किशोरवय आणि अश्लीलता 

डॉ. वैशाली देशमुख
गुरुवार, 23 जानेवारी 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

ओमीचा टॅब बाबांनी कशासाठी तरी घेतला, तर ‘सर्च हिस्टरी’मधे आपल्या वयात येऊ घातलेल्या मुलानं अश्लील व्हिडिओ पाहिला असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला तर ते बघून रडू यायला लागलं. काहीशी शरम, बराचसा राग, थोडा संकोच अशा नानाविध भावना त्यांच्या मनात फेर धरू लागल्या. त्यात अपराधीपणाची झाकही होती. ‘आपला’ मुलगा असं वागू शकतो? कुठं बरं चूक झाली असेल आपली? शिकवण्यात कमी पडलो की लक्ष कमी पडलं? मुळात इतकं घाणेरडं काहीतरी बघावंसं का वाटलं असेल त्याला? या वयात ही अक्कल बरी आली त्याला? आता पुढं? त्याच्याशी बोलावं की नको? असेल, तर काय आणि कसं?’ या सगळ्या विचारांनी ते इतके गोंधळून गेले की काय करावं, कशी प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना समजेना. विचारांती त्यांनी त्यावेळी तरी गप्प बसायचं ठरवलं आणि ते माझ्याकडं आले. 

अशा घटना आता अपवाद न राहता नित्यक्रम झालाय. किशोरवयीन मुला-मुलींशी क्लिनिकमध्ये, शाळांमध्ये बोलताना त्यातले कित्येक जण आपण हे पाहतो याचा अगदी खुलेपणानं स्वीकार करतात. मुलांमधलं उपजत कुतूहल किशोरवयात शिगेला पोचतं. ते शमवायला इंटरनेटची सहज उपलब्धता, किरकोळ किंमत आणि अपरिहार्य सार्वत्रिकता पूरक ठरते. 

पोर्नोग्राफीबद्दल खूप उलट सुलट मतप्रवाह आहेत. त्याच्या बऱ्यावाईट परिणामांविषयी अनेक संशोधनं झाली आहेत. पण त्याच्या निष्कर्षाविषयी तज्ज्ञांमध्येही एकवाक्यता नाही. अतिरेकी स्वरूपाची आणि विकृत लैंगिक उत्तेजना, स्त्रीविषयी गौणत्वाची भावना, हिंसक लैंगिक संबंधांना उत्तेजन अशा यातून उद्‍भवणाऱ्या गोष्टी काही मानवी परस्परसंबंधांसाठी बऱ्या नव्हेत. दुष्परिणामांची ही यादी आणखीही बरीच लांबलचक आहे. अश्लील फिल्म्स पाहणाऱ्या व्यक्ती लैंगिक संबंध ठेवण्यास लवकर सुरुवात करतात; त्यांना एकाहून अधिक जोडीदार असण्याचा, असुरक्षित संबंधांचा, लैंगिक दुर्वर्तनाचा आणि यौनरोग होण्याचा धोका असतो; त्यांचा सेक्सच्या बाबतीत काहीसा ‘कुछभी चलता है’ असा दृष्टिकोन असतो; जोडीदाराकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा अवास्तव असतात; त्या अनैसर्गिकतेला खतपाणी घालतात; असे निष्कर्ष काही अभ्यासांतून निघाले आहेत. 

त्याचबरोबर त्याच्या निरुपद्रवीपणाविषयीही तितक्याच अहमहमिकेनं बोललं जातं. मनातल्या लैंगिक ऊर्मींचा निरोगी निचरा यानं होतो असं काहीजणांना वाटतं. किशोरवयात लैंगिक शिक्षण देण्याचा छातीठोक मार्ग म्हणून काही याकडं पाहतात. लैंगिक जीवनाच्या मनोरंजनात ते भर टाकतं, ती एक लोकप्रिय करमणूक आहे, त्याच्या वापरामुळं लैंगिक विकृती येते असं कुठंही ठामपणे सिद्ध झालेलं नाही अशा त्याच्या बाजूनं बोलणाऱ्या कितीतरी विचारधारा आहेत. 

