प्रश्नोपनिषद

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

जानकीची आई सांगत होती, ‘जानकी लहानपणी अखंड प्रश्न विचारायची; इतकी की तिला आम्हाला सांगायला लागायचं, ‘बाई गं, आता जरा गप्प बसायला काय घेशील?’ पण आता मात्र तोंड उघडून एक शब्द आमच्याशी बोलायचा म्हणजे हिच्या जिवावर येतं हो. तिनं आम्हाला काही विचारणं तर दूरच, पण आम्ही दहा प्रश्न विचारले की बाईसाहेब एक उत्तर देणार. म्हणजे हिला काही प्रश्न पडतच नाहीत की आपल्याला सगळं कळतं असा हिचा भ्रम झालाय?’ 

यावरचं जानकीचं स्पष्टीकरण असं - ‘एक तर माझे अनेक प्रश्न मुळात त्यांना त्रास द्यायला मी विचारते, असा त्यांचा उत्तर देताना आविर्भाव असतो. म्हणजे ते माझ्याकडं त्रासिकपणं, ‘आता काय?’ अशा नजरेनं बघतात किंवा ‘आत्ता मला वेळ नाहीये, मी घाईत आहे’ अशी माझी बोळवण करतात किंवा मला हा प्रश्न का पडला असेल असा त्यांना प्रश्न पडतो. ‘उगीच भलते-सलते प्रश्न विचारू नकोस’ असाही ते काही वेळा दम देतात आणि बहुतेकवेळा अत्यंत काळजीयुक्त सल्ले कम् लेक्चर द्यायला लागतात. खूप कमी वेळा असं होतं, की मी त्यांना काहीतरी विचारलंय आणि त्यांनी मला त्याचं थोडक्यात नीट उत्तर दिलंय. मग कुणी सांगितलंय उगीच त्यांचं ऐकून घ्यायला? हं, आता लहानपणी फार प्रेमानं ते माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे, म्हणजे तसा प्रयत्न तरी करायचे. पण हळूहळू ते बदलत गेलं. मला तर वाटतं मी काय प्रश्न विचारीन याची त्यांना चक्क भीती वाटायला लागली.. आणि खरं सांगू का, मला आता गरजच वाटत नाही त्यांना काही विचारायची. माझं दोस्तमंडळ आहे की त्यासाठी! आणि त्याहूनही खात्रीचा, गुप्तता राखणारा आणि कोणतीही उलटतपासणी न करणारा ‘गूगल’ आहे.’ 

या विषयावर रोहितचं मत आहे - ‘आम्ही काही प्रश्न विचारले, आईबाबांच्या प्रश्नांना उत्तर दिलं किंवा आमची मतं व्यक्त केली की त्या माहितीचा ते गैरवापर करतात. ती माहिती अनावश्यक प्रकारे, नको त्या वेळी वापरतात. एकदा त्यांनी विचारलं म्हणून मी सांगितलं की माझे काही-काही मित्र सिगरेट ओढतात. झालं, तेव्हापासून ते सारखं शंकेखोरपणे माझ्याकडं बघतात, मी झोपलो की माझं दप्तर तपासतात. मग कसा विश्वास ठेवायचा त्यांच्यावर?’ 

  
खरं तर प्रश्न विचारणं हे विचार करण्याचं, कुतूहल जिवंत असल्याचं लक्षण आहे. त्यासाठी खूप धाडस आवश्यक असतं. चित्रकार पाब्लो पिकासो म्हणाले होते म्हणे, की जन्मत: प्रत्येक मूल हे कलाकार असतं, अडचण फक्त हे कलाकारपण मोठेपणी टिकवून ठेवण्यात असते. त्याच धर्तीवर म्हणायचं झालं तर प्रत्येक मूल हे जन्मत:च प्रश्नकर्ता असतं, पण मोठं होईल तसतसे हे प्रश्न कुठं गायब होतात कोण जाणे! किशोरांबरोबर घेतलेल्या चर्चासत्रांत, कार्यशाळांमध्ये मुलं लिखित स्वरूपात खूप प्रश्न विचारतात. म्हणजे प्रश्न पडत नाहीत किंवा पडायचे थांबतात असं नक्कीच नाही. उलट किशोरवयात अंतर्बाह्य इतके बदल होत असतात, की नवनव्या शंका त्यांना घेरून टाकत असतात. सर्वाधिक बदल होत असतात ते जननसंस्थेत. अर्थात सगळ्यात अधिक प्रश्न या संस्थेविषयीच असणार! पण हा विषय म्हणजे लपवाछपवीचा, लज्जास्पद समजला गेलेला. मुलं प्रश्न विचारायला बिचकण्याचं हे एक महत्त्वाचं कारण असतं. दुसरं असं, की सर्वसाधारण समज असतो की प्रश्न विचारणं म्हणजे अज्ञानाची कबुली देणं! वर्गात प्रश्न विचारणं अवघड वाटतं कारण आपल्याला काहीतरी येत नाही याची जाहिरात केल्यासारखं झालं ते. शिवाय त्यांना अतिप्रिय असलेले मित्र-मैत्रिणी काय म्हणतील, हसतील की काय ही आशंका असतेच मानगुटीवर कायम. त्यामुळं प्रश्न विचारायला जीभ रेटत नाही. 

