केला, की ॲप तुम्हाला तुमच्या वाय फाय नेटवर्कला नाव व पासवर्ड ठेवायला सांगते. त्यानंतर संचातील इतर राउटर स्मार्टफोन ॲपच्या साहाय्याने या राउटरला जोडता येतात. बस्स! तुमचे वायरलेस इंटरनेट काम करणे सुरू! ज्यांना अधिक कठीण गोष्टी करायच्या आहेत त्यांच्यासाठीही या राउटरमध्ये विशेष सुविधा घातलेल्या आहेत. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या टीव्हीवर हॉटस्टार अथवा नेटफ्लिक्‍स पहात असाल तर त्या टीव्हीला जास्त वायफाय सिग्नलचा हिस्सा द्यावा असे तुम्ही या राउटरला सांगू शकता! याच्या स्मार्टफोन ॲपमध्ये तुमच्या वायफाय नेटवर्कच्या स्पीडची चाचणीही घेता येते. तसेच तुम्ही या राउटरचा वापर करून काही विशेष लॅपटॉप अथवा आयपॅडचा इंटरनेट ॲक्‍सेस काढूनही घेऊ शकता! मुले इंटरनेटवरून उठतच नसतील तर हा उत्तम उपाय आहे!  अमेरिकेत याची किंमत २७९ डॉलर्स तर भारतात तो ३४ हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. 

नेटगिअर ऑरबी
नेटगिअर कंपनी अमेरिकेत वायफाय राउटरसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा नाइटहॉक नावाचा वायफाय राउटर अमेरिकेत खूपच लोकप्रिय आहे. नेटगिअरचा ऑरबी हा मेश वायफाय राउटर टॉम्स गाइड या प्रसिद्ध वेबसाइटनुसार बाजारात उपलब्ध असलेला सर्वोत्तम मेश राउटर आहे! हाही राउटर दोन अथवा तीनच्या संचात उपलब्ध आहे. यातील तंत्रज्ञान गुगल वायफायपेक्षा थोडेसे वेगळे आहे. या राउटरमध्ये तीन बॅंड आहेत. एक २.४ गिगाहर्टझ आणि दोन ५ गिगाहर्टझचे. एक ५ गिगाहर्टझ बॅंड हा या राउटरच्या भावंडांबरोबर कनेक्‍ट करण्यासाठी राखून ठेवलेला आहे. आणि त्यामुळेच या राउटरवर मिळणारा वायफाय स्पीड हा सर्वांत जास्त आहे. टॉम्स गाइड बेबसाइटप्रमाणे या राउटरवर तुम्हाला गुगल वायफायच्या दुप्पट स्पीड मिळू शकतो! परंतु गुगलप्रमाणे या राउटरच्या तीनच्या संचातील तीनही राउटर एकसारखे नसतात. एक राउटर विशेष असतो व त्याला बेस स्टेशन असे म्हटले जाते. हा राउटर तुम्ही इथरनेट केबलच्या साहाय्याने तुमच्या केबल मोडेमला जोडता येतो. इतर दोन राउटर हे दुय्यम प्रकारचे असतात व त्यांचा बेस स्टेशन म्हणून वापर करता येत नाही. गुगल वायफायच्या मानाने हा जास्त महागही आहे. तीनच्या संचासाठी अमेरिकेत ४०० डॉलर्स मोजावे लागतात. गुगल वायफायच्या मानाने हे राउटर बरेच मोठ्या आकाराचे आहेत. या राउटरसोबतही स्मार्टफोन ॲप येते. परंतु या राउटरचे स्मार्टफोन ॲप गुगलएव्हढे चांगले नाही. त्यात सर्व सेटिंग बदलता येत नाहीत. काही सेटिंग बदलण्यासाठी तुम्हाला या राउटरच्या वेबसाइटवर जाणे भाग आहे. या राउटरमध्ये गुगल वायफायप्रमाणे मुलांसाठी इंटरनेट बंद करण्याची सुविधा नाही. त्यासाठी तुम्हाला नेटगिअरचे जिनी ॲप वापरावे लागते. या राउटरची अनेक मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत, त्यातील नक्की कुठले तुमच्या सोयीचे आहे ते ओळखण्यासाठी मात्र थोडीफार अधिक माहिती करून घेणे आवश्‍यक आहे. माझ्या मते हा राउटर अधिक माहीतगार लोकांसाठी तयार केलेला आहे. 

इरो
मेश राउटरविषयीच्या लेखात आपण इरो कंपनीला गाळूच शकत नाही. अंदाजे दोन वर्षापूर्वी या कंपनीने प्रथमच मेश वायफाय राउटर घरगुती वापरासाठी अमेरिकन बाजारपेठेत आणला. इतर कुठलीही प्रसिद्ध कंपनी (गुगल, सॅमसंग, नेटगिअर, लिंकसस, डि-लिंक) त्याआधी घरगुती वापरासाठी मेश वायफाय राउटर बनवत नव्हती! इरोने मेश राउटर बाजारात आणल्यानंतर व त्याची उपयुक्तता पटल्यानंतरच इतर सर्व कंपन्यांनी आपली उत्पादने बाजारपेठेत आणली. हाही राउटर तीनच्या संचात उपलब्ध आहे. परंतु गुगल व नेटगिअरपेक्षा हा बराच महाग आहे. अमेरिकेत याची किंमत तब्बल ५०० डॉलर्स तर भारतात याची किंमत तब्बल ६० हजार रुपये एवढी आहे. पांढरे चौकोनी आकाराचे हे राउटर दिसायला चांगले आहेत. इरोचे तंत्रज्ञान नेटगिअरप्रमाणेच आहे. यातही नेटगिअरप्रमाणे तीन बॅंड आहेत. पंरतु इतर राउटरमध्ये नसलेल्या काही सुविधा यात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ या राउटरमध्ये थ्रेड नावाचे एक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही घरातील स्मार्ट कुलपे, डोअर बेल, मोशन सेन्सर इत्यादी उपकरणे तुम्ही या राउटरला जोडू शकता. पालकांना मुलांच्या इंटरनेटवर लक्ष ठेवण्यासाठीही यात सुविधा आहेत पण या सुविधा वापरण्यासाठी दरमहा शुल्क द्यावे लागते. नेटगिअरप्रमाणे यातही एक बेस स्टेशन असते व इतर दुय्यम राउटर असतात. या दुय्यम राउटरना कंपनीने ‘बीकन’ असे नाव दिले आहे. 

तुमच्याकडे मोठे घर असेल आणि तुम्हाला मेश राउटरची गरज भासतच असेल तर माझ्या मते गुगल वायफाय या तीन राउटरपैकी सर्वोत्तम आहेत. तो दिसायला अधिक चांगला, वापरायला अधिक सोपा आहे व आपल्यापैकी बहुतेकांना त्याच्या व इतर राउटरच्या स्पीडमधील फरक लक्षातही येणार नाही.  वरील तीन राउटरपैकी हा राउटरच सर्वांत स्वस्तही आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या