मात्र जेव्हा ही प्रेक्षकमंडळी अल्पवयीन असतील, तेव्हा याच्या कु-परिणामांविषयी काही शंकाच घेण्याचं कारण नाही. या फिल्म्स मुळात प्रौढ प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या असतात. प्रौढांनी हे पाहणं आणि अल्पवयीन मुलांनी पाहणं यात फरक आहे. आजचं पॉर्न हे अधिकाधिक हिंसक, बटबटीत आणि उघडंवाघडं होत चाललंय. नैसर्गिकतेकडून आत्यंतिक अनैसर्गिकतेकडं त्याचा प्रवास चालू आहे. तंत्रज्ञानात ज्या धडकी भरणाऱ्या वेगानं प्रगती होतेय त्यावरून आपल्याला अशीही भीती आहे की लवकरच यातली वास्तविकतेची भावना वाढत जाणार आहे. मुलं नुसती निष्क्रिय प्रेक्षक किंवा निरीक्षक न राहता त्या कार्यक्रमाचा आभासी भाग बनू शकणार आहेत. म्हणजे खऱ्याखोट्या आयुष्यामधल्या सीमारेषा यात फिकट होणार. आधीच किशोरांच्या मनात लैंगिक क्रिया ही फक्त एक धूसर कल्पना असते. त्यामुळं याचं आकलन होणं, ते पचवता येणं वाढत्या वयाच्या नाजूक मेंदूला कठीण जातं. आपापल्या क्षमतेप्रमाणं याचा अर्थ काढला जातो. त्यातून सुरू होतात लैंगिक प्रयोग, जे वयाला, विकासाच्या टप्प्याला अगदीच विसंगत असतात. 

अश्लील फिल्म्सचं व्यसन लागतं का? लागू शकतं. त्यांचा परिणाम काहीसा मादक द्रव्यांसारखा आहे. त्या बघण्यानं मेंदूमध्ये या द्रव्यांप्रमाणंच डोपामिन, ऑक्सिटोसीनसारख्या सुखद रसायनांचा स्राव होतो, जो माणसाला पुन्हा पुन्हा या दिशेनं वळवतो. दरवेळी, हरेक व्यक्त्तीला त्याचं व्यसन नाही लागत, पण काही जणांसाठी ते धोकादायक ठरू शकतं. 

दुसरं असं, की अशा साइट्स पाहणारी मुलं कायम कसल्यातरी दडपणाखाली वावरतात. मनात एक अपराधी भावना बाळगतात. आपण काहीतरी निषिद्ध करतोय ही टोचणी त्यांना असते.. आणि हे समजलं तर प्रौढांची प्रतिक्रिया काय होईल याची त्यांना कल्पना असते. बरं, विषय असा की सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. विचारणार तरी कुणाला? त्यामुळं चिंता, नैराश्य, एकाकीपणा या गोष्टींवर उतारा म्हणून मुलं याकडं वळली तरी त्यांच्यापासून त्यांची सुटका होतच नाही. 

या फिल्म्सच्या चित्रीकरणामागं अनेक भीषण गुपितं आहेत. त्यातली काही तर उघड गुपितं आहेत. अनेकांना वाटतं, की इतर फिल्म्सचं शूटिंग होतं तसंच यांचंही होत असेल. पण बहुतेक वेळा यात जुलूमजबरदस्ती केलेली असते. कधी असहायतेचा फायदा घेऊन, कधी मादक पदार्थांच्या अमलाखाली; तर कधी ब्लॅकमेलच्या बडग्याखाली. कधी परिस्थितीच्या रेट्याखाली, तर कधी गरजेच्या. अनेकदा त्यांचं चित्रीकरण लपवून छपवून, नकळत केलेलं असतं, उदा. ड्रग्जच्या अमलाखाली केलेल्या डेट रेपचं नकळत केलेलं चित्रीकरण. सगळ्यात घृणास्पद म्हणजे काही वेळा यात लहान मुलांचा वापर केलेला असतो. शिवाय कॅमेऱ्यासमोर आकर्षक दिसावं म्हणून केलेल्या प्रयत्नांत यात काम करणाऱ्यांचं शरीर शस्त्रक्रियांच्या, औषधांच्या माऱ्यानं जर्जर झालेलं असतं. 

