फेसबुक पोर्टल

वैभव पुराणिक
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

टेक्नोसॅव्ही
 

फेसबुक इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे बनवते हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल! २०१४ मध्ये फेसबुकने ऑक्‍युलस व्हर्च्युअल रिॲलिटी कंपनी विकत घेतली तेव्हाच फेसबुक इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे बनविणारी कंपनी झाली होती. परंतु ऑक्‍युलसच्या बाहेर मात्र फेसबुकने कधी इतर कुठली उपकरणे बनवली नाहीत. मात्र काही महिन्यांपूर्वी फेसबुकने पोर्टल नावाचा स्मार्ट डिस्प्ले बनवून अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे!

स्मार्ट डिस्प्लेवर मी या सदरातून अनेक वेळा लिहिले आहे. ‘ॲमेझॉनचा इको शो’ किंवा ‘गुगल होम हब’ यांना स्मार्ट डिस्प्ले म्हणता येईल. हे तुमच्या घरात एखाद्या टेबलावर अथवा किचनमधील काउंटरवर ठेवता येतात आणि यांचा वापर करून तुम्ही अनेक कामे करू शकता. मुख्य म्हणजे या डिस्प्लेबरोबर तुम्ही बोलू शकता! त्याला तुम्ही रेसिपी विचारू शकता, हवामान विचारू शकता, टायमर लावू शकता, दरवाजावर कुणी आले आहे हे कॅमेऱ्यामार्फत पाहू शकता. याच्या स्पीकरकरवी तुम्ही गाणी ऐकू शकता. एवढेच नव्हे तर एकमेकांना व्हिडिओ कॉलही करू शकता.

फेसबुकचा नवीन ‘पोर्टल’ नावाचा स्मार्ट डिस्प्ले हा मुख्यत्वे व्हिडिओ कॉलिंगसाठी बनवलेला आहे. ज्यांच्याकडे फेसबुक मेसेंजरचे अकाउंट असेल अशा लोकांना तुम्ही पोर्टलचा वापर करून कॉल करू शकता. इतर स्मार्ट डिस्प्ले आणि यातील एक मुख्य फरक म्हणजे यातील मानवी हालचाली टिपणारा कॅमेरा. या स्मार्ट डिस्प्लेसमोर तुम्ही इकडून तिकडे फिरत राहिलात, तरी कॅमेरा आपोआपच तुमच्या बरोबर फिरतो (एका मर्यादेत) आणि त्यामुळे तुम्ही आपापले काम करत एखाद्या व्यक्तीशी पोर्टलकरवी गप्पा मारू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही कचरा काढत असाल, तर तुम्ही जसजसे खोलीच्या वेगळ्या भागात जाता, तसतसे कॅमेरा आपोआपच तुमच्या बरोबर फिरतो आणि समोरच्या माणसाला तुम्ही नेहमीच दिसत राहता. तुम्ही कॅमेऱ्यापासून किती अंतरावर उभे आहात त्याप्रमाणे हा कॅमेरा डेप्थही जुळवून घेतो! त्यामुळे व्हिडिओ कॉलिंग करताना एका जागी बसायची गरज उरणार नाही! एवढेच नव्हे जर खोलीत एकापेक्षा जास्त माणसे असतील, तर तुम्ही ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोनदा बोट लावाल त्या व्यक्तीला कॅमेरा ट्रॅक करतो. माझे आईवडील जेव्हा माझ्या ४ वर्षाच्या मुलाशी व्हॉट्‌सॲप व्हिडिओ कॉलमार्फत बोलतात, तेव्हा तो फोनसमोर एक मिनीटही टिकत नाही! 