घरचे अडथळे निराळे असतात. आत्तापर्यंत मुलांना बऱ्यापैकी ‘स्व’ची जाणीव होऊ लागलेली असते. स्वत:ची अशी काही मतं तयार झालेली असतात. शिंगं फुटल्यावर आपल्याला सगळं कळतं असा ठाम समजही होतो. त्यातून पूर्वी प्रश्न विचारल्यावर आई-बाबांकडून मिळालेला कधी शाब्दिक, कधी अशाब्दिक तर कधी शारीरिक प्रतिसाद चांगलाच लक्षात असतो. काही वेळा एखाद्या विषयावर यापूर्वी कधीच बोलणं झालेलं नसल्यामुळं कसा प्रतिसाद मिळेल याची खात्री नसते. मग बोलावं की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. अशा सगळ्या अनिश्चिततेला तोंड देण्यापेक्षा सोपा मार्ग कुठला? तर मित्रमैत्रिणी किंवा गूगल! आणि त्याहूनही सोपं म्हणजे प्रश्न तसाच दाबून टाकणं. या अशा मार्गांचे फायदे कमी अन् तोटे जास्त आहेत हे आपल्याला माहीत आहे. 

पालकांसमोरचं पौगंडावस्थेतलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे संवादाचे ओघ वाहते ठेवणं, कोणताही संवाद करायला मुलं थबकणार नाहीत इतकं मुलांबरोबरचं नातं सुरक्षित करणं. मुलांनी प्रश्न विचारणं चालू ठेवावं यासाठीचे प्रयत्न बालपणापासूनच करावे लागतात, हे जरी खरं असलं तरी इट्स नेव्हर टू लेट! त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची याचं तंत्र मात्र या वयात बदलायला लागतं. कित्येकदा तर मुलांना उत्तराची अपेक्षाच नसते. आपलं कुणीतरी ऐकून घ्यावं इतकीच फक्त इच्छा असते. उदा. जिजा एक दिवस तणतणत घरी आली. आल्या आल्या ती आईला सांगायला लागली, ‘आज राजूचा मला खूप राग आलाय. इतका मूर्खासारखा वागत होता तो!’ आई म्हणाली, ‘जाऊ दे गं, लक्ष नको देऊस. इतर वेळी नीट वागतो ना? मग झालं तर.’ यावर जिजा अतोनात चिडली. ‘काहीही काय बोलतेस आई? जाऊ दे, तुला काही सांगण्यात अर्थच नाही.’ का बरं चिडली जिजा? आईनं दिलेलं उत्तर तिला इतकं का खटकलं? कारण ती आईला प्रश्न विचारतच नव्हती. ती फक्त एका घडलेल्या प्रसंगाविषयी बोलत होती. त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होती. आईचा हेतू चांगला होता यात काही शंका नाही. तिला जिजाच्या बोलण्यात ‘मी काय करू आता?’ असा प्रश्न जाणवला होता. म्हणून तिनं त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. खरं तर बऱ्याच वेळा अशा असतात, की किशोरांना फक्त ‘लाऊड थिंकिंग’ करायचं असतं. पण लहानपणापासूनच्या सवयीनं आपण त्यांच्या प्रत्येक समस्येला ताबडतोब उत्तर द्यायला जातो आणि संवादाचं गाडं बरोब्बर त्या दलदलीत फसतं. 

मुलांकडून येणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत जितकं उदारमतवादी राहायला लागतं, तितकंच किंवा थोडं अधिकच, पालकांना मुलांना प्रश्न विचारताना सावध राहायला लागतं. काय अन् कसं विचारायचं यावर बरीच बंधनं घालून घ्यावी लागतात. वैताग, घाई, अवाजवी टीका, थेट नकार या सगळ्यावर काळजीपूर्वक काट मारायला लागते. प्रश्न उलटतपासणीच्या स्वरूपात बिलकूल असायला नकोत. त्यांची पुनःपुन्हा पुनरावृत्ती होता कामा नये. ते मुलांचा हिरमोड होईल, अपमान होईल असे नकोत; त्यांची अवाजवी चेष्टा करणारे, त्यांना खाली पाडणारे नकोत. या वयात मुलं काहीशी स्वकेंद्रित होतात. त्यांना त्याचं खासगीपण जपायचं असतं. त्या नादात पूर्वीसारखी त्यांच्या प्रत्येक क्षणाची माहिती पालकांपर्यंत पोचत नाही. जेवढ्यास तेवढं उत्तर मुलांकडून येतं. साहजिकपणे थोडी माहिती मिळवण्यासाठी अनेक प्रश्न खर्ची घालायला लागतात. मग बऱ्याच वेळानंतर मुलं भेटली, की आपली प्रश्नांची फैर सुरू होते. खूप प्रश्न विचारले तरच मुलांकडून माहिती मिळवता येते असं नाही. उलट त्यानं मुलं मिटून जाण्याची शक्यता बळावते. त्यामुळं हे प्रश्न कमीत कमी असायला हवेत. मुलांबरोबरचा संवाद हा फक्त आणि फक्त प्रश्नांच्या स्वरूपात तर होत नाहीये ना याची खातरजमा करायला हवी. एका वडिलांची या विधानावरची प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती, ‘अहो, प्रश्न विचारायचे नाहीत तर मुलांशी बोलायचं तरी काय?’ कारण मुलं मोठी होतील तशी ‘आज शाळेत काय झालं?’ ‘अभ्यास केलास का?’ ‘आईला त्रास नाही ना दिला?’ ‘मार्क्स किती पडले?’ असे प्रश्न विचारण्याइतकीच बाबांची भूमिका हळूहळू मर्यादित व्हायला लागते असं त्यांना वाटायला लागलं होतं. 

