ॲमेझॉनची इको मालिका

वैभव पुराणिक
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

टेक्नोसॅव्ही
 

ॲमेझॉनने आपला इको स्मार्ट स्पीकर नोव्हेंबर २०१४ ला बाजारपेठेत आणला. ‘अलेक्‍सा’ असे म्हटले, की या स्पीकरला जाग यायची. सुरुवातीला या अलेक्‍साला आपण आवाजी आज्ञा देऊन काही साधीसुधी कामे करवून घेता येत असत. उदाहरणार्थ, किती वाजले आहेत हे सांगणे, एखादे गाणे लावणे, आपले कॅलेंडर (मीटिंग शेड्यूल) वाचून दाखवणे, हवामानाचा अंदाज सांगणे इत्यादी. परंतु मग या स्पीकरमध्येही विविध ‘स्किल’ घालून अनेक वेगवेगळी कामे करवता येऊ लागली. आता इकोला तुम्ही तुमच्या घरातील दिवे उघडबंद करायला सांगू शकता. तुमचा एसी कमी अधिक करवून घेऊ शकता, एवढेच नव्हे तर बाहेर दारावर कोण बेल वाजवत आहे हे आता इकोच्या स्क्रीनवर तुम्हा पाहूही शकता ! इतकेच नव्हे; तर आता इकोला तुम्ही एक २.१ साउंड सिस्टिम म्हणूनही वापरू शकता ! ॲमेझॉनने इकोच्या अनेक वेगवेगळ्या आवृत्त्या काढल्या आहेत. २० सप्टेंबरला सिएटलमध्ये झालेल्या एका समारंभात ॲमेझॉनने काही वेगळ्या प्रकारचे इको, तर काही जुन्या प्रकारच्या इकोच्या नवीन आवृत्त्या बाजारपेठेत आणल्या.

इको डॉट
‘इको डॉट’ हा ॲमेझॉनच्या इको मालिकेतील सर्वांत लहान स्मार्ट स्पीकर. हा ॲमेझॉनचा सर्वांत लोकप्रिय व स्वस्त इको आहे. त्यात इतर इकोप्रमाणे अलेक्‍सा असली, तरीही त्यातील स्पीकर मात्र चांगल्या दर्जाचा नव्हता. अलेक्‍साने दिलेली उत्तरे जवळून ऐकू येतील इतपतच यातील स्पीकर होता. तो गाणी ऐकण्यासाठी म्हणून नव्हताच. त्याचा उपयोग इतर चांगल्या स्पीकरला जोडण्यासाठी म्हणून करण्यात येत असे. अॅमेझॉनने २०१८ च्या इको डॉटमध्ये मात्र चांगल्या दर्जाचा स्पीकर टाकला आहे. मागील इको डॉटपेक्षा तब्बल ७० टक्के जास्त मोठा आवाज यातून येऊ शकतो. तसेच या इको डॉटचे डिझाईनही बदलण्यात आलेले आहे. त्याची गोलाकार बाजू ही आता कापडाची करण्यात आलेली आहे. त्याचा आकारही मागील इको डॉटपेक्षा थोडा मोठा आहे. आधीचा इको डॉट ३.३ इंच व्यासाचा होता. नवीन इको डॉट ३.९ इंच व्यासाचा असून त्याची उंची १.३ इंचावरून १.७ इंच इतकी वाढवण्यात आली आहे. तसेच आता इको डॉट तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध झाला आहे. नीअर ब्लॅक चारकोल, हेदर ग्रे आणि सॅंडस्टोन ग्रे. इको डॉटची किंमत मात्र ५० डॉलर्सच ठेवण्यात आली आहे. हा इको डॉट ११ ऑक्‍टोबरपासून अमेरिकेत उपलब्ध झाला आहे. भारतामध्येही हा इको डॉट ४,५०० रुपयाला ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. 