वास्तवामध्ये दोन व्यक्तींमधली लैंगिक क्रिया ही काही फक्त शारीर पातळीवर होत नसते, त्यात अनेक भावना असतात. एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, एकमेकांच्या शरीराबद्दल आदर, काळजी, जिव्हाळा हे सगळं त्यातून व्यक्त होत असतं. खरं तर दोन व्यक्तींमधले हळुवार, पण चिवट बंध तयार होण्यात याचा महत्त्वाचा वाटा असतो. अर्थातच, अशा संबंधांना दोघांचीही पूर्वसंमती असणं फार महत्त्वाचं! अश्लील व्हिडिओजमध्ये मात्र या सगळ्याला फाटा दिलेला असतो. सगळा भर फक्त शारीरिक सुखसंवेदनांवर असतो. शिवाय स्त्री-पुरुषांमध्ये असणारं अधिकारशक्तीचं समीकरण इथं उघड उघड एका बाजूला, म्हणजे पुरुषांच्या बाजूला कललेलं असतं. त्यात स्त्रीला एखाद्या वस्तूप्रमाणं हीन वागणूक दिलेली दिसते. 

या सगळ्या कारणांमुळं निदान अविकसित, कोवळ्या मनांवर याचे गंभीर परिणाम होऊ नयेत यासाठी काही पावलं उचलायला हवीत. पण पॉर्न इंडस्ट्री हा एक फार वेगानं वाढणारा प्रचंड उद्योग आहे. त्यात अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. अर्थात त्यावर पूर्णपणे बंदी आणणं ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. शिवाय इंटरनेटचं मोहजाल अफाट गुंतागुंतीचं आहे आणि त्यात अनेक पळवाटा आहेत. त्याचं तंत्रज्ञान सतत उत्क्रांत होत आहे. त्यात आजची गोष्ट उद्या कालबाह्य झालेली असते. कायदे करताना आणि बंधनं घालताना याचं भान सोडून चालणार नाही. पोर्नोग्राफीवर काही देशांत कायद्यानं पूर्णपणे बंदी आहे, तर काही देशांत त्यावर काहीही बंधनं नाहीत. आपल्या देशात ‘माहिती तंत्रज्ञान २००० कायदा’ या कायद्याखाली अश्लील व्हिडिओज तयार करण्यावर आणि त्यांच्या प्रसारावर बंदी आहे. शिवाय अल्पवयीन, म्हणजे अठरा वर्षांखालील मुलांचा ज्यात वापर केला गेला आहे असे व्हिडिओज तयार करणं, त्यांचा प्रसार करणं, ते बघणं अथवा जवळ बाळगणं या सर्वच गोष्टी गुन्हा ठरतात आणि त्यासाठी कडक शिक्षा आहेत. 

एवढं करूनही मुलं कधी ना कधी, चुकून का होईना, असलं काहीतरी पाहणार; दोस्तांच्या दबावाखाली, इंटरनेटवर माहिती शोधताना, एखाद्या शिवीचा अर्थ शोधताना, स्कूल बसमध्ये, खेळाच्या मैदानावर, शाळेच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये... तरीही आपल्या हातात काही गोष्टी नक्की राहतात. आजकाल गूगलसारख्या बऱ्याच कंपन्यांनी फिल्टर्स तयार केलेत. ते वापरून काही आक्षेपार्ह शब्द, साइट्स ब्लॉक करता येतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणांना पासवर्ड ठेवता येईल, घरात सर्रास वायफाय चालू न ठेवता अधूनमधून वापरता येईल. पण हे उपाय अगदीच तात्पुरते आणि कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. कारण आजची मुलं यातून सहज पळवाटा शोधू शकतात. त्यामुळं कायदे आणि बंधनं यांच्या पलीकडं काहीतरी करणं आवश्यक आहे. 