फेसबुक पोर्टल हे यावरचा रामबाण उपाय आहे! असे कॅमेरा ट्रॅकिंग वापरणे सक्तीचे नाही. जर तुम्हाला हे कॅमेरा ट्रॅकिंग बंद करायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता. फेसबुकने आपण टेलिव्हिजन आणि सिनेमासाठी काम करणाऱ्या व्यावसायिक कॅमेरामनच्या सल्ल्याचा पोर्टलचा कॅमेरा बनवण्यासाठी उपयोग केला आहे असे म्हटले आहे. ‘स्पॉटीफाय’ ही युरोप आणि अमेरिकेत उपलब्ध असलेले गाणी ऐकण्याचे प्रसिद्ध ॲप आहे.  ‘हे... पोर्टल’ असे म्हणून तुम्ही पोर्टलला एखाद्याला व्हिडिओ कॉल करायला सांगू शकता. समोरच्या माणसाकडे पोर्टल असण्याची गरज नाही. स्मार्टफोनमध्ये मेसेंजर ॲप असले तरीही पुरे आहे. अर्थातच पोर्टल असेल तर समोरच्या माणसालाही कॅमेऱ्यासमोर बसून राहायची गरज नाही. कॉलच्या दोन्ही बाजूला पोर्टल असेल, तर एकंदरीत कॉल अतिशय उत्तम दर्जाचा वाटतो. पोर्टलचा पडदा छान दिसतो व तुम्ही लांब गेलात तरीही चांगल्या दर्जाच्या मायक्रोफोनमुळे समोरच्याला तुमचे बोलणे नीट ऐकू येते. एकंदरीतच एक व्हिडिओ कॉलिंग उपकरण म्हणून पोर्टल चांगले काम करते. अजून एक उपयुक्त सुविधा म्हणजे पोर्टलच्या दोन्ही बाजूच्या व्यक्ती एखादे गाणे स्पॉटीफायचा वापर करून एकत्र ऐकू शकतात. एवढेच नव्हे, तर तुम्ही ते मोठ्या आवाजात ऐकू शकता आणि समोरचा माणूस ते कमी आवाजातही ऐकू शकतो. ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला व्हिडिओ कॉलतर्फे संभाषण करायचे आहे ती व्यक्ती प्रत्यक्ष त्या खोलीतच उपस्थित आहे असा आभास निर्माण व्हावा असा फेसबुकचा प्रयत्न आहे आणि त्यात फेसबुक यशस्वी झाले आहे.

पोर्टल दोन आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे. पोर्टल १९९ डॉलर्सना (अंदाजे १४,००० रुपये) अमेरिकेत उपलब्ध आहे तर पोर्टल प्लस ३४९ डॉलर्सना (अंदाजे २४,००० रुपये) उपलब्ध आहे. पोर्टलचे डिझाईन हे इतर स्मार्ट डिस्प्लेप्रमाणेच आहे. ॲमेझॉन इको शो प्रमाणेच पोर्टलला स्क्रीनच्या खाली स्पीकर व वर कॅमेरा लावलेला आहे. पोर्टलची स्क्रीन १० इंची आहे. पोर्टल प्लस मात्र इतर स्मार्ट डिस्प्लेपेक्षा दिसायला बराच वेगळा आहे. हा चक्क १८ इंच उंच आहे! एका उंच पट्टीवर चक्क १५.६ इंची पडदा बसवलेला आहे आणि हा पडदा उभा अथवा आडवा करता येतो. पट्टीच्या वरच्या बाजूला कॅमेरा बसवलेला आहे. पोर्टलच्या दोन्ही आवृत्तीबरोबर कॅमेरा झाकण्यासाठी एक झाकण फेसबुकने दिले आहे. पोर्टल प्लसचे स्क्रीन रिझोल्यूशन १९२० x १०८० एवढे आहे आणि पोर्टलचे रिझोल्यूशन मात्र ७२० पी. एवढेच आहे. पोर्टलचा स्पीकर १० वॉटचा असून, पोर्टल प्लसचा स्पीकर २० वॉटचा आहे. हे स्पीकर अगदीच कमी क्षमतेचे नसले, तरी ॲमेझॉनच्या इकोच्या तुलनेत ते तेवढे चांगले नाहीत. पोर्टलच्या दोन्ही आवृत्त्यांमधील कॅमेरा १२ मेगापिक्‍सेलचा असून तो समोरील १४० अंशामधील चित्र टिपू शकतो. पोर्टलचा कॅमेरा हा ॲमेझॉनच्या इको शोच्या ७ मेगापिक्‍सेलच्या मानाने नक्कीच चांगला आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे हा कॅमेरा तुम्ही जसे फिराल तसा आपला फोकसही फिरवतो. प्रत्यक्षात कॅमेरा फिरत नाही, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कॅमेऱ्याचा फोकस बदललेला दिसतो. फेसबुकने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वेगवेगळे फिल्टरही घातले आहेत. तुम्ही तुमचा चेहरा बदलून त्याजागी चक्क एका लांडग्याचा चेहरा दाखवू शकता! तुमच्या डोक्‍यावर एखादी मांजर बसली आहे असेही तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला आणि समोरच्या माणसाला हे दिसू शकते. एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या पडद्यावर इतरही अनेक गोष्टी ‘घालू’ शकता. यालाच ऑगमेंटेड रिॲलिटी असेही नाव आहे. प्रत्यक्ष आणि आभासी जगाची सरमिसळ आपल्याला ऑगमेंटेड रिॲलिटीच्या साहाय्याने करता येते. मुलांना गोष्ट सांगताना याचा छान उपयोग करून घेता येईल. 

एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेसबुकचे हे उपकरण आपल्या घरात वापरण्याइतका विश्वास लोक फेसबुकवर टाकतील का हा आहे. अमेरिकेत गेल्या दोन तीन वर्षात फेसबुकला प्रसारमाध्यमांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. केंब्रिज ॲनालिटीकानंतर फेसबुकने एकप्रकारे विश्वासार्हता गमावली आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यातून लोकांच्या व्हिडिओ कॉलिंगची माहिती फेसबुक नक्की कशी वापरणार यावरूनही थोडा गोंधळ उडाला आहे. प्रथम फेसबुकने आपण ही माहिती वापरणार नाहीच असा आभास व्यक्त केला. पण नंतर कॉलची वेळ आणि कुणाला कॉल केला आहे या माहितीचा वापर तुम्हाला जाहिरात दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो असे फेसबुकने म्हटले आहे. प्रत्यक्ष कॉलमध्ये काय घडले ती माहिती फेसबुक एनक्रिप्ट करते - म्हणजेच ती सुरक्षितपणे एका पोर्टलवरून दुसऱ्या पोर्टलवर पोचवते. त्या माहितीचा वापर फेसबुक कुठल्याही प्रकारे करत नाही असे फेसबुकने स्पष्ट केले आहे. परंतु त्यावर लोक विश्वास ठेवतील का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच फेसबुकने कॅमेरा झाकण्यासाठी खास झाकण पोर्टलच्या बॉक्‍समध्ये घातले आहे. तसेच मायक्रोफोन आणि कॅमेरा बंद करण्याची सुविधाही यात आहे. 

फेसबुकच्या या उपकरणाविषयी एकंदरीतच सर्वच प्रसारमाध्यामांचे बहुतेक बाबतीत एकमत आहे. या उपकरणाचा लोकांना फारसा उपयोग होणार नाही असे सर्वच म्हणताना आढळतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे या डिस्प्लेवर इतर ॲप फारशी उपलब्ध नाहीत. गाणी ऐकण्याची दोन तीन ॲप सोडल्यास इतर महत्त्वाची व नेहमी लागणारी ॲप यावर उपलब्ध नाहीत. नेटफ्लिक्‍स ॲप लवकरच पोर्टलवर उपलब्ध होणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकचा वेब ब्राउझर ॲप घालण्याचाही मानस असल्याचे सीएनबीसीने म्हटले आहे. स्मार्ट डोअर बेल व घरातील इतर स्मार्ट उपकरणांबरोबर पोर्टल चालत नसल्याने त्याचा तसाही उपयोग घरी करून घेता येत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपकरणात एकाऐवजी दोन व्हॉइस असिस्टंट आहेत. कॉल करण्यासाठी तुम्हाला ‘हे पोर्टल’ म्हणून पोर्टलचा स्वतः:चा व्हॉइस असिस्टंट वापरावा लागतो, पण इतर सर्व कामासाठी ॲमेझॉनच्या अलेक्‍साला साद घालावी लागते. अलेक्‍सा पोर्टलमध्ये अंतर्भूत आहे. पण वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारे हाक मारणे ग्राहकांसाठी सोयीचे नाही हे फेसबुकला एव्हाना कळून चुकले असेलच. आणि बहुतेक लोकांकडे ॲमेझॉनचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा इको असल्याने तुम्ही अलेक्‍सा म्हटलेत, की पोर्टल आणि ॲमेझॉन इको, दोन्हीही एकाच वेळी उत्तर देतात! या उपकरणाच्या उपयुक्ततेबाबत एकमत असले तरीही कॉलिंगसाठी हे सर्वांत चांगले उपकरण आहे यातही प्रसारमाध्यमांत दुमत नाही. पण फक्त उत्तम दर्जाचा व्हिडिओ कॉल करण्यासाठी इतके पैसे लोक द्यायला तयार होतील का - आणि तेही स्मार्टफोन व इतर स्मार्ट डिस्प्ले सहज उपलब्ध असताना, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या