इको प्लस
ॲमेझॉनने २०१७ मध्ये प्रथमच इकोची ‘इको प्लस’ ही आवृत्ती काढली. या आवृत्तीतला व साध्या इकोमधील फरक असा, की यात स्मार्ट स्पीकरव्यतिरीक्त घरातील स्मार्ट वस्तूंचा हब बनण्याचीही क्षमता होती. म्हणजेच तुम्ही फिलिप्स कंपनीचा ह्यू बल्ब घरात लावलात, तर तो बल्ब या इको प्लसला कनेक्‍ट करून आवाजी आज्ञा देऊन उघडबंद करता येतो. अमेरिकन बाजारपेठेत तर इको प्लसबरोबर फिलिप्सचा ह्यू स्मार्ट बल्ब मुफ्त मिळतो. भारतात मात्र ह्यू बल्ब वेगळा विकत घ्यावा लागतो. यात झिगबी नावाचा लोकप्रिय स्मार्ट होम इंटरफेस ॲमेझॉनने टाकला आहे. म्हणजेच झिगबीवर चालणारी सर्व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे आता इको प्लसवर चालू शकतात. स्मार्ट स्वीच, स्मार्ट कॅमेरे, एसीच्या थर्मोस्टॅट अशा अनेक गोष्टी इको प्लस वापरून आवाजी आज्ञा देऊन इको प्लसमुळे वापरता येतात. इको प्लस विकत घेतलात, की तुम्हाला वेगळा स्मार्ट होम हब घ्यायची गरज नाही. ॲमेझॉनने इको प्लसच्या या आवृत्तीत तापमान मोजणारा सेन्सरही टाकला आहे. त्यामुळे तुम्ही या इको प्लसचा वापर करून तापमान एका ठराविक मर्यादेच्या वर गेल्यास आपोआप एसी सुरू करू शकता. २०१८ च्या आवृत्तीचे डिझाईन ॲमेझॉनने इको डॉट प्रमाणेच केले आहे. त्याची गोलाकार बाजू आता कापडी झाली असून हा काळ्या, पांढऱ्या आणि ग्रे रंगात उपलब्ध झाला आहे. भारतामध्ये याची किंमत १५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. 

इको सब
ॲमेझॉनने प्रथमच आपल्या इको मालिकेमध्ये एका सबवुफरची भर घातली आहे. सबवुफर एखाद्या साउंड सिस्टिममध्ये बेस देतो; म्हणजेच तो कमी फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकवणारा स्पीकर आहे. हा सबवुफर नवीन इको डॉट अथवा नवीन व जुन्या इतर इको स्पीकरबरोबर काम करतो. एक सबवुफर व दोन इको स्पीकरचा वापर करून तुम्ही एक चांगल्या प्रकारची साउंड सिस्टिम बनवू शकता. म्हणजे मग तुम्हाला वेगळी साउंड सिस्टिम घ्यायची गरजच नाही ! दुर्दैवाने अजूनही अशा प्रकारचे तयार झालेली साउंड सिस्टिम तुमच्या टिव्हीबरोबर वापरता येणार नाही. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा ॲमेझॉनने अजून घातलेल्या नाहीत. पण पुढील काही वर्षातच ॲमेझॉन त्या घालेल यात मला शंकाच नाही. याचे डिझाईनही ॲमेझॉनने इतर इकोप्रमाणेच केले आहे. त्याची गोलाकार बाजू कापडी आहे. या सबवुफरचा व्यास इतर इको स्पीकरच्या मानाने बराच मोठा आहे. सर्वसाधारण बाजारात मिळणारे सबवुफर हे सर्वसाधारण स्पीकरपेक्षा जास्त मोठेच असतात. भारतामध्ये हा सबवुफर १३ हजार रुपयांना उपलब्ध आहे. अमेरिकेत हा सबवुफर १३० डॉलर्सना उपलब्ध असून त्या बरोबर दोन इको घेतले तर तो २५० डॉलर्सना मिळतो. भारतात मात्र तो दोन इकोबरोबर सवलतीच्या दरात मिळत नाही. 

इको ऑटो
ॲमेझॉनने इको मालिकेत अजून एका नवीन उपकरणाची भर टाकली आहे. इको ऑटो या नावाचा एक नवीन छोटा इको स्मार्ट स्पीकर खास तुमच्या गाडीसाठी बनवला गेला आहे. गाडी चालवताना आपले दोन्हीही हात अनेक वेळा गिअर आणि स्टिअरिंग व्हीलमध्ये अडकलेले असतात. मग अशा वेळी गाणे बदलायचे कसे? इथे इको आणि अलेक्‍सा आपल्याला मदत करू शकेल. आवाजी आज्ञा देऊन तुम्ही गाणी अथवा रेडिओ स्टेशन बदलू शकाल. ॲमेझॉन इको ऑटो दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या कारला जोडता येतो. ३.५ मिलीमीटरचा ऑक्‍सिलरी जॅक वापरून अथवा ब्लूटूथ कनेक्‍शन वापरून. इको ऑटो तुमच्या फोनलाही कनेक्‍ट करतो व फोनमधून इंटरनेट वापरतो. इको ऑटोमुळे अलेक्‍सा जी इतर कामे करू शकते ती सर्वच कामे तुम्ही गाडी चालवताना करू शकाल ! उदाहरणार्थ तुम्ही गाडी गॅरेजमध्ये पार्क करण्यासाठी अलेक्‍साला आज्ञा देऊन गॅरेजचे दार उघडू शकाल! इको ऑटोमध्ये ॲमॅझॉनने तब्बल ८ मायक्रोफोन टाकले असून त्याची रचना खास कारसाठी करण्यात आली आहे. कारच्या सिगारेट लायटर कनेक्‍टरमधील वीजेवरून हा चालू शकतो. इको ऑटोमात्र भारतामध्ये उपलब्ध नाही. तो भारतीय गाड्यांसाठी नक्की कधी उपलब्ध होईल हे ॲमेझॉनने जाहीर केलेले नाही. अमेरिकेतही तो अजून उपलब्ध झालेला नाही, तो पुढील काही महिन्यात अमेरिकेत २० डॉलर्सला उपलब्ध होईल.  