सगळ्यात प्रभावी आणि टिकाऊ उपाय दिसून आलाय तो म्हणजे समाजात आणि मुलांमध्ये याविषयी जागृती करणं हा. साधारणपणे आपल्या मुलांच्या अशा वागण्याविषयी लक्षात आलं, तर पालक म्हणून आपण किती तीव्र प्रतिक्रिया देतो हे आपल्याला माहीत आहे. आधीच लैंगिकता हा विषय समजायला किंवा स्वीकारायला फारसा सोपा नाही. त्यात आपल्या पोटच्या मुलांकडं एक पूर्ण वाढ झालेली, लैंगिक भावना असलेली व्यक्ती म्हणून पाहणं हे कोणत्याही आईबाबांसाठी अवघडच. साहजिकच त्यामुळं अशा एखाद्या घटनेवरची त्यांची प्रतिक्रिया ही अतिशय पूर्वग्रहदूषित आणि तीव्र दिली जाते. चर्चा करणं, त्यामागची कारणमीमांसा जाणून घेणं आणि काहीतरी उपाय काढणं हे करण्यापेक्षा रागावणं, टीका करणं, टोकाची बंधनं घालणं हीच पहिली ऊर्मी येते. 

वयात येताना मनात उमलणाऱ्या लैंगिक भावनांबद्दल आपल्याकडून मुलांपर्यंत जर नकारात्मक संदेश गेले, तर तो मुलांवर अन्याय आहे खरं तर! ही अत्यंत नैसर्गिक असलेली उत्कट भावना योग्य प्रकारे हाताळावी कशी हे त्यांच्यापर्यंत पोचणं अधिक संयुक्तिक आहे. शरीरसंबंध ही फक्त एक यांत्रिक, शारीरिक क्रिया नाही हे कळायला हवं. त्यातले भावनिक पैलू, दुसऱ्याविषयी आदर, संमतीचं महत्त्व, हळुवारपणा आणि स्त्री-पुरुषांचा एकमेकांबाबत पूर्वग्रहविरहित दृष्टिकोन हे मुलांपर्यंत पोचलं नाही, तर आपण त्यांच्याकडून जबाबदार वागण्याची अपेक्षा कशी काय करू शकणार? स्वीकार, परवानगी, समाधान अशासारख्या गोष्टींचं महत्त्व टप्प्याटप्प्यानं अधोरेखित करता येईल का? आणि तेही शरमेचं, वैतागाचं, कटकटीचं न वाटता? 

जिथं जिथं मुलांना लैंगिकता प्रशिक्षण दिलं जात नाही, तिथं याचा जास्त गैरपरिणाम होतो असं दिसून आलं. कारण यात दाखवलेली लैंगिकता खरी नाही, ती एक काल्पनिक गोष्ट आहे हेच मुळी त्यांच्या लक्षात येत नाही. त्यातल्या चित्रणालाच ते अस्सल धरून बसतात आणि प्रत्यक्ष जीवनात ते अमलात आणू पाहतात. मुलांना योग्य काय, अयोग्य काय याविषयी माहिती देणं; लैंगिकता, शारीरिक बदल, शरीरशास्त्र याबाबतीत स्पष्टता देणं फार महत्त्वाचं आहे. माध्यमांमधून मिळणारी माहिती सारासार विचार करून, नीट पचवून कशी ग्रहण करावी हे शिकवू या ना मुलांना! आणि म्हणूनच पोर्न-साक्षरता, माध्यम साक्षरता अतिशय प्रभावी ठरतात. कित्येक मुलांना ते जे पाहतात ते पॉर्न आहे हे माहितच नसतं. कुतूहलापोटी किंवा चुकून पहिल्यांदा पाहिलं गेलेलं काहीतरी पुन्हा पुन्हा पाहिलं जातं. या विषयावर मुलांशी बोलायला हवं, यासाठी आणखी एक सबळ कारण. 

या सगळ्या क्षमतांनी मुलं जेव्हा सज्ज होतील, तेव्हा या माऱ्यानं गोंधळून न जाता, विचलित न होता त्याला यशस्वीपणे हाताळू शकतील.

संबंधित बातम्या