बापरे, म्हणजे किशोरांच्या प्रश्नांना हाताळणं हे फारच तलवारीच्या धारेवर चालल्यासारखं आहे! आधी ते खरंच काही प्रश्न विचारतायत का याची खात्री करा, मग त्यांना नक्की काय विचारायचं आहे यावर नीट विचार करा, त्यानंतर त्यांना पटेल, रुचेल अशा प्रकारे उत्तर द्या... आणि वर त्यांना प्रश्न विचारताना अगदी सखोल काळजी घ्या... पालकांसाठी हे अर्थातच सोपं नसतं. त्यांच्याही मनात काही धाकधूक असते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, तर मुलांची निरागसता हरवून जाईल की काय अशी भीती असते. त्यापेक्षा अज्ञानातलं सुख बरं, असं वाटतं. पण अज्ञान आणि निरागसता यात फरक आहे. अपराधी भावना आणि शरम यांपासून मुक्तता म्हणजे निरागसता आणि त्यासाठी मुळात प्रश्न विचारायला हवेत. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या अनेक आरोग्यविषयक संस्थांनी किशोरवयातल्या प्रश्नांचं महत्त्व जाणलं आहे. या वयात प्रश्न विचारायची संधी मिळाली नाही किंवा पडणाऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरं, योग्य वेळी मिळाली नाहीत तर या अज्ञानात सुख मिळत नाहीच पण निश्चितच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. प्रश्न दाबून ठेवले, तर फार गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. चुकीची किंवा अर्धवट माहिती मिळाली तर धोके घेण्याची, प्रयोग करण्याची या वयातली उपजत प्रवृत्ती डोकं वर काढू शकते. कितीतरी मुलं स्वप्नावस्था किंवा लिंगाचा/स्तनांचा आकार याविषयीच्या गैरसमजातून कुढत राहतात. एखाद्या असुरक्षित लैंगिक संबंधानंतर इंटरनेटवर माहिती काढून गर्भपाताच्या गोळ्यांचा सर्रास संततिप्रतिबंधक म्हणून वापर केला जातो, त्याच्या साइड इफेक्ट्सच्या माहितीकडं मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं. सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपलोड केलेले फोटो आपण नंतर डिलीट करून टाकले, की काही प्रॉब्लेम येत नाही, असं कुणा मैत्रिणीनं सांगितलेलं असतं म्हणून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो आणि खासगी फोटो टाकले जातात. कधी कुतूहल शमवण्यासाठी लैंगिक प्रयोग केले जातात, कधी आजार लपवले जातात; तर कधी व्यसनांमध्ये तणावमुक्ती शोधली जाते. 

आईबाबांना मुलांपर्यंत काही सावधगिरीच्या सूचना पोचवायच्यात? त्यांच्याकडून काही माहिती काढून घ्यायचीय? त्यांची मतं समजून घ्यायचीत? मग प्रश्नांचा भडिमार आखडता घ्यायला हवा. त्यांच्याबरोबर सहज, अहेतुक वेळ घालवला, त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, त्यांना बोलायची, व्यक्त व्हायची संधी दिली आणि मुलखावेगळं वाटलं तरी त्यांचे दृष्टिकोन स्वीकारले तर या सगळ्या गोष्टी फार प्रश्न न विचारताही साध्य होऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरं देण्यापेक्षा हलकेच दिशा देऊन त्यांनाच उत्तरं शोधायला मदत केली तर ते अधिक फलदायी होऊ शकतं. बाळकृष्णानं ‘आ’ वासला तेव्हा यशोदेला विश्वरूपदर्शन झालं म्हणे. मुलांच्या प्रश्नांमधून त्यांच्या अद्‍भुत विश्वाची अशी एखादी झलक आपल्याला नक्कीच दिसेल.

संबंधित बातम्या