इको शो
ॲमेझॉनचा इको शो. हा एखाद्या टॅब्लेटप्रमाणे दिसणारा स्मार्ट स्पीकर आहे. त्यातील व इको मधील मुख्य फरक म्हणजे त्याचा पडदा. पडद्यामुळे या इकोवर तुम्हाला प्राइम व्हिडिओ सेवेत उपलब्ध असलेल्या गोष्टी पाहता येतात, तुमच्या घराची बेल कोण वाजवते आहे (रिंग कंपनीची बेल असेल तर) पाहता येते, स्ट्रीमिंग सेवांचा वापर करून टीव्ही मालिका पाहता येतात आणि स्काइपचा वापर करून लोकांना व्हिडिओ कॉलही करता येतात. या वर्षीच्या इको शोमधील मुख्य बदल म्हणजे स्पीकर. मागच्या इको शोच्या तुलनेने ॲमेझॉनने या इकोमधील साउंड सिस्टिम चांगलीच बदलली आहे. या इको शोमध्ये दोन ड्रायव्हर स्पीकर, एक बेस रेडीएटर स्पीकर आणि डॉल्बी प्रोसेसिंग घातले आहे. त्यामुळे एखाद्या खोलीला भारून टाकणारा आवाज यातून येतो. तसेच तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग वापरून यातील कॅमेरा व मायक्रोफोन बंदही करता येतो. किंबहुना याचा वापर स्मार्ट होम हबसारखाही करता येतो. इको प्लसप्रमाणे यातही ॲमेझॉनने झिगबी सुविधा घातली आहे. झिगबी वापरणाऱ्या सर्व स्मार्ट उपकरणांना इको शो. करवी उघडबंद करता येते. हा इको शो., गुगलने अलीकडेच जाहीर केलेल्या गुगल होम हब या उत्पादनाशी स्पर्धा करतो. परंतु गुगल स्मार्ट होमपेक्षा यात जास्त चांगली साउंड सिस्टिम आहे. या ॲमेझॉनने ब्राउझरही घातला आहे, त्यामुळे कुठलाही वेबसाइट इको शो. चा वापर करून तुम्हाला पाहता येते. दुर्दैवाने हा इको शो. मात्र अजून भारतात उपलब्ध नाही. 

इको इनपुट, इको लिंक अँप
ॲमेझॉनने या वर्षी अजून इको इनपुट नावाचे नवीन उपकरण जाहीर केले आहे. याला स्मार्ट स्पीकर म्हणता येणार नाही, कारण यात स्पीकरच नाही. फक्त अलेक्‍साच आहे. अलेक्‍साची उत्तरे ऐकायला तुम्हाला याला दुसऱ्या स्पीकरला जोडणे आवश्‍यक आहे. तुमच्याकडे चांगला स्पीकर असेल तर त्यात अलेक्‍सा सुविधा घालण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. केवळ ३५ डॉलर्स किंमत असणारे हे उपकरण या वर्षाच्या शेवटी अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीत उपलब्ध होणार आहे. ॲमेझॉनने या वर्षी आपल्या इको मालिकेत चक्क एका अँप्लिफायरचीही भर घातली आहे. काळ्या बॉक्‍सप्रमाणे दिसणाऱ्या या अँप्लिफायरमध्ये दोन ६० वॉटची चॅनल्स आहेत. या अँप्लिफायरला ॲमेझॉनने इको लिंक अँप असे नाव दिले आहे. ही दोन्हीही उपकरणे भारतात यायला अजून वेळ लागेल.   

फोटो फीचर

संबंधित बातम्या